Friday, December 31, 2021

🔴 रात्रीचा राजा

           🔴 रात्रीचा राजा

            जीवन हा एक रंगमंच आहे. त्या रंगमंचावर आपण प्रवेश केलेला आहे. कधीतरी एक्झिट घ्यायची आहेच. आपल्याला या रंगमंचावर विविध पात्रे रंगवावी लागतात. खरा खोटा अभिनय करावा लागतो. कधी अभिनयाला उत्स्फूर्त दाद मिळते , तर कधी मिळतच नाही. 

          मी लहानपणी नाट्यवेडा होतो. कोठेही नाटक असले तर ते प्रत्यक्ष बघावे असे वाटत राही. दशावतारी नाटके बरीच पाहिली असतील. बाबी नालंग , बाबी कलिंगण , आप्पा दळवी , चंद्रकांत तांबे , सुधीर कलिंगण अशा कलाकारांची दशावतारी नाटके विशेष लक्षात राहिली. ' माझी ढवळी , माझी पवळी ' असे म्हणत नाचत गात येणारे बाबी कलिंगण अधिक लक्षात राहिले आहेत. त्यांचा प्रवेश आला कि प्रेक्षक भारावून गेलेले मी पाहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक वाक्याला आणि हालचालीला जबरदस्त टाळ्या पडत. त्यांनी बहुतेकदा साकारलेली म्हातारी गवळण विलक्षण भाव खाऊन जाई. आम्हाला ती म्हातारी आमच्या आजीसारखी दिसत असे. 

          एक पुरुष हुबेहूब म्हातारीचे सोंग वटवतो आहे अशी शंका सुद्धा येणार नाही , एवढे बारकावे बाबी कलिंगण दाखवत असत. नऊवारी साडीमध्ये ते छान दिसत. लाल मोठे कुंकू लावून,  तोंडात दात असतानाही दात नसल्याचा अभिनय ते करत असत. 

          मी तेव्हा कणकवली नं.३ या शाळेत शिकत होतो. जवळच भालचंद्र महाराजांचा मठ होता. मठात बऱ्याचदा नाटके असत. आम्ही एकही नाटक पहायचे सोडत नसू. त्यावेळी रात्री उशिराच नाटक सुरु होई. ते पहाटे पाच सहा वाजेपर्यंत चालत असे. चणे , शेंगदाणे , कांदाभजी खात खात नाटक बघण्याची लज्जत अधिकच वाढत असे. नाटकात राक्षस आला की मला भीती वाटे. मी बाबांचा हात घट्ट पकडून राही. थंडी असे. कुडकुडायला होई. पण राजाचे आणि राक्षसाचे युद्ध बघायला मज्जा येई. त्यांची गाणी म्हणण्याची पद्धत आवडे. एकही गायक आवाजाची पट्टी सोडत नसत. 

          सगळ्याच पात्रांचा एवढा मोठा आवाज असे की लाईट गेला तरी स्पिकरची गरज पडत नसे. राक्षसाचा आवाज तर खूपच मोठा असे. त्याच्या आवाजाने झोपलेली मुले उठून रडू लागत. पैशाची तळी घेऊन एक बाई प्रेक्षागृहात फिरे. तिच्या तळीमध्ये लोक सुटे पैसे टाकत. ती पैसे न देणाऱ्या लोकांच्या  गालाला हलकेच हात लावत असे. त्यामुळे ते लोकसुद्धा लाजून पैसे देत असत. बाबांनी मला नंतर सांगितले तेव्हा समजले कि ती बाई नसून तो एक साडी नेसून आलेला पुरुष होता ते. पण तो पुरुष होता असे कोणालाही वाटणार नाही अशी त्याची अफलातून वेशभूषा , रंगभूषा असे. 

          नाटकात हनुमान असला कि आणखी मजा येई. चंद्रकांत तांबे यांनी साकारलेला हनुमान मी अनेकदा बघितला आहे. त्यांचा प्रवेश प्रेक्षकांमधूनच होई. हनुमानाची चपळाई दाखवताना त्यांनी प्रेक्षकांची नेहमीच वाहवा मिळवली आहे. टाळ्यांचा कडकडाट.  प्रेक्षक चुरमुऱ्याचे लाडू फेकत असत आणि हनुमान ते अचूक पकडत असे. आम्ही लहान असताना आम्हीही लाडू फेकले होते. हा हनुमान आला कि संपूर्ण रंगमंच दणाणून सोडत असे. त्यावेळी या कलाकारांनी आपली एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात कायमची उमटवली होती. त्यावेळी प्रेक्षकांची इतकी गर्दी असे कि बसायला जागा नसे. लोक दाटीवाटीने बसत आणि सकाळपर्यंत तोंडाचा आ करुन नाटक पाहात. सुधीर कलिंगण यांनी केलेला श्रीकृष्ण अगदी खराच वाटे. त्यांची राजाची , विष्णूची भूमिका जीवनविषयक तत्वज्ञान शिकवून जाई. 

          बाबी नालंग म्हणजे एक चालते बोलते नाट्यसाहित्यच. त्यांनी अनेक दशावतारी कलाकार घडवले असतील. त्यांचे शब्दांचे उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असत. 

          हे दशावतारी कलाकार रात्रीचे राजा असत. सकाळी त्यांच्या सामानाचा बोजा त्यांच्याच कपाळावर घेऊन त्यांना पुढील नाटकासाठी रवाना व्हावे लागत असे. त्यांचे रंगकर्म सुरु असताना आम्ही त्यांच्या रंगखोलीत हळूच जाऊन पाहात असू. स्वतःचा मेकअप स्वतः करत आरशासमोर प्रखर प्रकाशात ते भडक रंग देत असत. त्यांचा प्रवेश येईपर्यंत त्यांचा मेकअप सुरुच राही. 

          यातील काही कलाकार हे हौशी आहेत , तर काही व्यावसायिक झाले आहेत. दिवसा नोकरी करुन रात्री नाटके करणारेही कलाकार मी पाहिले आहेत. एकदा मी रत्नागिरी गाडीत बसलो होतो. त्या गाडीच्या चालकाकडे माझं लक्ष गेलं. गाडी साक्षात श्रीकृष्ण चालवतोय असं मला वाटलं. खरंच तो श्रीकृष्णच होता. श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सुधीर कलिंगण गाडीचे सारथ्य करत होते. नाटकात हुबेहूब अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा हा माणूस आज आम्हाला एसटीने रत्नागिरीला घेऊन चालला होता. समाजाची सेवा करणाऱ्या व समाजाला कलेची संस्कृती जपत विधायक संदेश देणाऱ्या अशा सर्व नाट्यवेड्यांना खरंच अभिवादन करावं तितकं थोडंच असणार आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

कणकवली ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...