🟤 धुके दाटलेले
शनिवार असल्यामुळे काल रात्री अलार्म लावून ठेवला होता. पण अलार्म वाजण्याअगोदरच उठायला झाले. माझे नेहमी असेच होते. अलार्म लावला कि तो वाजायच्या आधीच मी उठलेला असतो. मग काय ? नंतर अलार्म वाजून दुसऱ्यांची झोपमोड करण्यापेक्षा अलार्म बंद करुन कामाला लागायचे. अलार्म लावलेला नसता तर वेळेवर उठलोही नसतो कदाचित. पण सगळ्यात आधी बाबा उठतात , मग हळूहळू सगळ्यांना जाग येते.
शाळा सकाळची होती. मी माझी तयारी केली. बायकोला चहासाठी मुद्दाम उठवण्यापेक्षा बाहेरच चहा पितो असे बाबांना सांगून मी निघालोही. बाहेर पहाटेचा संधीप्रकाश दिसत होता. थंडी म्हणावी तशी नव्हतीच. पण थंडीसाठी उगीचच जर्किन घालून मी माझ्या गाडीवर स्वार झालो. पण बाहेर थंडी माझ्याकडे आ वासून बघत होती. जाता जाता मस्त अमृततुल्य चहा घेतला आणि सुसाट निघालो नेहमीप्रमाणे.
जसजसा मी पुढे जात होतो , रस्त्यावर धुके दाटून आलेले दिसू लागले होते. दाट धुक्यातून वाट काढत , रस्ता कापत निघालो होतो. शाळेत गेलो तरी मुले शाळेत असणारच नव्हती. तिथे जाऊन हालचाल नोंद करुन गृहभेटीला जायचे होते. ऑनलाईन तासिका व्यवस्थित होत नाहीत , म्हणून हा मार्ग अवलंबला होता. तसंही गावात हायस्पीड इंटरनेटची कमतरता जाणवतच होती. सगळ्याच मुलांकडे मोबाईल नव्हते. असलेच तर ते अँड्रॉइड नव्हते. कधी त्यांची बॅटरी चार्ज नसे , तर कधी रेंजचा प्रॉब्लेम असे. कधी रिचार्ज नसण्याच्या तक्रारी येत. त्यापेक्षा प्रत्यक्ष गृहभेटी देऊन मार्गदर्शन करणे केव्हाही चांगले, म्हणून गृहभेटीला प्राधान्य दिले. मुले अगदी वेळेवर क्लासला ठराविक ठिकाणी गटागटाने येत होती. सामाजिक अंतर आणि मुखपट्टीचे नियम पाळत होती.
धुके दाट पडले होते. पुन्हा शाळा बंद झाल्यामुळे मला शिक्षण क्षेत्रातही हे असे शैक्षणिक धुके दिसू लागले होते. ऑक्टोबरपासून सुरु झालेले वर्ग पुन्हा बंद झाल्यामुळे मुलांना संमिश्र आनंद आणि दुःख दोन्ही झाल्याचं दिसत होतं. मला मात्र अजिबात आनंद होत नव्हता. आता मला पुन्हा एकदा गेल्यावेळचा लॉकडाऊन आठवू लागला होता. आता शैक्षणिक धुके अधिक दाट होणार की काय अशा शंका मनात येऊन उदास व्हायला होत होतं. मी आपला तेच गाणं गुणगुणत चाललो होतो. धुके दाटलेले ..... उदास उदास sss मी मनातल्या मनात गाण्याचा आलाप मारत होतो.
हुमरटपासून घनदाट धुके सुरु झाले होते. पण थोडे पुढे गेल्यावर पुन्हा स्पष्ट दिसू लागत होते. पुढे पुढे 30 किलोमीटर अंतर पार करीपर्यंत धुक्याने कोणाचीच पाठ सोडली नव्हती. धुक्यामुळे गाडीचा वेग वाढवून चालणार नव्हता. वेग वाढवला तर पुढून कोणी आले आणि आपण त्याला ठोकलं तर ? ही भीती मनात येत होतीच. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. शाळेलाही धुक्याने वेढले होते. शाळा निर्विकारपणे माझ्याकडे पाहात होती. शाळेत मुले नसल्यामुळे कदाचित तिला आपल्या मुलांची आठवण आली असावी. तिने मला आपल्यात सामावून घेतले. आपल्याकडे विद्यार्थी नाही आले , पण शिक्षक तरी आले याचाही तिला आनंद झाला असेल कदाचित.
शेवटी मी काय शाळेत थांबणारच नव्हतो. मी मुलांना दिलेल्या वेळेत वाडीवार ठरवलेल्या ठिकाणी जाण्याची तयारी करत होतो. तयारी करेपर्यंत धुके निघून गेले होते. मी आपला ठरल्या ठिकाणी जायला निघालो. मुले माझी आधीच वाट पाहत होती. मी त्यांच्यासोबत जितका वेळ राहत होतो, तितका वेळ त्यांना शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत होतो. मुलं काहीतरी शिकण्याची धडपड करत आहेत या गोष्टींच्या आनंदाने माझ्या मनात दाटलेले धुके केव्हाच निघून गेले होते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
खूप छान लेख.
ReplyDeleteमुलांना त्यांच्या वाडीत जाऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
ReplyDeleteThanks for replying me
ReplyDelete