🛑 सारखं टोचतंय !!!
आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी टोचणाऱ्या येत असतात. त्या टोचतात आणि टोचतच राहतात. कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं टोचणं काही कमी होताना दिसत नाही.
दोन दिवसांपूर्वी ' फारच टोचलंय ' हे एकल नाट्य पाहिलं आणि ही गोष्ट अधिक प्रकर्षाने लक्षात आली. खरंच अशा कितीतरी टोचणाऱ्या गोष्टींना घेऊनच आपण आपलं जीवन रडतकडत जगत असतो.
आपलं जीवन हे आपलं स्वतःचं असतं. त्यावर जास्तीचा अधिकार आपलाच असतो नाही का ? पण आपलं जीवन अनेकदा दुसऱ्यांकडून नियंत्रित होत राहतं. आपण आपल्या मनासारखं जगू शकत नाही. दुसरे सांगणार तसं जगायचं म्हणजे त्रास होतो ना ? हे जगणं मग जगणं राहतच नाही मुळी. तो एक केविलवाणा प्रवास घडू लागतो. नको असतं, पण करावं लागतं. या नको असण्याची बेरीज वाढली की त्याचं रूपांतर नैराश्याच्या खाईने घेतल्यास ते रुद्ररुप ठरु शकतं.
मी एक शिक्षक आहे. मलाही काही गोष्टी टोचत राहतात. एखादी टाचणी टोचावी तशा या गोष्टी आपली पाठ सोडत नाहीत. मी शिक्षक झालो , पण इंजिनिअर झालो नाही ही गोष्ट मला सतत टोचत असे. पण आता मी खूप सुखी आणि समाधानी आहे. कारण भावी पिढी घडविण्याचे अनमोल कार्य करत आहे हा सुखद विचार मी करत राहतो. मी जगातील सर्वात सुखी माणूस असेन अशीही माझी भावना असते. या भावनेला मी बिलगून राहतो. तसं माझ्या आयुष्यात अनेक टोचणाऱ्या गोष्टींचा शिरकाव होत राहिला आहे. पुढेही तो होत राहील , थांबणार तर नाहीच नाही. पण त्यांचं सततचं टोचणं मला नवीन काहीतरी शिकवणारं असतं. मी ते संयम ठेवून शिकतो आणि पुढे जात राहतो.
नोकरीच्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत राहतात. त्या प्रश्नांची उकल मीच शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. कधी प्रश्न पूर्णपणे सुटतात , कधी अर्धे सुटतात. हे अर्धे सुटलेले प्रश्न टोचत राहतात. तेही पुढे पूर्ण सुटतात. अर्थात समस्या या येतच राहणार आहेत , त्याच आपल्यासाठी टोचणाऱ्या टाचण्या आहेत जणू !!! शेवटी टाचणीचं टोकही कधीतरी बोथट होतच ना ?
नोकरीत असताना नोकरी टोचत राहते. मग नोकरीला कंटाळून व्हीआरएस घेतली तर नंतरचं घराकडचं एकल जीवन टोचत राहील. एखादी गोष्ट केली म्हणूनही टोचणी , ती गोष्ट केली नसेल तरीही टोचणी. मला एक कळत नाही की हे ' सारखं टोचतंय ' हे आपण खूप गंभीरपणे का घेतोय ? ते सहजपणे घेतलं की डॉक्टरांकडे इंजेक्शन घेताना जसं वाटेल तसंच वाटणार. अर्थात इंजेक्शन टोचल्याशिवाय बरंच वाटणार नसेल , तर ते टोचून घेणंही आवश्यकच आहे. ते टोचल्यामुळे माझे बरे होईल ही सकारात्मक मानसिकता महत्त्वाची आहे. काहीतरी चांगले होण्यासाठी ' सारखं टोचतंय ' या गोष्टीचीही गरज आहे असं मला प्रामाणिक वाटतं.
काहींना दगडावर झोप लागते , काहींना गादीवरही झोप लागत नाही. म्हणजे दगडावर झोपणाऱ्याला तो खडबडीत दगड टोचत नाही , पण गादी मऊ , लुसलुशीत असूनही ती कशी काय टोचते ? कमाल आहे. म्हणजेच सुखं जास्त मिळू लागली तरीही ती टोचतात. हे म्हणजे असं झालं , फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन चुलीवरची भाकरी मागण्यासारखं. ती भाकरी खरपूस असली तरी गावाकडे जाऊन शेणामातीच्या घरात बसून खाण्यात जे सुख आहे , ते त्या आरसेमहालात कसे असेल ?
शिक्षण , घर , नोकरी , धंदा, लग्न , नातीगोती या प्रत्येकात वेगवेगळ्या पद्धतीने टोचणं अनुभवत असताना त्यांचा सामना करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. यात सर्वच यशस्वी होत असतात. लोकमान्य टिळकांनी एकदा म्हटलं होतं , " कितीही संकटे आली , आभाळ जरी फाटलं , तरी त्यावर मी पाय ठेवून उभा राहीन. " त्यांनी असं म्हटलं नसतं तर आज आपण स्वराज्यातील हे सुखमय दिवस कदाचित पाहू शकलो नसतो. सारख्या टोचणाऱ्या या टाचणीच्या टोकाला बोथट करण्याचं सामर्थ्य प्रत्येकात आहे , ते त्या त्या वेळी आपल्यातून बाहेर काढणं ही आजची आत्यंतिक गरज आहे. मग ' सारखं टोचतंय ' असं रडगाणं आपण कधीच रडत बसणार नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment