वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा तीन दिवसीय नाट्याविष्कार पाहण्याचा योग आला. मी त्यांच्या ' रंगवाचा ' त्रैमासिकाचा आजीवन सभासद असल्यामुळे मला विनामूल्य प्रवेश तिकीट घरपोच मिळाले. तो दिवस माझ्या वाढदिवसाचा होता. मला त्यांनी मस्त नाट्यभेट दिल्याबद्दल मी सुखावलो. पहिल्या दिवशी ' बहिणाबाई चौधरी ' यांच्या कवितांचा गायनाचा कार्यक्रम पाहताना साक्षात बहिणाबाई त्यांनी शब्दरूपाने उभी केली.
दुसरा दिवस ' नली ' हे एकल नाट्य सादर झाले होते. मी थोडा उशिराच नाट्यगृहात पोहोचलो होतो. नाटकाचे नाव नली होते , म्हणजे ते एका मुलीचे असणार हे मनात आधीच बिंबले होते. पण रंगमंचावर फक्त एकच पुरुष अभिनय करताना दिसत होता. त्याचे नाव बाळू होते. तो स्वतःची गोष्ट सांगत होता. माझेही घरातले टोपणनाव बाळूच. त्यामुळे मीच मला त्याच्यात पाहू लागलो होतो. एका मुलीचा हसण्याचा आवाज येत होता. रंगमंचावर मुलगी नसतानाही तिचे असणे लक्षात येत होते. ती हसणारी मुलगी म्हणजे त्या बाळूची ' नली ' होती.
बाळूचे नलीवर जिवापाड प्रेम होते. पण त्याने ते कधीच व्यक्त केले नव्हते. ज्यावेळी त्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता , त्या प्रत्येक वेळी तो असफल ठरला होता. ती दोघे प्राथमिक शाळेत असल्यापासूनच एकमेकांना जीवाला जीव देत होती , पण दोघांनीही कधीही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं नाही. कधीकधी त्यांचे शिक्षक बाळूला वर्गावर ठेवून आपल्या कामाला निघून जात. त्यावेळी मुलांचा अभ्यास तपासताना जर चुकला तर त्यांना शिक्षा करण्याची मुभा बाळूला दिलेली असे. तरीही बाळूने नलीला कधीही मारले नाही. तो हळूच तिचा हात हातात घेऊन मारल्याचा अभिनय करत असे.
पुढील शिक्षणासाठी बाळूला शहरात जावे लागले. बाळू शिकून खूप मोठा साहेब झाला. तरीही त्याचे ' नली ' वरचे प्रेम काही कमी झाले नव्हते. तो जेव्हा जेव्हा गावी येई , तेव्हा तेव्हा ' नली ' ची भेट घेई. तो तिच्याशी बोले. ती फक्त हसे आणि त्याला खूप मोठा झाल्याबद्दल आनंदाने शुभेच्छा देत राही.
एकदा असाच बाळू गावी आला होता. त्याला समजले कि त्याच्या ' नली ' चं लग्न झालं होतं. त्याला धक्काच बसला होता. तरीही बाळूचे प्रेम नलीवरच राहिले होते. आता त्याने लग्न न करण्याचे ठरवले होते. नली बरोबर लग्न करता आले नाही याचं दुःख बाळूला कायमच भेडसावत राहिलं होतं.
एकदा असाच पेपर वाचत असताना अचानक नलीचा फोटो बाळूला दिसला. फोटोवरची हेडिंग वाचून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या ' नलीने ' आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या केली होती. बाळूला हा धक्का सहन होण्यासारखा नव्हताच मुळी. तो त्यानंतर कायमच विमनस्क राहायला लागला. नलीच्या जाण्याने त्याचं जीवनच उध्वस्त झालं होतं.
हे एकल नाट्य पाहिले आणि मला माझी पत्नी ललिता आठवली होती. तिला सगळे प्रेमाने ' लली ' म्हणत असत. ती एक प्रेमाची हाक होती. आमचे लग्नापूर्वी प्रेम नव्हते. ओळख नव्हती. आमचं लग्नानंतरचं प्रेम. सात वर्षांच्या संसारानंतर माझी ' लली ' माझ्याकडे तिचं चार वर्षाचं बाळ सोपवून देवाघरी निघून गेली होती. त्या नाट्यातील ' नली ' चं हास्य मला माझ्या ' लली ' सारखं वाटत होतं. त्या बाळूसारखा मीही विमनस्क झालो होतो. आता मी इतक्या वर्षांनी विमनस्क अवस्थेतून पूर्ण बाहेर आलो असलो तरी ' लली ' सोबतच्या आठवणी जशाच्या तशा ताज्या आहेत.
काल आमचा प्रशिक्षणाचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. कणकवली गटसाधन केंद्राच्या दळवी मॅडम मला म्हणाल्या , " कुबलसर , तुमची ललिता आणि मी कुडाळ हायस्कुल मध्ये दोन वर्षे एका वर्गात होतो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. ती हुशार होती. " मी माझ्या ' लली ' बद्दल त्यांच्याकडून ऐकलं आणि माझी ' लली ' मला अर्धवट सोडून गेल्याचे दुःख अजून गडद होत जाताना मला दिसू लागलं. ' लली ' यु आर ऑलवेज ग्रेट , आय मिस यु.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment