गुरुपौर्णिमा: गुरुवंदनेचा अनुपम सोहळा!
आज, गुरुवारी, १० जुलै २०२५ रोजी सकाळपासून सुरू झालेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छांचा ओघ अजूनही थांबलेला नाही. खरं तर, रात्री उशिरापर्यंत हे प्रेमळ संदेश येतच राहतील. आम्हा शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे उत्साहाचा आणि आनंदाचा एक अद्वितीय सोहळा असतो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून मिळणारी गुरुवंदना शिक्षकी पेशाचं सार्थक करून जाते. जेव्हा ती गुरुवंदना मिळते, तेव्हा मनात एक आगळीच कृतज्ञता आणि समाधान दाटून येतं.
या गुरुपौर्णिमेचं मला नेहमीच अप्रूप राहिलं आहे, कारण या निमित्ताने अनेक आदरपूर्वक संदेश प्राप्त होतात. हे संदेश पाहून अजूनही लोकांचा शिक्षकांवरील विश्वास कणभरही कमी झालेला नाही, हे स्पष्ट होतं. जगात असंख्य लोक गुरूला आपला आदर्श मानतात आणि आपल्या भारतीय संस्कृतीत तर गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पारंपरिक गुरुजी, बाई आता नवीन पिढीचे 'सर' आणि 'मॅडम' झाले असले तरी, गुरुजींची क्रेझ आजही तितकीच आहे! काही गावांमध्ये तर गुरूंना देवाइतकं वंदनीय मानणारे लोक आहेत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांना याचा अनुभव अधिक तीव्रतेने येतो. गावातील लोकांनी दिलेला आदर स्वीकारत हे शिक्षक जेव्हा शहराकडे येतात, तेव्हा मात्र आदरात काहीशी कमतरता जाणवते. यामागचं कारण काय असावं बरं?
शहरातील जास्त शिकलेल्या माणसांना वेळेचा अभाव असतो, कदाचित यामुळेच त्यांना आदर व्यक्त करण्याची आठवण होत नसेल. कामांच्या गडबडीत आदर देणं हे एकच काम नसतं, हे खरंय. पण गेली अनेक वर्षे खेड्या-पाड्यांत काम करणारा मी मात्र शहरात नोकरीसाठी न आल्याबद्दल धन्यता मानतो. कारण इथला माणुसकीचा ओलावा आजही टिकून आहे.
सकाळी शाळेत जायला निघालो. माझ्या शाळेतील गुरुजनांसाठी भेटवस्तू घेतल्या होत्या. महर्षी व्यासांनी 'महाभारत' सांगितले आणि ते गणपतीने लिहिले. म्हणूनच मी ठरवले होते की, माझ्या शाळेतील गुरुजनांना गणेश मूर्ती भेट द्यावी. जाताना कार्यक्रमाची रूपरेषा डोळ्यासमोर तरळत होती. कासार्डे जवळ आले होते. अचानक RTO वाहतूक पोलिसांनी हात दाखवला. मी माझी टू-व्हीलर थांबवली. त्यांच्याशी आदरपूर्वक बोललो आणि त्यांनीही आदरानेच प्रतिसाद दिला. त्यांनी माझ्या गाडीचा नंबर स्कॅन केला. माझ्या गाडीची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत असं मला वाटत असतानाच, त्यांनी PUC नसल्याचं सांगितलं. मी पाकिटातून PUC चा पिवळा कागद काढला, पण तो माझ्या दुसऱ्या गाडीचा, स्कूटरचा निघाला.
साहजिकच, तो ग्राह्य धरला गेला नाही. मला दंड भरावा लागणार हे निश्चित होतं आणि मी तो भरण्यास लगेच तयार झालो. ते पोलीस अधिकारीसुद्धा हसत म्हणाले, "सर, तुम्हाला फक्त ५०० रुपये भरावे लागणार!" मी भरतो म्हणालो आणि त्यांनी पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे, इतके दिवस मी त्या रस्त्याने जातो, पण मला कधीच त्यांनी अडवले नव्हते. आज मला एक वेगळीच 'गुरुवंदना' मिळाली होती. जणू मीच त्यांना माझ्या अनुभवाची 'गुरुदक्षिणा' दिली होती! माझ्या चेहऱ्यावर दंड भरल्याचा लवलेशही नव्हता, कारण कधीतरी आपण असे सापडू शकतो याचा एक चांगला अनुभव आज मला मिळाला होता. या घटनेवर हसत हसतच मी शाळेच्या दिशेने निघालो.
शाळेच्या कार्यालयाच्या बाहेर रेनकोट काढायला थोडा वेळ लागला. कार्यालयात शिरलो, तर काय सातवीच्या मुली धावतच बुके हातात देत, "सर, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!" म्हणत स्वागत केले. मी अक्षरशः भारावून गेलो! सातवीच्या मुली खरंच भारी आहेत, कधी सरप्राईझ देतील सांगता येत नाही. आता मी आनंद ओसंडून परिपाठ कक्षाकडे वळलो. वरुणकर मॅडमनी वर्गात शिरताच मला शुभेच्छा दिल्या आणि नमस्कारही केला.
तेवढ्यात हेमा वंजारी मॅडम नमस्कार करू लागल्या. त्यांच्या डोक्यात माळलेली दोन गुलाबपुष्पे नमस्कार करताना माझ्या पायावर पडली. किती अद्भुत क्षण! वर्गात पाऊल टाकताच सगळी मुले भेटवस्तू देण्यासाठी आधीच आतुर झाली होती. त्यांनी भराभर पायाला डोके लावून नमस्कार करायला सुरुवात केली. सर्वांनी सुंदर भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू खऱ्या अर्थाने अनमोल होत्या, कारण त्यामागे देण्याचा निष्पाप भाव होता. मला आज खूपच सुंदर वाटले.
मीही माझ्या आयुष्यातील माझ्या गुरूंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. माझे अनुभव सांगितले. सर्व शिक्षकांनीही आपले अनुभव शेअर केले. तेव्हा त्यांच्यातील आदर्श शिक्षकाला मी नव्याने पाहू शकलो. माझ्यासारख्या शिक्षकाला अशी गुरुपौर्णिमा सतत यावी असं वाटलं नाही, तरच नवल!
लेखक : प्रवीण अशितोष कुबलसर, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment