🔴 "कृपया गेट बंद करा"
"गेट बंद करा." हे वाक्य वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, नाही का? एखाद्या लेखाचं नाव असं असेल, असं मलाही कधी वाटलं नव्हतं. पण शाळेतून घरी परतल्यावर जिने चढता चढता घराचं गेट दिसलं, आणि ते बंद करण्याची सूचना मिळाली. ही सूचना माझ्या बाबांनी दिली होती. आज बाबा हयात नाहीत, पण त्यांनी लिहिलेली ती सूचना जिन्याच्या भिंतीवर अजूनही तशीच आहे. ती वाचताना मला नेहमी त्यांची आठवण येते.
गाडी लावताना बाबांची आठवण, गाडीवर कव्हर व्यवस्थित घातलं नसलं तरी बाबांची आठवण, जिथे गाडी लावली तिथे कचरा काढला नाही तरी बाबांची आठवण, आज अमावस्या आहे आणि गाडीला लिंबू-मिरची लावली नाही तरी बाबांची आठवण... एक नाही, अशा अनेक बाबांच्या आठवणी जागोजागी पेरलेल्या आहेत. या सर्व ठिकाणांहून मी जेव्हा जेव्हा फिरतो, तेव्हा तेव्हा बाबांचं अदृश्य रूप मला जाणवत राहतं. माझे बाबा २६ जुलै २०२४ रोजी आम्हाला सोडून गेले, मागे या सगळ्या आठवणींचा ठेवा ठेवून.
सकाळी दरवाजा उघडला की मला वाटतं बाबा रोज येतात. बाहेर कावळ्यांचा आवाज ऐकताना मला बाबांच्या आठवणींना उजाळा मिळतो. ते आपल्यातून गेले असं मला वाटत नाही; ते नेहमीच माझी सोबत करतात. मी चुकतो तेव्हा माझी सोबत करतात, मी बरोबर असतो तेव्हा माझ्या पाठीशी असतात. ते नेहमी म्हणायचे, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणूनच मी कधीच घाबरत नाही, कारण मला माहीत आहे की ते नेहमीच माझ्या पाठीशी आहेत.
वर्षश्राद्ध होऊन एक आठवडा झाला असेल. वर्षश्राद्धाच्या दिवशी बाबा नेहमीप्रमाणे रात्री माझ्या वहिणीच्या अंगात आले होते. माझ्या सगळ्या बहिणी आणि घरातील सर्व मंडळी बाबांच्या येण्यासाठी आतुर झाली होती. बाबा आमच्या सर्वांशी बोलले. त्यांचं असं येणं आमच्यासाठी नेहमीच डोळ्यात पाणी आणणारं असतं. पण त्या दिवशी बाबांनी माझा हात हातात घेतला आणि तो सोडेनात. माझ्या हातावर त्यांनी माझ्या भावाचा हात ठेवला आणि भावाच्या हातावर काकांचा हात ठेवून सांगितलं, "तुम्ही तिघेजण कायम एकत्रच राहा."
बाबांनी हे आमचं एकत्र कुटुंब टिकवण्यासाठी पराकाष्ठा केली आणि ते त्यात यशस्वीही झाले. त्यांनी सांगितलेलं हे वाक्य प्रत्यक्ष कृतीत आणण्यासारखं आणि कायमचं लक्षात ठेवण्यासारखं होतं. मी त्यांचे सगळे शब्द अगदी जसेच्या तसे जपून ठेवले आहेत आणि कायमच जपणार आहे.

No comments:
Post a Comment