Friday, December 31, 2021

🔴 गजबजपुरी

          🔴 गजबजपुरी

            एका नातेवाईक पेशंटला बघण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. जाताना ट्रेनने जायचे ठरवले. ऑनलाइन बुकिंग भाच्यानेच करुन दिली. तिकीट कन्फर्म असल्यामुळे आमचा जीव भांड्यात पडला. पत्नी , मी आणि छोटी मुलगी असे निघालो.  नाताळची सलग तीन दिवस सुट्टी होती , ती सत्कारणी लावावी असे मनात आले होते. 

          भाऊसुद्धा यायला तयार झाला. त्याची तिकीट कन्फर्म झालीच नाही. पण तिकिटाचे पूर्ण पैसे भरुन कन्फर्म नसताना तोही आमच्याबरोबर यायला तयार झाला. स्लीपरमधून पहिल्यांदाच प्रवास करत होतो. या प्रवासाचा आगळा वेगळा अनुभव येत होता. आमच्या बोगीमध्ये आम्ही बसलो. लांबच्या लांब झोपता येईल एवढी मोठी सीट बघून हायसे वाटले. भाऊ वरच्या बर्थवर बसला. आम्ही खालच्या सीटवर व्यवस्थित बसलो. 

          समोरच्या सीटवर एक सहा सात वर्षाची छोटी मुलगी बसली होती. माझ्या छोट्या मुलीची आणि त्या छोट्या मुलीची काही क्षणातच ओळख झाली. ती तिच्याशी खेळण्यात चांगलीच रमली. तिने त्या मुलीचे नाव , गाव सर्व विचारुन घेतले. त्या मुलीला आपल्याकडील खाऊ दिले. छोट्यांमुळे आम्हां मोठ्यांचीही ओळख झाली. गप्पा मारत मारत प्रवास सुरु होता. फेरीवाले विक्रेते इकडून तिकडे फिरत होतेच. मी आपला सर्वांचे निरीक्षण करत होतो. 

          कितीतरी माणसे मुंबईच्या दिशेने चालली होती. नोकरीसाठी , शिक्षणासाठी , पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी , करिअर घडवण्यासाठी , खरेदीसाठी अशा अनेकविध कारणांसाठी त्यांचा प्रवास चाललेला होता. सकाळी सहा वाजता आम्ही ठाण्यात पोहोचलो. त्यानंतर सलग दोन दिवस डोंबिवली , उल्हासनगर , परेल असे फिरणे झाले. लोकलट्रेनमधून प्रवास करताना विविध गोष्टी पहावयास मिळाल्या. हॉटेलिंग झालं. 

          शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. मेनुकार्ड बघितले. भावोजी , ताई , आका आणि भाचा सोबत होते. त्यांनी स्प्रिंग रोल आणि पनीर रोटी मागवली. एकत्र बसून ते खातानाचा आम्हां भावंडांचा उत्साह द्विगुणित झाला होता. लहानपणी चटणी भाकरी किंवा कांदा , मसाला , चपाती खाणारे आम्ही आज एका दर्जेदार हॉटेलात वेगळी डिश खाण्यात दंग झालो होतो. खाता खाता गजाली सुरुच होत्या. समोर आलेल्या वेगळ्या पदार्थांच्या थाळ्या कशा संपवायच्या इथपासून टिशूपेपरचा वापर कसा करायचा इथपर्यंत गंमत गोष्टी आमच्या हसण्याचा आवाज वाढवित होत्या. थाळ्या संपल्या एकदाच्या. आता वेटरने प्रत्येकाला एकाएका प्लेटमधून गरम पाणी व त्यात कापलेले लिंबू टाकून आणून दिले. त्यात आम्ही हात धुतले आणि मग ओले झालेले हात टिशुपेपरने छान पुसून घेतले. नाश्त्याची चव जिभेवर चांगलीच रेंगाळत होती. 

          आदल्या रात्री नीट झोप न झाल्यामुळे डोळ्यावर झोपेने आक्रमण करायला सुरुवात केली होती. मस्त दोन तीन तास झोपलो. प्रवासाचा शीण गेला होता. संध्याकाळी आणखी दोन भाचे आम्हांला मुद्दाम भेटायला आले. त्यांच्यासोबत मस्त भोजन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच उठलो. ज्या पेशंटला आम्ही बघायला गेलो होतो, ती पेशंट आमच्या सतत गप्पांमध्ये येत होती. तिच्या उपचारासाठी डॉक्टरांनी लाखो रुपयांचे पॅकेज सांगितल्याचे ऐकून आम्ही हादरुन गेलो होतो. 

          एखादा माहीत नसलेला आजार खूप उशिरा कळावा आणि त्याचे दुष्परिणाम त्या पेशंटला भोगावे लागावे ही कल्पनाच आम्हाला सहन होत नव्हती. तरीही एक मानसिक आधार देण्यासाठी आम्ही त्या पेशंटला भेटायला मुद्दाम गेलो होतो. आम्ही तिच्याशी बोलत असताना तीही आमच्याशी भरभरुन बोलत होती. ती स्वतः उच्चशिक्षित होती आणि उच्च विचारांचीही होती. ती स्वतः सकारात्मक विचारांची असल्याने आम्ही तिला अधिक मोटिवेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तरीही कितीही काहीही केले तरी तिचा आजार काही आम्ही घेऊ शकणार नव्हतो याचे दुःख आम्हाला सलत होते. 

          प्रत्येकाला आपले जीवन खूपच महत्त्वाचे असते. हे जीवन क्षणभंगुर असते , हे प्रत्येकाला माहिती असते. पण माणूस कितीही आजारी असला तरी त्याला शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची उमेद असतेच असते. मलाही माझ्या त्या जवळच्या नातेवाईकाबद्दल ती पूर्ण बरी व्हावी अशी अतिशय प्रामाणिक भावना आहे. तिच्या कुटुंबियांना तिची आत्यंतिक गरज आहे. तिचे असणे तिच्या लहान बाळासाठी किती महत्त्वाचे आहे याची कल्पना केली तरी आपल्या हृदयाचा ठोका चुकेल. 

          मुंबई ही एक गजबज असलेली गजबजपुरीच आहे. तिच्या पोटात असे कित्येकजण असतील कि जे अशा प्रकारे समस्यांना तोंड देत असतील. या समस्यांवर मात करत असतील. माझे निरीक्षण माझ्यापुरते मर्यादित असेल , पण या गजबजपुरीत स्वतःला सामावून घेणारे हे सगळे गजबजपुरीचे महानायकच आहेत. हे आपल्या समस्यांवर सदोदित मात करत राहण्याची क्षमता बाळगतात हे ही मला विचार करायला भाग पाडत आहे. 

          मी उद्या माझ्या घरी कोकणात जाईन , पण इथल्या समस्या तशाच राहतील. तरीही मी एक वेगळाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जात आहे याचा मला आनंद आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल

( 9881471684 ) कणकवली



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...