Monday, February 28, 2022

🛑 महिला मेळावा : आनंदाचा सोहळा

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेचा मेळावा संपन्न होताना आरंभापासून समारोपापर्यंत थांबण्याचा अविस्मरणीय योग आला. अर्थात तालुका प्रसिद्धी प्रमुख असल्यामुळे थांबावे लागले असे मी अजिबात म्हणणार नाही. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी पूर्ण करणे हे काम मी उत्साहाने करत असलो तरी संध्याकाळी साडे सहा वाजले तरी अजिबात कंटाळा आला नाही. 

          कार्यक्रमाला उपस्थित राहायला थोडा उशीरच झाला होता. गडबडीत कार्यक्रमस्थळी निघालो. तालुकाध्यक्ष विनायक जाधवसरांचा फोन आला. " प्रवीणभाई , येताय ना ? " गाडीवर असताना फोन उचलणे चुकीचे आहे , पण " हा काय मी निघालो " असं सांगत दोन मिनिटांत पोहोचलो सुद्धा. मराठा मंडळ महिलांच्या आवाजाने गजबजलेले दिसत होते. फेटे घातलेल्या महिला शिक्षिका उत्साहात दिसत होत्या. मी गेल्या गेल्या त्यांचे फोटो घ्यायला सुरुवात केली. मला प्रत्येक घडामोडीचा क्षण टिपायचा होता. प्रत्येक महिला शिक्षिकेच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद कॅमेऱ्यात अचूक टिपणं मला किती जमलं मला माहित नाही ? मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो. 

          गरमागरम चहा घेण्याचा आग्रह झाला. मस्त वाफाळलेला चहा घेतला. स्वागत कक्षात महिलांची नोंदणी सुरु झाली होती. समोसा खावासा वाटत होता , पण भरपेट नाश्ता उगीच करुन गेलो असे वाटून गेले. सभागृहात गेलो. व्यासपीठ सुंदर सजवले गेले होते. फोटोतल्या सावित्रीबाई फुले , रॉड्रिग्जगुरुजी , शिंपीगुरुजी आणि कुसुमाग्रज यांच्याकडे बघून खूप आनंद झाला. ज्यांच्या चरणी कायम नतमस्तक व्हावे अशी ही व्यक्तिमत्त्वे दिवसभर आमच्यामध्ये होती याचाही आनंद वाटत होता. 

          काही मिनिटांत कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालक ज्योत्स्ना चव्हाणमॅडम मधुर स्वरात मान्यवरांना आसनस्थ होण्यास सांगत होत्या. सुरुवातीलाच हल्लीच देहावसान झालेल्या विभूतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि मंगलध्वनीच्या सुरात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मान्यवरांच्या स्वागतासाठी महिला उत्सुक झाल्या होत्या. सुंदर समुहसुरात गायिलेल्या महिलांच्या स्तवनाने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली. त्यानंतर मराठी भाषेचे गोडवे गाणारे समुहगीत सादर झाले. सूर , लय , ताल यांचा त्रिवेणी संगम झाल्याचे दिसत होते. 

          मी आपला जसे मिळतील तसे फोटो काढत होतो , व्हिडीओ बनवत होतो. मी कुठेही कसाही फिरत असलो तरी माझी कोणालाच अडचण होत असल्याचे सांगितले जात नव्हते. कदाचित माझ्या मध्येच असण्याचा त्रास अनेकांनी सहन केला असेल तर त्यांची मला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते. 

          मुख्य पदाधिकारी महिलांनी सर्व मान्यवरांचे केलेले स्वागत आणि त्यांचा केलेला सत्कार सर्वांच्या दीर्घकाळ टिकणारा असाच होता. सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना दिसत होता. शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि पुस्तकाची भेट असे आगळे वेगळे सत्काराचे स्वरुप होते. 

          कल्पना मलये यांनी लेखिकेला साजेल अशा साहित्यिक भाषेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांनी केलेल्या भाषणात महिलांबद्दलचा आदर ओसंडून वाहताना दिसत होता. शेकडो महिलांची उपस्थिती व्यासपीठाला अधिकाधिक आनंदित करताना दिसत होती. कणकवली शाखेच्या अनेक शैक्षणिक , सामाजिक उपक्रमांबद्दल सर्व वक्त्यांनी तोंड भरुन कौतुक केले. जिल्हा पदाधिकारी यांनी कणकवली शाखेचे विशेष कौतुक केले. राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी ' पुन्हा पुन्हा येऊ ' असेही सांगितले. सर्व पदाधिकारी भरभरुन बोलत होते. महिला त्यांचे शब्द अगदी कान देऊन टिपून घेताना दिसत होत्या. निकिता ठाकूर आणि त्यांच्या टीमचे काम बघून तर सर्वांनीच तोंडात बोटे घातली असतील. मानसोपचार तज्ज्ञ पियुषा प्रभुतेंडुलकर यांचे मार्गदर्शन सुरु व्हायला थोडा उशीरच झाला होता. भोजनाची वेळ आली असतानाही सर्व महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा आग्रह धरला. ताणतणावाचा सामना कसा करावा आणि आपल्या शालेय जीवनात येणाऱ्या ताणाला कसे दूर ठेवावे हे ऐकताना सर्व महिलांनी सुसंवाद साधला. तीन वाजता जेवतानाही कोणीही कंटाळलेले दिसले नाही हे विशेष. 

          दुपार सत्रामध्ये महिलांचे फनिगेम्स सुरु झाले. यांत सर्वांनी सहभाग घेतला होता. एका गेम मध्ये तरी भाग घेण्याचे प्रत्येक महिलेने येतानाच ठरवलेले होते जणू. एका आगकाडीत एकवीस मेणबत्त्या पेटवणाऱ्या महिलांना मानलेच पाहिजे. पाणी भरलेल्या बादलीतील वाटीत नाणे टाकताना ते नाणे तिन्ही वेळेला वाटीत पडणे सोपी गोष्ट नसते , पण अशी गोष्ट महिलाच शक्य करु शकतात हे पाहाता आले. दूरवर ठेवलेल्या बाटलीत रिंग टाकतानाही महिलांचा उत्साह पाहिला. अचूक नेम धरुन अलगद बाटलीभोवती स्थिरावणारी रिंग सुद्धा आश्चर्यचकित झाली असेल. 

          त्यानंतर बौद्धिक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यात भाग घेणाऱ्या महिलांनी अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा होता. त्यात सूत्रसंचालन करणारे दिनेश पाटीलसर स्वतःही थक्क झालेले दिसले. शेवटी दोन महिलांमध्ये टाय फेरी होऊनही दोघांचीही महिला रत्न म्हणून निवड करण्याची वेळ आली. 

          लकी ड्रॉ कार्यक्रम हा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय होता. शेवटपर्यंत थांबलेल्या महिलांनाच त्याचे पारितोषिक प्राप्त होणार होते. चिठ्ठी उचलताना ती आपलीच असणार असे समोरच्या महिलांना वाटत होते. चार पाचदा तर ते खरेही झाले. दहा महिला भगिनींना लकी ड्रॉचे आकर्षक गिफ्ट प्राप्त झाले. ते गिफ्ट घेताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तो पाहून खऱ्या अर्थाने महिला मेळाव्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसत होते. 

           समारोपाची ऋण व्यक्त करणारी , हृदयाला भिडणारी भाषणे झाली. हा मेळावा संपूच नये असे निघताना प्रत्येकाला वाटले नसेल तरच नवल. माझे मात्र या सर्वांची प्रसिद्धी देण्याचे काम अधिकाधिक वाढलेले दिसत होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )





No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...