नाभिक म्हणजेच न्हावी समाजाचे संत सेना महाराज यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला. बांधवगडचे तत्कालीन राजा वीरसिंह यांच्या पदरी केशकर्तन , अंगमर्दन अशी सेवा देण्याचे काम संत सेना महाराज अतिशय इमाने इतबारे करीत असत. संत सेना हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. विठ्ठलभक्तीची नितांत आवड असणारे सेना महाराज वारकरी संप्रदायाचे संत म्हणून ओळखले जातात.
संत निळोबा , संत जनाबाई यांनी संत सेनांबद्दल गौरवोद्गार काढलेले दिसतात. संत जनाबाई म्हणतात , “ संत सेना न्हावी भला , तेणे देव भुलविला ”. संत निळोबा म्हणतात , “ जन्मोनि न्हावियाचे वंशी , भक्ती केली तुवा भोळी ”. अनेक संतांनी आपल्या अभंगांतून संत सेना महाराजांचे विशेषत्व सांगितले आहे.
संत सेना महाराजांचे अभंग शिखांच्या ‘ गुरुग्रंथसाहिब ’ या ग्रंथात आढळतात , यावरूनच त्यांचे संतपण दिसून येते. तत्कालीन सर्व संतांना संत सेना महाराजांबद्दल कमालीचा आदर होता. संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. विठ्ठलाची भेट घेण्यासाठी ते मध्यप्रदेशातून म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात ते सुमारे वीस वर्षे राहिले. या काळात त्यांनी मराठी भक्तिमय कविता लिहिल्या. इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पुस्तकात ‘ धन कोणा कामा आले , पहा विचारुनी भले , ऐसे सकळ जाणती , कळोनिया आंधळे होती ’ या अभंगात संत सेना महाराज म्हणत आहेत , ‘ सखा पांडुरंगाविण , सेना म्हणे दुजा कोण ? ’
संत सेना महाराजांची पत्नी होती सुंदरबाई. तीही संत सेना महाराजांच्या सत्संग सेवेत सहभागी असे. घरी येणाऱ्या भक्त , संत यांची सेवा करण्यात हे दांपत्य कोणतीही कसर सोडत नसत. असेच एकदा घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना वीरसिंह बादशहाकडून संत सेनांना नाभिक सेवेसाठी निरोप पाठवण्यात आला. संत सेना परिवार सेवेत दंग होता. त्यामुळे त्यांना बादशहाच्या सेवेला जाण्यास थोडा उशीर झाला. इकडे बादशहा रागावला होता. राजाच्या आदेशाचे तात्काळ पालन न केल्यामुळे संत सेनांना पकडून आणण्यास सांगितले. राजाचे सैनिक संत सेनांना पकडण्यासाठी निघाले.
बादशहा संत सेनांची वाट पाहत असतानाच संत सेना बांधवगडावर दाखल झाले. राजाला संत सेनांची प्रसन्न मुद्रा पाहून आनंद झाला. बादशहाने संत सेनांकडून आपली दाढी करुन घेतली. अंगमर्दन करुन घेतले. राजा कुष्ठरोगाने पिडीत होता. ही गोष्ट फक्त राजाच्या पत्नीला आणि संत सेना यांनाच माहिती होती. बादशहाने आपला चेहरा आरशात पाहिला. त्यावेळी संत सेना त्यांना विठ्ठलासारखे दिसले. राजाने पुन्हा पुन्हा पाहिले तरी त्याला तोच अनुभव आला. राजाचा कुष्ठरोग निघून गेला होता. राजाला संत सेना यांचा खूप अभिमान वाटला. आपण विठ्ठलाकडून आपली शरीर सेवा करुन घेतली याची खंतही वाटली. संत सेना महाराजांच्या धोकटीमध्ये राजाने सुवर्णमुद्रा घातल्या. संत सेना आपल्या घरी जायला निघाले. खुद्द विठ्ठलच संत सेनांचे रुप घेऊन आल्यामुळे ते वाटेत अंतर्धान पावले. राजाच्या सैनिकांनी खऱ्या संत सेना महाराजांना पकडून राजासमोर उभे केले. संत सेना महाराज पुन्हा आलेले पाहून राजा आश्चर्यचकित झाला. राजाने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. धोकटीमध्ये सुवर्णमुद्रा पाहताच संत सेनांना सर्व गोष्ट लक्षात आली. साक्षात पांडुरंगाने संत सेनांना शिक्षा होऊ नये म्हणून सेना महाराजांचे रुप घेतले होते.
अशा प्रकारे संत सेना महाराज यांच्याबद्दलच्या घडलेल्या गोष्टी वाचायला मिळतात. संत सेना महाराज हे नाभिक समाजातील असल्यामुळे त्यांची पुण्यतिथी नाभिक समाजाचे ज्ञातिबांधव साजरी करतात. यंदा महाराष्ट्रातील तमाम नाभिकांनी संत सेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात सगळीकडे संत सेना महाराजांची जयंती साजरी होत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ , मुंबई अशी नाभिक समाजाची नोंदणीकृत समाज संघटना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाची जिल्हा शाखा कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे या संघटनेचे कार्य सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील नाभिक समाजाला एकत्र करण्याचे महत्त्वाचे कार्य ही संघटना करीत आहे. त्यासाठी तालुकास्तरावर आणि विभागस्तरावर पदाधिकारी , कार्यकारिणी स्थापन करुन संघटनात्मक कार्य सुरु आहे.
मी विद्यार्थीदशेत असल्यापासून नाभिक संघटनेचे कार्य अतिशय जवळून पाहिले आहे. कणकवली शहरातील कै. यशवंत हरी अणावकरगुरुजी , मालवणचे कै. विवेकानंद उर्फ स्वामी लाड , कुडाळचे कै. चंद्रकांत चव्हाण आणि सध्याचे राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण यांचे संघटनात्मक कार्य पाहताना त्यावेळीही मी प्रभावित झालो होतो. त्यांनी केलेले संस्कार मी कदापि विसरु शकत नाही. शाळेत परीक्षेत चांगले यश मिळाल्याबद्दल त्यावेळी माझा मालवण येथील भैरवी मंदिरात झालेला सत्कार अजूनही लक्षात आहे. त्यामुळे मला मिळालेली प्रेरणा हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करुन गेला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
त्या पहिल्या पिढीच्या काळात संपर्क साधनांची वानवा होती. तरीही या कार्यकर्त्यांनी नाभिक समाजाच्या बांधणीसाठी जंगजंग पछाडले होते. गावागावांत जाऊन घरोघरी भेटी देऊन त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे असेच होते. त्यांची विचारसरणी त्यागाची होती. समाजहिताची होती. प्रोत्साहनाची होती. त्यांनी माझ्यासारखे संघटनेवर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते निर्माण केले. आज नाभिक संघटनेसाठी कार्य करणारे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्यासाठी जुन्या जाणत्या मंडळींनी संघटनेसाठी दिलेला वेळ मोलाचा होता. कै. स्वामी लाड आणि आजचे राज्य संघटक विजय सीताराम चव्हाण यांनी संघटनेसाठी केलेले अनमोल कार्य मालवण पासून सुरु झाले. आज सिंधुदुर्गात खारेपाटणपासून दोडामार्गपर्यंत सर्वदुर संघटनेचे पाईक पसरले आहेत. कुडाळात कै. चंद्रकांत चव्हाण यांच्या कार्यकारिणीने केलेले कार्य नव्या नाभिक पिढीचा उत्साह वाढवणारे आहे. आता यातील काही मंडळी हयात नसली तरी ती त्यांच्या कार्याच्या रुपाने कायमच अमर राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
गेली सहा सात वर्षांत नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्षपद कणकवलीतील अनिल अणावकर यांनी सांभाळले. त्यांनी संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. संघटनेचे काम करणारे अनेक धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्या काळात त्यांनी निर्माण केले आहेत. मी शिक्षक झाल्यामुळे पहिली तेरा चौदा वर्षे संघटनेपासून दूर होतो. पण पुन्हा कणकवली तालुक्यात आल्यानंतर अनिल अणावकर यांच्यामुळे कणकवली तालुका नाभिक संघटनेचा सरचिटणीस म्हणून कार्य सांभाळीत आहे. संघटनेच्या समाजोपयोगी उपक्रमांना समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्धी दिल्यामुळे संघटनेची नव्याने ओळख निर्माण होण्यास अधिक मदत होत आहे. संघटनेचे संकेतस्थळ , यु ट्युब चॅनेल यांचीही मदत होत आहेच. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांची मदत संघटना वाढवण्यासाठो मोलाची ठरत आहे हे वेगळे सांगायला नको.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाभिक भवन असावे यासाठी शासनस्तरावर नाभिक संघटनेची मागणी जोर धरु लागली आहे. मालवण येथे भैरवी मंदिरात संत सेना महाराजांच्या मूर्तीची स्थापना करुन अनेक वर्षे उलटली आहेत. मालवण तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यातही नाभिक समाजाचे संत शिरोमणी सेना महाराज यांचे मंदिर बांधण्यासाठी , भवन बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज वाटते आहे. जुन्या कार्यकारिणीने नव्या कार्यकारिणीकडे हे कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. नवीन कार्यकारिणी , माजी कार्यकारिणी आणि नाभिक कर्मचारी बंधु भगिनी यांनी मनात आणले तर नाभिक भवन उभारण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे हे मी सांगू शकतो.
हल्लीच आमच्या एका नाभिक भगिनींवर संकट ओढवले. तिला मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे झाले हे त्याचेच एक छोटे उदाहरण आहे. कोरोना काळात जय भवानी ग्रुप आणि सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक व्यावसायिकांना , सावंतवाडी बांदा येथील पूरग्रस्तांना वस्तुरुपाने मदतीचा हात देण्यात आला. संघटनेचे अनेक उपक्रम सुरु असताना या कार्यात महिला वर्गानेही भरारी घेतली आहे. नाभिक समाजातील अनेक हिरकणी तयार होऊ लागल्या आहेत. ड्रेसकोडचा वापर , १० वी , १२ वी आणि स्पर्धा परीक्षांत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान , नाभिक रत्न पुरस्कार , समाजभूषण पुरस्कार , खेळाडू , कलावंत , ज्येष्ठ श्रेष्ठ , महिला ब्युटिशियन , नाभिक कर्मचारी , आदर्श नाभिक कार्यकर्ता यांचा सन्मान , वाढदिवस , पदाधिकारी यांच्या भेटी , जातीवाचक विधानाबद्दल विराट मोर्चा , सलून व्यवसायाला उभारी , गरीब होतकरु मुलींना आर्थिक सहाय्य मिळवून देणे , आंगणेवाडी पायी नाभिक वारी , व्यापारी महासंघात प्रवेश , योगविषयक मार्गदर्शन , महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन , कायदेविषयक मार्गदर्शन , भव्य दिव्य वधु वर मेळावा , रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर , ऑनलाईन गाऊ नाचू सेनानंदे उपक्रम आणि अशा प्रकारचे अनेक उत्तम उपक्रम राबवून पुढील नाभिक पिढी अधिक गतिमानतेने कार्य करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे ठेवील अशी आशा करतो.
लेखन : प्रवीण अशितोष कुबल
जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक कर्मचारी संघटना
महाराष्ट्र नाभिक महामंडळ , मुंबई ( शाखा : सिंधुदुर्ग )

No comments:
Post a Comment