Sunday, January 9, 2022

🟣 झुंजार बाबल्या

          🟣 झुंजार बाबल्या

        गेली दोन वर्षे तो मृत्यूशी झुंज देत होता. कॅन्सरची लक्षणे समजल्यानंतर उपचार सुरु करण्यात आले. माणसांना कॅन्सर सारखं दुर्धर  दुखणं कधी होऊच नये. 

          कोणत्याही पेशंटला स्वतःचा आजार समजला कि तो हबकून जातो , पण हा मात्र अजिबात घाबरला नव्हता. त्याने सुरुवातीपासून आज शेवटपर्यंत जगण्याची जिद्द अजिबात सोडली नव्हती. वयाच्या अवघ्या ३५ ते ४० वर्षांमध्ये असे घडावे असे कोणाला स्वप्नातही वाटणार नाही. पण असा आजार जडला कि तोही किती चिवट असतो , जाण्याचे नावही घेत नाही. कायम परोपकारी वृत्तीने सर्वांशी वागणाऱ्या या माणसालाच अशा आजाराने जखडावे याची कमाल वाटते. असा कसा हा देव ? जो तीन मुली आणि एक मुलगा यांना पोरका करुन जातो. कधी कधी या देवाचाही राग करावासा वाटतो. काही माणसे देवालाच शिक्षा देतात. देवाला पाण्यात बुडवून ठेवतात. बिचाऱ्या देवाला बुडून राहावे लागते. ज्याठिकाणी देव बुडून जाऊ शकतो , स्वतःचे रक्षण करु शकत नाही , तर तो आपले रक्षण कसे करणार असाही कधीकधी प्रश्न पडतो. आता यावरही काहीजण म्हणतील कि देव आपली सत्त्वपरीक्षा घेत आहे म्हणून. असो. हे असेच चालायचे , पण अनेक माणसांमध्ये देव भेटतो याची प्रचिती मला अनेकदा आली आहे. 

          मी ज्यांच्याबद्दल बोलतोय तो माझा आत्येभाऊ आणि साडू लागतो. त्याचं नाव प्रसाद. तो आजारी असताना त्याच्या ऑपरेशनसाठी बराच खर्च येणार होता. गरीब बिचारा प्रसाद एवढा खर्च कसा काय पेलू शकणार होता ? त्याला अनेकांनी आर्थिक मदत दिली. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करत होता. तेवढी मदत पुरण्याइतका आजार काही साधासुधा नव्हता. ऑपरेशन झाल्यानंतर प्रसाद बरा झाला असे वाटले , पण तो बाहेरुन बरा दिसत असला तरी आतून पोखरला जात होता. त्याच्या पत्नीला मानले पाहिजे. तिने आपल्या नवऱ्यासाठी शर्थीची झुंज दिली. कोल्हापूर , मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये फिर फिर फिरवले. अजूनही तिला आपला नवरा बरा होऊन दुकानात जाईल अशी आशा होती. प्रत्येकीला आपल्या नवऱ्याबद्दल असेच वाटणार ना ? आपले कुंकू अबाधित राहावे असे प्रत्येक सौभाग्यवतीला वाटणारच. माझ्या मेहुणीचे तिच्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसताना आपल्या नवऱ्याला असा दुर्धर आजार होईल अशी तिने कधी कल्पनाही केली नसेल. 

          या माझ्या भावाला सगळे बाबल्या या नावानेच जास्त ओळखतात. बाबल्या झुंजार होता. पण तो या आजाराने बेजार झाला होता. एकदा तो माझ्याकडे आला होता तेव्हा मी त्याला माझ्या गळ्यातील सोन्याची माळ विकून पैसे दिले होते हे समजल्यावर तर त्याने मला ओक्साबोक्शी रडत घट्ट मिठी मारली होती. तो बरा होण्यासाठी त्याच्या बायकोला गळ्यातले मंगळसूत्रही विकावे लागण्याची शक्यता आहे असे सांगणारा मी स्वतः सोन्याची साखळी विकून बसलो होतो. साखळी विकून आलेले सगळे पैसे मी त्याला हसत हसत देऊन टाकले. त्याची ती त्यावेळची मिठी मला आताही आठवते आहे. 

          आज या बाबल्याला भेटायला गेलो होतो. हल्ली बरेच दिवस मी आणि माझी पत्नी त्याला बघायला गेलोच नव्हतो. अर्थात बघायचे ठरवले असते तर बऱ्याचदा जाऊ शकलो असतो , पण जाण्यासाठी पाय काही बाहेर पडत नव्हते. आज मात्र त्याला बघायला जाण्यासाठी पाय स्वतःहून बाहेर पडले होते. 

          मी , माझी पत्नी आणि माझी पाच वर्षांची छोटी मुलगी उर्मी जात होतो. जाता जाता छोटी उर्मी आम्हाला म्हणाली , " पप्पा , आपल्या बाबल्या काकांना बरे वाटायला हवे. मी देवाकडे प्रार्थना करते. " आम्ही एवढे मोठे असून ती छोटी मुलगी देवाकडे प्रार्थना करत होती. मी गाडी चालवत होतो. पत्नी मागे बसली होती. आपल्या मुलीची ही वाक्ये ऐकताच तिने रडायलाच सुरुवात केली. ती आंब्रडला बाबल्याच्या घरी जाईपर्यंत प्रवासात रडतच होती. 

          गेलो तर बाबल्या बेडवर निश्चेष्ट पडला होता. डोळे सताड उघडे होते. श्वास सुरु होता म्हणून तो आहे असे वाटत होते. त्याला मी चार पाच वेळा जवळ जाऊन हाका मारल्या. त्याने प्रत्येक हाकेला जोरात दिर्घश्वास घेतला होता. हाकेला ओ देणे त्याला अजिबात जमत नव्हते. शेवटी तासभर त्याच्यासोबत राहून आम्ही परत यायला निघालो. 

          अर्ध्या तासात आम्ही कणकवलीत पोहोचलो. खोलीचे कुलूप उघडले आणि आत पाऊल ठेवणार , इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. आंब्रडवरुन फोन आला होता. बाबल्याची मृत्यूशी झुंज संपली होती. त्याला स्मशानात घेऊन जाताना ' पप्पा , काका , बाबू , बाबल्या ' अश्या आर्त किंकाळ्यानी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मीही माझा चष्मा काढून हलकेच डोळ्यातले आलेले पाणी पुसत होतो.    

          मला अजूनही प्रश्न पडला आहे , तो आमच्या जाण्याची वाट बघत होता का ? बाबल्या , तू आता आसमंतात जिथे असशील तिथे तुला माझे अनंत कोटी प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...