🛑 खांडुक
सायकल ही आमची त्यावेळची सफारी होती. सायकल चालवायला शिकताना खूप गमती जमती घडल्या. बाबांची मोठी सायकल होती. ती चालवणे सोडाच , पण ती आमच्या जीवनीला झेपलीही नसती इतकी जड होती. कधीतरी दोन्ही हातांनी हँडल धरुन गोल गोल फिरवणे व्हायचे. त्याच्यापुढे जाता येत नव्हते.
तेली आळीत नेरकरांचे सायकलचे दुकान होते. तिथे तासाच्या भाड्याने छोट्या सायकली चालवण्यासाठी मिळत असत. एक तासाचे एक रुपया भाडे असे. आम्हाला एक रुपया मिळाला कि मी आणि माझा भाऊ दोघे सायकल सवारीसाठी निघत असू. " नीट सायकल चालवा रे बाबांनो " हे बाबांचे व आईचे वाक्य दहा वेळा ऐकून आम्हाला बाहेर पडावे लागे. आम्ही एकमेकांची जबाबदारी घेत असू. छोटी सायकल असल्यामुळे दोन्ही बाजूंना पाय पोहोचत असत. छोटा भाऊ मागून धावत धावत येत असे. मी पडत असताना त्याने अनेकदा मला पकडले आहे. आता मोठेपणीही तो माझ्या कायम पाठीशी असतो. आता जीवनरुपी सायकल चालवतानाही माझा भाऊ मी कुठे कमी पडणार नाही किंवा तोंडघशी पडणार नाही याची काळजी घेतो. खरंच, हा आधार खूप काही देऊन जातो.
विद्यामंदिर कणकवलीचे मैदान मोठे होते. त्यावर आम्ही सायकलचे राऊंड मारत असू. एक तास सायकल फिरवतानाचा आनंद इतका असायचा कि आता विमान चालवतानाही तो येणार नाही. पण तास संपत आला की वाईट वाटायचे. सायकल परत नेऊन द्यावी लागे. पुन्हा कधी एक रुपया सायकलीसाठी मिळणार तेव्हाच सायकल चालवायला मिळे. तोपर्यंतची प्रतिक्षा करणे फार अवघड असे.
सायकल चालवता येऊ लागल्यानंतर आत्मविश्वास वाढतच गेला. कोणाचीही सायकल दिसली की त्यावर बसून एखादातरी फेरफटका मारावा असे वाटत राही. पण सायकल पोटावर पाडून घेऊ , या भीतीने कोणीही आम्हाला सायकल चालवायला देण्याचे धाडस करत नसत.
एकदा बाबांची मोठी सायकल घेऊन मी एकटाच विद्यामंदिरच्या दिशेने निघालो. तरी बाबा नको म्हणत होते. येतो पटकन , असं म्हणत मी निघालो तो क्षणात दिसेनासा झालो.
विद्यामंदिरच्या प्रवेशद्वारापाशी महाराजा नावाचे हॉटेल आहे. तिथे मी आलो असेन. माझा अचानक तोल गेला. सायकल माझ्या पोटावर पडली होती. मी सायकलला बाजूला घेण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी मला उचलले होते. सायकल मात्र बाजूला माझी फजिती बघत उभी होती. मला उचलताना कोणीतरी सायकलला व्यवस्थित स्टँडवर लावून ठेवले होते. मला त्यावेळी त्या सायकलचा वैतागथोर राग आला होता.
डाव्या पायाचे ढोपर चांगलेच खरचटले होते. त्यातून रक्त ओघळत होते. एक रुपयाच्या नाण्याएवढी त्वचेची साल निघाली होती. मला रडायला येत होतं , पण रडूही शकत नव्हतो. हॉटेलच्या मालकांनी मला ओळखले होते. ते आता बाबांना माझा हा पराक्रम सांगणार त्यामुळे तर मला जास्तच रडू फुटत होते. पण मी ते आवरले आणि सायकल घेऊन तडक निघालो. वाटेत एका ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले दिसले. त्या पाण्याने खरचटलेला पाय चांगला धुवून घेतला. ते पाणी चांगले नव्हते , पण माझे काहीच झाले नाही असे मला बाबांना दाखवायचे होते. म्हणून मी तशी आयडियाची कल्पना लढवली होती.
आता मी दुकानात गेलो आणि गप्प बसलो. पण मी गप्प बसलेला पाहून तर बाबांनी मला लगेच ओळखले. त्यांना झालेला प्रकार अखेर सांगावाच लागला. त्यांनी मला त्यावेळी केलेले फायरिंग मला हुमसून हुमसून रडू आणणारे होते. त्यांनी मला डॉक्टरकडे अजिबात नेणार असे सांगितले. मी रात्रभर झोपलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी बाबा मला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. मी आपला लंगडत लंगडत चालत होतो.
काही दिवसांनी ती जखम बरी झाली असे वाटले. शाळेत परिपाठाच्या अगोदर मुले धावत असताना एक आडदांड मुलगा मला येऊन मोठ्यांदा आदळला. ती जखम पुन्हा फुटली. त्याचे मोठे खांडुक झाले. ते बरे होता होत नव्हते. मी त्याची खूपच काळजी घेत होतो. त्यामुळे ते बरे व्हायचे विसरुन अधिक चिघळत चालले होते. त्या खांडकाने माझी झोपच उडवून टाकली होती. त्यांच्यावरचे मांस वाढत चाललेले दिसत होते. शेवटी तेवढ्या भागाला भूल देऊन शस्त्रक्रियेने वाढलेली जखम कापून टाकावी लागली. दररोज ड्रेसिंग करायला जावे लागे. पट्टी काढताना जीव जाई. त्यावेळी मला खूप पथ्य पाळावे लागले होते. पिवळं दूध आणि चपाती एवढाच माझा आहार होता. डॉक्टरांना दरवेळी द्यायच्या पैशांचा हिशेब करत माझे काका मला चिडवायचे. तीनशे रुपये आणि दूध असे ते मला चिडवत त्यावेळी मला त्यांचा राग येई.
असे हे माझे सुप्रसिद्ध खांडुक लवकरच पूर्ण बरे झाले तरीही आपली खुणा काही त्याने सोडली नाही. अजूनही माझ्या ढोपरावर ते मला वाकुल्या दाखवत आहे असे वाटत राहते.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
No comments:
Post a Comment