🟢 छंद लेखनाचा
समर्थ रामदासांनी म्हटले आहे , " दिसामाजी नित्य काहीतरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचित जावे ". वाचनाचं वेड प्रत्येकाला असायला हवं , तसंच लेखनाचं वेड असणंही गरजेचं आहे. वाचन आणि लेखन या दोन्ही कौशल्यांचे फायदेच फायदे आहेत. वाचन केल्यामुळे तुम्हाला लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते. लेखक कसे लिहितात ? त्यांनाच कसं सुचतं ? असे अनेक प्रश्न वाचकाला पडतात. मग तोही काहीतरी लिहावे असे ठरवतो आणि हळूहळू लिहिता लिहिता लेखक बनून जातो.
माझेही तसेच झाले. मला वाचता वाचता लिहिण्याची गोडी निर्माण झाली. ही गोडी वाढता वाढता वाढत चालली आहे. हा छंद म्हणावा कि व्यसन म्हणावं ? माणसाला एखादी चांगली गोष्ट करण्यात परमानंद मिळत असेल तर ती गोष्ट त्याने जरुर करावी. हा लेखनाचा स्वानंद मिळत राहणेही आपल्या निकोप आरोग्यासाठी हितकारक असते. तुम्ही चांगले विचार करण्यात गढून जाता. वाईट विचारांना फाटा मिळतो. तुमची सर्जनशीलता विकसित होत जाते. तुमची प्रसिद्धी आपसूकच होत जाते. अर्थात प्रसिद्धीसाठी लेखन करायचे नसते , तुमची लेखन कलाच तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देते.
नाटकात काम करणाऱ्या नटाला प्रत्यक्ष प्रतिसाद मिळतो तेव्हा त्याला होणारा आनंद प्रत्येकवेळी वेगळा असतो. तसाच आनंद लेखकालाही मिळाला की त्याला स्वर्ग दोन बोटे उरत असेल. उत्स्फूर्तपणे लिहावे , ते एकदा दोनदा वाचून पाहावे असे करत असताना आपणच आपल्याला अधिक विकसित करत असल्याचा आनंद विरळाच असतो.
मला सुचले कि मी माझा राहात नाही. ते कधी एकदा लिहून काढतो असे होऊन जाते. सुचले कि मग त्याला वेळ, काळ लागत नाही. जिथे असेन तिथे लिहायला सुरुवात करतो. मध्यरात्री सुदधा लिहायला बसावे लागते. एकदा सुचले कि ते लिहिल्याशिवाय स्वस्थता येत नाही. तुमचा ताण कुठल्या कुठे निघून जातो. तुम्ही एक कात टाकलेली असता. तुम्ही कालपेक्षा आज अधिक ताजेतवाने आणि टवटवीत झालेले असता. माणसाला असे ताजेतवाने राहण्यासाठी नित्य लेखनाची नितांत गरज आहे.
पूर्वी अनेक लेखक स्वतःला बंद खोलीत कोंडून घेत आणि आपला लेखनप्रपंच करत. स्वातंत्र्यपूर्व काळात कारागृहातून अनेक क्रांतिकारकांनी लेखन करुन अनेक देशभक्तीपर कवने लिहिली. त्यांच्यासाठी कारागृह ही शिक्षा नव्हती. या शिक्षेच्या काळात त्यांच्याकडून विविध साहित्यकृती प्रसवल्या. त्यांचं दैदिप्यमान लेखन वाचताना आजही भारावून जायला होतं. त्यातलं साहित्यमूल्य अजोड होतं.
आपल्या जीवनात घडलेल्या घटना लिहिता लिहिता आपणच आपल्याला रिते करीत असतो. आपण मोकळे झालो की बरे वाटते. मला एखाद्याला जे सांगायचं असतं ते लिहिलं की माझ्या भावनांचा योग्य निचरा होतो. भावना आल्या कि त्या प्रकट झाल्याचं पाहिजेत. त्या प्रकट करण्यासाठी लेखनाइतकं दुसरं साधन नाही.
लेखन केल्यानंतर ते वाचकांपर्यंत पोहोचवणं ही देखील एक कला आहे. आता प्रसारमाध्यमे वाढल्यामुळे ते सहज शक्य झाले आहे. तुमच्यामुळे काही न वाचणारे लोकही वाचू लागतात हा तुमच्या लेखनात मोठा फायदा असतो. तुम्ही तुमच्या लेखनाने एखादा सकारात्मक विचार देता आणि वाचकाचे जीवन बदलून जाऊ शकते. वाचकाला माहित नसलेली गोष्ट तुम्ही नीट समजावून सांगत असता त्यामुळे वाचकांमध्ये आमूलाग्र बदल घडत असतो हे तुम्हाला लक्षातही येत नाही.
तुम्हाला भावणारी गोष्ट तुम्ही लिहिता त्यावेळी ती दोनदा जन्माला आलेली असते. एकदा ती प्रत्यक्ष घडलेली असते आणि दुसरी तुम्ही ती शब्दरूपाने घडवून आणत असता.
मला एकदा एका सलूनमधून फोन आला. समोरुन आवाज आला , " सर , तुम्ही ' सामंतांचे वडे ' नावाचा लेख लिहिलात तो खुद्द सामंतांच्या पत्नीने वाचला. ती तुम्हाला तुमच्या घरी बटाटे वडे पाठवून देत आहे. " अर्ध्या तासात खरंच गरमागरम बटाटेवडे माझ्यासमोर हजर होते. मला माझ्या लेखनाचा असाही उपयोग होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
हल्लीच माझ्या शाळेत बालिका दिन साजरा झाला. त्याचंही थोडं असंच झालं. एका संस्थेच्या प्रकल्प संचालकांपर्यंत माझे लेख पोहोचले असावेत. त्यांनी त्यांच्या संस्थेचा निबंध स्पर्धेचा कार्यक्रम आमच्या शाळेत घेतला. त्यामुळे आमच्या मुलांना निबंध लेखनाची संधी मिळाली. बक्षिसे मिळाली. बक्षिसे घेत असताना मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस उत्स्फूर्त आनंद बघता आला.
त्या दिवशी एका सहावीतल्या मुलाशी फोन संभाषण झाले. तो माझ्या ओळखीचा नव्हता. पण तो मला चांगला ओळखत होता. त्याने माझे लेख वाचले होते. त्याने मला पहिला प्रश्न असा विचारला , " सर , तुम्ही जे लेख लिहिता ते सर्व लेख मी वाचतो. पण तुम्हाला ते लिहायला सुचतात कसे ? " त्या मुलाचा प्रश्न मला आवडला. मी शाळेच्या कामात होतो. पण मला त्या मुलाशी बोलून त्याला उत्तर द्यावेच लागले. मी त्याला सांगितले , " मी असं काही वेगळं लिहीत नाही. मी जात येत असताना मला जे दिसतं ते मी लिहितो. मी प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न करतो. त्यातली जी गोष्ट मला अधिक भावते , ती गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहते. मग त्या घटनेला मी शब्दरूप देतो. " त्यावेळी मी त्या मुलाशी पाच मिनिटे बोललो असेन. लेखन कसे करता ? असे विचारणारा हा लहान मुलगा पुढे नक्कीच कोणीतरी मोठा आदर्श नागरिक घडेल यात मला मुळीच शंका वाटत नाही. या मुलासारखी अनेक मुले, माणसे या जगात चांगल्याचा शोध घेत असतील तर त्यांना चांगले नक्कीच सापडेल. फक्त हा शोध सुरु ठेवणं हे सातत्याने सुरु राहायला हवं.
असा हा लेखनाचा छंद व्रतासारखा जोपासत पुढे जाणं हे माझ्यासाठी सुद्धा एक रोजचं आव्हान असणार आहे. ते पेलता यायला हवं असंच मला वाटत राहतं.
माझ्या एका मित्राने हल्लीच माझा एक लेख वाचला आणि त्याला वाचनाची गोडी निर्माण झाली. तो स्वतः हुशारच आहे , सध्या कामाच्या व्यापात वाचनाकडे दुर्लक्ष झाल्याचं त्याने मान्य केलं. पुन्हा एकदा वाचनाकडे आणि लेखनाकडे जाता येण्यासारखा आपल्यातील बदल हा मला वाटतं मोठा बदल असावा , जो आपलं पूर्ण जीवनच बदलून टाकतो.
©️ प्रवीण अशितोष कुबल
( 9881471684 )
वाचनाने जीवन समृद्ध होते.आपल्या या लेखन प्रपंचास हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteआपली सहज ओघवती भाषा वाचकाला गुंतवून ठेवते आणि प्रसंगही नित्यक्रमातलेच 👌👍
ReplyDeleteधन्यवाद साऱ्यांचे
ReplyDeleteफार छान लिहिता सर!
ReplyDeleteवाचते आणि लिहिते होण्यासाठी सुंदर लेख👌👌
ReplyDelete