Monday, April 10, 2023

🛑 आम्ही वारीक वारीक

🛑 आम्ही वारीक वारीक

          संत सेना महाराज हे नाभिक समाजाचे संत म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत. ते मूळ मध्यप्रदेशातील बांधवगडचे. त्यांनी अनेक काव्यरचना केल्या. कवने केली. आजही ती अभंग आहेत. त्यांनी केलेल्या रचना विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या आहेत. 

          त्या काळात नाभिक हे नाव वापरले जात नव्हते. न्हावी या नावाचा उच्चार पुनःपुन्हा होत होता. अजूनही कागदोपत्री ' न्हावी ' या नावालाच उल्लेख आढळतो. नाभिक समाजावर राम नगरकर या नाभिक समाजातील शाहिराने ' रामनगरी ' हे विनोदी पुस्तक लिहून नाभिक समाजाचे प्रश्न मांडले आहेत. नाभिक समाजाचे लोक हे केशकर्तनाचा पारंपरिक व्यवसाय करतात. त्यात आता आधुनिकता आली आहे. हा नाभिक आपली कात्री , फणी , वस्तरा , वाटी आणि एक कापड ज्या पिशवीत किंवा ट्रंकेत ठेवत असे , त्याला ' धोकटी ' असे म्हटले जाई. 

          गावोगावी फिरुन काम करणारे नाभिक व्यावसायिक आता कमी झाले आहेत. काही गावांमध्ये एकही नाभिकाचे घर नसेल तर दुसऱ्या गावातून नाभिक बोलावले जात. त्याला वर्षाची ' कुल ' दिली जाई. कुल म्हणजे न सडलेला भात. एका माणसाची वर्षभर स्वच्छता केल्याबद्दल एखादी गोणी भात मिळे. हळूहळू या गोणीचाही आकार कमी कमी होत गेला. 

          कुंभार , मांग , रामोशी , महार , सोनार , लोहार , सुतार , गुरव , चांभार , कोळी , परिट आणि न्हावी असे बारा बलुतेदार म्हणजे लोकांचे सेवकच. या लोकांमध्ये नाभिकांचा धंदा म्हणजे हातावरचं पोट. 

          लग्नातील नवऱ्याची रेग , मयत झालेल्या घरातील पुरुष सदस्यांचे शौरकर्म करणं , अशुभ कार्याच्या वेळी शेंडी कापणे इत्यादी कामे नाभिकाशिवाय पुढे जात नाहीत. या कामाबद्दलही पूर्वी जमीन , झाड , कपडे , टॉवेल इत्यादी मिळे. आता रोख रक्कम दिली जाते. रितीरिवाज असेल तर काही वस्तुरुपाने भेटी दिल्या जातात. 

          आता नाभिक समाजातील शिकलेली मुले  पारंपरिक व्यवसाय करण्यास पुढे सरसावताना दिसत नाहीत. जेंटस ब्युटीपार्लर , युनिसेक्स सलून , स्पा इत्यादी व्यवसाय वाढीस लागत असले तरी हे व्यवसाय नाभिकेतर लोक चालवू लागले आहेत. चांगला पैसा मिळत असल्याने इतर समाजही या धंद्याकडे आकर्षिला जात आहे. याचा परिणाम मूळ नाभिक बांधवांवर होऊ लागला आहे. 

          नाभिक व्यवसाय करणाऱ्या मुलास लग्नासाठी मुली मिळणेही अवघड बनत चालले आहे. सर्वांनाच मुंबईला स्थायिक असलेले नोकरीवाले नवरे हवे आहेत. याचाही मोठा फटका नाभिक बांधवांना बसतो आहे. 

          संत शिरोमणी सेना महाराज हे नाभिक समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विविध समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात. तळागाळातील नाभिक समाज सुशिक्षित झाला पाहिजे असे प्रयत्न नाभिक  संघटनेच्या वतीने केले जातात. आधुनिकतेकडून अत्याधुनिकतेकडे जाण्यासाठी नाभिक युवक , युवतींनी नाभिक संघटनेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणे ही काळाची गरज आहे. आजची पिढी हे उद्याचे भविष्य आहे. त्यांनीच जर संघटनेकडे पाठ फिरवली तर उद्याचे भावी कर्तबगार नाभिक कसे निर्माण होणार ? नाभिक युवक , युवतींनी नाभिक व्यवसायाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे. लोकांना काय हवे आहे याचा अभ्यास करुन त्यांची सेवा करण्याचे हे लोकव्रत पुढे सुरु ठेवण्यासाठी अग्रस्थानी राहिले पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा आपल्या दुकानात दुसऱ्याला नोकरीला ठेवण्याची क्षमता बाळगली पाहिजे. 

          संत सेना महाराजांनी बादशहाची सेवा केली. असेच एकदा संत सेना महाराजांना बादशहाकडे बोलावणे आले होते. संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांना विठ्ठलासाठी वेळ देणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे बादशहाकडे जायला उशीर झाला. याचा राग येऊन बादशहाने सेना महाराजांना पकडून आणण्याचे फर्मान काढले. बादशहाचे सैनिक सेनांना पकडण्यासाठी घरी आले. इकडे बादशहाची दाढी करायला दुसरेच सेना आले होते. बादशाहाच्या सेवकांनी सेना महाराजांना बंदी करुन त्यांच्यासमोर उभे केले. बादशहाला आश्चर्यच वाटले. " सेना महाराज जर घरी होते , तर मग माझी दाढी करुन गेलेले सेना कोण होते ? " बादशहाला संत सेना महाराजांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आदर वाटला. कारण बादशहाची दाढी करण्यास आलेले दुसरे संत सेना म्हणजे साक्षात विठ्ठल पांडुरंग होते. बादशहा शरमला. त्याने संत शिरोमणी सेना महाराजांचा गौरव केला. 

          असे हे संत सेना महाराज आपल्याला ' वारीक ' म्हणत. त्यांनी एका अभंगात असे म्हटले आहे , " आम्ही वारीक वारीक , हजामत करु बारीक. " आज त्यांची जयंती आहे . त्यानिमित्ताने या थोर विभूतीस माझे कोटी कोटी प्रणाम. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग नाभिक कर्मचारी संघटना





No comments:

Post a Comment

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...