Saturday, July 12, 2025

🔹करसिव्ह आणि मी: एका शिक्षकाच्या आठवणी

🔹करसिव्ह आणि मी: एका शिक्षकाच्या आठवणी

         मी आठवीत असताना, कणकवलीच्या एस.एम. हायस्कूलमध्ये खामकर सरांनी आमच्यात करसिव्ह इंग्लिश रायटिंगची आवड निर्माण केली. मुख्याध्यापक असलेल्या खामकर सरांनी स्वतःच्या खर्चाने आम्हा प्रत्येकाला 'सुलेखन पुस्तिका' दिल्या. त्यातील सुंदर इंग्रजी अक्षरांनी मला भुरळ घातली. मी मूळतः अभ्यासू असल्यामुळे, जे दिसेल ते जसेच्या तसे उतरवण्याचा माझा प्रयत्न असे. माझे मराठी अक्षर आधीपासूनच वळणदार होते, तरीही मी त्यात सतत नवनवीन प्रयोग करत राहिलो. अक्षरातील या बदलांमुळे माझे खरे अक्षर कोणते, हे मलाही कळत नसे. पण लहानपणापासूनच मला लेखनाची आवड असल्याने, आजही माझा हा छंद मी जोपासत आहे याचा मला आनंद आहे.

         खामकर सरांनी आमच्याकडून रनिंग इंग्लिश लिपीचे अनेक कित्ते गिरवून घेतले. त्या कित्त्यांमध्ये सुंदर सुविचार असत. सुरुवातीला त्यांचे अर्थ कळत नसले तरी, हळूहळू मला त्या इंग्रजी विचारांचा अर्थ उमजू लागला. लिहिणे आणि समजणे या दोन्ही क्रिया खामकर सर आमच्याकडून एकाच वेळी करून घेत होते, हे आज मला समजते. त्यांनी कधीही सलग शिकवले नाही; फक्त आमच्याशी सलगी साधून बोलले. मुख्याध्यापक असूनही ते आमच्याशी इतके आपलेपणाने वागत, याचाच आम्हाला आनंद असे. त्यांच्याकडे पाहूनच आमचे शिक्षण होऊ लागले. हरीच्या कॅन्टीनमधून भजी तळण्याचा वास आला की सर आम्हा सर्व मुलांना भजी खाऊ घालत. पैसे नेहमी सरच देत; आम्ही कधीही पैसे दिले नाहीत. शिकवणे, खाणे आणि पुस्तके - सर्व काही फुकट! आज असे कोणी करत असेल यावर विश्वास बसणार नाही. पण खामकर सरांनी आमच्या भल्यासाठी आणि आमच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी आपले जीवन वाहिले, असे म्हणायला हरकत नाही. ते सर्व प्रकारच्या मुलांमध्ये रमणारे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे आम्ही विद्यार्थी त्यांच्या जवळ जायला कधीच घाबरत नसू.

         मी उत्तम करसिव्ह लिहायला लागलो. माझे अक्षर संपूर्ण शाळेत गाजले. आठवी आणि नववीचे सर्व इंग्रजी पेपर्स मी करसिव्हमध्येच लिहिले. आमचे इंग्रजीचे सर माझे अक्षर पाहून खूप खुश होत आणि त्यामुळे मला नेहमी इतरांपेक्षा जास्त गुण मिळत. दहावीत आलो, तेव्हा माझ्या वर्गशिक्षकांनी मला एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "प्रवीण, तुझे अक्षर सुंदर आहे यात शंका नाही. पण तुझी ही लिपी दहावीच्या बोर्डाचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकाला वाचता आली नाही तर काय होईल? तुझे मार्क्स कमी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याऐवजी, तू साध्या लिपीत लिहायला सुरुवात कर." त्यांनी दिलेला सल्ला मला पटला. मी पुन्हा साधे इंग्रजी लिहू लागलो, पण कधीतरी गंमत म्हणून करसिव्ह लिहिणे मात्र सुरूच ठेवले.

         एकदा मी माझ्या मोठ्या बहिणीच्या वहीवर रनिंग लिपीत तिचे नाव लिहून दिले होते. कणकवली कॉलेजमधील तिच्या प्राध्यापकांनी ते पाहिले. माझी बहीण 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) मध्ये शिक्षण घेत असताना, त्यांच्या शिबिरे होत असत. त्यांच्या स्पर्धा झाल्या की, करसिव्ह लिपीत सर्टिफिकेट बनवण्याचे काम मला मिळे. हे काम मी आनंदाने दोन-तीन वर्षे केले असेल. आज, शिक्षक म्हणून पुन्हा वर्गात मुलांना 'करसिव्ह' लिपी शिकवताना, या सर्व घडामोडी माझ्या डोळ्यासमोरून सरकल्या आणि आता त्या शब्दबद्धही झाल्या.

लेखक: प्रवीण अशितोष कुबलसर

मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग




No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...