Friday, March 25, 2022

🛑 वृद्धाश्रमातील वृद्ध

          असा प्राणी ओळखा जो सकाळी चार पायांनी , दुपारी दोन पायांनी आणि संध्याकाळी तीन पायांनी चालतो ? या कोड्याचे उत्तर विचार करण्यासारखे आहे. तो प्राणी म्हणजे आपणच आहोत. मनुष्यप्राणी. हा मनुष्य बाल्यावस्थेत चार पायांवर रांगतो , तारुण्यात दोन पायांवर रुबाबात चालतो आणि म्हातारपणी काठी घेऊन चालतो. आपण सगळे या तीन अवस्थांमधून जाणार हे नक्की असतं. 

          यातील पहिल्या दोन अवस्था हव्याहव्याशा असतात. तिसरी अवस्था येऊच नये असं वाटतं. ती येईपर्यंत आपण त्या अवस्थेतील आप्तांशीही व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. त्या अवस्थेत गेलो की समस्या नकोशा होऊन जातात. आपल्याला कोणी वृद्ध म्हटलेलं आवडत नाही. आपण ज्या कुटुंबसंस्थेचे भाग होतो , ती स्वतःची संस्था आपणांस नाकारु लागते ही आजची मोठी खंत आहे. 

          आजीबाईचा बटवा आज गायब झालेला आहे. आजीच्या गोष्टी हरवल्या आहेत. नातवंडांना आजोबा नकोसे झाले आहेत कि मुलांना आपले आईवडील नकोसे झाले आहेत ? असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. वृद्ध झाल्यानंतर त्यांची उपयोगिता कमी झाल्यामुळे असे झालेय का ? आयुष्याच्या उत्तरायणात जेव्हा खरी गरज आहे , त्याचवेळी त्यांना विलग करणं कितपत योग्य आहे ? असे प्रश्न यक्षप्रश्न बनत आहेत. 

          अशा वेळी बिचारे वृद्ध आई बापच निर्णय घेतात. " आता आम्ही या घरातील अडगळीच्या वस्तू झालो आहोत."  हे असह्य जगणं जगण्याच्या संघर्षातून काही वृद्ध आत्महत्येलाही प्रवृत्त झाले असल्यास ती आजच्या तरुण पिढीची चूकच म्हणायला हवी. 

ज्यांना आत्महत्या करण्याचं धाडस होत नाही ते वेगळं घर थाटण्याचा प्रयत्न करतात. वेगळं घर थाटलं तर आम्हांला बघणार कोण ? हा प्रश्न ज्यांना पहिला पडला असेल त्यांच्या सुपिक डोक्यात ' वृद्धाश्रम ' नावाची संकल्पना रुजली असेल. मुलांच्या सुखाच्या संसारात आपली अडचण नको म्हणून स्वतः वृद्धाश्रमाला जवळ केलेली माणसं मी पाहिली आहेत. काहींचं असं म्हणणं आहे , " आमची सगळी मुलं परदेशात राहतात , आम्हांला भारतातच राहायचे आहे. त्यांना वरचेवर येणे शक्य नाही म्हणून आम्ही स्वतःच वृद्धाश्रमात राहतो आहोत. ते तिकडून आम्हाला फोन करतात , पैसे पाठवतात. पण एक मात्र खरं आमच्या जीवनाचा उद्देश सफल झाला असला तरी पुढील जीवन मुलांच्या सहवासाशिवाय जाणार याचे अतीव दुःख होते. " 

          काहींना त्यांच्या मुलांनी ' सासू सुनांची ' भांडणे नको म्हणून वृद्धाश्रमात पाठवले आहे. अर्थात वृद्ध झाल्यानंतर या मुलांनाही त्यांची मुले वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नसतील तर ते नवल म्हणावे लागेल. 

          स्वेच्छेने किंवा जबरदस्तीने किंवा अपघाताने वृद्धाश्रम जवळ करावा लागणे ही कोणत्याही मानव प्राण्याला आवडणारी गोष्ट नसेल. एखाद्या दांपत्याला मुलंच नसतील तर त्यांना नाईलाजाने आपल्या सुरक्षेसाठी वृद्धाश्रमाला घर म्हणावे लागते. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या माध्यमातून दोन तीन वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला. तिथे जाऊन त्यांची एका दिवसासाठी आस्थेने विचारपूस केली. त्यांना वस्तू , धान्य , फळे , खाऊ दिले. त्यांच्या संस्थेला जमेल तशी आर्थिक मदत दिली. फोटो काढले. बातम्या दिल्या. या कार्याने त्या वृद्धांची काही प्रमाणात सोय होणार होती. प्रश्न सुटणार नव्हते.

          मी तेथील प्रत्येक वृद्धाला बघत होतो. त्यांचे चेहरे वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. त्यांचे चेहरे तात्पुरते फुललेले दिसत होते. ते  कायम तसे नसावेत हे लक्षात येत होते. कोणाची दाढी वाढली होती , कोण खोकत होते , कोण आजारी होते , कोणाच्या केसात उवा दिसत होत्या. आमच्या मंडळातील सेवाभावी नाभिक तिथे जाऊन मोफत केशकर्तनाची सेवा देत असल्याचे समजले. मला माझ्या ज्ञातीबांधवांचा आदर वाटला. 

          मी तिथे त्यांच्याशी बोलता बोलता एक अंगाई गीत म्हटले. ' श्यामची आई ' या नवीन चित्रपटातील ते गाणे होते. ' माझा बाळ गुणाचा गं , माझा श्याम गुणाचा गं ' असे गाण्याचे बोल होते. मी मधुर सुरात गाणे म्हणत होतो. समोरचे वृद्ध मंत्रमुग्ध होऊन मला ऐकत होते. जणू त्यांची स्वतःची मुलं त्यांना दिसत असावीत. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलेले मला दिसले. डोळ्यातील पाणी त्यांनी पुसलेही नाही. त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून मी गहिवरुन गेलो होतो. वृद्धाश्रमाने आम्हांला दिलेली वेळ संपली होती. आम्ही परत निघालो होतो. माझ्या डोळ्यांसमोरुन त्या वृद्धांचे चेहरे जाता जात नव्हते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर(  9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...