🛑 दांडगी आई : आमची बहिणाबाई
त्या दिवशी ' बहिणाबाईंच्या गाण्यांवर आधारित ' कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली. कार्यक्रम शेवटपर्यंत बघितला. कितीतरी दिवसांनी एक सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला. बहिणाबाईंच्या मुलाने सोपानदेव चौधरी यांनी किती चांगले काम केले आहे. आपल्या आईच्या म्हणजेच बहिणाबाई चौधरींच्या सर्व रचना लिखित करुन सर्वांना त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. या बहिणाबाईंचा संपूर्ण कार्यक्रम बघताना मला बहिणाबाईंच्या ठिकाणी आमची दांडगी आई दिसत होती.
दांडगी आई जरी वयाने दांडगी नसली तरी तिला सगळेजण दांडगी आईच म्हणत असत. आमची सर्वात मोठी आत्या होती ती.
आम्ही मालवणी भाषेत तिला दांडगी आई न म्हणता ' दांडगे आये ' असा उल्लेख करत असू. ती सगळ्यांचीच ' दांडगी आये ' झाली होती. तिचे लग्न तिच्या वयाच्या खूप कमी वयात झाले होते. तिच्या नवऱ्याला कोणत्या तरी असाध्य रोगाने पछाडले होते. तेव्हा तिच्या पोटात बाळ होते. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला होता. पण काहीच दिवसात आमची दांडगी आये अकाली विधवा झाली होती. मग ती आमच्या घरी म्हणजे तिच्या माहेरीच राहिली. आपल्या मूळ घरी ती परत गेलीच नाही. आपल्या मुलीला आमच्याच घरी लहानाची मोठी केली. सोबत आमच्या काकांना , आत्यांना आणि आम्हालाही मोठे करण्यात तिचा सिंहाचा वाटा होता. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. माहेरी असल्यामुळे तिला आजोबांची बोलणी खावी लागली. प्रसंगी शिव्यांसोबत मारही खावा लागला. वादावरून वाद वाढत जात आणि माझ्या आजोबांची आणि तिची शाब्दिक आणि शारीरिक चकमक घडे.
तिने आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या जीवाचे रान केले होते. ती रात्री उशिरा झोपे आणि सकाळी लवकर उठत असे. सकाळी जात्यावर दळण दळताना तिच्या तोंडी ओव्या येत. तिच्या ओव्या अर्थाने भरलेल्या असत. त्यावेळी त्यांचा अर्थ समजण्याइतके आम्ही समंजस नव्हतो. पण तिच्या गोड आवाजाने आमची झोप निघून जाई , पुन्हा तिच्या आवाजाने गाढ झोपही येई. उठल्यानंतर तिच्या ओव्या मी आठवण्याचा प्रयत्न करत असे. पण काहीही लक्षात राहत नसे.
रात्री आम्हाला झोपवताना कधीतरी छान छान गोष्टी सांगी. ' आकडी कोयती लावतय, शिळी रोटी खातंय, चल पिटु येतंय ' अशी सुरुवात असलेली गोष्ट मला खूप आवडे. आता तीही विसरायला झाली आहे.
माझ्यावर तिचा खूप जीव होता. सगळ्यांवर तिचे आणि सगळ्यांचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते. ती आपल्या मुलीच्या चुका काढुन तिला शिव्या शाप देत असे. पण आम्हाला तिने कधी वाईट बोलल्याचे आठवत नाही.
गणपतीच्या सणाला तिच्या फुगड्या जगावेगळ्या असत. तिने त्या कुठे ऐकल्या होत्या तीच जाणे. ती म्हणूनच आमच्यासाठी बहिणाबाईच ठरली होती. 'तुजा फु फु , माजा फु फु ' ही फुगडी तिच्या तोंडूनच ऐकावी आणि पहावीदेखील.
नवस करण्यात ती पटाईत होती. एकदा तिने वेगळाच नवस केला होता. गणपतीसमोर ती विवस्त्र फुगडी घालणार होती. तिने तो नवस सगळ्यांना नकळत फेडलाही.
तिचा संताप बघताना कुणालाही रडू येईल. मी तिचा संताप बघितला आहे. ती स्वतःवरच चरफडत राही. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे देवाकडून हवी असत. समर्पक उत्तरे मिळाली नाहीत की ती देवावर संतापे. देवाला अरे तुरे करी.
आमच्या घरातील चूल तिच्याच हातात होती. काकांची लग्ने झाली. त्यांच्या बायका आल्या. तरीही तिने चूल काही सोडली नाही. आजी तिला चूल सोडायचा हुकूम देत असे. तेव्हा त्यांच्यात झालेली भांडणे मी ऐकली आहेत. मी लहान होतो , आजीही माझीच होती आणि आत्याही. पण आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो. शेवटी माझी आजीच नमतं घेत असे. अशी त्यांची लुटूपुटूसारखी भांडणे दर आठवड्याला एकदा तरी हमखास होत. ती नेहमीची असल्याने त्यात कोणीही पडत नसत.
तिच्या मुलीचे लग्न झाले. तिला नवरा मिळाला तोही दारुच्या व्यसनाने गेला. तिच्यावर अनेक संकटे आली , पण ती डगमगली नाही.
मी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात नोकरीला लागलो होतो. तेव्हा माझे जेवण बनवण्यासाठी दांडगी आये आली होती.सकाळी उठल्यापासून ती माझ्यासाठी मरमर मरे. जंगलात जाऊन लाकडे गोळा करी. माझ्या आवडीचा फोडणीचा गरमागरम भात करुन देई. चुलीवरच्या थाळीला लावलेल्या भाकऱ्या करुन देई. पेज देई. तिच्या जेवणाला अप्रतिम चव होती. मी जेवत असताना ती माझ्याकडे कौतुकाने बघत बसे. माझे जेवण झाल्यानंतरच त जेवत असे.
एकदा मी शाळेतून उशिराच घरी आलो होतो, शाळेचे काहीतरी काम होते. मी आधीच वैतागलो होतो. मी आलो तर ती मला म्हणालीं , " अरे बाळू , माज्या पाटीवर जरा मुटके मार रे !!! आज नाकडा हाडलंय ना , पाट कशी दुकाक लागली हा " मी मुटके मारायचे सोडाच , मी तिच्यावर खूप खूप रागावलो. बिचारी काहीही न बोलता चुलीकडे गेली आणि गरमागरम चहा करुन मला आणून दिला. थोड्या वेळाने गरमागरम फोडणीचा भात समोर हजर होताच. ' माज्या बाबूक भूक लागली आसात ना ? ' असं म्हणत जेव्हा तिने मला भात पुढे केला होता तेव्हा मी तर तिच्याकडे बघतच राहिलो होतो. किती सहनशील होती ती !!! ग्रेटच.
पावसाळ्याचे दिवस होते. मी तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त गेलो होतो. मला यायला उशीरच झाला होता. संध्याकाळचे सहा वाजत आले असतील. ती माझ्या वाटेवर नजर ठेवून बसली होती. 'आजून कसो माजो पोरगो येत नाय ' असे म्हणत ती निघाली होती. वाटेत एक मोठा ओढा होता. पावसामुळे त्याचे पाणी वाढले होते. त्यावर साकवसुद्धा नव्हता. मी ओढ्याच्या पलीकडे येऊन थांबलो होतो. ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पहात बसलो होतो. दांडगी आये तिथे येऊन पोहोचली होती. तिने माझ्यासाठी मोठी आरोळी ठोकली होती. तिने आपली नऊवारी साडी वर खोचून घेतली आणि पाण्याच्या गतिमान प्रवाहात न घाबरता धाव घेतली होती. मीही तिच्यामुळे हळूहळू पलीकडून येण्याचा प्रयत्न करु लागलो होतो. मध्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. तिचे रडणे खोलीवर येईपर्यंत सुरुच होते.
आता ही आमची दांडगी आये हयात नाही. तिच्या आठवणी काही केल्या जाता जात नाहीत. तिच्यासोबतचे प्रसंग आठवले की आजही माझ्या डोळ्यांत गंगा यमुनेचा पूर आल्याशिवाय राहत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
.jpeg)
Excellent 👌👍
ReplyDelete