प्रत्येकाला आपला गाव आवडत असतो. ज्या गावात आपला जन्म झाला , तोही आपलाच गाव असं आपल्याला वाटत असतं. अर्थात जन्मस्थळ आणि गाव यांत साम्य असलं तर त्या गावाविषयी आपल्याला कमालीची ओढ असते. नव्हे ती असायलाच हवी. आपल्या गावाशी आपली नाळ जोडलेली असते. त्या गावातील आठवणी आपल्याला सतत गावाची ओढ तीव्र करत राहतात.
' गड्या आपला गावच बरा ' असं म्हणणारी अनेक माणसं मी बघितली आहेत. त्यांना हे सतत कळत असतं . गावात आले कि त्यांना शहराचा विसर पडतो. रजा संपत आली कि पोटात भला मोठा गोळा येतो. शहराकडे जाताना पावले जड होत जातात. शेवटी आपल्या मातृभूमीला सोडताना जणू आईलाच पारखे होत असल्याचा अनुभव येत असतो. गावातील ते अविस्मरणीय क्षण आठवले कि पाय पुढे पडणारच कसे ?
माझा जन्म कणकवलीत झाला. त्यावेळी वाहतुकीची आतासारखी साधनं नव्हती. संपर्क साधनं तर नव्हतीच म्हणाना. गोरगरिबांसाठी कुठला आलाय फोन ? तो फक्त बघण्यापुरता मर्यादित होता. कणकवलीपासून दहा मैलावर असणारं माझं किर्लोस गाव. आता त्याचं नाव आंबवणेवाडी असं झालं आहे. पण आम्ही किर्लोस या नावाचाच उच्चार करतो. किर्लोस हेच नाव आमच्या तनामनात कोरले गेले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम आमच्या गावीच केले जातात. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे येणाऱ्या अधिकाधिक सणांना बालपणी आम्ही किर्लोस गावी जात असू. बालपणीचा तो काळ खूप सुखाचा म्हणायला हवा. त्याचं वर्णन करताना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या उपमा सुचू शकतात. बालपणी गावात घालवलेले क्षण आनंदाचे परमोच्च बिंदूच म्हणायला हवेत.
शेतावर गुरे घेऊन जाणे , गुरे पाण्यावर घेऊन जाणे , गुरे पाण्यावर नेत असताना वाटेत सापडणारी सगळी झाडे आपल्याला फळे द्यायला आधीच उत्सुक असत. झाडाखाली पडलेली जांभळे , चिंचा , बोरे खाताना येणारी मजा काही औरच. करवंदे खाऊन ओठ चिकटत. करवंदांचा लालभडक कोंबडा खातानाचे दिवस पार काळवंडून गेले आहेत. नदीवर नेलेल्या गुरांना पाण्यात डुंबताना पाहून आपणांस डुंबता येत नाही ही खंत अजूनही सलते आहे. काकांनी पोटाखाली हात धरून पोहायला शिकवतानाचे धडे लक्षात आहेत. पण आता मात्र त्याच पाण्याची ज्याम भीती वाटते. आमच्या नदीने त्यावेळी मुंबईकरांचे घेतलेले जलबळी आमच्या मनात थरकाप आणत. त्यामुळे पाण्याची भीती वाटत गेली. पोहोणे राहूनच गेले. कपडे धुणाऱ्या फडतरीच्या पुढे पोहत जाण्याचे आमचे धाडस काहीकेल्या झालेच नाही.
पावसाळ्यात शेतावरील गुट्यावर बसून चिखलात पडताना झालेला आनंद अजूनही अंगावर रोमांच आणतो आहे. रात्रीच्या वेळी काकांनी पकडून आणलेले ' न्हयचे माश्ये ' मनःचक्षूंसमोर फडफडताना दिसत आहेत. त्याचं तिखट सार आणि हाताचा दोन दिवस न जाणारा वास गायबच झाला आहे. हे सगळे क्षण अविस्मरणीय आहेत म्हणूनच मला माझ्या गावाची ओढ वाटत राहते. सुट्टी कधी एकदा पडते आणि गावाला जायला मिळते असे आम्हाला होऊन जाई. शनिवारी आणि रविवारी मिळालेली संधीही आम्ही सोडत नसू. आंबे , काजू तर होतेच. फणसाचे गरे खाताना स्पर्धा लागे. माझे बाबा एकावेळी पन्नास साठ पेक्षा जास्त बरके गरे खात. त्यांचा कायम पहिला नंबर ठरलेला असे. आम्ही वीस पंचवीसच्या पुढे कधी गेलोच नाही. खाऊन पचवणे त्यावेळी चांगले जमे. आता जास्त खाल्ले तर त्रास होईल म्हणून स्पर्धाच लावली जात नाही.
मी रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला लागलो. आता जन्मभूमी आणि कर्मभूमी बदलली होती. नोकरीत खुश होतो. पण गावाकडे जाण्याची ओढ काही कमी होत नव्हती. एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडली. तीही रत्नागिरीतच. माध्यमिक शाळेतील नोकरी सोडून मराठी जिल्हा परिषदेची नोकरी स्विकारताना मनस्वी त्रास होत होताच. सरांचा गुरुजी झालो. तिथेही अठरा ते एकोणीस महिने छान नोकरी केली. गावाकडून येणारी पत्रे डोळ्यात पाणी आणत होती. मीही पाणी भरल्या डोळ्यांनी उत्तरे देत राहिलो.
शेवटी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओढ तीव्र झाली. नवीन भरतीच्या वेळी माझी सिंधुदुर्गात निवड झाली. एका दिवसांत निर्णय घेतला. रत्नागिरीतील नोकरी सोडून सिंधुदुर्गात आलो. देवगडात नऊ वर्षे नोकरी केली. पुन्हा कणकवलीत पाच वर्षे , वैभववाडीत सात वर्षे आणि आता पुन्हा कणकवलीत म्हणजे माझ्या जन्मभूमीत आलो आहे. माझी माणसे माझ्यासोबत आहेत. ती मला रोज भेटत आहेत. त्यांच्यासोबत आयुष्य जगताना आयुष्याचं सोनं होत आहे.
© प्रवीण अशितोष कुबल ( पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं. १ )


No comments:
Post a Comment