Thursday, September 1, 2022

🛑 भजनांचे दिवस

🛑 भजनांचे दिवस

          माणसाकडे एखादी कला असायलाच हवी. त्या एका कलेचा आधार घेत तो आपलं जीवन सुंदर करु शकतो. ही एखादी कला जर भजनाची आवड असेल तर अधिक उत्तम. कारण ही भजनाची कला कधी छंद बनेल ते समजणारही नाही.

          पारंपारिक आणि वडिलोपार्जित कला पुढे नेत असताना घरातील नवी पिढी एक एक धडा घेत असते. आमच्या घरात आजोबांना भजनाचे भारी वेड होते. ते उत्तम गायक होते. त्यांचा आवाज स्त्रियांसारखा बारीक होता. त्यांनी आपल्या काळात अनेक भजने गाजवल्याचे बाबा सांगतात. स्वतः पेटी वाजवत नसले तरी सुरात गाण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांचे हे वेड पुढच्या पिढीत उतरत गेले आहे. 

          आम्ही लहान असतानाचे भजनांचे दिवस आठवतात. आमच्या एका घरातच आठ नऊ पुरुष असल्यामुळे भजन मंडळ स्थापन झाल्यासारखे झाले होते. काही कारणास्तव आमची आरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे आमचे भजन आपसूकच बंद झाले होते. अर्थात या कारणामुळे आमचे वैयक्तिक भजन सुरु करण्यासाठी चालना मिळाली होती. बुवाकाका पेटीवर , भाईकाका मृदुंगावर , बालाकाका चकीवर आणि आम्ही उर्वरित सगळे कोरस असे आमचे भजन सुरु झाले. बुवाकाका गायला लागले की आम्हाला चेव येत असे. त्यांचे अफलातून गायन पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. आम्ही एका रात्रीत आठ दहा भजने करत असू. प्रत्येकवेळी आधीपेक्षा भजन सरस होई. जणू रंगदेवता माता आमच्यावर प्रसन्न होण्यासाठी नेहमीच आतुर असल्यासारखी. सलग दहा रात्री जागरणे करुनही बाप्पाची सेवा करताना त्रास वाटत नसे. ते भजनांचे दिवस आठवले की आताही खुमखुमी येते. तसे ते बालपण पुन्हा यावे असे वाटत राहते. ती भजनांची मजा आता येत नाही. 

          एकदा बुवाकाका भजनाला आले नव्हते. दोन तीन भजने करायची होती. बुवाच नाही तर भजने कशी करायची हा आमच्यासमोर प्रश्न होता. सगळ्यांनी मला बुवागिरी करण्याचा आग्रह धरला. मी सहजच पेटीवर बसलो. एक दोन सूर दाबून धरले. त्या सुरात लाऊडस्पीकर लावून तीन भजने केली. लोकांना ती आवडलीही. लोकांनी मला सहन केले. त्यांच्या सहनशीलतेची मी खरंच कमाल करतो. बाप्पाने त्यावेळी माझ्याकडून भजनरुपी सेवा करुन घेतली होती. 

          अशी ही माझी गायनाची आणि भजनाची आवड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी अनेक भजने प्रत्यक्ष पाहिली आहेत. चंद्रकांत कदम , परशुराम पांचाळ , वामन खोपकर , विलास पाटील यांची भजने प्रत्यक्ष बघितली. त्यांच्या शिष्यांची भजने पाहिली. त्यानंतर कित्येक बुवांची भजने पाहण्याचा योग आला. 

          पूर्वीच्या आणि आताच्या भजनांमध्ये बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या बुवांना सर्वकाही मुखोद्गत असे. त्यांची नोटेशने , तराने ऐकताना देहभान विसरून जायला होई. आता तसे का घडत नाही समजत नाही. 

          आमचे आणि बुवाकाकांचे काहीतरी बिनसले. भजन बंद पडले ते सुरु झालेच नाही. मीही पेटी शिकण्याचा प्रयत्न करता करता आरंभशूर ठरलो. मला ते तडीस नेता आले नाही हा माझा पराजयच आहे. माकडाच्या घरासारखे मी पेटी वाजवायला शिकण्याचा दरवर्षी निश्चय करत गेलो. पण कधीही सफल प्रयत्न करुच शकलो नाही. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकत गेलो आणि त्या संसारालाच भजन म्हणू लागलो. आता हे माझे स्वप्न पूर्ण होईल याची मलाही खात्री नाही. 

          आता दरवर्षी आम्ही आमच्या गणपतीकडे छान भजन करतो. सगळी घरातली मंडळी ' भजन मंडळी ' म्हणून बसलेली असतात. दरवर्षी तेच अभंग , तेच गजर , त्याच गवळणी असल्या तरी आमच्या भजनाची गोडी आम्हांला नेहमीच नित्य नूतन टवटवीत वाटते हेही तितकेच खरे आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...