🔴 दाने दाने पर
कालचीच गंमत गोष्ट आहे. तशा अनेक गंमत गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. पण त्या आवश्यकही असतात. कारण काहीवेळा त्यामधूनही आपल्याला धडे मिळत असतात. आपलीच गंमत सांगायला आपल्याला जमली पाहिजे. गंमत एकदा झाली म्हणजे ती पुन्हा होणार नाही हेही सांगता येत नाही. कधी कधी गंमत घडण्याचीही आपण वाट बघत असतो. ती घडली की मज्जा येते. ती मज्जा अनुभवता आली पाहिजे म्हणजे झाले.
आम्ही मुंबईवरुन गावी आलो. दुपारी बारानंतर आल्यामुळे माझ्या वहिनीने तिच्याकडे जेवायला बोलावले. भाऊ आमच्यासोबतच होता. सहावीत शिकत असलेली माझी मुलगी तनिष्का क्लासला व तिथून शाळेत गेली होती. तिची शाळा अडीच वाजता सुटणार होती. तोपर्यंत आम्ही सगळे जेवलो. तिला आणायला मी शाळेत जायला निघालो. माझ्याबरोबर पत्नी आणि छोटी मुलगी उर्मीही यायला निघाली. वहिनीने तनिष्कासाठी जेवणाचा डबा भरुन दिला होता.
सकाळी लवकर उठून प्रवासाला सुरुवात केली. रेल्वेत झोप मिळालीच नव्हती. त्यामुळे मुलीला शाळेतून घेऊन आल्यानंतर भरपूर झोपावे असे ठरवले होते.
वहिनीने मुलीसाठी दिलेला जेवणाचा डबा मी माझ्या पलेजर गाडीच्या पुढच्या पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवला. शाळा जवळच होती. रुमसुद्धा जवळच होता. वाटले डबा कशाला डिकीत ठेवायचा ? म्हणून तिथेच ठेवला. शाळेच्या मागच्या बाजूच्या रस्त्यापाशी आलो. आम्ही तिघे तनिष्काला न्यायला आलो हे तिच्यासाठी सरप्राईज असणार होते. तिला तीन दिवसानंतर अशा प्रकारे शाळेत भेटायला मिळणार हे आमच्यासाठीही वेगळेच फिलिंग असणार होते.
मी गाडी साईड स्टँडवर लावली. माझ्यासारखे आणखी काही पालक आपल्या मुलांना न्यायला आलेले दिसले. त्यातल्या ओळखीच्या पालकांना मी आदरपूर्वक हात वर करुन हाय केले. शाळा सुटली होती. मुले शाळेच्या मागील अरुंद गेटमधून येऊ लागली होती. आमची नजर तनिष्का कुठे दिसते का ? यासाठी भिरभिरत होती. ती मुलींच्या घोळक्यातून बोलत बोलत येत होती. तिने आम्हाला पाहिले आणि सुखावली. छोट्या उर्मीने लगेच तिचा हात पकडला. आम्ही परत गाडीकडे आलो. गाडीवर बसणार तितक्यात ??? गाडीच्या समोरच्या फुटरेस्टवर ठेवलेला जेवणाचा डबा दिसत नव्हता. मला वाटले मी तो डिकीमध्ये ठेवला. म्हणून डिकी उघडून बघितली तर डिकी रिकामीच होती.
डबा कुठे गेला असावा म्हणून इकडे तिकडे पाहिले तर काय ? रस्त्याच्या शेजारच्या झाडांच्या अतिदाट झाडीमध्ये एक भटकता कुत्रा आमचा जेवणाचा डबा उघडताना दिसला. त्याला तो काही उघडता येत नव्हता. मी त्या डब्याची आणि त्यातल्या जेवणाची आशा सोडली. मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन चपाती भाजी घेतली. येताना पुन्हा त्याच दिशेने सहजच आलो. आता मात्र त्या ठिकाणी कुत्रा दिसत नव्हता फक्त न उघडलेला डबा दिसत होता. मी डबा आणायला त्या झाडीत शिरलो. डबा बाहेर काढला. डबा घट्ट झाकणाचा होता. तो थोडी ताकद लावून उघडला. त्यातले जेवण जसेच्या तसे होते. डबा उघडताच तो कुत्रा पुन्हा कुठूनतरी धावतच माझ्याजवळ आला. मी तो डबा त्याच्यासाठी जमिनीवर पालथा केला. अधाशासारखा त्याने तो पटकन संपवून टाकला. मी आणि माझी मुलगी दोघेही त्याच्याकडे तोंडात बोट घालून पाहतच राहिलो. एका कुत्र्याची भूक भागवली याचा आनंद मुलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. खरंच त्यावर आज त्याचेच नाव लिहिले होते याचा प्रत्यय आला. ' दाने दाने पर लिखा होता है खानेवाले का नाम ' हे पटल्याने आम्ही हसत हसत घरी परतलो.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
No comments:
Post a Comment