🛑 कुठे हरवली मळणी
पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत जामगे सीमावाडी येथे हजर झालो होतो. त्या आठवणी अजूनही ताज्या वाटत आहेत. त्या सर्व आठवणी स्मरणकुपीत जतन करुन ठेवण्यासारख्याच आहेत , म्हणून जपून ठेवल्या आहेत.
मी तेव्हा एकवीस बावीस वर्षांचा असेन. मिशीसुद्धा दिसत नव्हती. दाढी तर आलीच नव्हती. शाळेत शिक्षक असल्याने मोठ्या वयस्कर माणसांचा आदर स्विकारताना भारावून जायला होत होते. दोन वाड्यांच्या मध्यभागी द्विशिक्षकी शाळा होती. शाळा रस्त्यालगत होती. त्यावेळी तो मार्ग एसटी साठी सुरु झाला नव्हता. शाळेपासून जवळपास शेतीच शेती होती. त्यामुळे भात कापणी झाल्यानंतर शाळेसमोरुन भाताच्या पेंड्या नेताना पालक , गावकरी यांच्या भेटीगाठी होत असत. त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल कमालीचा आदर असे. डोळ्यात बघून ते कधीही बोलत नसत. ' गुर्जी , गुर्जी ..... अशी प्रेमळ हाक तिथे कायम ऐकू येई. त्यात असलेला आदर ओसंडून वाहत असल्यासारखा असे. त्यात कृत्रिमता अजिबात नसे.
मी तेव्हा एका रिकाम्या घरात राहत होतो. मोरे , शेलार आणि सुर्वे नावांच्या घरमालकांनी दिलेले प्रेम विसरलेलो नाही. सुर्वे आणि शेलार यांच्या घरात त्यांचं कुटुंब होतं. मोरे यांचं बंद घर मला शाळेपासून जवळ होतं. म्हणून मी तिथे राहायला लागलो.
शाळा सुटल्यानंतर मी त्या रिकाम्या घरात एकटाच कंटाळून जाई. मग हळूहळू मी सायंकाळची अभ्यासिका घेऊ लागलो. दहा पंधरा मुले दररोज अभ्यासासाठी येऊ लागली. त्यांना येणाऱ्या शंका मी सोडवू लागलो. त्यांना न्यायला पालक येत असत. त्यामुळे सगळ्या पालकांशी माझी चांगली ओळख झाली.
ओळखी सुरु झाल्या होत्याच आणि भात कापणीचे दिवसही सुरु झाले होते. कापलेले भात एकावर एक रचून ठेऊन नंतर समूहाने एकदम झोडण्याची त्या लोकांची सवय माझ्यासाठी नवीनच होती.
आमच्या गावी गाईबैलांचा किंवा रेड्यांचा वापर करुन मोठ्या जाड खांबाभोवती भात पसरवून मळणी करत असत. गुरांच्या पायाखाली पेंड्या तुडवल्या जात. त्याखाली भाताच्या पेंडीला उरलेसुरले शिल्लक भाताचे गोटे तुटून पडत. दोन तीनदा असे करुन मग भाताच्या पेंड्यांचे गवतात रूपांतर होई. ते गवत गुरांना चारा म्हणून वापरले जाई. लहानपणी आम्ही कधी गावी गेलो असताना रात्री रात्री गॅसबत्तीच्या उजेडात मळण्या बघितल्या आहेत.
मोठया पाटावर भात झोडल्यावर काही दिवसानंतर ही मळणी पार पडे. मळणी झाली की घरात मस्त गरमागरम पिठी आणि उकडाभात भरपेट खायला मिळे. लाकडी डोण्यात ठेवलेल्या उकड्या पेजेवर दुधासारखी जाड सुरसुरीत साय जमा झालेली दिसे. तशी उकडी पेज आता पाहायला मिळत असेल असे वाटत नाही. मातीच्या गोलीमध्ये पेज केली जात असे. गोली म्हणजे मातीची कळशी. ती चुलीवर ठेऊन ठेऊन काळीकुट्ट झालेली असे. त्यात बनलेली पेज मात्र पांढरीशुभ्र दिसे. करवंटीच्या डवलीतून पेज वाढणारी माझी आजी सर्वांना प्रेमाने पुन्हा पुन्हा वाढत राही. तिला नाही उरली तरी खरवडून वाढणारी आजी आज जिवंत हवी होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मळणी म्हणजे सामुहिक भात झोडणीच असे. एका दिवसांत त्यांची मळणी आणि झोडणी पूर्ण होताना मी बघितली आहे.
त्या दिवशी माझ्याकडे माझा एक शिक्षक मित्र आला होता. आम्ही मालवणी भाषेत मस्त बोलत होतो. कितीतरी दिवसांनी मालवणीत बोलण्याची संधी मिळाली होती. गावाकडे आल्यासारखा अनुभव येत होता. मस्तपैकी गाव गाता गजाली सुरु होत्या. तेवढ्यात एक विद्यार्थी निरोप घेऊन आला. म्हणाला , " गुर्जी , गुर्जी , तुम्हाला आमच्या मळणीकडे बोलावले आहे." आम्हांला गंमतच वाटली. आम्ही दोघेही धावतच मळणीच्या ठिकाणी गेलो. मळणीचा धबधब आवाज येत होता. मोठ्या काळ्या पत्थरावर भाताच्या ओंब्या रपारप आपटल्या जात होत्या. पिवळेजर्द भाताचे दाणे चहूकडे उडत होते. आम्हीही सहज मळणीत भाग घ्यायला जाण्याच्या प्रयत्नात होतो. पण आम्ही आल्याचे समजताच मळणी करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आम्हांला आदरपूर्वक नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली.
आम्ही आतल्या खोलीत जाऊन बसलो. पाच दहा मिनिटांत आमच्यासमोर कोंबडीचे जेवण आले. आमच्याकडे ज्याला ' वडे सागोती ' म्हणतात , तसा त्यांचा जेवणाचा बेत पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. सगळ्यांच्या जेवणापूर्वी आम्हाला आदरपूर्वक वाढण्यात आले होते. पुन्हा पुन्हा आग्रहाने वाढले गेले. नारळाच्या वापराशिवाय केलेल्या जेवणाची एव्हाना सवय झाली होती.
आमचे जेवण झाले तरी मळणी सुरु होतीच. मळणी संपल्यावर सर्व मंडळी जेवली असतील. त्यांनी आम्हां शिक्षकांना प्रथम जेवण्याचा मान दिला होता. त्यातले काही लोक कधीही शाळेत गेले नव्हते , तरीही शिकलेल्या माणसांपेक्षा जास्त आदर देण्यास शिकलेले पाहून माझं शिक्षण मला त्यांच्यासमोर खुजं वाटायला लागलं.
त्यानंतर प्रत्येकवेळी आम्हाला मळणीच्या जेवणाला बोलावणे व्हायचे. नेहमी तसाच आदर पाहायला मिळायचा. ही मळणी आणि आदर दोन्ही आता हरवलीत की काय ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून केली जाणारी मळणी आणि आदर या दोहोंचा आज अंगीकार करण्याशिवाय पर्याय नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
.jpeg)

No comments:
Post a Comment