Saturday, January 22, 2022

🛑 कॉईन बॉक्स

          एकमेकांशी संवाद साधणे ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. समोरासमोर संवाद होत नाही म्हणून फोनचा आधार घ्यावा लागतो.  पूर्वी क्वचितच फोन सुविधा उपलब्ध असे. लॅंडलाईन फोन असणाऱ्यांकडे शेजाऱ्यांचे फोन येत राहात. त्यावेळी त्या फोन मालकांनाही वाटत असेल , फोन आम्ही नक्की कोणासाठी घेतला ? आमच्यासाठी कि शेजाऱ्यांसाठी ? समजा एखाद्याचा महत्त्वाचा फोन असेल तर ठिक आहे. पण दुसऱ्याच्या फोनवर कमी वेळ बोलण्याचे तारतम्य पाळता न येणारी माणसे बरीच बघितली. एकदा फोनचा रिसिव्हर कानाला लावला कि हातवारे करत अर्धा तास बोलणाऱ्या माणसांना काय म्हणावे ?  मिळालाय फुकट म्हणून गैरफायदा घेऊ नये हे त्यांना सांगूनही समजत नाही. 

          त्यानंतर एस टी डी फोन आले ते एक बरे झाले. निदान आपल्या नातेवाईकांना फोन करणे सोयीचे झाले. त्यावेळी अशा बुथवर फोन करण्यासाठी माणसांची तोबा गर्दी असे. मग लोक त्या छोट्या बॉक्समध्ये उभे राहून मनसोक्त अर्धा अर्धा तास बोलत राहू लागले. बाहेरच्या माणसांचे चेहरे मात्र आतल्या माणसाच्या नावाने चरफडत असल्यासारखे दिसत. " हा कधी एकदा बाहेर येतोय आणि मला माझा फोन करता येतोय " असे बाहेरच्याला होऊन जाई. 

          त्यामुळे नंतर कॉईन बॉक्स आला असावा. त्यात एक रुपयाचे नाणे टाकले कि साठ सेकंद बोलता येई. मोजकेच बोलायचे असले तर तेही विसरुन जायला होई. ते आठवेपर्यंत सेकंद संपून जात. पुन्हा पुढचा रुपया टाकावा लागे. 

          मग गल्लोगल्ली असे कॉईन बॉक्स दिसू लागले. काहींनी तर त्याचा धंदाच बनवला. त्यावेळी मोबाईल आलेले असले तरी त्याचे प्रमाण नगण्य होते. पेजर नावाचे एक यंत्र त्यावेळी आले होते. त्यावर फक्त संदेश प्राप्त होत असत. सुटबुटात वावरणाऱ्या काही मोजक्या लोकांकडेच हा पेजर असे. 

          माझे लग्न झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी मी साधा मोबाईल घेतला. ग्रामीण भागात त्यावेळी बी. एस. एन.एल. ची रेंज आली होती. त्यासाठी उंच डोंगरावर जावे लागले. पोस्टपेड कार्ड घेतले होते. उंच ठिकाणी गेल्यावर मोबाईलच्या स्क्रिनवर दोन्ही बाजूला पूर्ण रेंज दिसली कि खूप आनंद होई. मग तिथून सगळ्या नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न होई. 

          ज्या घरात राहात होतो , तिथेही माळ्यावर रेंज आहे हे समजल्यावर शिडीवर चढून जाऊन फोन अटेंड करण्यात कोण आनंद व्हायचा म्हणून सांगू !! बोलता बोलता आवाज कट झाला कि रागाने मोबाईल आपटावासा वाटे. पण तसे करणेही जमत नसे. महिना संपला कि पोस्टपेड बिल पोस्टाने येई. ते बघून डोळे पांढरे होत. बिल जास्त आलेले असे. पोस्टपेड असल्यामुळे बोलण्याचे भान नसे. तास तास बोलल्यामुळे बिलाची रक्कम वाढलेली असे. 

          तरीही सर्वांशी घरबसल्या बोलता येई हेही काही कमी नव्हते. फोनवर बोलल्यामुळे आपला संवाद वाढत जात होता. समोरचा आवाज अगदी जवळ ऐकू येत असल्यामुळे ती व्यक्तीच जणू भेटल्याचा भास होऊन जाई. नोकरीच्या गावी असताना आई बाबांशी , भावा बहिणींशी बोलताना घरी आल्यासारखे वाटे. 

          आज आधुनिक तंत्रज्ञान असलेले मोबाईल आले आहेत. त्यावर माणसे प्रत्यक्ष व्हिडिओ स्वरुपात दिसू लागली आहेत. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. दिवस रात्र चॅटिंग होऊ लागले आहे. टाईप करुन चॅटिंग करत असल्याने प्रत्यक्ष आवाजाची मजा निघून गेली आहे. अनेक ग्रुप चॅटिंगमुळे वैयक्तिक स्वरूपाचा संवाद कमी होत चाललेला दिसून येत आहे. आता सर्वच गोष्टी व्हाट्सएप , फेसबुक , इन्स्टाग्राम , टेलिग्राम , यु ट्युबच्या माध्यमातून मिळू लागल्या आहेत. तेच बघत बसण्याच्या नादात आपला एकमेकांशी होणारा हृद्य संवाद कमी कमी होत जात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. 

          तंत्रज्ञान हे आपल्या भल्यासाठीच आहे , त्याचा आपण किती वापर करायचा हे प्रत्येक वापरकर्त्याला समजायला हवे. त्याचा गैरवापर होतोय हे धोकादायक आहे. आता सगळे  अनलिमिटेड रिचार्ज झाल्यामुळे ते संपेपर्यंत मोबाईलला चिकटून राहण्याची माणसाला सवय होत चालली आहे. 

          कॉईन बॉक्स असताना बरे होते. महत्त्वाचे बोलायचे आणि फोन कट करायचा असे चालायचे. आता मात्र आपण किती बोलतोय याचेही भान राहत नाही. रस्त्याने जाता इयरफोन किंवा ब्लुटूथवर खुळ्यासारखी एकटीच बोलत जात असलेली माणसे पाहिली कि खुळी तरी बरी असे म्हणण्याची वेळ येते. आता त्याहीपुढे आणखी कोणते शोध लागतील ते विज्ञान जाणे. 

          आता ते लाल रंगाचे कॉईन बॉक्स कुठेतरी विरळ आढळतात आणि ते जुने दिवस आठवून ते संवाद हवेहवेसे वाटतात. गॅसवरचे जेवण खाऊन कंटाळलेले लोक चुलीवरच्या जेवणावर आले आहेत , तसे मोबाईलवर बोलून बेजार झालेले लोक पुन्हा कॉईन बॉक्स वापरतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...