🛑 योगवसुधा आणि वसुधायोग
हल्ली योग करणारी माणसं गावोगावी दिसू लागली आहेत. मला योगाची आवड आहे. हे योग योग्य प्रकारे करावे लागतात. नाहीतर त्याचे तोटे संभवतात. डीएडला असताना कणकवली कॉलेजच्या प्राध्यापक विलास पाटील सरांकडून योगा शिकण्याचा योग जुळून आला. सलग एकवीस दिवस योगाचे प्रात्यक्षिक अनुभवले. तेव्हा त्याचे विशेष वाटले नाही. नवीन काहीतरी शिकावे या हेतूने शिकलो होतो. त्याचे प्रमाणपत्र जपून ठेवले होते हे माझे योगनशीबच म्हणायला हवे.
त्या एका योगप्रवेश प्रमाणपत्रामुळे मला पहिली नोकरी मिळाली. माझी ही अतिरिक्त पात्रता कामी आली होती. चाळीसजणांमधून माझी निवड व्हायला केवळ योग कारणीभूत होता. योगायोगानेच मला नोकरी मिळाली होती हाही माझा भाग्ययोगच.
नोकरी मिळाल्यानंतर योग येईल तसा योग शिकवत होतो. नंतर प्रसंगानुरुप अभ्यासापुरता योग करत असे. तीन वर्षांपूर्वी योगशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करावा असे मनात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संलग्न डॉ. वसुधा योगा अकॅडमी वेंगुर्लेमध्ये प्रवेश निश्चित केला.
अकॅडमीच्या संचालिका डॉ. वसुधा मोरे ह्या स्वतः B.A.M.S. D. Yoga. M.S.Yoga (S -VYASA-Banglor) पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उच्च विद्यविभूषित डॉक्टर व योगशिक्षिका आहेत. त्यांना आयुष मंत्रालयाची मान्यता मिळालेली आहे. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या या विद्वत्तेचा अनुभव आला. त्यांचा योगाचा खोलवर असलेला अभ्यास आम्हाला थक्क करणारा होता. आम्हाला योगाच्या महागुरु मिळाल्या होत्या.
त्यांचे अध्यापन ऐकताना , त्यांच्यासोबत प्रात्यक्षिक करताना खूप शिकता आले. त्या खऱ्या अर्थाने योगगुरु आहेत. योगाचे यम आणि नियम त्यांनी नेहमीच पाळले आहेत. योगसिद्धांताचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या आवाजात मृदुता असते. सतत संयमाने जीवन जगण्यासाठी त्या आम्हाला प्रेरित करतात. त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून आम्ही खूप काही शिकत गेलो. त्यांनी डॉक्टर हा व्यवसाय सदैव पेशा म्हणून करण्याचे व्रत अंगिकारले आहे. त्यांच्या अर्ध्या तासांच्या मार्गदर्शनाने आपल्यात लक्षात येण्याइतका बदल घडू शकतो. मला त्यांचे तीस ते चाळीस पूर्ण दिवसांचे प्रत्यक्ष व ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. त्यांनी नेहमीच पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. पुस्तकातला योगा अंतरात उतरवला आहे. त्यांनी दिलेली योगनिद्रा अजूनही आठवते. दररोज नवनवीन हालचाली शिकवताना त्या आपले वय विसरुन जाताना दिसतात. ज्या हालचाली आम्हाला अजिबात जमत नव्हत्या , त्या हालचाली त्यांना लिलया जमत होत्या. आम्हाला कधीकधी आमचीच लाज वाटे. पण हळूहळू त्यांनी आमच्यात आत्मविश्वास रुजवला. आम्ही त्यांच्यासारखे करत गेलो नि घडत गेलो. त्यांची शाबासकी मिळत गेली.
त्यांचा दिवस सकाळी ५ वाजता सुरु होतो. त्या लंडनमधील लोकांचे ऑनलाईन क्लासेस घेतात. तसेच अमेरिका, युरोप आणि संपूर्ण भारतातुन मद्रास, कलकत्ता, गोवा,कर्नाटक,आंध्रप्रदेश ,हिमाचल ,उत्तराखंड येथील विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत. आपल्या शेजारील गोव्यातील अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार होत आहेत. सिंधुदुर्गातील अनेक डॉक्टर त्यांचे शिष्य आहेत. मी शिकत असताना माझ्यासोबत दहा ते बारा डॉक्टर्स देवगड , कुडाळ , सावंतवाडी , गोवा इथून शिकायला येत होते.
त्यांचे नावच वसुधा आहे. वसुधा म्हणजे पृथ्वी. ज्या पृथ्वीवर आपण राहतो , ती किती विशाल आहे. तसेच वसुधा मॅडमांचे योगातील ज्ञान विशाल पृथ्वीसारखे आहे. म्हणूनच त्या आमच्यासाठी सदैव ' योगवसुधा ' ठरतात. योगा शिकताना नेहमीच जमिनीला वंदन करावे लागते. वाकावे लागते. वसुधेला नतमस्तक व्हावे लागते. डॉ. वसुधा मोरे यांना आमचा नेहमीच साष्टांग सूर्यनमस्कार असणार आहे.
त्यांना नमस्कार करण्याचा अनमोल योग आमच्या जीवनात आला म्हणूनच आम्हाला या योगालाच ' वसुधायोग ' म्हणणे योग्य वाटते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

छान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete