🛑 करु देवाशी भांडण
कैलासवासी चुलत्यांचे वर्षश्राद्ध होते. आदल्या दिवसापासून आमच्या सर्व बहिणी , नातेवाईक यायला सुरुवात झाली होती. मोठा गोतावळा असल्यामुळे माणसांची गर्दी नेहमीसारखीच होती. हे सर्वांचे आमच्यावरचे प्रेमच आहे असे मी मानतो.
भटजीकाका सांगितलेल्या वेळेवर आले होते. सर्व धार्मिक विधी वेळेवर पूर्ण होत होते. अशा वेळी एक वेगळे भावपूर्ण वातावरण तयार झालेले असते. येणारे नातेवाईक , पाहुणेरावळे अनेक दिवसांच्या अंतराने एकत्र आलेले असतात. त्यांच्या अश्रूपूर्ण गाठीभेटी जिव्हाळ्याचे प्रतिक असतात. ज्ञातीबांधव एकत्र येतात. समाजातील वाडीतील गावकरी येतात.
हे सगळं आज घडत होतं. दुपार होत चालली होती. येणारी मंडळी पिंडाला नमस्कार करत होती. मनोभावे नमस्कार करुन मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत होती. अजून काही माणसं येतच होती.
मी पिंडांचे विसर्जन करण्यासाठी नदीकडे निघालो होतो. माझ्यासोबत माझे बालाकाका होते. बालाकाका आमच्या घरातील एक जाणते व्यक्ती आहेत. त्यांच्याशिवाय कुणाचे पान हलत नाही. त्यांना सगळ्या धार्मिक गोष्टी परिपूर्ण माहिती असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडील सर्व कार्यक्रम होत असतात. आमचे सर्व भावोजी आणि बहिणी आम्हाला जे सहकार्य करतात त्याने आम्ही नेहमीच भारावून जातो. ही सर्व माणसे स्वतःच्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांसमोर वाकत असतात. या सर्वांबद्दल कायम मला ऋणात राहावेसे वाटते. येणारी माणसे हसतमुखाने निघून जातात. जाताना त्यांचे पाय आमच्या घरातून निघण्यास तयार नसतात. ते बराच काळ रेंगाळत राहतात. मग जाताना जड पावलाने जायचे म्हणून जातात.
वाडीतील सर्व गावकरी मंडळी हिरीरीने सहभाग घेतात. कित्येक कार्यक्रमात मी त्यांना मिळून मिसळून काम करताना बघितले आहे. हा एकोपा बघून खूप समाधान वाटते. मग ही वाडीतील माणसे वाटतच नाहीत , एकाच कुटुंबातील माणसे वाटत राहतात. मला बघताच हात उंचावतात. आपुलकीने चौकशी करतात. आम्हांला खूप सारे प्रेम देतात. आमच्याकडून प्रेम घेतात. आम्ही प्रेम देतो , त्यामुळे आम्हाला जे प्रेम मिळते त्याला तोड नाही. हे प्रेम आजन्म जपून ठेवायची आमची जबाबदारी असते.
जी माणसे काही काळ आमच्या सोबत नव्हती , तीही आता आमच्यासोबत येऊ लागली आहेत ही त्या देवाचीच कृपा आहे. त्या माणसांत नेहमीच चांगली भावना भरुन राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
अशा मोठ्या गजबजाटात काही चुका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चुका घडत असतात , त्या मुद्दाम केल्या जात नसतात. माणसे नुसती येत असतात. सर्वांचा आदर सन्मान करायचे मनात असते. पण गर्दीत कधीतरी काहीतरी राहून जातेच.
आलेली सर्व पितरे असतात. ती माणसाच्या रुपाने महालय किंवा श्राद्धाला खूप मोठ्या श्रद्धेने आलेली असतात. त्यांना आदराने जेवायला वाढणे हे यजमानांचे कार्य असते. आज हे कार्य आमच्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यात काही चुका झाल्या असतील तर येणाऱ्या अस्मादिकांनी आम्हांला क्षमा करावी अशीही विनंती आम्ही साष्टांग नमस्कार करुन केलेली आहे.
आलेली माणसं जायला लागली , तसं घर रिकामं होऊ लागलं. तरीही बहिणी , भावोजी आणि आत्या अशी माणसं मुद्दाम थांबली होती. वर्षश्राद्ध असलं की रात्री नेहमी भजन केलं जातं. त्यावेळी ज्यांचं वर्षश्राद्ध असतं , त्यांचा आत्मा कोणाच्याही अंगात येत असतो. तो कोणाच्या अंगात येतो हे पाहण्याची उत्सुकता असते.
आमचा भाई तिच्या मुलीच्या अंगात येतो हे आम्हाला गेल्या वर्षभरात माहीत झालेले आहे. तो येतो , तो मृदुंग वाजवतो , तो बोलतो आणि ते पाहून सगळे भाईची आठवण काढून ओक्साबोक्सी रडू लागतात.
आजही अगदी तसेच घडत होते. भजन मधुर सुरात सुरु झाले होते. अभंग आणि गजराचा आळवणीचा आर्त सुर , धुपाचा सुगंध , मृदुंगाचा नाद ऐकून भाईचा आत्मा आजही अगदी वेळेवर आला होता. त्याची वाट पाहावी लागली नव्हती. भाई आला आणि त्याने मृदुंग वाजवायला सुरुवात केली. त्याच्या आत्म्याचे घुमणे सुरु झाले होते. भाईच्या सगळ्या मुली रडू लागल्या होत्या.
सगळे भाईला नमस्कार करत होते. मीही नमस्कार करायला गेलो होतो. मी भाईचा हात हातात घट्ट पकडून त्याला विचारले , " मी कोण आहे ? " भाईने तातडीने उत्तर दिले होते. भाईचा आत्मा बोलला , " बाळू "… तू माझी आठवण काढ. माझ्या पोरग्यांकडे लक्ष दे. " मी सद्गदित झालो. पुढे भाईने सर्वांची नावे सांगितली. त्यांचे गुण सांगितले. तो चतुर्थीला दोन वेळा आला होता. आज तो पुन्हा आलाच. तो यावा अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. ती पूर्ण झाली.
तो असाच येत राहतो , त्यामुळे तो गेला आहे असे आम्हाला वाटत नाही. त्याचा वरदहस्त आमच्यावर असाच राहो अशी त्याच्या चरणी आमची कायमची प्रार्थना असणार आहे. भजनाचा शेवट भैरवीने होत होता. " मिळोनिया संतजन , करु देवाशी भांडण " हे शब्द माझ्या कानात नुसते गुंजत राहिले होते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )
No comments:
Post a Comment