🔴 माझ्या जीवनाची आधारशिला : प्राथमिक शिक्षक पतपेढी
मी १९९८ साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. दोन वर्षांनी माझं लग्न ठरलं. तेव्हा शिक्षक असलो तरी पगार जेमतेमच होता. अशा परिस्थितीत कर्ज काढल्याशिवाय लग्न करणं निव्वळ अशक्य होतं.
सुदैवाने, मी आमच्या प्राथमिक शिक्षक पतपेढीचा सभासद होतो आणि त्यामुळेच मला तातडीने कर्ज मिळू शकलं. दोन शिक्षक मित्रांनी जामीन दिल्यावर अवघ्या काही दिवसांतच पन्नास हजार रुपयांचं कर्ज माझ्या हातात पडलं. त्या पैशातूनच माझं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यावेळी तो खर्चही मला खूप मोठा वाटला होता.
माझी पत्नीही शिक्षिका होती आणि तिलाही कर्ज काढायचं होतं. तिने कधीच कर्ज काढलं नव्हतं, त्यामुळे तिने माझं मार्गदर्शन घेतलं. माझ्या सल्ल्यानुसार, तिनेही साठ हजार रुपयांचं कर्ज काढलं. आम्हा दोघांनाही आमच्या शिक्षक बँकेने लग्नासाठी त्वरित मदत केली. त्यानंतर जेव्हा जेव्हा आर्थिक गरज भासली, तेव्हा सहा महिन्यांनीही मी कर्ज काढलं. कोणतंही आर्थिक संकट आलं की, बँक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आजही मला कधीही गरज भासली, की बँकेचे दरवाजे माझ्यासाठी सदैव खुले असतात.
आमच्या कुटुंबातील तब्बल १६ ते १७ लग्नं, दोन वेळा घरांची उभारणी, कणकवलीत खोली घेणं, सलून दुकान सुरू करणं... अगदी वैद्यकीय अडचणींमध्येही बँकेनेच आम्हाला आधार दिला. मी कधीच दुसऱ्या बँकेच्या दारावर गेलो नाही. माझी प्राथमिक शिक्षक बँक नेहमीच नियमानुसार सेवा देत राहिली आणि मीही नियमाने कर्ज घेत राहिलो. आजही मी माझ्या बँकेच्या ऋणात आहे.
आज माझ्या बँकेने मला सन्मानपूर्वक बोलावून घेतलं, शाल, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन माझा सत्कार केला. हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता. मी माझ्या प्राथमिक शिक्षक बँकेचा सदैव ऋणी राहीन. ही बँक होती म्हणूनच आज मी सुरक्षित आणि समाधानी जीवन जगतोय. तिच्या मदतीनेच मला आयुष्यात खूप काही साध्य करता आलं.
माझी बँक सदैव चिरायू होवो, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो!
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १





No comments:
Post a Comment