🛑 प्रशिक्षणानंद
शैक्षणिक प्रशिक्षणे ही नेमेची येत असतात. हल्ली त्याचे प्रमाण थोडे कमी झाले होते. ऑनलाईन प्रशिक्षणे वाढली होती. आता पुन्हा एकदा प्रशिक्षणे सुरु झाली आहेत.
शिक्षण क्षेत्रात प्रशिक्षणे उदंड असतात. इंग्रजी पेटी , टॅग मिटिंग , शिक्षण परिषद , मुख्याध्यापक सभा , शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण , निष्ठा प्रशिक्षण , गुगल क्लासरुम प्रशिक्षण , स्काऊट , कब आणि इतर प्रशिक्षणे सांगावी तितकी कमीच होतील. काही प्रशिक्षणे नवीन असतात. काही उजळणी स्वरुपात असतात.
नवीन शैक्षणिक प्रवाह येत राहतात. जुन्या संकल्पना जाऊन नवीन येतात. नवीन संकल्पना गळी उतरेपर्यंत वेळ लागत राहतो. त्या समजेपर्यंत पुन्हा अजून काही नवीन उपक्रम करण्यासाठी आग्रह धरला जातो. हे करु कि ते करु असे होऊन जाते. सगळेच उपक्रम चांगले असतात , पण ते करत असताना नियमित अभ्यासक्रम कधी शिकवायचा तेच समजायला मार्ग नसतो.
मग शिक्षकांची घुसमट सुरु राहते. अधिकारी सांगत राहतात. ते म्हणतात, हेही करायला हवे आणि तेही करायला हवे. त्यांचेही बरोबरच असते. कारण ते त्यांच्या वरच्यांचे आदेश पाळत असतात. त्यांनाही ते सहसा पटत नसतेच , पण त्यांचाही नाईलाज होत राहतो.
प्रशिक्षणे होणे खरंच आवश्यक गोष्ट आहे. काही गोष्टी आपण विसरलेले असू शकतो. त्या लक्षात येण्यासाठी प्रशिक्षणे हवीतच याबद्दल कुणाचेही दुमत असूच नये. पण लागोपाठ प्रशिक्षणे असल्यास त्यांचा कंटाळा येतो आणि तोचतोचपणा येतो. पहिल्या घेतलेल्या प्रशिक्षणाची शिक्षणक्षेत्रात अंमलबजावणी होण्यापूर्वीच दुसरे एखादे प्रशिक्षण व्हाट्सएपच्या माध्यमातून येऊन धडकते. त्यामुळे पहिल्या घेतलेल्या प्रशिक्षणाची परिणामकारकता कमी होते.
हल्ली आमची टॅग , शिक्षण परिषद , इंग्रजी पेटी अशी मासिक प्रशिक्षणे सुरु असताना माझे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणाचे दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले. जिल्हास्तरीय प्रशिक्षण अतिशय उत्तम पद्धतीने घेण्यात आले. त्यात शालेय व्यवस्थापन समितीची कर्तव्ये , अधिकार , जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या स्तराबद्दल अधिकचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे आर्थिक व्यवहार , अंकेक्षण , संरचनात्मक लेखा परीक्षण , शालेय आपत्ती व्यवस्थापन , निपुण भारत अभियान , शाळा विकास आराखडा , यशोगाथा इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर तपशीलवार मार्गदर्शन मिळाले. गमतीदार शैक्षणिक खेळातून मनोरंजन आणि शिक्षण घडले.
त्यानंतर मला हे प्रशिक्षण तालुकास्तरावर द्यायचे होते. कणकवली तालुक्यातील बावीस केंद्रांवरील एकूण चवेचाळीस शिक्षक या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले होते. शिक्षकांना प्रशिक्षण देणे ही सर्वात अवघड गोष्ट असते. आपण यापूर्वी कितीही वेळा तज्ज्ञमार्गदर्शक म्हणून काम केलेले असले तरीही. आपल्या समोरील प्रशिक्षणार्थी शिक्षक यांना शंका येतात. त्या सर्व शंकांचे निरसन योग्य पद्धतीने आपल्याला करता आले पाहिजे म्हणजे झाले.
सर्वच शंका निरसन करता येण्यासारख्या नसतातही. त्यामुळे शंकांचे निरसन न झाल्यामुळे अनेक शिक्षकांना शंकासुर बनूनच राहावे लागते. काही शिक्षक शंका विचारतात तरी , काहींच्या शंका संकोच वाटल्याने विचारायच्या राहूनच जातात त्यांचा आपण विचारच केलेला नसतो.
काहीही म्हणा , कितीही काहीही झाले तरी सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. न समजलेल्या संकल्पना समजून घेण्यासाठी ते वाचन करतात , चर्चा करतात , गुगल करतात. आपली शंका समाधान होईपर्यंत ते त्या समस्येची पाठ सोडत नाहीत.
मला यावेळी प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. मी प्रशिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी गुगल क्विज वापरल्या. सर्वांनी त्या अधीरतेने सोडवल्या. गटकार्यासाठी त्यांनी केलेले सादरीकरण वाखाणण्याजोगे होते. गंमत खेळ खेळताना त्यांनी लहान बालकांसारखा खोडकरपणाही दाखवला.
शिक्षकाने सदैव विद्यार्थी असायला हवे हे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध करुन दाखवले. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षकांनी घेतलेला सहभाग मलाही लाजवणारा असाच होता. सर्वांनी प्रशिक्षण उत्कृष्ट झाल्याबद्दलचा अभिप्राय दिला. केंद्रप्रमुख ओटवकरसर माझ्याबरोबर मार्गदर्शक होते. गटशिक्षणाधिकारी मा. किशोर गवससाहेब यांचे उदघाटनपर मार्गदर्शन स्फूर्ती वाढवणारे होते. गटसाधन केंद्राच्या दळवी आणि पाळेकर यांचेही सहकार्य मोलाचेच होते. त्यांच्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढत गेला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. तावशीकर यांनी प्रशिक्षण वर्गाला आकस्मिक भेट दिली.त्यांनी केलेले शंकांचे निरसन लक्षात राहील असेच होते. सर्वांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. एकूणच हा माझा प्रशिक्षणानंद म्हणायला हवा. मला खूप चांगले प्रशिक्षणार्थी लाभले. हे सर्व प्रशिक्षणार्थी पुढे केंद्रस्तरीय प्रशिक्षण घेताना याहीपेक्षा अधिक उत्तम मार्गदर्शन करतील याबद्दल अजिबात शंका असण्याचे कारण नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment