Friday, December 31, 2021

🔴 सुपारी

          🔴 सुपारी

         लहानपण खरंच निरागस असतं. हट्ट करायला मिळतो. हट्ट पुरवले जातात. लगेच नाही पुरवले गेले तरी कधीतरी पूर्ण होण्याची शक्यता असते. तेव्हा कसं केव्हाही हट्ट करता येत असतो. पण जसे मोठे आणि समंजस होत जातो , तसे हट्टीपणा सोडण्याचे सल्ले दिले जातात. मीही हट्टीच होतो. आमचे अनेक हट्ट बाबांनी आणि आईने पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला होता. आम्ही पाच भावंडे असल्याने आमच्या पालकांचीही आमचे लाड पुरे करताना दमछाक होत असे. ऐपतीप्रमाणे आमचे लाड केले गेले. मागणीप्रमाणे सर्व मिळाले नाही तरी निदान आम्ही मागणी तरी करु शकत होतो. आमची शैक्षणिक वस्तुंची मागणी आधी पूर्ण केली जात असे. इतर मुलांच्या सुविधा बघून आम्ही केलेली मागणी तात्काळ धुडकावून लावली जात असे. आम्ही आमच्या रास्त मागण्या आईमार्फत बाबांपर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहू. तेव्हा कुठे महिन्यातून एखादी मागणी पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागत. 

          त्यावेळी स्वस्ताई होती. आजसारखी महागाई नव्हती. ५ पैशाची लिमलेटची गोळीही आम्हाला आनंदी ठेवत असे. बाबांनी बाजार आणायला सांगितला कि आम्हाला ५ किंवा १० पैसे हमखास मिळत. फक्त त्याचे चांगले खाऊ आणावे लागे. काहीतरी आणून खात असलेले दिसलो की मार पडलाच म्हणून समजा. 

          एकदा मला खाऊसाठी २० पैसे मिळाले. बाबांनी मला खाऊ आणण्यासाठी पाठवले. मी धावतच कांबळी गल्लीच्या शेजारी असलेल्या छोट्या पानपट्टीच्या दुकानात गेलो. तिथे मिलन नावाची सुपारी मिळत असे. आमच्या शाळेतली बरीच मुले ती मधल्या सुट्टीत खाताना मी बघायचो. पण प्रत्यक्ष खाण्याची संधी मला मिळाली नव्हती. आता ती संधी मिळाली होती. मी २० पैशाच्या २ मिलन सुपारी घेतल्या. एक खिश्यात ठेवली. दुसरी फोडली आणि खात खात किंवा चघळत चघळत आमच्या दुकानात आलो. आमच्या सलूनात तेव्हा दोन तीन गिऱ्हाईके बसली होती.  ती माझ्या चांगली ओळखीची होती. मी सुपारी खात आलो होतो , हे त्यांनीही बघितले आणि बाबांनीही. सुपारी लाल रंगाची असल्यामुळे माझे तोंड पोपटाच्या चोचीसारखे लालभडक झाले होते. 

          बाबांनी माझ्या तोंडाकडे पाहिले. मी सुपारी खाऊन आल्याचे पाहून बाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मला तिथेच कानफटात लगावून दिली. अचानक झालेल्या हल्ल्याने मला रडताही येईना. पण ओळखीच्या माणसांसमोर रडणार तरी कसे ? कायम मारल्यानंतर भोकाड पसरुन रडणारा मी अगदी शांत कसा राहिलो हेच मलाही समजेना. 

          माझी मलाच लाज वाटू लागली होती. पुन्हा सुपारी घ्यायची नाही अशी मला सक्त ताकीद देण्यात आली. मीही ती पुढे पाळली. त्या बालवयात मला वेळीच शिक्षा मिळाल्याने मी पुन्हा मिलन सुपारी घेण्याच्या फंदात कधीच पडलो नाही.

          आमच्या दुकानात पानाची तबकडी होती. आजोबा , बाबा , काका पान खात असत. हे आमच्या गिऱ्हाईकांनाही माहीत होते. काही गिऱ्हाईके केवळ पान खात आणि निघून जात. पण आमच्या बाबांनी त्यांना लोभ लावला , त्यामुळे अशी ही गिऱ्हाईके आमची कायमची बनून गेली. आम्हां पाचही भावंडांना नावासह ओळखू लागली. 

          सतत पानाचे तबक , तबकडी समोर असूनही आम्हाला कोणालाही पानाचे किंवा कसलेही व्यसन लागले नाही. 

          गावच्या घरी गेल्यावर आमची आजी खूप प्रेमाने सुपारीचा छोटा तुकडा पुढे करत असे. तिच्या प्रेमापोटी आम्ही तो तुकडा थोडासा चघळून फेकून देऊ. पण व्यसन लागू दिले नाही. आम्ही आता मोठे झालो तरीही पानाचा डबा अजून आमच्या घरी सुरुच आहे. 

          बाबांनी दातांमुळे पान , तंबाखू सोडून दिली आहे. लहर आली तर कधीतरी सुपारी खातात. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले तरी आमची गावाकडील घरची पान खाणारी माणसे पान सोडू शकत नाहीत या गोष्टीचे दुःख वाटते. मी स्वतः तंबाखूमुक्त शाळा अभियानात सहभागी झालो. प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तरी घरातील माणसांच्या बाबतीत कोरा तो कोराच राहिलो आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...