🔵 करणी फिरता
" अशी कशी देवाची करणी , नारळाच्या आत पाणी , नारळ दिसतो दगडावाणी, आत गोड गोड पाणी " असा गजराचा अभंग आम्ही भजनामध्ये आळवत असू. त्यावेळी ' करणी ' या शब्दाचा अर्थ एका चांगल्या अर्थाने मनात बसला होता. आपण सर्वजण या आयुष्यात एक नाटक करत आहोत आणि देव हा त्याचा सूत्रधार आहे. आता देव याचा अर्थ निसर्गाची करणी असाही आपण घेऊ शकतो.
त्यानंतर ' करणी ' या शब्दाचा दुसरा अर्थ समजला. " जैसी करनी , वैसी भरनी " नावाचा गोविंदाचा हिंदी चित्रपट पाहिला आणि नवीन अर्थाची मांडणी मनात घर करुन गेली. म्हणजे आपण जसे वागणार आहोत , करणार आहोत , तसंच आपल्या बाबतीत घडणार आहे , आणि ते भोगावेही लागणार आहे.तेव्हापासून अधिक चांगले आचरण करत राहण्याची प्रेरणा मिळत गेली.
गावाकडे मात्र या ' करणी ' या शब्दाचा नवा अर्थ समजला जात होता. कोणाचे वाईट झाले कि कोणीतरी आपल्यावर ' करणी ' केली असे बोलले जाई. जप , जाप , साक्षी , पंचाक्षरी असे अनेक शब्द कानात गुंजू लागले होते. एक अनामिक भीती मनात उमटत होती. कोणीतरी आपल्यावर ' करणी ' केली तर आपले काय होईल ? असा संस्कारही बालमनावर त्यावेळी झाला. जसा मोठा होत गेलो , शिकत गेलो तसे त्याचे गांभीर्य माझ्या लेखी कमी कमी होत गेले. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढल्यामुळे असेल , करणीची भिती निघूनच गेली. त्यात एकदा अंधश्रद्धा निर्मूलनच्या नरेंद्र दाभोलकरांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष लाभल्यामुळेही वैज्ञानिक दृष्टीकोन कमालीचा वृद्धिंगत झालेला दिसला.
माध्यमिक शाळेत शिकत असताना असे अनेक साधक बाधक अनुभव येत जात होते. ते मनावर कोरले जात होते. त्यानंतर आपल्या आचरणात सकारात्मक सुधारणा होताना जाणवत होती. एकदा असाच मी शाळेतून दुकानात आलो होतो. दप्तर दुकानाच्या कोपऱ्यात ठेवले होते. ते दप्तर आपोआप हलू लागले होते. दप्तर ज्या भिंतीला टेकले होते , त्या भिंतीच्या मागे एक पोह्याची गिरण होती. गिरण चालू असतानाच दप्तर हलताना दिसे. गिरण बंद झाली कि दफ्तरही हलायचे थांबे.
गिरणीचे मालक नेहमी एक आयडिया करत. त्यांची गिरण सुरु आहे हे लोकांना समजावे म्हणून त्यांनी वाफ बाहेर पडण्याच्या पाईपवर बाटली किंवा प्लास्टिक भांडे लावून ठेवत. त्यामुळे ' फाक फाक फुक फुक ' असा काहीसा मोठा आवाज येई. तो आवाज अतिशय कर्कश असे. आमचे बाबा कधीकधी हळूच जाऊन ती बाटली काढून टाकत असत आणि मग आवाज बंद होई. पण थोड्याच वेळात तो कर्कश आवाज पुन्हा सुरु झालेला असे.
त्या दिवशी एक म्हातारे गृहस्थ आमच्या दुकानात आले होते. त्यांनाही तो आवाज ऐकू आला होता. ते म्हातारे आजोबा अतिशय आस्तिक होते. ते जप, जाप आदि करणारे असावेत. त्यांना तो आवाज वेगळाच वाटू लागला होता. त्यांनी त्या आवाजाला आपल्या मनात असे शब्द ऐकले होते , ' करणी फिरता , करणी फिरता '. आम्ही ज्याला ' फाक फाक फुक फुक ' म्हणत होतो त्याला ते ' करणी फिरता , करणी फिरता ' असे म्हणत स्वतः अतिशय गंभीर आणि अस्वस्थ झालेले दिसत होते. जेव्हा आमच्या बाबांनी ती बाटली काढून टाकली , तेव्हा आवाज बंद झाल्यावर ते म्हातारबाबा पूर्वीसारखे झाले होते. त्यांच्या मनात कोणती ' करणी ' होती ते त्यांनाच माहिती असेल , आम्हाला सांगता येणार नाही. पण या प्रत्यक्ष अनुभवावरून माझ्या असे लक्षात आले कि आपल्या मनात जे सुरु असते , तेच आपल्याला सगळीकडे दिसत असते. त्यानंतर ज्या ज्या वेळी त्या म्हातारबाबांचे दर्शन घडे , तेव्हा मला ' करणी फिरता , करणी फिरता ' ची आठवण येऊन हसू फुटत असे. आता ते म्हातारबुवा राहिलेले नाहीत , पण त्यांची ती ' करणी ' अजूनही कुठेतरी असेल का ? याबद्दल खात्रीपूर्वक सांगताही येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली ( 9881471684 )
खूप छान
ReplyDeleteThanks
ReplyDelete