एखाद्याच्या घरी चोरी झाल्याशिवाय त्याला समजू शकत नाही चोरी काय असते ते. ते सुद्धा आपल्या लहानपणी चोरी झाली असेल तर ती आपल्या मनावर जास्त कोरली जाते. माझंही तसंच झालं.
आम्ही तेव्हा गांगोवाडी परिसरात राहात होतो. ते सावंतांचे घर होतं. खूप चांगली माणसं होती त्या चाळीत. ती चाळ म्हणजे एक घरच होतं म्हणाना. मालकांची सगळी मुलं आमचे चांगले मित्र झाले होते. संध्याकाळी दररोज त्यांच्या संगतीने आम्ही आरती किंवा भक्तिगीते म्हणत असू. बाबा दुकानातून रात्री उशिरा येत असत. त्यांची वाट पाहून आम्ही कधीच झोपलेले असू. त्यांनी खाऊ आणले असले तर बाबाच आम्हाला उठवत असत. मग त्या अर्धवट झोपेत आम्ही तो पदार्थ खात खात पुन्हा झोपत असू.
बाबांनी आमची सर्वांची पोष्टात आर डी ची खाती उघडली होती. दरमहा दहा रुपये त्यात भरायचे असत. पाच वर्षानंतर मिळालेली रक्कम मोठी दिसत असे. आमच्या दोघा तिघांची आर डी मुदत संपली होती. त्यामुळे त्याची रक्कम नुकतीच प्राप्त झाली होती. बाबांनी त्यात काहीतरी मुलांसाठी दागिने किंवा एखादी नवीन वस्तू घेण्याचे ठरविले होते. म्हणून ती एवढी मोठी रक्कम घरातच ठेवली होती. रुम भाड्याचा होता. रूमचा दरवाजा मोठ्याने ढकलला की उघडेल अशी दरवाजाची अवस्था होती. पण आतापर्यंत आम्हाला त्या दरवाजाने कधी दगा दिला नव्हता.
त्या दरवाजाच्या जवळच मी आणि माझे बाबा झोपत असू. मी बाबांच्या कुशीत गाढ झोपणारा मुलगा होतो. त्यांच्याशिवाय मला झोप लागत नसे. मध्यरात्री जाग आली तर भीतीने बाबांच्या अधिक कुशीत शिरत असे. एक लोखंडी पत्र्याची कॉट होती. त्यावर सुद्धा कधीतरी आमचे झोपणे होई. पण मी मात्र कायम बाबांकडेच. बाकीची चार भावंडे आईच्या जवळ झोपत. रूममध्ये दोनच खोल्या होत्या. त्यात आम्ही सात माणसे कशीतरी दाटीवाटीने झोपत असू.
त्याच खोलीत दोन लोखंडी बॅगा होत्या. त्यात सर्वांचे कपडे ठेवलेले असत. बाबांनी दोन दिवसांपूर्वी मिळालेले पैसे त्या कपड्यांच्या खाली लपवून ठेवले होते. ते पैसे तिथे ठेवल्याचे मला माहिती नव्हते. आईला आणि मोठ्या बहिणींना माहिती होते.
त्या दिवशी रात्री आम्ही सगळे गाढ झोपलो होतो. सकाळी बाबांना नेहमीप्रमाणे जाग आली होती. त्यांना लोखंडी पेट्या दिसल्या नाहीत. त्यांनी सगळ्यांना जागे केले होते.. आम्ही घाबऱ्याघुबऱ्या उठलो होतो. खरंच पेट्या कुठे दिसत नव्हत्या. दरवाजाकडे पाहिले. दरवाजा किलकीला उघडा दिसला. उघडून बघितला तर बाहेर एक भला मोठा दगड ठेवलेला दिसत होता.
बाबांनी ओळखले. चोरी झाल्याबद्दल ते म्हणाले. त्यांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे चोरांनी चोरुन नेल्याबद्दल त्यांना खूपच वाईट वाटलेले त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यांनी मातीच्या माठातील थंडगार पाणी प्यायला सुरुवात केली होती. कितीवेळ ते पाणीच पित होते. तेही खूप घाबरले होते पण घाबरल्याचे दाखवत नव्हते. आम्ही रडू लागलो. त्या आवाजाने शेजारी पाजारी जागे झाले. त्यांनाही चोरीबद्दल समजले. तोपर्यंत बाहेर दिसायला लागले होते.
खोलीपासून शंभर दिडशे मीटर अंतरावर असलेल्या नदीच्या किनाऱ्याजवळच्या झुडपांमध्ये आमच्या बॅगा चोरांनी विस्कटून टाकलेल्या दिसत होत्या. त्यातले पैसे तेवढे घेऊन चोर पसार झाले होते. आमची प्रमाणपत्रे सुद्धा विखरुन टाकली गेली होती. चोरांना त्यांचा काहीच उपयोग होणार नव्हता. कोणीतरी धावत धावत सांगायला आले होते. ते ऐकून आम्ही भावंडे आणि बाबा जिवाच्या आकांताने नदीच्या दिशेने धावत सुटलो होतो.
तिथे जाऊन बघतो तर काय !!! खरंच आमच्या दोन पेट्यांमध्ये मावणारा आमचा गरिबीतला संसार उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळत होता. आमची पाच वर्षांची पुंजी त्या चोरांनी चोरुन नेली होती.
कोणीतरी पोलिसात तक्रार नोंदवली होती. चार पाच पोलिसांची फौज घटनास्थळी हजर झाली होती. त्यांनी पहिल्यांदा आमच्याच घरातल्या माणसांचे ठसे घ्यायला सुरुवात केली होती. त्यांना आमच्यावरच संशय आला होता. पण आम्ही सर्वांनी त्यांना हवे तसे सहकार्य केले होते.
दुपारपर्यंत श्वानपथक आले होते. पोलिसांनी त्या श्वानांमार्फत तपास सुरु केला होता. आम्ही आमच्या विखुरलेल्या कपड्यांना हात लावू शकत नव्हतो. साखळी बांधलेले पोलिसांनी आणलेले कुत्रे कपड्यांचा वास घेऊन नदीपर्यंत धावत गेले होते व तिथेच घुटमळत राहिले होते. त्यांना पुढेही जाता येत नव्हते आणि मागेही. ते फक्त भुंकत राहिले होते.
पुढील तपास झाला कि नाही मला माहित नाही. पण आमच्या कष्टाचे पैसे मात्र आम्हाला मिळालेच नाहीत.
चोरी झाल्यानंतरच्या रात्री मी आणि बाबा कॉटवर झोपलो होतो. रात्री बाराचा सुमार असेल. बाहेर कुत्री मोठ्याने भुंकू लागली होती. मला वाटले आजही चोर आले असतील. मी एवढा घाबरलो होतो कि बाबांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होतो. जसजसे कुत्र्याचे भुंकणे वाढे , तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते.
त्या चोरांनी अलगद दरवाजा उघडून कशी चोरी केली , हे कोणालाही समजले नाही. कुणी म्हणाले, " त्यांच्याकडे मंतरलेले तांदूळ असतात. तांदूळ टाकून ते आपल्याला संमोहित करुन टाकतात , मग चोरी करतात. " त्या दिवशी खिडकीच्या बाहेर काही तांदळाचे दाणे होते खरे. मी स्वतः बघितले आहेत ते तांदूळ.
ह्या चोरांचं मला एक समजत नाही !! त्यांना चोरी करण्यासाठी आमचेच घर कसे सापडले ? त्या तांदळांनी आम्ही खरंच संमोहित झालो होतो का ? त्या चोरांना ते आमचे कष्टाच्या कमाईचे पैसे लाभले असतील का ? असे अनेक प्रश्न मला त्यावेळीही पडले होते आणि आताही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर( 9881471684 )
No comments:
Post a Comment