🛑 लालपरी
हल्ली दोन अडीज महिने झाले , ही परी दिसेनासी झाली आहे. खरंच ती परी आहे , सर्वांची लालपरी. गावागावात पोहोचलेली. सर्वांना आवडणारी. अगदी अतिदुर्गम भागातही ती पोहोचली होती. तिचे पोहोचणे सर्वांसाठी प्रतिक्षा करत ठेवणारे. ती आली रे आली कि सर्वांचा आनंद द्विगुणित होऊन जातो. तिची प्रतिक्षा आता मात्र सहन होताना दिसत नाही. ती लवकर यायला पाहिजे अशी सर्वांचीच तीव्र इच्छा आहे.
त्यादिवशी शाळेत जायला निघालो होतो. ती माझ्यासमोरुन अचानक झरकन निघून गेली. किती दिवसांनी ती मला दिसली होती. मला ही खूप आनंद झाला होता. ती अशीच पुढेही दिसत राहावी असे वाटत होते. मी तिच्यामागून गाडी पळवत चाललो होतो. शेवटी तिने मला चकमा दिला. ती वेगात माझ्या पुढे पुढे निघून दिसेनाशी झाली. मी विचार करु लागलो होतो. मला जशी तिची हुरहूर लागली होती , तशीच ती सर्वांनाच लागली असणार.
मी ज्या लालपरीबद्दल बोलतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सर्वांची लाडकी एसटी आहे. तुम्हाला काय वाटले ? कोणी तिला बस म्हणतात. पण ही बस प्रत्येकाला स्वतःच माझ्यामध्ये बस म्हणून सांगत असते. काहींनी तर या लालराणीला लाल डबा सुद्धा म्हटल्याचे ऐकले आहे. खूप त्रास होतो असे ऐकताना. पण लोकं जिची आतापर्यंत मदत घेत आले आहेत तिलाच असं का बोलत असतील हेही न उलगडणारे कोडे आहे. असो. आता ती नसल्यावर आपली काय अवस्था झाली आहे हे समजले तरी पुरेसे आहे.
आम्ही लहानपणापासून या लालपरीनेच प्रवास केला आहे. आता स्वतःची गाडी असल्यामुळे कधीतरी लालपरीने प्रवास घडतो. पण लालपरीचा प्रवास हा सगळ्यात सुरक्षित प्रवास असे. लालपरीचे चालक , वाहक आपल्याला काळजीपूर्वक इच्छित स्थळी नेऊन सोडतात. ते जी सेवा करत आहेत , त्याला तोड नाही.
लालपरीचे ड्रायव्हर , कंडक्टर आमच्या दुकानात येत. बाबांशी त्यांची जीवश्च कंठश्च मैत्री होती. त्यातील एक दोन व्यसनाधीन मित्रांना बाबांनी रुळावर आणल्याचे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.
नोकरीला लागल्यावर मला या लालपरीनेच शाळेपर्यंत सोडले आहे. शनिवारी शाळा सुटल्यानंतर या लालपरीसाठी दहा बारा किलोमीटर अंतर दिड तास चाललो आहे. एकदा लालपरी दिसली की हायसे वाटे.
मी जन्माला येणार होतो , त्यादिवशीची गोष्ट बाबा सांगतात. बाबा गावी गणपती बनवत असत , तेव्हा माझी आई कणकवलीत होती. आईच्या पोटात दुखत असल्याची बातमी बाबांपर्यंत कुणीतरी पोहोचवली. बाबा तसेच निघाले होते. एक लालपरी वेगात निघाली होती. बाबांनी लांबूनच तिला दोन्ही हात जोडले. लालपरीच्या चालकाने स्टॉप नसूनही तिथे गाडी थांबवली. माझा जन्म सुखरुप झाला , तेव्हा माझ्या बाबांनी त्या लालपरीचे मनापासून आभार मानले होते.
अशी ही लालपरी. तिने असे अनेकांना वाचवले आहे. कामावर नेले आहे. पर्यटन करायला उपयोगी पडली आहे. ती आता सुरु नाही तर सर्वसामान्यांचा प्रवास महागला आहे. ती लवकर सगळीकडे धावायला सुरुवात करेल अशी आशा बाळगण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment