🟣 नायक आणि विनायक लेखांक : ९३
काही माणसं त्यांच्या कामाने लक्षात राहतात. ही त्याच कामासाठी जन्माला आलेली असू शकतात. किंवा अनपेक्षितपणेही आलेली असली तरी त्यांच्याकडून विलक्षण असे कार्य घडत असताना आपण पाहतो आणि भारावूनही जातो. ते आपोआपच नायक बनतात. ते नायक नसतानाही त्यांच्यातील नायक ठळकपणे दिसू लागतो. हा माहीत नसणारा नायक अचानक विनायक बनून समोर येतो आणि नायक या शब्दाला सार्थ करतो.
असेच एक नायक असलेले विनायक माझ्या आयुष्यात आले. डी. एड. होऊन आम्ही बाहेर पडत असताना हे विनायक आम्हाला गवसले. त्यांचा निरागसपणा आम्हाला भावला. त्यांच्यातील नायक त्यावेळी दिसला नव्हता. जास्त संपर्क न आल्यामुळे असेल कदाचित , पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी लागल्यानंतर एकाच तालुक्यात आमच्या नेमणुका झाल्या हे नशीबच म्हणावं लागेल. त्यांना देवगडचे टोक मिळाले. गिर्ये नं. 1 शाळेत त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यांच्यासोबत असणारे आमचे दुसरे नायक मित्र गिल्बर्ट यांनीही त्यांची एकाच शाळेत अनेक वर्षे सोबत केली.
माझी आत्येबहिण गिर्यात दिलेली होती. गिल्बर्ट आणि विनायक हे माझे मित्र आहेत , हे तिलाही समजले. ती त्यांच्याकडे माझी चौकशी करत असे. त्यावेळी फोन नसल्यामुळे ती या माझ्या मित्रांकडे माझी खुशाली विचारत असे. माझ्या या मित्रांनी तिला प्रसंगानुरूप सहाय्य केले होते. ती बडबडी असली तरी तिच्या या गुणाबद्दल ते माझ्याकडे कधी बोलले नाहीत.
विनायक जाधव नावाचं व्यक्तिमत्त्व साधं , सरळ आणि परोपकारी असल्याचे मला त्यावेळीच समजलं होतं. आता या विनायकभाईंच्या सहवासात आल्यानंतर ते अधिक स्पष्टपणे जाणवू लागलं आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे खूप कमी लोक असतात , विनायकराव हे मदत करताना कोणतीही अपेक्षा बाळगताना दिसत नाहीत. त्यांच्यासोबत बोलताना त्यांच्या या गोष्टीचा अधिक अनुभव येतो.
शाळेच्या कामातही ते अतिशय तत्पर असतात. त्यांचे अध्यापन विद्यार्थिप्रिय असेच आहे. त्यांच्या हसतमुख वदनाकडे पाहिले की खऱ्या ' विनायकाची ' म्हणजे गणरायाची आठवण यायला हरकत नाही. सावरकरांचे नाव विनायक होते. आता हे आमचे जाधवांचे विनायक आहेत. सावरकरांनी सागराकडे आळवणी केली होती , " सागरा , प्राण तळमळला ". आमचे विनायक अशी आळवणी करत असतील , " शिक्षका , सांग तळमळ गा " . शिक्षकांच्या समस्या त्यांच्या समस्या झालेल्या असतात. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांवर सन्माननीय तोडगा काढण्याचे काम ते करताना दिसतात तेव्हा त्यांच्याबद्दल उत्स्फूर्तपणे लिहावेसे वाटते.
एखाद्या मोठ्या संघटनेचे तालुक्याचे महत्त्वाचे पद कोणालाही असेच मिळत नसते. विनायकभाईंनी ते आपल्या कार्य कर्तृत्वावर मिळवलेले आहे. त्या पदासाठी काम करताना त्यांना दिवसाचे चोवीस तासही पुरत नाहीत. सर्व पदाधिकारी आणि शिलेदार यांच्याशी दररोज फोन संपर्कात राहणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. सगळ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना त्यांची काय हालत होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यांनी संघटनेचे कार्य जोमाने करताना सर्वांशी कायमच मित्रता जोपासली आहे. त्यांचे वक्तृत्व ऐकण्याचा हल्ली अनेकदा योग आला. सर्व विषयांना स्पर्श करत , सर्व मुद्द्यांना हात घालत बोलण्याची त्यांची पद्धत कोणालाही आवडेल अशीच आहे. त्यांना तरीही संघर्ष करावा लागत असला तरीही त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच तयार असतात. संघटनेचे अध्यक्ष , मित्र, शिक्षक आणि कौटुंबिक सर्व नाती जगत असताना त्यांना खूपच कसरत करावी लागत असणार. ते या सर्व शिवधनुष्यासारख्या जबाबदाऱ्या लिलया पेलताना दिसतात.
गेल्यावर्षी खारेपाटण चेकपोस्टवर माझी तिसऱ्यांदा ड्युटी लागली होती. मी तिथे काम करत असताना त्यांचा फोन आला. ते मला म्हणाले , " प्रविणभाई , तुम्ही पुन्हा पुन्हा ड्युटी का सहन करताय , मला बोलला असता तर मी काहीतरी पर्याय काढला असता. " मी त्यांना म्हणालो , " विनायकभाई , मला पहिल्यांदा ड्युटी आली , तेव्हा मी ती केली. दुसऱ्यांदा मी भावाची ड्युटी केली. तिसरी ड्युटी आली तर ती मी माझी ड्युटी म्हणून करतोय. "
मी एवढे बोललो आणि फोन ठेवला. पण विनायकभाई गप्प बसतील तर ना ? त्यांनी थेट तहसीलदारांकडे याबाबत विचारणा केली. माझ्या जागी दोन दिवसात दुसरे शिक्षक हजर झाले, मी कार्यमुक्त झालो. आपला शिक्षकमित्र एकटाच भरडू नये ही त्यांची संवेदनशीलता मला त्यावेळी भावली. मी त्यांचे आभार मानले तरी ते आभार स्वीकारायला तयार नव्हते. असे हे विनायकराव.
माणसाने असे असावे , जसे विनायकभाई आहेत. त्यांना कोणताही गर्व नाही. ते रागावले तरी लगेच शांत होतात. ते ज्यांच्यावर रागावतील त्यांना पुन्हा जाऊन वैयक्तिक भेटतील. त्यांच्या मनात नेहमीच सर्वांबद्दल आपुलकी असते. वरवर आपुलकी दाखवून खोटा अभिनय करणे त्यांना कधी जमेल असे मला वाटत नाही. हे विनायकभाई माझ्या जीवनात आले आणि माझ्या जीवनाला एक नवीन नायक जोडला गेला. त्यांचा हा सहवास मला अखंड लाभत राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत राहणार.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

प्रवीण अगदी यतार्थ शब्दांकन. विनायक हा सर्वांगसुंदर कार्यकर्ता आहे.
ReplyDeleteधन्यवाद भाई
DeleteThank you my dear friend
ReplyDeleteIts all right bhai
Deleteअगदी यथार्थ 👍👌
ReplyDeleteमार्मिक लेखन कुबल सर आणि यथार्थ वर्णन. खरेच कौतुकास्पद कामगिरी.सर्वाना सोबत घेऊन जाणारा नेता.
ReplyDeleteसुंदर व मार्मिक लेखन विनायक सराबाबत
ReplyDeleteThanks to all
ReplyDeleteविनायक सरांविषयी केलेले शब्दांकन हे खरं आणि सुंदर आहे.
ReplyDelete