🛑 गोमू संगतीनं
होळी आली की गोमुची आठवण येते. प्रत्येक घराघरात खेळे घेऊन जाणारे गावागावातील गट पुन्हा एकदा त्यानिमित्ताने एकत्र येतात. काही गावात ' कोळीण ' नावाचा प्रकार असतो. ही कोळीण म्हणजे एक पुरुषच असतो. त्याने साडी परिधान केलेली असते. तो किंवा ती अगदी बालगंधर्व दिसत नसली तरी बाईसारखी तरी नक्कीच दिसते. मेकअप थोडा भडकच केलेला असतो. पण ही ' कोळीण ' होळीच्या काळात भाव खाऊन जाते.
पूर्वी परंपरेने एकाच घरातील पुरुष साड्या नेसून कोळीणी बनत. मग पुढे पुढे साड्या नेसणारे मिळेनासे झाले. मग आता कोणालाही धर दपट साडी नेसवून रंग फासून कोळीण बनवले जाते. थोडे नाचायला आले की झाले.
होळीच्या दिवसांत या कोळीणीचा दर वाढतो. अशा कोळिणी आता अडवून दाखवू लागल्या आहेत. देवस्थानासाठी करावे लागते म्हणून या कोळीण होणाऱ्या नटांच्या हाता पाया पडण्याची वेळ येते.
लहानपणी आम्ही कोळीणीच्या मागे फिरत असू. तीच तीच गाणी असली तरी ऐकायला मजा वाटे. कोळीण आपली रुमाल हातात धरुन पुढे मागे ठेक्यात नाचत राही. डफाच्या तालावर पायांचा ठेका धरणाऱ्या गवळणी प्रशंसेस पात्र ठरत. कोणी वीस , पन्नास , शंभर रुपये तळीमध्ये ठेवून कोळीणीला शबय देत.
माझे बालाकाका कोळीण झाले की छान नाचत. त्यांच्यासारखे नाचून गाणे म्हणणारी गवळण मी आजपावेतो पाहिली नाही. सूर , ताल आणि चाळांचा अचूक ठेका असल्यामुळे त्यांची कोळीण सर्वांनाच आवडे. त्यांच्या लावण्या सुद्धा वैविध्यपूर्ण असत. चाली श्रवणीय असत. त्यामुळे प्रत्येक घरात वेगळा नाच पहावयास मिळे. आमच्या भाईकाकांची डफावरची थाप कोणालाही नाचायला भाग पाडेल अशी होती.
गुढीपाडव्याच्या रात्री मांडावर सगळी गाणी होत. मध्येच एखादी बतावणी असे. विनोद असत. काही माणसे विचित्र सोंगे आणून उपस्थितांना हसवून सोडत. ती सोंगे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटत.
आम्ही कणकवलीत असल्यामुळे शाळा करुन ' गोमुचा नाच ' करताना खूपच धावपळ उडून जाई. आम्हाला अभ्यासही करायचा असे आणि गोमुचा नाचही करायचा असे. मग शनिवार , रविवार दोन दिवस निवडून किंवा जोडून एखाद्या दिवसाची शाळेला दांडी मारुन गोमुचा नाच घेऊन जात असू.
त्यावेळी आम्ही जळकेवाडीत राहत होतो. सदानंद डिचोलकरांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी मालक आणि सर्व शेजारी यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मी गाणी म्हणण्यात पटाईत होतो. माझा छोटा भाऊ कृष्ण होत असे. शेजारचे दोघे सवंगडी होत असत.
त्या दिवशी रविवार होता. आम्ही दिवसभर आमचा गोमू घेऊन फिरत होतो. कोणी दहा पैसे , वीस पैसे असे पैसे देत असत. पन्नास पैसे म्हणजे आमच्यासाठी त्यावेळी सगळ्यात मोठी देणगी असे. सोबत मोठा संजयदादा डिचोलकर कायम असायचा. तो आमचा खजिनदार होता. संध्याकाळपर्यंत आमचे एकूण सोळा रुपये जमले होते. एका दिवसात आमच्या गोमूने केलेली ही कमाई आमच्यासाठी त्यावेळी लाखमोलाची होती. आमच्या वाटणीला येणारे सर्व पैसे आम्ही आमच्या आईच्या ताब्यात देऊन ठेवू. आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी आई त्यातले थोडे थोडे पैसे देत राही. आम्ही त्या पैशातून कधीही खाऊ घेतल्याचे मला आठवत नाही. आपल्या या कलेचा उपयोग आम्ही शेवटी शिक्षणासाठीच केला होता या गोष्टीचा आजही मला सार्थ अभिमान वाटतो.
लहान असताना लाज वाटत नसे , थोडा मोठा झाल्यानंतर गोमू घेऊन जायला लाज वाटू लागली. होळीच्या काळात परीक्षांचे वातावरण असे. त्यामुळे काही लोक आम्हाला ओरडत असत. परीक्षेत ' गोमूची गाणी ' लिहिणार आहात काय ? असेही म्हणणारी माणसे भेटली आहेत. काहींनी पाठीवर शाबासकीही दिली आहे. शाबासकी देणाऱ्या लोकांना आम्ही नेहमीच लक्षात ठेवले आहे. ओरडणाऱ्या व फुकटचे सल्ले देणाऱ्यांनाही नेहमीच आदर दिला आहे.
आता गोमुचा नाच बघितला की माझा लहानपणीचा गोमुचा नाच लक्षात येऊन आजही हसू येतं आणि स्वतःचा अभिमानही वाटतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment