🛑 काव्यप्रेमी मंच : उत्तम कविलेखकांचा संच
आज मला एका लेखकांच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील होऊन पंधरवडा झाला असेल. या ग्रुपमध्ये प्रतिभावंत लेखक , लेखिका , कवी , कवयित्री आहेत. यात सामील होण्यासाठी मला ओसरगावचे प्रकाश चव्हाण यांनी आग्रह धरला. मी लेखक किंवा कवी नाही. तेवढे मोठे होण्यासाठी मला अजून काही वर्षे लेखनक्षेत्रात कार्य करावे लागेल. मी लिहितो ते वाचकांना आवडते याचा अर्थ मी लेखक झालो असे मला स्वतःलाही वाटत नाही. मी एक साधा शिक्षक आहे. माझ्यामध्ये लेखनक्षमता जरुर आहे. त्यात खतपाणी घालण्याचे काम हा काव्यप्रेमी ग्रुप करत आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होत चाललेला आहे. त्याची पट वाढतच जाणार आहे याचीही मला खात्री आहे.
पूर्वी मी मला हवे तसे लिहीत असे. एखाद्या घटनेकडे बघत बघत सुचत गेले की मला भावेल तसे , वाटेल तसे लिहीत जाई. माझ्याकडे आधीच खूप शीर्षके तयार आहेत , त्यावर वेळ मिळेल तसे लेखन मी करत असतो. मी माझा फावला वेळ मुद्दाम काढतो आणि लिहिण्याची हौस भागवून घेतो. एखादी गोष्ट सुचली की ती लिहिल्याशिवाय राहवत नाही. मग जिथे असेन तिथे माझे लेखनकार्य सुरु राहते. ते लेखन वाचकांना पाठवले की त्यांचे अनेक उदंड प्रतिसाद मला अधिकाधिक लिहिण्यास प्रवृत्त करतात. मी लिहीत जातो , लिहीत राहतो , लिहूनच थांबतो.
आचार्य अत्रे यांनी आपले आत्मचरित्र लिहिले होते. ' कऱ्हेचे पाणी ' या आत्मचरित्राचे एक एक खंड केवढे जाडजूड होते. आश्चर्य वाटते , एवढे लेखन करण्यासाठी त्यांना किती वेळ लागला असेल ? त्यावेळी आजसारख्या सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी प्रचंड लेखन केले होते. त्यांनी लिहिलेली नाटके पाहताना , वाचताना त्यांच्याबद्दलचा आदर वाढत राहतो. त्यांनी त्यावेळी कित्येक भूमिका बजावल्या होत्या. प्राध्यापक , पत्रकार , लेखक , कवी , नाटककार , पटकथाकार , कथाकार , वक्ता आणि कितीतरी !!!! त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या पुस्तकांची पारायणे करावी लागतील , तरीही ते शक्य होईल असे वाटत नाही. त्यांच्या पासंगाला आपण पुरणार नाही हे कटुसत्य आहे.
काव्यप्रेमी शिक्षक मंच म्हणजे एक लेखन कार्यशाळाच आहे. यावर नियम आहेत. बंधने आहेत. शाबासकी आहे. प्रतिसाद आहेत. मार्गदर्शन आहे. नवनवीन लेखांचा संग्रह आहे. नवनिर्मिती आहे. सन्मान आहे. आणि असे बरेच उत्तमोत्तम आहे. मला पंधरवड्यात इतक्या गोष्टींचा शोध लागला आहे.
याद्वारे माझ्या लेखनाची गती वाढली आहे. वाचन वाढले आहे. कविता , चारोळी लिहिण्याची सुरुवात मी यामधूनच केली आहे. मी पत्रकारिता करतो , पण लेखनाचे हवे तसे बाळकडू मिळण्याचा स्रोत मला आता गवसला आहे. शब्दाची कोटी करणे , कोट्यवधी शब्दांमधून अचूक शब्द शोधून काढणे जमायला लागले आहे. मंचाने नवलेखकांना अशीच प्रेरणा देत राहावी म्हणजे माझ्यासारखे झाकलेले लेखक नक्कीच प्रथितयश लेखक बनतील यांत मुळीच शंका वाटत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )

खूप सुंदर
ReplyDeleteखूप छान सरजी
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteयोग्य साथ , सोबत ,
ReplyDeleteलिहीत रहा प्रविण भाई
खूप छान