Thursday, March 31, 2022

🛑 एप्रिलफुल बनाया

🛑 एप्रिलफुल बनाया

          आज एक एप्रिल. दुसऱ्यांना फुल बनवण्याचा दिवस. आज आपण दुसऱ्यांना फुल बनवणार आहोत असे म्हणता म्हणता आपण स्वतः फुल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुल म्हणजे फुलझाडाचे फुल नव्हे ? ते फुल असते तर बरे झाले असते. हे मूर्ख बनवणारे फुल आहे , ज्याला आपण ' एप्रिलफुल ' या नावाने सगळीकडे ओळखतो. 

          जुन्या काळी आजच्या दिवशी एक गाणे नेहमी लागायचे. " एप्रिलफुल बनाया , तो उनको गुस्सा आया , तो मेरा क्या कुसुर , जमाने का कुसुर जिसने दस्तुर बनाया " हे गाणे म्हणता म्हणता आम्हीही कोणाचीतरी खोड काढायचो. मजा वाटायची. तो फसला की म्हणायचो , " एप्रिलफुल , कानात डुल , खिशात फुल , हातात बांगडया " वगैरे ...... लहानपणी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला एप्रिलफुल करण्यात जी मजा येई ती आता येत नाही. ती निष्पाप मजा निखळ असे. त्यात हेवेदावे नसत. तो एक खेळच असे. तो आम्ही कधीच जीवघेणा बनवला नाही. 

          " तुला गुरुजींनी बोलावलंय " असे सांगून कित्येकांना आम्ही गुरुजींकडे पाठवले आहे. " तुझ्या मागे बघ काय ? " असे म्हणत त्याला मागे बघायला लावले आहे. मित्रांना फसवले. त्यांनी फसून घेतले. मीही अनेकदा त्यांची शिकार होऊन गेलो आहे. घरात आणि शेजारी तर खूपच मज्जा केली आहे. भाड्याने राहत असताना अनेक खोल्या बदलल्या. प्रत्येक खोलीचा वेगवेगळा अनुभव असेल. पण या दिवशी ' राग ' मात्र कधीच येऊ दिला नाही. आमचे एप्रिलफुल हे समोरच्याला खजिल करुन सोडून दिलेले असे. जीवघेणे एप्रिलफुल आम्ही कधीच केले नाही आणि कदापि करणारही नाही. 

          अक्षयकुमारचा एक हिंदी पिक्चर बघितलेला आठवतोय. त्यात त्यांनी एक खोटाच खून केल्याचा अभिनय केला होता. मित्र मित्र मिळून असा खोटा खोटा एप्रिलफुलचा खेळ खेळत होते. आणि खरंच कोणीतरी कोणाचा तरी खून केला होता. त्यामुळे त्यांच्या मजेचे रूपांतर सजेत झाले होते. गुन्हा दुसऱ्यांनी केला होता , सजा त्यांना मिळाली होती. त्यांना फक्त मजा करायची होती , पण वेगळेच घडले होते. 

          हल्ली काही ठिकाणी एप्रिलफुलच्या निमित्ताने खोड्या काढल्या जात असतील तर त्या ठीक आहेत. त्यांचे स्वरुप जीवघेणे ठरु नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. एखाद्याने खोडी काढली तर आपणही ती समजून घेतली पाहिजे. त्याचा सूड न घेता त्याची मस्करी करता आली पाहिजे. अर्थात थट्टा मस्करी ही मस्करी पुरती मर्यादित असली पाहिजे , तिची कुस्करी होऊ नये म्हणजे झाले. 

          सध्या ' राडा ' हा नवीन शब्द सर्वांच्याच शब्दकोशातील शब्द झाला आहे. जावे तिथे ' राडा संस्कृतीने ' थैमान मांडले आहे. सुड वृत्तीने बेभानपणे वागणारी तरुण पिढी बघितली की मन विदीर्ण होऊन जातं. एप्रिलफुलचे काहीसे तसेच झाले आहे. त्याचा मिश्कीलपणा जाऊन त्याची जागा ' बदला ' या नवीन भावनेने घेतली आहे. हे चुकीचे आहे. 

          एप्रिलफुल हा दिवस ' एक गंमत दिवस ' म्हणून नक्कीच साजरा केला गेला पाहिजे. त्याला गालबोट न लावता त्याचा निखळ , निर्मळ आनंद घेता आला तर हा दिवस ' एक उनाड दिवसासारखा ' नक्कीच अविस्मरणीय होऊ शकतो यात शंका नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 रणी निघाले समितीचे शूर

          काल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची नियामक सभा संपन्न झाली. तीन वर्षे परिपूर्ण झाल्यानंतर किंवा मुदत पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी अशा सभा घ्याव्या लागतात. मी अशा सभेला पहिल्यांदाच उपस्थित होतो. सभेचे कामकाज पाहण्याचा भाग्यशाली योग आला. 

          मागील तीन वर्षांपूर्वीच्या इतिवृत्ताचे वाचन झाले. त्यावर आवश्यक चर्चा झाली. चर्चा नेहमी साधक आणि बाधक दोन्ही प्रकारे व्हावी लागते असेही लक्षात आले. सर्वांच्या सकारात्मक किंवा नकारात्मक मतांचा सन्मान केला जातो , आदर करायचा असतो हे त्या निमित्ताने माझ्या लक्षात आले. प्रत्येकाचे मत हे स्वतःचे वैयक्तिक असते. या वैयक्तिक मताला सभागृहात मांडले जाते , हा खऱ्या लोकशाहीचा विजय ठरतो हे समितीच्या या सभेने अधोरेखीत केले आहे. 

          समितीचा तळागाळातील किंवा ग्रास रुटवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा असतो हे स्पष्ट झाले आहे. हे सगळेच आपले धडाडीचे शिलेदार असतात. या सगळ्यांनाच पदाशिवाय काम करण्यात धन्यता वाटत असते. 

          काल मला तिसऱ्यांदा पावनखिंड चित्रपट बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्यावर त्याचा असर होताच. मला आमचे समस्त समितीचे शिलेदार बाजीप्रभू , अगिन्या , शिवा काशिद , रायाजी , कोयाजी आणि समस्त मावळ्यांसारखे वाटू लागले. 

          चित्रपटातील काही वाक्ये मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटतात. " मराठे कधी पळत नाहीत , ते पळायला लावतात. " हे खरंच आहे. आमचे समितीचे निष्ठावंत शिलेदार कधीच पळत नाहीत , तेही पळायला लावतील असे कार्य करताना दिसतात. " हट्टाला पेटतो , त्याला मरहट्टा म्हणतात " या वाक्याला अनुसरुन आमचे समितीचे शिलेदार जर एखाद्या हट्टाला पेटले तर ते कार्य पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणारे नाहीत. 

          विशाळगडावर शिवाजी महाराजांसोबत प्रयाण करताना मावळ्यांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागला होता. वाटेतल्या गांधीलमाश्यांचे चावे त्यांना वेदना देत होते. पण शिवरायांचे मावळे अजिबात मागे हटले नाहीत. आता आमच्या समितीच्या मुख्य नेतृत्वाखाली काम करत असताना अनेकदा अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना अनेक शासकीय संघर्षांना नेहमीच तोंड देत राहावे लागते. परंतु आपल्या मताशी नेहमी ठाम राहत झुंजत राहणारे समितीचे शिलेदार पाहिले की थक्क व्हायला होते. त्यावेळी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची पाठ थोपटावी तितकी थोडीच असते. शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी जसे बळ दिले , तसे बळ समितीचे शिलेदार आपल्या खंबीर नेतृत्वाला नेहमीच देत असतात. या शिलेदारांच्या निस्सीम पाठिंब्यावर आपलं नेतृत्व अधिक आत्मविश्वासाने लढत असतं. आपल्या समितीच्या शिक्षक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अगदी असेच काम केल्याचे दिसून येते आहे. 

          पावनखिंडीत लढताना बाजीप्रभू शिवाजी महाराजांना म्हणाला होता , " महाराज , कुणाचं नाव कुठं कोरलं जातं , आमचं इथं कोरलं जाणार आहे , आजचा उत्सव साजरा करु द्या. " आमच्या समितीच्या सर्व शिलेदारांनी नेहमी हिच भावना ठेवली आहे. त्यांनी आपली नावे प्रत्येक नेतृत्वाच्या हृदयात अशीच अप्रत्यक्षपणे कोरुन ठेवलेली दिसून येतात. 

          पावनखिंड पार करताना सगळे मावळे शिवरायांना विनम्र विनंती करतात , " जा राजं जा , जा राजं जा " त्यावेळी शिवाजीराजे विशाळगडाकडे जायला निघतात. आमच्या समितीची नेतृत्वे जेव्हा शासनाशी संघर्ष करत असतात , तेव्हा आमचे शिलेदार असेच त्यांच्या सदैव पाठीशी असतात. या शिलेदारांच्या जीवावरच ते शासनाच्या लढ्यात न घाबरता नेटाने लढताना पाहून आम्हालाही स्फुरण चढते. 

          " न्यायाची चाड आणि अन्यायाची चिड " सदैव बाळगणारे समितीची नेतृत्वे जणू म्हणत असतात , " आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी , शैक्षणिक विकासाचा सूर्य उगवू पाहतोय , घाबरु नका. तुमचं युद्ध आहे तुमच्या कमजोरीशी , उमेदीच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा. " अशी उत्स्फूर्त मार्गदर्शन करणारी नेतृत्वे समितीने कायमच दिली आहेत. 

          समितीची एक नवीन नेतृत्व असलेली कार्यकारिणी गठित झाली आहे. त्यांना आपण अशीच साथ द्यायची आहे. मागील केलेल्या कार्याची जाण ठेवून अधिक प्रेरणेने उत्साहाने काम करत राहायचे आहे. " जय शिक्षक समिती " च्या घोषणेचा दीप सदासर्वकाळ तेवत ठेवत आपलं कार्य समितीच्या सर्व शिलेदारांनी असेच वृद्धिंगत करत राहिले पाहिजे. समितीचे नवे शूरवीर रणी निघाले आहेत , ते मागे फिरणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.  

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, March 29, 2022

🛑 एकदम सही

🛑 एकदम सही

          भरत माझा आवडता मराठी नट आहे. त्याचं ' ऑल दि बेस्ट ' हे पहिलं नाटक खूप पूर्वी पाहिलं होतं. त्यात त्याने केलेली ' मुक्या ' ची भूमिका कमालीची होती. तेव्हा भरत एवढा भरात नव्हता. त्याच्या चित्रपटांची सलग शृंखला येत गेली. अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे नंतर भरतला पाहायला प्रेक्षक पसंती देऊ लागले. त्याचा मॅड परफॉर्मन्स लोकांना इतका आवडू लागला कि त्याचे बघितलेले चित्रपट पुन्हा पुन्हा बघण्यात मज्जा वाटू लागली. 

          श्रीमंत दामोदरपंतने तर कहरच केला. त्याच्या ' गोड गोजिरीने ' त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. एक साधा अभिनेता आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय होताना आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्याचं वेगळं हसणं आपल्याला हसवून जातं. त्याच्या चित्रविचित्र अंगविक्षेपांनी हास्याचे फवारे उडू लागतात. 

          त्याच्या गंभीर भूमिका पाहिल्या. तो हसवतो , तसा रडवू शकतो इतका त्याचा सहज सुंदर अभिनय आहे. त्याचे दहा हजारांपेक्षा अधिक नाट्यप्रयोग झाल्याचे समजते आणि आपला विश्वासही बसत नाही. पण हे खरे आहे. 

          विजय कदम यांनी साकारलेली ' मोरुची मावशी ' करणं सोपी गोष्ट नव्हती. ती त्याने लिलया पेलली आहे. ' टांग टिंग टिंगाक , टांग टिंग टिंगाक , टांग टिंग टिंगाक , टुंग ' हे त्याने स्वतः म्हणून नाचलेलं गाणं पुन्हा पाहावसं वाटत राहतं. 

          हल्लीच त्याचं ' पुन्हा सही रे सही ' हे नाटक पाहिले. एकाच नाटकात पाच भूमिका करताना त्याने केलेले प्रवेश चक्रावून सोडतात. एका विंगेतून निघून जातो आणि दुसऱ्या विंगेतून वेगळी वेशभूषा करुन परत परत येणारा भरत ग्रेटच आहे. डोळ्यांच्या पापण्या लवत नाहीत , तोपर्यंत तो दुसऱ्या भूमिकेत कसा काय हजर होतो हे त्यालाच ठाऊक. ते नाटक पाहताना आमचा गोंधळ उडून जातो , तर त्याचा किती गोंधळ होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. शेवटपर्यंत रंगमंचावर होणारा गोंधळ अनुभवतानाची मजा प्रत्यक्षच  घ्यायला हवी. 

          मदन सुखात्मे नावाचे एक गृहस्थ असतात. ते मृत झाल्याचे त्यांच्या लांबच्या नातेवाईकांना समजतं आणि त्यांची मालमत्ता आपली करुन घेण्यासाठी सर्वांची चाललेली धडपड माणसाच्या मरणाची वाट पाहणारी ठरते. 

          ज्यांच्याकडे भरपूर इस्टेट असते , त्यांच्या जाण्याची वाट मुलं , पत्नी किंवा नातेवाईक बघत असतील तर किती भयानक गोष्ट आहे. शेवटी हा मदन सुखात्मे मेलेलाच नसतो हे समजते तेव्हा तोतया बनलेल्या मदन सुखात्मेंची झालेली घाई विनोद निर्माण करते. एका वेळी पाच पाच ठिकाणी मदन सुखात्मे दाखवताना दिग्दर्शक आणि सहकलाकार यांनी केलेला अभिनय हुबेहूब भरत जाधव सारखाच वाटतो.  ही कला भरत जाधवांसारखे कलाकारच दाखवू शकतात. ही सगळी ड्रामेबाजी एका सहीसाठी चाललेली असते. प्रत्येक घरात जर सहीसाठी एवढा आटापिटा केला जात असेल तर तो थांबला पाहिजे. इस्टेटीसाठी आपण घरातच शत्रू बनतो. ही इस्टेट नसती तर खूप बरे झाले असते असे जेव्हा वाटते , तेव्हा माणसे डेडस्टॉक संपत्ती वाढवण्यापेक्षा ' मानवीय नात्यांची संपदा ' वाढवण्यासाठी प्रयत्न करु लागतात. हे मात्र ' एकदम सही ' आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, March 28, 2022

🛑 अमोल भंडारी : एक अनमोल शैक्षणिक भांडार

🛑 अमोल भंडारी : एक अनमोल शैक्षणिक भांडार

          मला शेर्पे केंद्रात आता तीन वर्षे होतील. मी हजर झालो , तेव्हा शेर्पे केंद्रशाळेचा मुख्याध्यापक चार्ज अमोल भंडारी यांच्याकडे होता. त्यावेळी पाठयपुस्तके आणण्यासाठी मी केंद्रशाळेत गेलो होतो. अमोल भंडारी हे एक आमच्यापेक्षा वयाने लहान असलेले उपशिक्षक तिथे मार्गदर्शन करताना दिसले. तेव्हाच त्यांचा माझ्यावर पहिला वहिला प्रभाव पडला होता. मुद्देसूद मार्गदर्शन करत केंद्रमुख्याध्यापकांची जबाबदारी ते पेलताना दिसत होते. 

          त्यानंतर तीन वर्षात त्यांच्यासोबत विविध उपक्रमांच्या निमित्ताने पुनः पुन्हा भेट झाली. प्रत्येकवेळी त्यांच्यातील धडपड करणारा शिक्षक मला खुणावत होता. मी त्यांच्या वयाचा असताना अगदी असाच होतो याची जाणीव होऊन मला त्यांच्याविषयी असलेला आदर वाढत जाताना दिसत होता. शिक्षकाने नेहमी असेच असावे , नेहमी कार्यरत. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे ,  सरळ आहे. त्यांना स्वतःची ओळख करुन देण्याची गरज पडत नाही , त्यांचे शैक्षणिक कार्यच त्यांची ओळख बनली आहे. शेर्पेसारख्या दुर्गम भागात अमोल भंडारींसारखे शिक्षक कार्यरत असतील तर ते तिथल्या विद्यार्थ्यांचे भाग्यच म्हणायला हवे. 

          आपल्या शैक्षणिक कार्याने मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे माझ्यासारखा शिक्षक नक्कीच सांगू शकतो. यश मिळवण्यासाठी जी जिद्द लागते , ती त्यांच्याकडे आहे. त्यांनी मुलांना यश मिळावे म्हणून आपला वैयक्तिक वेळही मुलांसाठी दिलेला असेल. कारण काही काळ त्यांनी आपले व्हॉटस ऍप , फेसबुक बंद ठेवले होते हे मला माहिती आहे. आता आपल्याला या तंत्रांची इतकी सवय झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणे ही अशक्यच गोष्ट आहे. तरीही अमोल भंडारी यांनी त्यावर कमालीचा संयम बाळगला होता. 

          नेट सेटची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते एक हुशार प्राथमिक शिक्षक आहेत. ते आपली फुशारखी मारताना मला कधी दिसलेले नाहीत. ते म्हणूनच मला जास्त आदर्श वाटतात. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु शकणाऱ्या मार्गदर्शकांमध्ये त्यांचा वरचा नंबर लागेल. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन यु ट्युबच्या माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे. अशा तरुण व उमेदीने शिकवणाऱ्या अमोल भंडारींसारख्या शिक्षकांनी गावोगावी शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उद्युत करायला हवे. त्यासाठी अमोल भंडारी सरांचे अनमोल मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर असते. तिच्यात खंड पडला की विद्यार्थ्यांना भविष्यात त्याची किंमत मोजावी लागते. अखंडपणे सलग अव्याहतपणे काम करणाऱ्या अमोल भंडारींसारख्या शिक्षकांकडून म्हणूनच भव्य दिव्य असे शैक्षणिक कार्य घडते आणि आम्हां शिक्षकांची मान अभिमानाने अधिकाधिक उंचावत राहते. 

          अमोल भंडारी हे शिक्षण क्षेत्राला लाभलेले एक अनमोल रत्नच आहेत. त्यांचे आडनांव भंडारी आहे आणि ते स्वतः ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांच्या मनात कायमच मुलांच्या स्पर्धाविषयक विविध प्रश्नांची चक्रे फिरत असतील. कधी एकदा शाळेत जातो आणि मुलांना सांगून टाकतो असे त्यांचे नेहमीच होत असेल. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असतीलही , त्यांना त्या पुरस्काराने अधिक प्रोत्साहन मिळत राहते. खेड्यापाड्यात काम करणाऱ्या अमोल भंडारींसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी जीवाचे रान करणाऱ्या शिक्षकांचा म्हणूनच सन्मान होत राहिला पाहिजे. अशा अमोलांना पुरस्कारापेक्षा शाबासकीची थाप महत्त्वाची असते. पदाधिकारी , अधिकारी , पालक यांनी दिलेली अशी जिव्हाळापूर्ण थाप अमोलांना अनमोल बनवते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Sunday, March 27, 2022

🛑 वेताळ गेलो चोरीक

 🛑 वेताळ गेलो चोरीक

          चांदोबा हे आमचे सर्वांचे लाडके मासिक. कणकवली नगर वाचनालय येथे बालवाचक म्हणून नोंदणी केल्यानंतर दर दोन दिवसांनी नवनवीन पुस्तके वाचायला मिळत. चांदोबा , कुमार , किशोर , ठकठक , लोटपोट अशी अनेक बालवाङमये आम्ही वाचत असू. चांदोबातील ' विक्रम वेताळाच्या गोष्टी '  क्रमशः असत. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसे. त्या गोष्टीतील वेताळ विक्रमाला प्रत्येक कथेत प्रश्न विचारत असे. विक्रमाच्या पाठीवर लोंबणारा वेताळ त्याकाळी आमच्या स्वप्नातही यायचा. घाबरत उठून आम्ही भावंडे आईबाबांच्या कुशीत सामावत असू. 

          त्यानंतर पाचवी ते सातवीच्या दरम्यानच्या काळात महेश काणेकर नावाचे बालकादंबरीकार आम्हाला एक बालनाट्य शिकवायला येत. त्याचे नावच होते , " वेताळ गेलो चोरीक ". ते स्वतः त्याचे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही होते. त्यांनी लहानांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते चित्रकारिता करीत. ते पोर्ट्रेट काढत असताना मी अनेकदा थक्क होऊन पाहत बसत असे. उंच ,  कुरळे केस असलेले महेश काणेकर उत्तम गायक असल्याने त्यांची श्रवणीय गाणी ऐकून मलाही तसं गाण्याची सवय लागली असावी. त्यांच्या या नाटकाची स्टोरी आता अजिबात आठवत नाही. त्यात माझी भूमिका कोणती होती तेही आठवत नाही. रिहर्सलच्या वेळी भालचंद्र मठाच्या रंगमंचावर आम्ही बसत असू. तिथे एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. त्याची सावली आम्हाला सोबत करी. 

          वाचता वाचता ' कॉमिक्स ' ची पुस्तकेही वाचत गेलो. त्यात वेताळ असे , स्पायडरमॅन असे. गोष्टी चित्ररुप असत. त्यामुळे ही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचूनही कधीच कंटाळा आला नाही. त्यातील वेताळ वेगळाच असे. त्याच्या अंगावर कायम बुरखा असे. त्याचा बुरखा काढलेला चेहरा कधीच पाहता आला नाही. 

          अभ्यासामुळे काहीच दिवसांत त्यांचे वाचन मागे पडले. वाचण्याची आवड वाढल्यामुळे कणकवली कामगार केंद्रातील पुस्तके वाचायला जाऊ लागलो. अभ्यास जास्त आवडू लागल्याने किंवा स्कॉलरशिप परीक्षेला बसल्यामुळे अभ्यास करण्याचे माझे तास वाढत गेले. 

          ' वेताळ गेलो चोरीक ' या बालनाट्याचे कथानक आठवत नसले तरी माझ्या वाचनातील ' वेताळ ' केव्हाच चोरीला गेला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Friday, March 25, 2022

🛑 रेशमी पुरस्कार

🛑 रेशमी पुरस्कार

          पुरस्कार मिळणे हा प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय ठेवा असतो. त्यासाठी आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षांचे योगदान द्यावे लागते. चाकोरीतून काम करताना त्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे धाडस ज्यांच्या अंगी असते , तेच पुरस्काराचे मानकरी ठरतात. रश्मी आंगणे या त्यापैकीच एक गुणी आणि उपक्रमशील शिक्षिका आहेत. त्यांचे आडनांव आंगणे आहे म्हणजे त्या मूळ आंगणेवाडीच्या आहेत. देवी भराडीचा त्यांच्यावर असाच वरदहस्त राहो. कधी कधी मला असे वाटते , भराडीदेवी त्यांच्या भक्तांमध्ये वास करत असेल , तर ती काही अंशाने त्यांच्यातही वास करत असावी. 

          रश्मी मॅडमांच्या अध्यापनाचे पाठ पाहण्याची संधी मिळाली होती. त्यांचे अध्यापन विद्यार्थीकेंद्री आहे. दैनंदिन जीवनाची सांगड घालत घटक शिकवण्याची त्यांची पद्धत म्हणूनच बालकांना आपलीशी वाटत राहते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांचे संस्कार प्रकट होताना दिसतात. त्यांनी सातरल कासरल शाळेत असतानाही नवोपक्रम राबवले आहेत. मी एकदा त्यांच्या शाळेत गेलो होतो तेव्हा मला प्रचिती आली आहे. कदाचित त्यांना हे आठवतही नसेल. 

          बीएडला असताना त्यांच्या ग्रुपमध्ये नसलो तरी त्यांच्या पाठांविषयी ऐकले आहे. त्या अभ्यासू आहेत. जे ठरवतील , ते पूर्ण करण्याची त्यांची जिद्द इतरांनाही लाजवणारी असते. त्या जिद्दी आहेत , म्हणून त्यांच्या हातून अपूर्व असे शैक्षणिक कार्य घडताना आपण पाहात आहोत. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले असेल. 

          त्यांचा आवाज श्रवणीय आहे. त्यांनी आपल्या आवाजात पाठ्यपुस्तकातील कवितांचे केलेले गायन पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असेच आहे. त्यांना नेहमी गुणवत्तेचा ध्यास लागलेला असतो. त्या भारावून व झोकून देऊन काम करताना दिसतात. त्यांची काम करण्याची ऊर्जा पाहिली की माझ्यासारख्या पुरुष शिक्षकालाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. 

          त्यांचे कथावाचन वाचिक अभिनय , आवश्यक विराम आणि ओघवतेपणा यांचा त्रिवेणी संगमच आहे. त्यांच्या काही कथा मी ऐकल्या आहेत. त्यांचे सूत्रसंचालन नियोजनबद्ध असते. ते एक व्यावसायिक सूत्रसंचालन वाटते. 

          आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी एक पाऊल पुढे असण्यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या शिक्षिका लाभलेले विद्यार्थी खरेच भाग्यवान असतील. त्या ज्या शाळेत जातील तिथे शैक्षणिक सोने पिकवतील. त्यांचे पती सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणेसाहेब यांची त्यांना लाभलेली साथ त्यांच्या यशात उत्तुंग शिखरे सर करताना मिळालेली देणगीच आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणूनच रेशीमगाठीचा रेशमी पुरस्कार आहे असे मला वाटते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 वृद्धाश्रमातील वृद्ध

          असा प्राणी ओळखा जो सकाळी चार पायांनी , दुपारी दोन पायांनी आणि संध्याकाळी तीन पायांनी चालतो ? या कोड्याचे उत्तर विचार करण्यासारखे आहे. तो प्राणी म्हणजे आपणच आहोत. मनुष्यप्राणी. हा मनुष्य बाल्यावस्थेत चार पायांवर रांगतो , तारुण्यात दोन पायांवर रुबाबात चालतो आणि म्हातारपणी काठी घेऊन चालतो. आपण सगळे या तीन अवस्थांमधून जाणार हे नक्की असतं. 

          यातील पहिल्या दोन अवस्था हव्याहव्याशा असतात. तिसरी अवस्था येऊच नये असं वाटतं. ती येईपर्यंत आपण त्या अवस्थेतील आप्तांशीही व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. त्या अवस्थेत गेलो की समस्या नकोशा होऊन जातात. आपल्याला कोणी वृद्ध म्हटलेलं आवडत नाही. आपण ज्या कुटुंबसंस्थेचे भाग होतो , ती स्वतःची संस्था आपणांस नाकारु लागते ही आजची मोठी खंत आहे. 

          आजीबाईचा बटवा आज गायब झालेला आहे. आजीच्या गोष्टी हरवल्या आहेत. नातवंडांना आजोबा नकोसे झाले आहेत कि मुलांना आपले आईवडील नकोसे झाले आहेत ? असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. वृद्ध झाल्यानंतर त्यांची उपयोगिता कमी झाल्यामुळे असे झालेय का ? आयुष्याच्या उत्तरायणात जेव्हा खरी गरज आहे , त्याचवेळी त्यांना विलग करणं कितपत योग्य आहे ? असे प्रश्न यक्षप्रश्न बनत आहेत. 

          अशा वेळी बिचारे वृद्ध आई बापच निर्णय घेतात. " आता आम्ही या घरातील अडगळीच्या वस्तू झालो आहोत."  हे असह्य जगणं जगण्याच्या संघर्षातून काही वृद्ध आत्महत्येलाही प्रवृत्त झाले असल्यास ती आजच्या तरुण पिढीची चूकच म्हणायला हवी. 

ज्यांना आत्महत्या करण्याचं धाडस होत नाही ते वेगळं घर थाटण्याचा प्रयत्न करतात. वेगळं घर थाटलं तर आम्हांला बघणार कोण ? हा प्रश्न ज्यांना पहिला पडला असेल त्यांच्या सुपिक डोक्यात ' वृद्धाश्रम ' नावाची संकल्पना रुजली असेल. मुलांच्या सुखाच्या संसारात आपली अडचण नको म्हणून स्वतः वृद्धाश्रमाला जवळ केलेली माणसं मी पाहिली आहेत. काहींचं असं म्हणणं आहे , " आमची सगळी मुलं परदेशात राहतात , आम्हांला भारतातच राहायचे आहे. त्यांना वरचेवर येणे शक्य नाही म्हणून आम्ही स्वतःच वृद्धाश्रमात राहतो आहोत. ते तिकडून आम्हाला फोन करतात , पैसे पाठवतात. पण एक मात्र खरं आमच्या जीवनाचा उद्देश सफल झाला असला तरी पुढील जीवन मुलांच्या सहवासाशिवाय जाणार याचे अतीव दुःख होते. " 

          काहींना त्यांच्या मुलांनी ' सासू सुनांची ' भांडणे नको म्हणून वृद्धाश्रमात पाठवले आहे. अर्थात वृद्ध झाल्यानंतर या मुलांनाही त्यांची मुले वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नसतील तर ते नवल म्हणावे लागेल. 

          स्वेच्छेने किंवा जबरदस्तीने किंवा अपघाताने वृद्धाश्रम जवळ करावा लागणे ही कोणत्याही मानव प्राण्याला आवडणारी गोष्ट नसेल. एखाद्या दांपत्याला मुलंच नसतील तर त्यांना नाईलाजाने आपल्या सुरक्षेसाठी वृद्धाश्रमाला घर म्हणावे लागते. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या माध्यमातून दोन तीन वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला. तिथे जाऊन त्यांची एका दिवसासाठी आस्थेने विचारपूस केली. त्यांना वस्तू , धान्य , फळे , खाऊ दिले. त्यांच्या संस्थेला जमेल तशी आर्थिक मदत दिली. फोटो काढले. बातम्या दिल्या. या कार्याने त्या वृद्धांची काही प्रमाणात सोय होणार होती. प्रश्न सुटणार नव्हते.

          मी तेथील प्रत्येक वृद्धाला बघत होतो. त्यांचे चेहरे वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. त्यांचे चेहरे तात्पुरते फुललेले दिसत होते. ते  कायम तसे नसावेत हे लक्षात येत होते. कोणाची दाढी वाढली होती , कोण खोकत होते , कोण आजारी होते , कोणाच्या केसात उवा दिसत होत्या. आमच्या मंडळातील सेवाभावी नाभिक तिथे जाऊन मोफत केशकर्तनाची सेवा देत असल्याचे समजले. मला माझ्या ज्ञातीबांधवांचा आदर वाटला. 

          मी तिथे त्यांच्याशी बोलता बोलता एक अंगाई गीत म्हटले. ' श्यामची आई ' या नवीन चित्रपटातील ते गाणे होते. ' माझा बाळ गुणाचा गं , माझा श्याम गुणाचा गं ' असे गाण्याचे बोल होते. मी मधुर सुरात गाणे म्हणत होतो. समोरचे वृद्ध मंत्रमुग्ध होऊन मला ऐकत होते. जणू त्यांची स्वतःची मुलं त्यांना दिसत असावीत. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलेले मला दिसले. डोळ्यातील पाणी त्यांनी पुसलेही नाही. त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून मी गहिवरुन गेलो होतो. वृद्धाश्रमाने आम्हांला दिलेली वेळ संपली होती. आम्ही परत निघालो होतो. माझ्या डोळ्यांसमोरुन त्या वृद्धांचे चेहरे जाता जात नव्हते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर(  9881471684 )



🛑 सत्याचे सत्य

           आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसे येतात. त्यांच्या भेटीनंतर त्यांची सत्यासत्यता पटते. कधीही आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा , कानांवर नव्हे. डोळ्यांनी बघितलेले जास्त लक्षात राहते. या अनेक माणसांपैकी सत्यवान चव्हाण हे एक नाव आहे. जे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांची माझी देवगड तालुक्यापासूनची ओळख आहे. ते आमच्यासाठी कायमच आदर्श राहिलेले आहेत. ते त्यावेळी वानिवडे शाळेत होते. खाडीला लागून असलेली शाळा. त्यांच्या शाळेत जायचे असेल तर तरीवरुन जावे लागले. एकदा त्यांच्या त्या शाळेत जाण्याचा योग आला होता. ती भव्य दिव्य शाळा बघून मला त्यांची दिव्यता लक्षात आली. 

          शाळा आदर्शच होती. कारण त्या शाळेत शिकवणारे सत्यवान चव्हाण आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांची माझी तिथेच ओळख झाली. त्यानंतर अनेकदा पगाराच्या वेळी तालुका स्कुलला भेट झाली असेल. प्रशिक्षणांमध्ये सत्यवान सरांचे पेटीचे सूर ऐकले नाहीत असे कधी झाले नसेल. त्यांचा स्वभाव आमच्या स्वभावाशी जुळला आणि जिवलग मैत्री नसली तरी मित्रत्व निर्माण झाले. त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा सहवास लाभला. आता ते जास्त वेगळे दिसतात ,  त्यावेळी त्यांचा सडपातळ बांधा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून माझ्यात काही सकारात्मक बदल झाले हे त्यांना माहितीही नसेल. 

          अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहिले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्याचीच देणं आहे. त्यांचे भजनवेड मला पूर्वीपासून माहिती आहे. भजनात सूर , ताल , लय यांचा सुरेख संगम असावा लागतो. आपल्या आयुष्यातही त्यांनी मैत्रीचे हे सूर जपले आहेत. त्यांचे कमी मित्र असतील ,  जे आहेत ते खास मित्रच असतील. ते मला ' पव्या ' म्हणतात. त्यांचं ' पव्या ' उच्चारणं हृदयाला भिडणारं असतं. 

          शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून भूमिका बजावत असताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांचे लिखित स्वरुप त्यांच्याकडे नसेलही. त्यांच्या संकल्पना अफलातून असतात. वयोमानानुसार शिक्षकांमध्ये पठारावस्था येऊ शकते. सत्यवान सरांमध्ये ती दिसत नाही. कालपेक्षा आज काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने त्यांचा शाळेत प्रवेश होत असतो. चेकपोस्टवर काम करताना त्यांच्याशी जवळून संपर्क आला. आम्ही देवगड मध्ये जास्त वर्षे नोकरी केल्यामुळे असेल, पण देवगडशी आमची नाळ जुळलेली आहे. तिथले क्षण अविस्मरणीय असेच होते. तो हापूस आंब्यांच्या मोहराचा वास अजूनही नाकातून जात नाही. कोणत्याही घरात गेल्यानंतर तीन चार हापूस आंब्याच्या फोडी समोर येत असत. त्या फोडींची चव आता येत नाही. ते दिवसच वेगळे होते. पेटीच्या पेटी मोफत आंबे देणारे पालकही तिकडेच भेटले. त्याच तालुक्यातील आमचे हे मित्र सत्यवान चव्हाण म्हणूनच आम्हाला हापूसच्या आंब्यासारखे मधाळ वाटत राहतात. त्यांच्या संगतीत राहणाऱ्या सर्वांना ते आपल्या सारखा मधुर बनवून टाकतील यात काय शंका नाही. ते मला पव्या म्हणतात , म्हणून मीही त्यांना गमतीने सत्या म्हणून लागलो आहे. ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत , त्यांच्यासारखा होण्यासाठी अजून काही पावसाळे बघावे लागतील. म्हणूनच सत्यासोबतच्या या माझ्या सत्य भावना आहेत असे मी गीतेवर हात ठेवूनही सांगू शकतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



Wednesday, March 23, 2022

🛑 तुलसी प्रेम : बंधू प्रेमाची गोष्ट

🛑 तुलसी प्रेम : बंधू प्रेमाची गोष्ट

          आज आमच्या न्हानुचा वाढदिवस. तो जन्माला आला तेव्हा मी दोन वर्षांचा होतो. त्यामुळे त्याच्या जन्माच्या दिवशीची घटना आठवत नाही. पण माझ्या मागून माझा भाऊ , माझा पाठीराखा जन्माला आला. त्याला आम्ही न्हानू म्हणतो. त्याला हे नाव आवडत नसावे कदाचित. अनेकांना आपली टोपण नावे आवडत नसतात. तो लहान असल्यामुळे ' लहान ' चे ' न्हान ' आणि ' न्हान ' चे ' न्हानू ' झाले असावे. त्याचे मूळ नाव किती सुंदर आहे. तुळशीदास हे नाव बाबांनी खूप शोधून दिले असावे. तुळशीदास हे मोठे संत होऊन गेले आहेत. त्यामुळे त्याचे नावच अध्यात्मिक आहे. नावाप्रमाणे तोही अध्यात्मिक बनला आहे. तो खूप आस्तिक आहे. देवांवर त्याची श्रद्धा असते. तो देवांचे खूप करतो. 

          लहानपणी तो हनुमान भक्त होता. त्याच्या मस्तकी व गळ्यावर नेहमी शेंदूर असे. थोडा मोठा झाल्यावर तो अष्टगंध लावू लागला होता. तो दर शनिवारी मारुतीला रुईचा हार करुन घालत असे. तेल वाही. तेलात आपला चेहरा पाही. मला हे सगळं त्याचं बघून करावं लागे. तो करतो म्हणून मीही करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या करण्यात नेहमी कृत्रिमता असे. बाबा सांगत म्हणून करावे लागे. पण हळूहळू या गोष्टींची सवय होत गेली. एखादया शनिवारी मारुतीला हार घातला नाही तर चुकल्यासारखे वाटे. शेंदूर फासलेला मारुती मात्र दरवेळी नेहमीसारखाच दिसे. दोन मंदिरांमध्ये ही भक्तीविधी चाले. न्हानू आदल्या दिवसापासून रुईची पाने गोळा करीत असे. आका आणि न्हानू ही दोन भावंडे रामभक्त , हनुमानभक्त होती. 

          आता न्हानू भालचंद्र भक्त झाला आहे. दर दिवशी मंदिरात जात असेल. काही ठरलेल्या वारांना मंदिरात जाऊन नमस्कार करण्याचा नियम तो मोडताना दिसत नाही. मी मात्र देखल्या देवा दंडवत करत असतो. मुद्दाम मंदिरात जाणे माझ्याच्याने होत नाही. जाता जाता मंदिर दिसले आणि मला मनस्वी जावेसे वाटले तरच मी देवळात जातो. वारानुसार देवळात जाणे हे माझ्या मनाला पटत नाही. याचा अर्थ माझी देवाबर श्रद्धा नाही असा होत नाही. मला सतत साथ देणाऱ्या , सतत भेटणाऱ्या माणसांमध्ये देव दिसतो. त्यांच्यात देव दिसत असल्यामुळे मला वेगळे देवालयात देवाला भेटायला जाण्याची तितकीशी आवश्यकता वाटत नसावी. माझा हा असा दृष्टिकोन सर्वानाच आवडेल असे नाही. तो आवडायला पाहिजे असा माझा आग्रहही नसतो. 

          आमचा न्हानू थोडा रागीट आहे. त्याचा राग लगेच शांत होत नाही. तो राग धरुन ठेवतो. तो माझ्यापेक्षा देवाचे करतो , तर त्याने रागाला शांत करायला हवे. त्याचा राग तो थंड करण्याचा प्रयत्नही करत असेल , पण त्याचा गुस्सा तसाच राहिलेला दिसतो. मीही रागावतो , पण माझे रागावणे तात्पुरते असते. पण माझा राग अनावर होतो ही मला नावडणारी गोष्ट आहे. या रागामुळे मी माझी कितीतरी माणसे दुखावून बसलो आहे. आता मात्र मी रागावर खूप नियंत्रण ठेवतो आहे. तो येऊच नये यासाठी प्रयत्न करतो आहे. आपल्या आरोग्यासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. 

          माझी आणि न्हानुची बरीच भांडणे झाली असतील. लहानपणी त्याला आकडी येत असे. त्यामुळे त्याला सॉफ्ट कॉर्नर असे. तो कधीही डोळे वर करत असे. त्याची ती अवस्था बघवत नसे. खेळता खेळता त्याचे असे होई. त्यामुळे त्याच्यावर आईचे निरतिशय प्रेम होते. ती त्याला अनेकदा कमरेवर घेऊन चहा चपाती भरवे. त्याला बघून मलाही कधीतरी वाटे , मलाही अशी आकडी आली असती तर मलाही आईने असे कमरेवर घेऊन भरवले असते !!! पण असा वाईट विचार कोणालाही कधीही येऊ नये. ही प्रेमाची स्पर्धा आईशी खेळू नये. आई बाबांनी आम्हा सर्वांवर समान प्रेम केले. न्हानुचा राग आला की तो जमिनीवर किंवा भिंतीवर जोरात डोके आपटून घेई. त्यामुळे त्याची भीती वाटे. तो आपल्या जीवाची पर्वा करत नसे.

          पण जसा मोठा होत गेला , ह्या त्याच्या सवयी कमी कमी होत जाऊन अजिबात नाहीशा झाल्या. आजचं त्याचं व्यक्तिमत्त्व आदर्श शिक्षकाचं आहे. त्याने अनेक उत्तम विद्यार्थी घडवले आहेत. त्याचे विद्यार्थी त्याच्याबद्दल भरभरुन बोलतात तेव्हा त्याच्या आदर्शत्वाची कल्पना येते. तो एक उत्तम शिल्पकार , चित्रकार आहे. त्याला वादनाची आवड आहे. त्याचा आवाज चांगला आहे. तो स्वतःसाठी गातो. परशुराम पांचाळ त्याचे आवडते बुवा आहेत. त्याच्या आणि माझ्या अनेक आवडी निवडी मिळत्याजुळत्या आहेत. स्वभाव मात्र भिन्न आहेत. 

          नोकरी मिळेपर्यंत त्याने खूप संघर्ष केला. नोकरी मिळाल्यानंतरही अधिक संघर्षाला त्याला तोंड द्यावे लागले. माझ्या बिडवाडीच्या आत्येची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची त्याला मोलाची साथ मिळाली. आर्थिक पडत्या काळात त्यांनी दिलेली अनमोल साथ अविस्मरणीय आहे. त्यांचे आम्ही कायम ऋणी राहू. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याच्यासाठी काही केले तर ते आमचे कर्तव्यच होते. त्याच्यावर कितीही संकटे आली तरी आम्ही सगळेच त्याच्या नेहमी पाठीशी राहिलो. तो कधीही वाईट वळणाला गेला नाही. आपले काम आणि आपली कला याच्याशी तो सदैव प्रामाणिक आहे याचा मला गर्व आहे. वाद कोणाचे होत नाहीत , पण आमचे वाद एक दोन दिवसांत विरुन जाणारे असतात. दुसऱ्यांना दाखवण्यासारखे आमचे मिठी मारणारे प्रेम नाही , ते अंतर्गत आहे. आम्हाला एकमेकांचा अतिशय आदर आहे. त्याच्यासारखा कलाकार , शिल्पकार मी कधीही होऊ शकणार नाही. तो माझा ग्रेट भाऊ आहे हे लिहिताना माझे डोळे आताही पाणावल्याशिवाय राहात नाहीत. अश्रुंमुळे मला पुढचे धूसर दिसू लागले आहे , त्यामुळे मी आता इथेच थांबतो. Happy Birthday

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 मार्च एंडिंग : माय वर्क इज पेंडिंग

🛑 मार्च एंडिंग : माय वर्क इज पेंडिंग 

          मार्च महिना आला ' मार्च एंडिंग ' हे इंग्रजी शब्द आठवतात. आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांचीच घाई होते. कारण कामे रखडलेली असतात. ती एकतीस मार्चच्या अगोदर पूर्ण करायची असतात. मग ' वर्क इज पेंडिंग ' राहते. 

          एकतीस मार्चपर्यंत शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी सगळे एकजुटीने कामाला लागतात. सर्व हिशेब जुळायला लागतात. पैशांचा प्रश्न असतो. इन्कम टॅक्स भरावा लागणार असतो. उपयोगिता प्रमाणपत्रे द्यावी लागणार असतात. 

          रजिस्टरे अपूर्ण असतात. ती परिपूर्ण करायची असतात. तासातासाने नवनवीन सुचनांचा भडिमार सुरु होतो. अंतर्गत तपासणी सुरु होते. पैशांचा हिशेब चुकायला नको असतो. पावत्या गोळा कराव्या लागतात. लेखाशीर्षात बसवाव्या लागतात. पावत्यांवर खाडाखोड करुन चालणार नसते. ऑडिट होताना दंड भरावा लागेल ही भीती असते. 

          अखर्चित रक्कम , व्याजाची रक्कम काढून दिलेल्या खात्यात तात्काळ भरणा करण्याचे आदेश मागे लागतात. तहानभूक विसरुन निर्जीव फाईलींना सजीव बनवण्याचा प्रयत्न होतो. फाईल सजीव बनवता बनवता आपण सजीव आहोत हेच विसरुन जायला होते. 

          पेटीकॅशबुक , लेजर , स्टॉकबुक , डेडस्टॉक , 32 नंबर , 33 नंबर ही सगळी रजिस्टरे एकामागून एक हाताखालून जात राहतात. त्यातील इंटऱ्या वाट पाहत असतात. या इंटऱ्या लिहून दमायला होते. कसेतरी लिहून पूर्ण होते. आकस्मिक खर्चाची देयके खायला येतात. ती भरता भरता नाकात नऊ येतात. व्हावचर बुक आधीच तयार असते. पैसे आधीच खर्च झालेले असतात. बँकेत पैसे जमा झाल्याबद्दलचा मेसेज येण्याची प्रतिक्षा सहन होत नाही. आणि ती प्रतिक्षा संपते... पैसे जमा झाल्याचे समजते. मग पैसे काढण्यासाठी गडबड घाई होते. बँकेत रांगाच रांगा लागतात. धनादेश रजिस्टर पूर्ण करावे लागते. चेक क्रॉस करता करता आपणही क्रॉस होऊन जातो. आढावा पूर्ण करण्याची शर्यत सुरु होते. उभ्या आडव्या बेरजांची तेरीज मारताना घामाघूम व्हायला होते. ज्यांची रजिस्टरे पूर्ण होत आलेली असतात ते आपला घाम पुसत असतात. ज्यांची अपूर्ण असतात , ते घाम काढत असतात. आधीच उन्हाळा मी म्हणत असतो. त्यात मार्च एंडिंगने उष्मांक वाढल्याचे जाणवते. 

          शाळांमध्ये ही परिस्थिती असेल तर इतर कार्यालयांमध्ये नुसती  तारांबळ उडालेली असेल असे वाटत राहते. कालच माझ्या मोठया बहिणीचा फोन आला होता. मंत्रालयात एका विभागात लिपिक म्हणून काम करणारी माझी ताई रेल्वेतून नुकतीच उतरली होती. कामावरुन घरी परतताना तिने फोन केला होता. ती चालता चालता बोलत होती आणि बोलता बोलता चालत होती. तिची दमछाक तिच्या आवाजात लक्षात येत होती. तिचेही मार्च एंडिंगचे दुखणे तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. फाईलींची भली मोठी रास माझ्या डोळ्यासमोर येईल असे तिने वर्णन केले होते. पेंडिंग कामांची मोठी यादी ती सांगत राहिली होती. कार्यालयातील या अतिरिक्त कामांमुळे तिच्या मैत्रिणींनी व्हीआरएस घेतल्याचे ती सांगत होती. नवीन भरती होत नव्हती , रिक्त जागा रिक्तच राहत होत्या. दोन तीन टेबलांचा कार्यभार सांभाळताना कसे मेटाकुटीला यायला होते ते ऐकताना मीही मेटाकुटीला येत असल्याचे जाणवले होते. पेंडिंग वर्कचा ताण ती घरी घेऊन आली होती. फाईली ऑफिसात राहिल्या होत्या , तरीही त्या पूर्ण कशा होतील या कल्पनेने तिला येणाऱ्या तणावांची बेरीज किंवा गुणाकार होत असल्याचे माझ्या लक्षात आले. 

          मी तिला माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या ते गळी उतरताना दिसत नव्हते. कदाचित मी तिच्या जागी असतो तर माझीही वेगळी अवस्था असली नसती हे मलाही पटत होते. पण कार्यालयातील हा अदृश्य ताण कसा घालवावा हे मी तिला फोनवरुन सांगणं मलाही कठीणच जात होतं. कितीही काम पूर्ण केलं तरी बॉस खुश होत नाही ही सगळ्यांचीच व्यथा आहे. बॉस म्हणजे माणूसच ना ? त्यालाही कोणीतरी वरुन ताण देत असणारच. तो आपल्या हाताखालच्या लोकांना ताणच देणार. कारण आपल्याला जे मिळतं तेच आपण परत करत असतो हा निसर्ग नियम आहे. हा ताण कधी कधी आवश्यक असला तरी तो प्रत्येकाला सुसह्य करता यायला पाहिजे. म्हणून कार्यालयात असताना कार्यालयाचा विचार करावा. कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर आपलं वैयक्तिक आयुष्य जगण्यास सुरुवात केली पाहिजे. आता आपल्या कामात थोडा बदल झाला आहे म्हणजेच आपल्याला ती विश्रांती वाटायला हवी. हे सर्व आपण आपल्यालाच समजून देत राहायला हवं. घरी आल्यानंतर एखादं पुस्तक वाचावं , कविता म्हणावी , आवडत्या गायकाची गाणी ऐकावी , वपु काळेंची विनोदी कथा ऐकावी , टीव्ही लावावा , कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये बसावं , आवडत्या नटनट्यांचे मराठी हिंदी सिनेमे पाहावेत , मस्त खळखळून हसावे. असं काहीतरी करावं की हा मनात भरुन ओसंडून वाहणारा तणाव विसरुन जायला होईल. 

          पण घरी येईपर्यंत घरचे वेगळे ताण आपली वाट बघत असतात. पुन्हा उद्याची तयारी लक्षात येते. उद्याचे जेवण , उद्याची भाजी सगळं डोळ्यासमोर येऊन नाचू लागतं. 

          हे सगळं असंच चालत राहणारं आहे. हे कधीही न संपणारं मारुतीचं शेपुटच आहे. आपलं आयुष्य किती मोलाचं आहे. ते असंच तणावात कशाला घालवायचं ? ताण नक्की घ्यायचा पण त्याचं स्वरुप नेहमी तात्पुरतं असायला हवं. ते अखंडपणे चालणारं नक्कीच असू नये. नाहीतर या जबरदस्त तणावांनी आपल्याला मानसिक आणि नंतर शारीरिक रोगांना सामोरं जाण्याची भीती नाकारता येत नाही. म्हणून मार्च एंडिंग एन्जॉय करा. " वर्क इज पेंडिंग " हे वाक्य तुमच्या मेमरीतून कायमचे डिलीट करुन टाका. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, March 22, 2022

🛑 गुरुंचे गुरु सद्गुरु

🛑 गुरुंचे गुरु सद्गुरु

          गुरुकुल पद्धतीमध्ये गुरूंच्या गृही राहून अध्ययन केले जात असे. गुरुंनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे हे छात्राचे आद्यकर्तव्य असे.

 " गुरु ईश्वर तात माय , गुरु विन जगी थोर काय " यात गुरुला सर्व उपमा दिल्या आहेत. पण हे गुरु घडतात कसे ? त्यालाही काही प्रक्रिया आहेत. गुरु होणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ती एक निरंतर प्रक्रिया आहे. या गुरुंना विद्या देणारे उच्च विद्याविभूषित असतात. अध्यात्मिक क्षेत्रात गुरुंच्या गुरुंना सद्गुरु म्हटले जाते. हल्ली असे अनेक सद्गुरु आपल्याला दिसून येतात. 

          शैक्षणिक क्षेत्रात गुरुजी या नावाने ओळखले जाणारे शिक्षक आता सर या नावाने ओळखले जातात. इंग्रजी शाळांमध्ये किंवा हायस्कूल , कॉलेजमध्ये पूर्वी शिक्षकांना ' सर ' असे म्हणू लागले. ते अजूनही तसेच सुरु आहे. मराठी शाळांमध्ये शिक्षकांना ' गुरुजी ' किंवा ' बाई ' असे संबोधले जाई. त्यात खूप आदर वाटे. आता सर आणि मॅडम या शब्दांमध्ये मोठेपणा वाटू लागला आहे. पण गुरुजी या शब्दाला जो सन्मान आहे तो इतर शब्दांना नक्कीच नाही. आपण इंग्रजाळलेले झाल्याने ' सर ' या शब्दाचा अभिमान बाळगत आहोत , पण गुरुजी या शब्दांमध्ये विनम्रता येते ती सर मध्ये येत नसल्याचे जाणवते. 

          मी शिक्षक झालो. मला अजूनही गुरुजी हा शब्द नितांत आवडतो. जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरी करत असताना मी ' गुर्जी ' होतो. सिंधुदुर्गात गुरुजींचा सर झालो. मग सर या उपाधीची सवयच लागली. पण अजूनही खेड्यापाड्यात गुरुजी म्हणणारी मंडळी आढळतात. त्यांना शिक्षकांबद्दल कमालीचा आदर दिसून येतो. 

          या गुरुजींनाही कधीतरी मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक ही भूमिका पार पाडताना दिसतात. त्यांनाही मार्गदर्शन करणारे गुरु असतात. 

          मी शेर्पे केंद्रात येऊन तीन वर्षे होतील. आम्हाला जे केंद्रप्रमुख लाभले आहेत , त्यांचे नावच सद्गुरु आहे. आल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शैक्षणिक वाटचाल करत असताना आम्हाला ते आमचे शैक्षणिक सद्गुरुच वाटत आले आहेत. ही त्यांची स्तुती नसून वस्तुस्थिती आहे. 

          प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. पण माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच ' माझे सद्गुरु ' असाच राहिला आहे. त्यांचे आणि माझे आडनाव समान आहे , " कुबल " . पण म्हणून काही मी या गोष्टीचा फायदा करुन घेत नाही. मी त्यांना पूर्वी ओळखतही नव्हतो. पण आता त्यांच्यासोबत काम करताना त्यांना ' सद्गुरुंच्या ' प्रमाणेच ओळखू लागलो आहे. 

          आपल्या हाताखाली काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम ते प्राधान्याने करताना दिसतात. त्यामुळे ते आमचे केंद्रप्रमुख आहेत असे वाटत नाही , ते आमच्या मार्गदर्शक गुरूंसारखे वाटत राहतात. कधी ते आमचा मित्र बनतात. आमच्याशी कौटुंबिक गप्पा मारताना ते स्वतः केंद्रप्रमुख आहेत हेही विसरुन गेलेले दिसतात. 

          यापूर्वी शाळेत केंद्रप्रमुख येत असले तर खूप भिती वाटे , पण कुबलसरांची भिती अजिबात वाटत नाही. ते दररोज यावेत आणि आम्हाला एखादी शिकवण देऊन जावे असे वाटते. त्यांच्याकडे गेली अनेक वर्षे दोन दोन केंद्रांचा भार आहे. या केंद्रामधील सर्व उपक्रम राबवत असताना , शाळांना भेटी देत असताना त्यांची दमछाक होत असेल. पण त्यांचा प्रत्येक शाळेतील प्रवेश नेहमी हसतमुखाने असतो. त्यामुळे कोणत्याही शिक्षकांना दडपण येत नाही ही जमेची गोष्ट आहे. 

          कोणाकडून कोणते काम करुन घेता येईल याचाही त्यांचा अभ्यास दांडगा आहे. ते कोणावर पूर्णपणे अवलंबून नसतात हे विशेष. जी कामे त्यांनी स्वतः करायची असतात , त्यांचा भार ते शिक्षकांवर अवाजवी लादत नाहीत. कामाचा व्याप वाढला तर समान विभागणी करुन व्यक्तिपरत्वे काम देण्याची त्यांची पद्धत मला खूप आवडते. 

          मी पत्रकारिता परीक्षा पास झालो हे समजताच त्यांनी माझे हार्दिक अभिनंदन केलेच. पण त्यांनी मला पत्रकारिता करण्यासाठी अचूक दिशा दाखवली. प्रत्येकवेळी प्रोत्साहन दिले. आज मी जे काही बरेवाईट लेखन करीत आहे त्यालाही त्यांची शाबासकीची थाप कारणीभूत आहे. त्यांच्यामुळे माझा या क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला आहे. 

          संपूर्ण केंद्रातच नव्हे तर तळेरे प्रभागात एक पत्रकार म्हणून माझी झालेली ओळख त्यांच्यामुळेच आहे. कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला नाही असे झाले नसेल. त्यामुळे त्यांनी माझा उत्साह वाढवत नेला तरी जबाबदारी सुद्धा वाढवत नेली आहे. तळेरे पत्रकार संघाच्या संपर्कात येण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. 

          खरंतर पत्रकाराने आपली प्रसिद्धी करायची नसते. मी शैक्षणिक  उपक्रमांची प्रसिद्धी देता देता कुबलसरांनी आणि आता सर्व तळेरे प्रभागाने माझी जी पत्रकार म्हणून प्रसिद्धी दिली आहे त्याबद्दल मी कायमच सर्वांचा ऋणी राहीन. मला मुळात प्रसिद्धीची आवड नाही , पण जे चांगले ते मी प्रसिद्ध करत गेलो आहे. त्यामुळे माझी प्रसिद्धी होणे साहजिक होते. पण त्याचे श्रेय कुबलसर आणि तळेरे पत्रकार संघ यांना जातं असे मी मानतो. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यही झाले नसते. 

          शिक्षकांना असे सकारात्मक प्रेरणा देणारे शैक्षणिक सद्गुरू भेटणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. म्हणूनच मला किंवा आम्हांला लाभलेले केंद्रप्रमुख सद्गुरू कुबलसर म्हणूनच श्रेष्ठ ठरतात. अशा व्यक्तिमत्त्वांचा ज्यावेळी त्यांच्या अपरोक्ष आदर केला जातो त्यावेळी त्यांचा तो पुरस्कारच ठरतो. त्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अनेक उत्तम पुरस्कार लाभले आहेत ते मिळण्याचे कारणही तेच आहे. आमच्यासाठी ते आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव झाला की आमची छाती अभिमानाने अधिक फुलून येते आणि आनंद गगनात मावेनासा होतो. आमच्या सद्गुरुंना उत्तरोत्तर अनेक उदंड पुरस्कार मिळोत , त्यांच्याकडून उत्तमोत्तम शैक्षणिक , सामाजिक कार्य घडो अशी मी ईश्वरचरणी सदैव प्रार्थना करत राहणे हे माझे आता कर्तव्यच झाले आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )




Monday, March 21, 2022

🛑 स्वानंदी : एक जगण्याची उर्मी

🛑 स्वानंदी : एक जगण्याची उर्मी

          जगण्यासाठी प्रत्येकाला एक उर्मी लागते. उर्मीशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुमचा आनंद सतत वाढवत राहणारी ही उर्मी जगण्यासाठी अत्यावश्यक असते. तुमचा स्वतःमधला आनंद म्हणजेच स्वानंद होय. हा स्वानंद मिळाला की तुमच्या जगण्याची उर्मी वाढलीच म्हणून समजा. 

          माझ्याही जीवनात ही उर्मी आली.  या उर्मीने स्वानंदीपणाचे रुप घेतले. ही स्वानंदी सर्वांचीच जगण्याची उर्मी वाढवत निघाली आहे. 

          तो २२ मार्चचा दिवस होता. डॉक्टरांनी सिझर करायला हिच तारीख ठरवली होती. याच दिवशी तिचा सिझेरियनने जन्म होणार होता. डॉक्टरांपुढे आम्ही सर्वांनी आधीच माथे टेकले होते. तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तिचे रडणे आम्हालाही रडू येण्यासारखेच होते. मुलगी झाली म्हणून जास्त रडू होते ते. 

          पहिल्या दोन मुली असताना तिसरीचे स्वागत हसत होणे कठीणच होते. पण पत्नीची मोठ्या दिव्यातून सुटका झाली याचा मात्र आनंद मी लपवू शकत नव्हतो. मुलगी झाली म्हणून दुःखाची एक पुसटशी छटा सर्वांच्याच चेहऱ्यावर आलेली दिसत होती. 

          डॉक्टरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावले होते. मी माझ्या पत्नीला भेटलो होतो. मुलगी झाल्याचा तिलाही आनंद झालाच नव्हता. तिलाही मुलगा होण्याची अपेक्षा असावी. 

          मुलगी झाली तर ती कोणालाही तरी देऊन टाकावी इतका वाईट विचार त्यावेळी माझ्या मनात आला होता. तो वाईट विचार मी माझ्या पत्नीला बोलूनही दाखवला होता. तिला नऊ महिने उदरात जिवापाड सांभाळलेल्या बाळाबद्दल असे बोललेले रुचले नव्हते. पण ती गप्प राहिली होती. 

          हळूहळू ही तिसरी मुलगी मोठी मोठी होत गेली. तिचे नाव आम्ही स्वानंदी ठेवले. घरात म्हणायला साधे सोपे दोन अक्षरी नाव ठेवले , ' उर्मी ' . ही उर्मी जसजशी मोठी होत गेली तसतशी सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होत गेली. तिचे बोबडे बोल सुखावणारेच. तुमचे कोणतेही दुःख विसरायला लावणारे. 

          आज तिला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. तिने सगळ्यांना वेड लावले आहे. ती आमच्या घरातील सर्वात बडबडी मुलगी असेल. ती कोणाचीही ओळखीची होऊन जाते. एकदा ओळख झाली की समोरच्या अपरिचित व्यक्तीलाही तिचा कमालीचा लळा लागेल अशीच ती आहे. अशा या माझ्या मुलीला ' ती आम्हाला नको होती ' हे समजते आणि स्वतः सर्वांना सांगत सुटते. " पप्पांना मी नको होते , ते मला कचरा पेटीत टाकणार होते किंवा पिंकी आत्येला देऊन टाकणार होते. " 

          मुलगी झाली की ती सर्वानाच का नकोशी होते ? आमच्या शेजारी एका दांपत्याला सगळ्या मुळीच झाल्या होत्या. त्यातील एका मुलीचे नावच त्यांनी ' नकोशी ' असे ठेवले होते. आमच्यासारखी शिकलेली माणसं जर असा विचार करत असतील तर अशिक्षित लोकांचं काय ? त्यांच्याबद्दल न बोलणेच बरे. 

          आज आमची उर्मी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. तिचं बोलणं हृदयाचा ठाव घेणारं असतं. तिचं निरागस बालप्रेम डोळ्यांत टचकन पाणीच आणतं. ती दररोज रात्री माझे पाय चेपते. तिच्या चिमुकल्या हातात पाय चेपण्याइतकी ताकद कुठे आहे ? पण तिने पाय चेपायला सुरुवात केली की पाय दुखायचे थांबतात हे मात्र नक्की. तिच्या अनेक अपेक्षा असतात. ती माझ्याजवळ हळूच येऊन सांगते. मी काही तितकासा मनावर घेत नाही. पण काही वेळाने मीही विरघळून जातो. तिचा राग आला कि तिच्यावर डोळे वटारले जातात. कधी कधी हातही उगारला जातो. पण आमची उर्मी ते पाचच मिनिटांत विसरुन जाते. मला हवी असलेली गोष्ट खायला आणून देते. मला घ्यायला सांगते. पप्पांनी मारले तरी तिला पप्पाच हवे असतात. मग ती म्हणून दाखवले , " पप्पा , तुम्ही माझे पप्पा आहात ना , मग मला कधीतरी मारलं तर काय होतं ? मारा तुम्ही , पण तुम्ही माझे लाडके आहात. मी तुमची जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहे ना ? "...... या तिच्या वाक्यांनी कोणीही निशब्द होईल यात शंका नाही. 

          तिला मोबाईलचे खूप वेड आहे. त्यातील यु ट्युब हा तिचा अतिशय जवळचा मित्रच. त्यातल्या अनेक गोष्टी , गाणी , हिंदी भाषा तिला तोंडपाठ झाल्या आहेत. ती खेळताना जास्त हिंदीच बोलते. ती अजून शाळेत गेलेली नाही. यंदा ती पहिलीत जाईल. 

          घरात त्रास देते म्हणून तिला एका बालवर्गात घातले होते. ती पहिला दिवस रमली. दुसऱ्या दिवशी तिला वर्गात करमेना. तिने बाईंना सांगितले , " मॅडम , मला पप्पांची आठवण येते आहे , त्यांना फोन करा. " मॅडमनी फोन केल्याचे नाटक केले हेही तिला समजले. तिला खोटे अजिबात आवडत नाही. मी शाळा सुटण्याच्या वेळी तिला आणायला गेलो होतो. ती माझीच वाट बघत बसली होती. मला बघताच तिचा बांध फुटला होता. ती वर्ग सोडूनच माझ्या दिशेने रडत रडत इतक्या वेगाने धावत आली होती. मीही मग धावत जाऊन तिला उचलून घेतले होते. ती तेव्हाच रडायची थांबली. मग येताना तिची न संपणारी बडबड सुरुच होती. 

          तिचा तिच्या मोठ्या दोन्ही बहिणींवर भारीच जीव आहे. काही क्षणांसाठी भांडतील आणि लगेच गळाभेटही घेतील. त्यांचे हे असेच चिरायु राहो. 

          प्रत्येकाच्या घरी अशी एखादी उर्मी जन्माला यायला हवी. मग तुमचं एकूण जीवनच बदलून जाईल. माझं जीवन तिन्ही मुलींसाठी आहे. त्याच माझं जीवन आहेत. त्या वेगवेगळ्या तिघी असल्या तरी माझ्यासाठी जगण्याच्या उर्मीच आहेत. आमचं स्वानंदी जगणं म्हणूनच उर्मीमय होत गेलं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 दांडगी आई : आमची बहिणाबाई

 🛑 दांडगी आई : आमची बहिणाबाई

          त्या दिवशी ' बहिणाबाईंच्या गाण्यांवर आधारित ' कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली. कार्यक्रम शेवटपर्यंत बघितला. कितीतरी दिवसांनी एक सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला. बहिणाबाईंच्या मुलाने सोपानदेव चौधरी यांनी किती चांगले काम केले आहे. आपल्या आईच्या म्हणजेच बहिणाबाई चौधरींच्या सर्व रचना लिखित करुन सर्वांना त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. या बहिणाबाईंचा संपूर्ण कार्यक्रम बघताना मला बहिणाबाईंच्या ठिकाणी आमची दांडगी आई दिसत होती. 

          दांडगी आई जरी वयाने दांडगी नसली तरी तिला सगळेजण दांडगी आईच म्हणत असत. आमची सर्वात मोठी आत्या होती ती. 

          आम्ही मालवणी भाषेत तिला दांडगी आई न म्हणता ' दांडगे आये ' असा उल्लेख करत असू. ती सगळ्यांचीच ' दांडगी आये ' झाली होती. तिचे लग्न तिच्या वयाच्या खूप कमी वयात झाले होते. तिच्या नवऱ्याला कोणत्या तरी असाध्य रोगाने पछाडले होते. तेव्हा तिच्या पोटात बाळ होते. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला होता. पण काहीच दिवसात आमची दांडगी आये अकाली विधवा झाली होती. मग ती आमच्या घरी म्हणजे तिच्या माहेरीच राहिली. आपल्या मूळ घरी ती परत गेलीच नाही. आपल्या मुलीला आमच्याच घरी लहानाची मोठी केली. सोबत आमच्या काकांना , आत्यांना आणि आम्हालाही मोठे करण्यात तिचा सिंहाचा वाटा होता. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. माहेरी असल्यामुळे तिला आजोबांची बोलणी खावी लागली. प्रसंगी शिव्यांसोबत मारही खावा लागला. वादावरून वाद वाढत जात आणि माझ्या आजोबांची आणि तिची शाब्दिक आणि शारीरिक चकमक घडे. 

          तिने आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या जीवाचे रान केले होते. ती रात्री उशिरा झोपे आणि सकाळी लवकर उठत असे. सकाळी जात्यावर दळण दळताना तिच्या तोंडी ओव्या येत. तिच्या ओव्या अर्थाने भरलेल्या असत. त्यावेळी त्यांचा अर्थ समजण्याइतके आम्ही समंजस नव्हतो. पण तिच्या गोड आवाजाने आमची झोप निघून जाई , पुन्हा तिच्या आवाजाने गाढ झोपही येई. उठल्यानंतर तिच्या ओव्या मी आठवण्याचा प्रयत्न करत असे. पण काहीही लक्षात राहत नसे. 

          रात्री आम्हाला झोपवताना कधीतरी छान छान गोष्टी सांगी. ' आकडी कोयती लावतय, शिळी रोटी खातंय, चल पिटु येतंय ' अशी सुरुवात असलेली गोष्ट मला खूप आवडे. आता तीही विसरायला झाली आहे. 

          माझ्यावर तिचा खूप जीव होता. सगळ्यांवर तिचे आणि सगळ्यांचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते. ती आपल्या मुलीच्या चुका काढुन तिला शिव्या शाप देत असे. पण आम्हाला तिने कधी वाईट बोलल्याचे आठवत नाही. 

          गणपतीच्या सणाला तिच्या फुगड्या जगावेगळ्या असत. तिने त्या कुठे ऐकल्या होत्या तीच जाणे. ती म्हणूनच आमच्यासाठी बहिणाबाईच ठरली होती. 'तुजा फु फु , माजा फु फु ' ही फुगडी तिच्या तोंडूनच ऐकावी आणि पहावीदेखील.

          नवस करण्यात ती पटाईत होती. एकदा तिने वेगळाच नवस केला होता. गणपतीसमोर ती विवस्त्र फुगडी घालणार होती.  तिने तो नवस  सगळ्यांना नकळत फेडलाही. 

          तिचा संताप बघताना कुणालाही रडू येईल. मी तिचा संताप बघितला आहे. ती स्वतःवरच चरफडत राही. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे देवाकडून हवी असत. समर्पक उत्तरे मिळाली नाहीत की ती देवावर संतापे. देवाला अरे तुरे करी. 

          आमच्या घरातील चूल तिच्याच हातात होती. काकांची लग्ने झाली. त्यांच्या बायका आल्या. तरीही तिने चूल काही सोडली नाही. आजी तिला चूल सोडायचा हुकूम देत असे. तेव्हा त्यांच्यात झालेली भांडणे मी ऐकली आहेत. मी लहान होतो , आजीही माझीच होती आणि आत्याही. पण आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो. शेवटी माझी आजीच नमतं घेत असे. अशी त्यांची लुटूपुटूसारखी भांडणे दर आठवड्याला एकदा तरी हमखास होत. ती नेहमीची असल्याने त्यात कोणीही पडत नसत. 

          तिच्या मुलीचे लग्न झाले. तिला नवरा मिळाला तोही दारुच्या व्यसनाने गेला. तिच्यावर अनेक संकटे आली , पण ती डगमगली नाही. 

          मी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात नोकरीला लागलो होतो. तेव्हा माझे जेवण बनवण्यासाठी दांडगी आये आली होती.सकाळी उठल्यापासून ती माझ्यासाठी मरमर मरे. जंगलात जाऊन लाकडे गोळा करी. माझ्या आवडीचा फोडणीचा गरमागरम भात करुन देई. चुलीवरच्या थाळीला लावलेल्या भाकऱ्या करुन देई. पेज देई. तिच्या जेवणाला अप्रतिम चव होती. मी जेवत असताना ती माझ्याकडे कौतुकाने बघत बसे. माझे जेवण झाल्यानंतरच त जेवत असे.

          एकदा मी शाळेतून उशिराच घरी आलो होतो, शाळेचे काहीतरी काम होते. मी आधीच वैतागलो होतो. मी आलो तर ती मला म्हणालीं , " अरे बाळू , माज्या पाटीवर जरा मुटके मार रे !!! आज नाकडा हाडलंय ना , पाट कशी दुकाक लागली हा " मी मुटके मारायचे सोडाच , मी तिच्यावर खूप खूप रागावलो. बिचारी काहीही न बोलता चुलीकडे गेली आणि गरमागरम चहा करुन मला आणून दिला. थोड्या वेळाने गरमागरम फोडणीचा भात समोर हजर होताच. ' माज्या बाबूक भूक लागली आसात ना ? ' असं म्हणत जेव्हा तिने मला भात पुढे केला होता तेव्हा मी तर तिच्याकडे बघतच राहिलो होतो. किती सहनशील होती ती !!! ग्रेटच. 

          पावसाळ्याचे दिवस होते. मी तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त गेलो होतो. मला यायला उशीरच झाला होता. संध्याकाळचे सहा वाजत आले असतील. ती माझ्या वाटेवर नजर ठेवून बसली होती. 'आजून कसो माजो पोरगो येत नाय ' असे म्हणत ती निघाली होती. वाटेत एक मोठा ओढा होता. पावसामुळे त्याचे पाणी वाढले होते. त्यावर साकवसुद्धा नव्हता. मी ओढ्याच्या पलीकडे येऊन थांबलो होतो. ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पहात बसलो होतो. दांडगी आये तिथे येऊन पोहोचली होती. तिने माझ्यासाठी मोठी आरोळी ठोकली होती. तिने आपली नऊवारी साडी वर खोचून घेतली आणि पाण्याच्या गतिमान प्रवाहात न घाबरता धाव घेतली होती. मीही तिच्यामुळे हळूहळू पलीकडून येण्याचा प्रयत्न करु लागलो होतो. मध्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. तिचे रडणे खोलीवर येईपर्यंत सुरुच होते. 

          आता ही आमची दांडगी आये हयात नाही. तिच्या आठवणी काही केल्या जाता जात नाहीत. तिच्यासोबतचे प्रसंग आठवले की आजही माझ्या डोळ्यांत गंगा यमुनेचा पूर आल्याशिवाय राहत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Sunday, March 20, 2022

🛑 मी ब्लॅंक झालो

🛑 मी ब्लॅंक झालो

          लहानपणापासून आपण कितीतरी वेळा ब्लॅंक झालो असणार. पण मोठेपणी ते लक्षात येते. ब्लॅंक होणे म्हणजे मन पूर्ण रिक्त होणे असा होतो. पण कधी कधी आपलं मन रिक्त होणं केव्हाही चांगलंच. ब्लॅंक होणे म्हणजे विसरून जाणे असाही अर्थ होतो. तोही बरोबरच आहे. घाबरुन बऱ्याचदा विसरण्याची शक्यता जास्त असते. अनेकांचे तसेच होत असेल. माझे तर अनेकदा तसे झाल्याचे मला चांगलेच आठवते आहे. 

          शाळेत परीक्षेला जाताना सर्व काही आठवत असते , पण पेपर हातात पडला की ब्लॅंक व्हायला होते. जे आठवत होते ते सगळे विस्मरणात जाते. नको ते आठवू लागते. हवे तेव्हा हवे ते आठवत का नाही ते समजण्याला मार्ग नसतो. अर्थात आपला आत्मविश्वास कमी असतो म्हणून असे होत असेल का ? म्हणजे आत्मविश्वास आला की सर्व आठवू लागेल असं आहे का ? तर तसेही होताना दिसत नाही. ज्यांच्याकडे आत्मविश्वास ठासून भरलेला असतो , तेही कधीना कधी ब्लॅंक झालेच असतील ना ? 

          भाषण करताना मोठ्या समुदायासमोर बोलायचे असते. त्यावेळी जे ठरवलेले असते , ते आठवतच नाही. मध्येच लिंक तुटते. बोलायचे असते ते कुठल्या कुठे विरुन जाते. कधी कधी मित्रांमध्ये बोलतानाही ब्लॅंक व्हायला होते. ते आपला असा काही पाणउतारा करतात की त्यापुढे आपणांस बोलता येत नाही. अर्थात त्यावेळी आपण ब्लॅंकच झालेले असतो. 

          डीएडच्या सराव पाठांनाही तसंच. तिथे तर मोजकंच बोलायचं असतं. तिथेही मध्येच ब्लॅंक व्हायला झालं आहे. हे ब्लॅंक होणं काही थांबणारी गोष्ट नाही. कधी आपण निरुत्तर होतो , आपला मेंदूच चालत नाही. तो बंड करु लागतो. त्याच्या भरवश्यावर सर्व चाललेलं असतं , तर तोच आपल्याला दगा देत असतो. समोरचे मस्त एन्जॉय करतात. कशी फजिती झाली !!! असा अविर्भाव आणतात. त्यांची अशी कधीतरी फजिती झालीच असेल ना , याचा ते विचार करताना दिसत नाहीत. 

          डीएडला असताना आमच्या दोन्ही वर्गाच्या म्हणजे ज्युनिअर आणि सिनिअरच्या मुलांनी मिळून एक एकांकिका केली होती. तिचे नाव होतं , " एक मेलेलं पोस्ट , त्याची जिवंत गोष्ट " त्यात आम्ही सात  , आठजण पात्रे होतो. सगळी पात्रे आमचे दिग्दर्शक प्रदिप मांजरेकर यांनी निवडली होती. त्यावेळी धनंजय क्लास म्हणजे आमच्या सरावाची जागा होती. वेळ मिळेल तसे आम्ही सर्व एकत्र येऊन एकांकिकेचा सराव करत होतो. कणकवलीतील नाथ पै एकांकिका स्पर्धेत भाग घेणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. पण प्रदिप मांजरेकर यांना कायम आव्हाने पेलण्याची सवय होती. त्यांनी आम्हाला सतत प्रभावित करत ठेवले होते. मंगेश लाड , प्रशांत बोभाटे , शेट्ये आणि असे काही मित्र त्यात भूमिका करणार होते. माझी भूमिका एका म्हाताऱ्याची होती. तालमीच्या वेळी मी माझा म्हातारा छान रंगवत असे. माझ्याकडे मोठी मोठी वाक्ये होती. ती मी चांगलीच पाठ केली होती. बालपणात चार , पाच बालनाट्ये केली होती. पण यावेळी जाणत्या रसिक प्रेक्षकांसमोर सादरीकरण करायचे म्हणजे मोठी कसरतच होती. 

          जसजशी एकांकिकेची तारीख जवळ येत होती , तशी पोटातील पोकळी वाढत चाललेली दिसत होती. ही पोकळी भीतीने भरु लागली होती. 

          मित्रांचे नाटक म्हणून वेशभूषा , रंगभूषा , केशभूषा करण्याची जबाबदारी सहदेव पालकरदादा याने घेतली होती. तो स्वतः एक आर्टिस्ट होता. हाडाचा शिक्षक होता. त्याला आमची रंगभूषा करणे सोपे होते. माझी म्हाताऱ्याची भूमिका असल्याने त्याने मला पांढरी मिशी लावली होती. मिशी चिकटवण्यासाठी त्याने कसलेसे लिक्विड लावले होते. ते लावल्यानंतर मिशी घट्ट चिकटली होती. पण मला बोलता येईना. मिशी अडकू लागली होती. बोलताना तोंड उघडताना त्रास व्हायला लागला होता. मी दादाला तसे सांगितले. दादा म्हणाला , " प्रवीण , घाबरु नकोस , तुला हळूहळू बोलायला येईल. बाहेर जाऊन बोलायचा सराव करत राहा. " त्याने सांगितल्याप्रमाणे मी आपला सराव करायला सुरुवात केली होती. थोडे थोडे जमूही लागले होते. 

          आता आमच्या एकांकिकेचा नंबर आला. नेपथ्यकारांनी अचूक नेपथ्य केले होते. प्रकाश योजना बरोबर होती. ध्वनी योजना हवा तिथे ध्वनी वाजवत होती. आमचा दोघांचा प्रवेश सुरुवातीलाच होता. प्रवेश झक्कास झाला. टाळ्या मिळाल्या. मी म्हाताऱ्यासारखा बोलत होतो. मस्त चेव येत होता. समोरचे प्रेक्षकही दिसू लागले होते. त्यातले काही ओळखीचेही होते. त्यांना बघून मला रंगमंचावरच घाम फुटला. माझे शब्द , माझी वाक्ये मला आठवेनाशी झाली. मीच म्हणालो , " भाऊ , मला आता पुढचे काही आठवत नाही , तूच काय ते बोल. त्यावेळी मी ब्लॅंक झालो होतो. समोरच्या पात्राने मला सांभाळून घेतले, आमचा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण झाला. पुढची माझी सर्व स्वगते नीट पूर्ण झाली तरी सुरुवातीला मी ब्लॅंक झालो ही खंत होतीच. 

          हल्लीच मी एका नाटयोत्सवाला गेलो होतो. तेव्हाही एक कसलेला नाट्य अभिनेता मध्येच ब्लॅंक झाला होता. त्यावेळी त्याने रंगमंचावरूनच ते कबुलही केले होते.  त्यांचा अभिनय एवढा अफलातून होता की मी तर भारावूनच गेलो होतो. पण त्यांच्या ब्लॅंक झाल्यानंतरच्या विनम्रपणे सांगण्याबद्दल मी जास्त भारावून गेलो आणि मला माझे ब्लॅंक होणे आठवले. 

          आयुष्य हा एक रंगमंच आहे. त्यावर आपण आपल्या जीवनाचे नाट्य सादर करत असतो. ते करतानाही आपण अनेकदा ब्लॅंक होतो , कधी ते ब्लॅंक होणे आवश्यकही असते. पण कधी ब्लॅंक झाल्यामुळे आपणांस पुढील अनर्थांना तोंड देण्याची पाळी येते. प्रयत्नपूर्वक आपल्याला या ब्लॅंकच्या जागा भरता आल्या पाहिजेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 सतीश , क्या यही प्यार है ?

🛑 सतीश , क्या यही प्यार है ?

          त्या दिवशी पेपरमध्ये बातमी वाचली आणि धक्काच बसला. तसा धक्का बसणं ही आता रोजचीच सवय झाली आहे. कोणाचा जन्म झाला तर आपल्यासाठी आनंदाची बातमी असते , पण कोणाचा तरी मृत्यू झाला तर ती बातमी आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक असायला हवी. त्यामुळे असे धक्के पेपरमध्ये रोजच बसत असतात. कधी काळचा एक मित्र गेल्याची बातमी होती ती. वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा असलेला. त्याला मित्र म्हणण्यापेक्षा दादा म्हणणे कदाचित योग्य ठरेल. पण त्याला ते मान्य नव्हते. त्याला नावाने हाक मारणेच आवडत असे. सतीश.

          आमच्या सलून दुकानासमोरच त्यांचे दुकान होते. दुकान टेलरिंगचे होते. केरकर आणि सतीश मयेकर या दोघांचे ते दुकान होते. दोघेही हसतमुख होते. एक कपडे कापत असे , दुसरा कपडे शिवत असे. दोघांचे काम अतिशय कौशल्यपूर्ण असे होते. त्यांनी त्यांच्या कामाच्या मॉडर्न पद्धतीमुळे  गिऱ्हाइके वाढवत नेली होती. शर्ट , पॅन्ट मारण्यात अतिशय पटाईत असलेली मंडळी होती ती. त्यांच्याकडे टेपरेकॉर्डर होता. तो दिवसभर वाजत असे. आमचे दुकान जवळच असल्यामुळे आम्हीही त्या सुरेल गाण्यांचा आस्वाद घेत असू. नवीन गाण्यांची कॅसेट आली रे आली की ती पहिली यांच्या दुकानात वाजत असे म्हणानात. 

          दोघेही संगीतवेडे होते. गाणी ऐकता ऐकता यांचे कर्तनकाम , शिवणकाम धाडधाड सुरु असताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तेव्हा संजय दत्तचा रॉकी सिनेमा आला होता. सिनेमा काही बघायला मिळाला नाही. पण त्यातली गाणी मात्र ऐकून ऐकून तोंडपाठ झाली होती. त्यातलं एक गाणं सतीशला खूपच आवडायचं. त्याचे बोल असे होते , " दिन तेरे बिन कही लगता नही  , वक्त गुजरता नही , क्या यही प्यार है , हा यही प्यार है " ती कॅसेट खराब होईपर्यंत ते गाणं सतीशने हजारदा लावलं असेल. तो तेव्हा एकदम तरुण , गोंडस होता. त्याला मिशीसुद्धा आली नव्हती. त्याचे लग्न व्हायला खूप अवकाश होता. त्याच्या मनात काय सुरु होतं तोच जाणे. पण हे गाणं ऐकताना तो फ्रेश दिसायचा. आमचे बाबा त्याला चिडवत , " काय रे सतीश , ह्या गाण्याचो तुका कंटाळो येयत नाय रे " तो बाबांच्या बोलण्यावर फक्त हसायचा आणि म्हणायचा , " कुबल , तुमचा वय गेला , आता आमचा इला , ही आमच्या काळातली गाणी आमका आयकाकच व्हयी. नायतर आमी म्हातारे होतलव " मग माझे बाबा त्याच्या बोलण्यावर न बोलता पुन्हा आपल्या दुकानात येऊन त्याचे वाढलेल्या आवाजातले गाणे ऐकत बसत. कारण त्याच्याशिवाय बाबांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. 

          काही वर्षे निघून गेली असतील. आमचे संबंध अधिक दृढ होत गेले. मीही त्यांच्या दुकानात जाऊन बसू लागलो. त्यांच्याशी गप्पागोष्टी मारु लागलो. शिलाई मशीनची खडखड थांबत नव्हती , तशी टेपरेकॉर्डरची गाणीही थांबता थांबत नव्हती.

          असेच काही दिवस निघून गेले कापरासारखे. आठवणी मात्र जशाच्या तशा राहिल्या. आम्हाला काही कारणास्तव दुकानाची जागा बदलावी लागली. जागा बदलली तरी कधीतरी सतीशकडे जाणे होई. दिवस बदलत गेले , त्यांची कौशल्येही बदलली. सतीशला आणि त्याच्या भावाला टेलरिंग पेक्षा वेगळा व्यवसाय खुणावू लागला. त्यांनी ट्रक , ट्रॅव्हलर घेतले. व्यवसाय जोमाने सुरु केला. पुन्हा काही वर्षांनी त्यांनी आपापले नवे व्यवसाय सुरु केले. उद्योगाचे घरी जणू लक्ष्मी पाणी भरु लागली होती. सतीशने दिक्षा कंस्ट्रक्शन हा व्यवसाय सुरु केला. विहिरी खोदणे , बोअरवेल खोदणे , विहिरी बांधणे असे काहीसे व्यवसायाचे स्वरुप होते. व्यवसायाने व्यापक रुप धारण केलं होतं. आता हल्ली कधी हा सतीश दिसला कि खूप गडबडीत असे. त्याला आमच्याशी बोलायलाही वेळ नसे. बोलता बोलता त्याचा फोन येई आणि तो गडबडीत निघून जाई. आयुष्याच्या ट्रॅकवर पुढे जात असताना कितीतरी अशी माणसं भेटतात. काही माणसं खूप मोठी होत असताना बघायला मिळतात. सतीश खूप मोठा उद्योजक होताना आम्ही बघितला आहे. पण त्याच्या निधनाची वार्ता वाचली आणि मला पूर्वीचा सतीश आठवून काळजात धस्स झाले. तो अल्पायुषी ठरला होता.

          बातमी वाचली तेव्हा पुन्हा एकदा त्याचं आवडतं गाणं माझ्या कानात आपसूक वाजू लागलं होतं  , " क्या यही प्यार है , दिन तेरे बिन कही लगता नही  , वक्त गुजरता नही " आता हे गाणेच राहिले होते , सतीश कधीच आमच्या पुढे निघून गेला होता.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )





Saturday, March 19, 2022

🛑 आचार्य शिरोमणी

          शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना व इतरही सामाजिक क्षेत्रातील कलावंतांना परफेक्ट अकॅडमीकडून आचार्य शिरोमणी पुरस्कार प्रदान केल्याचे वाचनात आले. अतिशय चांगली गोष्ट आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांमुळेच आजची पिढी अजून सुसंस्कारीत होण्यासाठी संधी उपलब्ध होते आहे. त्यांच्याकडे बघूनही आपल्यात सकारात्मक बदल घडू शकतात अशी व्यक्तिमत्त्वे जगात आहेत. त्यांचं बोलणं , चालणं सगळंच टिपण्यासारखं असतं. त्यांचा सहवास लाभला तर जीवनाचं सोनंच होऊन जाईल. अशा सोनं करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं कठिण असलं तरी दुर्मिळ अजिबात नाही. 

          आमच्या सहवासातील अनेक शिक्षक बंधू भगिनींना हल्ली अनेकविध पुरस्कार मिळाले आहेत ही त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावतीच आहे. या व्यक्तींना पुरस्कार मिळून त्यांनी पुरस्कारालाच मोठे केले आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. 

          जिल्हा सचिव सचिन मदने आणि महिला तालुका सचिव नेहा मोरे यांना मिळालेला पुरस्कार आम्हाला म्हणूनच आम्हाला अभिमानास्पद आहे. त्यांचे शैक्षणिक , सामाजिक कार्य उल्लेखनीय असेच आहे. त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून अनेकदा भेटी घडल्या. त्यांच्या व्यक्तित्त्वाने समोरच्याला नवनवीन गोष्टी द्याव्यात असे प्रभावी व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले आहे , नव्हे त्यांनी ते तावून सुलाखून बनवले आहे. त्यासाठी त्यांना अनेक संघर्षांना , समस्यांना दैनंदिन तोंड द्यावे लागत असेल. त्यावर प्रत्येकवेळी मात करणाराच खरा आचार्य शिरोमणी असतो यांच्यासारखा. 

          सचिन मदने यांची ओघवती भाषा मला भावते. आमचे जिल्हा सरचिटणीस अतिशय अभ्यासू आहेत याबद्दल मला त्यांचा मनस्वी आदर आहे. आपल्या समितीने कित्येक व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. नोकरीला लागल्यापासून मी अशा दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकली आहेत. रॉड्रिग्जगुरुजींची मार्गदर्शने तर आम्ही दररोज परिपाठाला ऐकली आहेत. कणकवली नं.३ शाळेत सातवीपर्यंत शिकताना त्यांची पाठीवरील शाबासकीची प्रेमळ थाप अजूनही आठवते. ते मला स्कॉलर म्हणत. त्यांच्या असे म्हणण्यामुळे मी खरंच चौथी , सातवीत स्कॉलर झालोच. ही त्यांची आणि आमचे आचार्य शिरोमणी पाटकरगुरुजी , नारकरगुरुजी , पालवगुरुजी , परबगुरुजी , तावडेबाई यांची देण आहे असे मी मानतो. 

          मदनेसरांच्या हातून कित्येक विद्यार्थी घडले असतील , ते भाग्यवान असतील , कारण त्यांना असे मार्गदर्शक लाभले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती देखील त्यांना या कार्यात मोलाची साथ देताना दिसतात. रोटरी क्लबचे प्रमुख पदाधिकारी म्हणून मदने सरांची निवड म्हणजे सचिन तेंडुलकरच्या बॅटचा षटकारच म्हणायला हवा. 

          नेहा मोरेंना मिळालेला पुरस्कार म्हणजे कणकवली शाखेसाठी अभिमानाचा तुरा आहे. एकतर आमची समिती म्हणजे अभिमानांची खाणच आहे. यात अनेक हिरे आहेत. झाकलेली माणकं आहेत. प्रसंगानुरुप त्यांची तेजस्विता चमकताना दिसते. सर्वांची नावे इथे सांगणे कठिण आहे. प्रत्येकजण एकमेवाद्वितीय आहे. वेळेनुसार आपला बौद्धिक खजिना प्रत्येकजण खुला करताना दिसतात.

          म्हणूनच आनंद तांबे , सत्यवान चव्हाण आणि कित्येक शिक्षक रत्ने शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवताना दिसतात आणि आम्ही आमचा ऊर अभिमानाने भरुन येतो. सर्वांनीच आपल्या नैसर्गिक देणगीचा आणि प्राप्त केलेल्या कौशल्यांचा पुढील पिढीसाठी असाच उपयोग करत राहिल्यास आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे आचार्य शिरोमणी ठरु. नक्कीच. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )





Friday, March 18, 2022

🟣 नायक आणि विनायक लेखांक : ९३

 🟣 नायक आणि विनायक लेखांक : ९३


          काही माणसं त्यांच्या कामाने लक्षात राहतात. ही त्याच कामासाठी जन्माला आलेली असू शकतात. किंवा अनपेक्षितपणेही आलेली असली तरी त्यांच्याकडून विलक्षण असे कार्य घडत असताना आपण पाहतो आणि भारावूनही जातो. ते आपोआपच नायक बनतात. ते नायक नसतानाही त्यांच्यातील नायक ठळकपणे दिसू लागतो. हा माहीत नसणारा नायक अचानक विनायक बनून समोर येतो आणि नायक या शब्दाला सार्थ करतो. 

          असेच एक नायक असलेले विनायक माझ्या आयुष्यात आले. डी. एड. होऊन आम्ही बाहेर पडत असताना हे विनायक आम्हाला गवसले. त्यांचा निरागसपणा आम्हाला भावला. त्यांच्यातील नायक त्यावेळी दिसला नव्हता. जास्त संपर्क न आल्यामुळे असेल कदाचित , पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी लागल्यानंतर एकाच तालुक्यात आमच्या नेमणुका झाल्या हे नशीबच म्हणावं लागेल. त्यांना देवगडचे टोक मिळाले. गिर्ये नं. 1 शाळेत त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यांच्यासोबत असणारे आमचे दुसरे नायक मित्र गिल्बर्ट यांनीही त्यांची एकाच शाळेत अनेक वर्षे सोबत केली. 

          माझी आत्येबहिण गिर्यात दिलेली होती. गिल्बर्ट आणि विनायक हे माझे मित्र आहेत , हे तिलाही समजले. ती त्यांच्याकडे माझी चौकशी करत असे. त्यावेळी फोन नसल्यामुळे ती या माझ्या मित्रांकडे माझी खुशाली विचारत असे. माझ्या या मित्रांनी तिला प्रसंगानुरूप सहाय्य केले होते. ती बडबडी असली तरी तिच्या या गुणाबद्दल ते माझ्याकडे कधी बोलले नाहीत. 

          विनायक जाधव नावाचं व्यक्तिमत्त्व साधं , सरळ आणि परोपकारी असल्याचे मला त्यावेळीच समजलं होतं. आता या विनायकभाईंच्या सहवासात आल्यानंतर ते अधिक स्पष्टपणे जाणवू लागलं आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे खूप कमी लोक असतात , विनायकराव हे मदत करताना कोणतीही अपेक्षा बाळगताना दिसत नाहीत. त्यांच्यासोबत बोलताना त्यांच्या या गोष्टीचा अधिक अनुभव येतो. 

          शाळेच्या कामातही ते अतिशय तत्पर असतात. त्यांचे अध्यापन विद्यार्थिप्रिय असेच आहे. त्यांच्या हसतमुख वदनाकडे पाहिले की खऱ्या ' विनायकाची ' म्हणजे गणरायाची आठवण यायला हरकत नाही. सावरकरांचे नाव विनायक होते. आता हे आमचे जाधवांचे विनायक आहेत. सावरकरांनी सागराकडे आळवणी केली होती , " सागरा , प्राण तळमळला ". आमचे विनायक अशी आळवणी करत असतील , " शिक्षका , सांग तळमळ   गा " . शिक्षकांच्या समस्या त्यांच्या समस्या झालेल्या असतात. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांवर सन्माननीय तोडगा काढण्याचे काम ते करताना दिसतात तेव्हा त्यांच्याबद्दल उत्स्फूर्तपणे लिहावेसे वाटते. 

          एखाद्या मोठ्या संघटनेचे तालुक्याचे महत्त्वाचे पद कोणालाही असेच मिळत नसते. विनायकभाईंनी ते आपल्या कार्य कर्तृत्वावर मिळवलेले आहे. त्या पदासाठी काम करताना त्यांना दिवसाचे चोवीस तासही पुरत नाहीत. सर्व पदाधिकारी आणि शिलेदार यांच्याशी दररोज फोन संपर्कात राहणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. सगळ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना त्यांची  काय हालत होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यांनी संघटनेचे कार्य जोमाने करताना सर्वांशी कायमच मित्रता जोपासली आहे. त्यांचे वक्तृत्व ऐकण्याचा हल्ली अनेकदा योग आला. सर्व विषयांना स्पर्श करत , सर्व मुद्द्यांना हात घालत बोलण्याची त्यांची पद्धत कोणालाही आवडेल अशीच आहे. त्यांना तरीही संघर्ष करावा लागत असला तरीही त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच तयार असतात. संघटनेचे अध्यक्ष , मित्र, शिक्षक आणि कौटुंबिक सर्व नाती जगत असताना त्यांना खूपच कसरत करावी लागत असणार. ते या सर्व शिवधनुष्यासारख्या जबाबदाऱ्या लिलया पेलताना दिसतात. 

          गेल्यावर्षी खारेपाटण चेकपोस्टवर माझी तिसऱ्यांदा ड्युटी लागली होती. मी तिथे काम करत असताना त्यांचा फोन आला. ते मला म्हणाले , " प्रविणभाई , तुम्ही पुन्हा पुन्हा ड्युटी का सहन करताय , मला बोलला असता तर मी काहीतरी पर्याय काढला असता. " मी त्यांना म्हणालो , " विनायकभाई , मला पहिल्यांदा ड्युटी आली , तेव्हा मी ती केली. दुसऱ्यांदा मी भावाची ड्युटी केली. तिसरी ड्युटी आली तर ती मी माझी ड्युटी म्हणून करतोय. " 

          मी एवढे बोललो आणि फोन ठेवला. पण विनायकभाई गप्प बसतील तर ना ? त्यांनी थेट तहसीलदारांकडे याबाबत विचारणा केली. माझ्या जागी दोन दिवसात दुसरे शिक्षक हजर झाले, मी कार्यमुक्त झालो. आपला शिक्षकमित्र एकटाच भरडू नये ही त्यांची संवेदनशीलता मला त्यावेळी भावली. मी त्यांचे आभार मानले तरी ते आभार स्वीकारायला तयार नव्हते. असे हे विनायकराव. 

          माणसाने असे असावे , जसे विनायकभाई आहेत. त्यांना कोणताही गर्व नाही. ते रागावले तरी लगेच शांत होतात. ते ज्यांच्यावर रागावतील त्यांना पुन्हा जाऊन वैयक्तिक भेटतील. त्यांच्या मनात नेहमीच सर्वांबद्दल आपुलकी असते. वरवर आपुलकी दाखवून खोटा अभिनय करणे त्यांना कधी जमेल असे मला वाटत नाही. हे विनायकभाई माझ्या जीवनात आले आणि माझ्या जीवनाला एक नवीन नायक जोडला गेला. त्यांचा हा सहवास मला अखंड लाभत राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत राहणार. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 धोंडास

🛑 धोंडास 

          तसे अनेकांचे अनेक पदार्थ आवडीचे असतात. त्यात आईने केलेले पदार्थ आपल्या विशेष आवडीचे असतात. लहानपणापासून अनेकविध पदार्थ खाल्ले असतील. कधी भुकेची आग शमवण्यासाठी खाल्ले गेले असतील. भूक लागली की सगळंच गोड लागतं. आपोआप जिभेला चव येते. चवीनुसार पदार्थ खाल्ले जातात. पण आईच्या हातची चवच वेगळी असते. 

          सुरेश वाडकरांचं गाणं ऐकत होतो. शब्द मालवणी होते. ' माझ्या आईच्या जेवणाची चव फार येगळी , विसरुक नाय येवची ' माझी भाषा मालवणी , आई मालवणी आणि गाणं मालवणी त्यामुळे मालवणी मुलखात नसताना , या मालवणी गाण्यांनी माझी खूप सोबत केली आहे. 

          आईने केलेल्या माश्याच्या कडीचा वास हात धुतला तरी जाता जात नसे. तो वास परत परत घेत राहावा असाच होता. तिने केलेली उसळ , चपाती खमंग नसली तरी चवदार होती. त्यात खोबरे जास्त नसे , पण प्रेम पुरेपूर असे. तिने वाढलेल्या शिळ्या भाकरीची चव आताच्या ताज्या भाकरीलाही येण्याची शक्यता कमीच.

          त्या रात्री आईची गडबड सुरु होती. कोणता तरी विशेष पदार्थ बनवण्यासाठी तिची तयारी सुरु असावी. तिने वेलची , गुळ असे पदार्थ जवळ घेतले होते. आम्ही झोपेची तयारी करत होतो. कसल्या तरी पदार्थाचा सुगंध नाकात दरवळत आला. त्या गोड वासाने मला जाग आली. मी उठून बसलो. आई चुलीशेजारी बसली होती. चुलीवर काहीतरी शिजत होते. आई एका टोपात ' टोपातले ' बनवत होती. मला ' टोपातले ' हा पदार्थ खूप खूप आवडत असे. 

          ' टोपातले ' या पदार्थाला गावाकडे ' धोंडास ' असेही म्हणतात.  ते गरमागरम खायचे नसते. पण मला धीर नव्हता. मी ते आईकडे मागितले. आईने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला , पण माझी स्वारी ते खाण्याचा जास्त आग्रह धरुन बसली होती. बाबांनी डोळे वटारून दाखवले तरी मी ऐकणारा नव्हतो. शेवटी आईने ते गरमागरम धोंडास मला दिलेच. मी त्याच्यावर लागलीच झडप घातली. ते गरमागरम असल्याने माझी जीभ चांगलीच भाजली. आता माझ्या लक्षात आले की ते थंड झाल्यावर खायचे असते ते !!!!

          सकाळ झाली. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. आईने ते ' धोंडास ' केकसारखे कापून आम्हाला दिले. आम्ही सर्वांनी ते मनसोक्त खाल्ले. किती मधुर चव होती त्या धोंडासाची !!! ते खाऊन माझी भाजलेली जीभ तृप्त झाली होती. 

          हल्लीच आमच्या गावातून माझ्या काकांनी ' धोंडास ' आणले होते. अगदी आईने बनवल्यासारखीच त्याची चव होती. ते खाता खाता माझी आई माझ्या डोळ्यासमोरुन गेल्याचा आभास प्रत्येक क्षणाला झाला होता. 

          हा पदार्थ अतिशय मऊ असतो. तो धोंड्यासारखा नक्कीच नसतो. तरीही त्याचे नाव ' धोंडास ' का ठेवले असावे असा प्रश्न आजही मला पडतो. काही दिवसांपूर्वी काही कारणास्तव आमचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडेसाहेब यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या सूनबाईंनी ' धोंडास ' आणून दिले. तेव्हाही मला माझ्या आईची आठवण आली होती. किती गोष्टींमध्ये आपल्या अशा सुमधुर आठवणी लपलेल्या असतात नाही ? खरंच या गोड गोड धोंडासासारखी गोड गोड माणसं मला लाभली आहेत असा विचार करुन मी त्या विधात्याकडे नतमस्तक होतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  (  9881471684 )



Thursday, March 17, 2022

🛑 होळीचा सण लय भारी

🛑 होळीचा सण लय भारी

          "  होळी रे होळी , पुरणाची पोळी " असे म्हणत सर्वजण होलिकोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करताना दिसतात. होळी हा रंगांचा सण आहे. दुसऱ्याला मस्त रंगवण्याचा दिवस. होलिकेचे दहन करण्याचा दिवस. 

          लहानपणी कणकवली गांगोवाडीत राहायला असल्यापासून आम्हाला होळी कळू लागली होती. त्यावेळी तरुणांबरोबर आम्ही लहान मुले मुली होळीची मजा लुटत असू. आमच्या खोलीच्या जवळच होळदेव उभा केला जात असे. त्याला आंब्याच्या पानांनी लपेटून सजवले गेले की होळीचा ढंगच न्यारा दिसायचा. परंपरेने चालत आलेल्या रुढींचे पालन करत होळी मनोभावे साजरी व्हायची. होळीचा स्तंभ श्रीफळांनी नटत असे. मग गाऱ्हाणी होत. नवसाचे नारळ होळी स्तंभासमोर ठेवले जात. 

          आदल्या दिवसापासून आमची तयारी सुरु होई. लाकडे , शेणी गोळा करणे हे आमचे काम असे. वाडीतील प्रत्येक घरोघरी जाऊन एखादे दुसरे लाकूड , एक दोन शेणी मागून घेण्यात आनंदच वाटे. आता गॅस आले , लाकडे- शेणी मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे आजकाल सरसकट वर्गण्या मागितल्या जातात व सण साजरा केला जातो. 

          कवळं तोडण्याची सुरुवात याच काळात होत असल्याने आम्हाला तीसुद्धा मिळत. त्यांनी होळीची आग लागलीच भडके. लाकडे , शेणी आणि कवळे यांचा आगडोंब होई. मग त्या होलिकोत्सवात गाणी म्हटली जात. कोणीतरी लाऊडस्पीकरची सोय केलेली असे. उत्स्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होई. रात्रीचा जागर सुरु झालेला असे. बारा वाजेपर्यंत आम्ही कसेतरी थांबू. ' बाराच्या आत घरात '  अशी बाबांची ऑर्डर असे. त्या ऑर्डरचे पालन न करणाऱ्याच्या आनंदाची होळीच होत असे. त्यामुळे आम्ही वेळेचे काटेकोरपणे पालन करीत असू.

          बाबांच्या भीतीने घरात येऊन झोपलो तरी स्पीकरचा आवाज कानात धडकत राही. परुळेकरांचा आवाज सुरेल होता. त्यांच्या गाण्यांचे सूर होळीची रंगत आणखीच वाढवताना दिसत. आपल्यालाही त्यांच्यासारखे स्पीकरवर गाणे कधी म्हणता येईल का ? असा प्रश्न पडे. असा विचार करता करता कधी झोप येई समजतही नसे. 

          सकाळी होळीच्या राखेचा गंध मस्तकावर लावून आम्ही धन्य होत असू. त्यानंतर अनेक खोल्या बदलल्या असतील पण त्यानंतरची होळी काही आठवत नाही. गावच्या घरी होळीला गेलो असेन , पण वडे सागोती , शिरवाळ्या पुरती मर्यादित होळी पाहिली. बोंबा लांबूनच ऐकल्या , ऐकू नये अशा शिव्यांच्या लाखोल्या ऐकल्या. त्यांचा अर्थ समजणे आमच्या बालवयाला अवघड असे. त्यांचा अर्थ समजून घेण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही. 

          काल परवापासून माझ्या घरात होळीची तयारी सुरु आहे. सहावीतल्या तनिष्काने आमच्या इमारतीमध्ये छोट्यांचा ग्रुपमध्ये गुप्तपणे वर्गणी गोळा करायला सुरुवात केल्याचे सांगितले. रंग , पिचकाऱ्या आणि रंगांचे फुगे यासाठी त्यांचा मौजेचा दिवस जवळ येत होता. मोठ्यांनीही त्यांना वर्गण्या देऊन प्रोत्साहनच दिले होते. आज त्यांचे धुलिवंदन , रंगांची उधळण मजेशीर होणार यात शंकाच नाही. 

          आज धुलिवंदनाची सुट्टी आहे. काल शाळेत मुलांसोबत होतो. सातवीच्या मुलांकडून ' कचरा ' एकत्र करुन घेतला. त्याच्याभोवती गोल साखळी करुन कचऱ्याची होळी केली. सभोवती फिरता फिरता अनेक अभ्यासविषयक खेळ घेतले. मुले खेळता खेळता शिकत होती. होळीचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, March 16, 2022

🛑 सारखं टोचतंय !!!

🛑 सारखं टोचतंय !!!

          आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी टोचणाऱ्या येत असतात. त्या टोचतात आणि टोचतच राहतात. कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं टोचणं काही कमी होताना दिसत नाही. 

          दोन दिवसांपूर्वी ' फारच  टोचलंय ' हे एकल नाट्य पाहिलं आणि ही गोष्ट अधिक प्रकर्षाने लक्षात आली. खरंच अशा कितीतरी टोचणाऱ्या गोष्टींना घेऊनच आपण आपलं जीवन रडतकडत जगत असतो. 

          आपलं जीवन हे आपलं स्वतःचं असतं. त्यावर जास्तीचा अधिकार आपलाच असतो नाही का ? पण आपलं जीवन अनेकदा दुसऱ्यांकडून नियंत्रित होत राहतं. आपण आपल्या मनासारखं जगू शकत नाही. दुसरे सांगणार तसं जगायचं म्हणजे त्रास होतो ना ? हे जगणं मग जगणं राहतच नाही मुळी. तो एक केविलवाणा प्रवास घडू लागतो. नको असतं, पण करावं लागतं. या नको असण्याची बेरीज वाढली की त्याचं रूपांतर नैराश्याच्या खाईने घेतल्यास ते रुद्ररुप ठरु शकतं. 

          मी एक शिक्षक आहे. मलाही काही गोष्टी टोचत राहतात. एखादी टाचणी टोचावी तशा या गोष्टी आपली पाठ सोडत नाहीत. मी शिक्षक झालो , पण इंजिनिअर झालो नाही ही गोष्ट मला सतत टोचत असे.  पण आता मी खूप सुखी आणि समाधानी आहे. कारण भावी पिढी घडविण्याचे अनमोल कार्य करत आहे हा सुखद विचार मी करत राहतो. मी जगातील सर्वात सुखी माणूस असेन अशीही माझी भावना असते. या भावनेला मी बिलगून राहतो. तसं माझ्या आयुष्यात अनेक टोचणाऱ्या गोष्टींचा शिरकाव होत राहिला आहे. पुढेही तो होत राहील , थांबणार तर नाहीच नाही. पण त्यांचं सततचं टोचणं मला नवीन काहीतरी शिकवणारं असतं. मी ते संयम ठेवून शिकतो आणि पुढे जात राहतो. 

          नोकरीच्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत राहतात. त्या प्रश्नांची उकल मीच शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. कधी प्रश्न पूर्णपणे सुटतात , कधी अर्धे सुटतात. हे अर्धे सुटलेले प्रश्न टोचत राहतात. तेही पुढे पूर्ण सुटतात. अर्थात समस्या या येतच राहणार आहेत , त्याच आपल्यासाठी टोचणाऱ्या टाचण्या आहेत जणू !!! शेवटी टाचणीचं टोकही कधीतरी बोथट होतच ना ?

          नोकरीत असताना नोकरी टोचत राहते. मग नोकरीला कंटाळून व्हीआरएस घेतली तर नंतरचं घराकडचं एकल जीवन टोचत राहील. एखादी गोष्ट केली म्हणूनही टोचणी , ती गोष्ट केली नसेल तरीही टोचणी. मला एक कळत नाही की हे ' सारखं टोचतंय ' हे आपण खूप गंभीरपणे का घेतोय ? ते सहजपणे घेतलं की डॉक्टरांकडे इंजेक्शन घेताना जसं वाटेल तसंच वाटणार. अर्थात इंजेक्शन टोचल्याशिवाय बरंच वाटणार नसेल , तर ते टोचून घेणंही आवश्यकच आहे. ते टोचल्यामुळे माझे बरे होईल ही सकारात्मक मानसिकता महत्त्वाची आहे. काहीतरी चांगले होण्यासाठी ' सारखं टोचतंय ' या गोष्टीचीही गरज आहे असं मला प्रामाणिक वाटतं. 

          काहींना दगडावर झोप लागते , काहींना गादीवरही झोप लागत नाही. म्हणजे दगडावर झोपणाऱ्याला तो खडबडीत दगड टोचत नाही , पण गादी मऊ , लुसलुशीत असूनही ती कशी काय टोचते ? कमाल आहे. म्हणजेच सुखं जास्त मिळू लागली तरीही ती टोचतात. हे म्हणजे असं झालं , फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन चुलीवरची भाकरी मागण्यासारखं. ती भाकरी खरपूस असली तरी गावाकडे जाऊन शेणामातीच्या घरात बसून खाण्यात जे सुख आहे , ते त्या आरसेमहालात कसे असेल ? 

          शिक्षण , घर , नोकरी , धंदा, लग्न , नातीगोती या प्रत्येकात वेगवेगळ्या पद्धतीने टोचणं अनुभवत असताना त्यांचा सामना करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. यात सर्वच यशस्वी होत असतात. लोकमान्य टिळकांनी एकदा म्हटलं होतं , " कितीही संकटे आली , आभाळ जरी फाटलं , तरी त्यावर मी पाय ठेवून उभा राहीन. " त्यांनी असं म्हटलं नसतं तर आज आपण स्वराज्यातील हे सुखमय दिवस कदाचित पाहू शकलो नसतो. सारख्या टोचणाऱ्या या टाचणीच्या टोकाला बोथट करण्याचं सामर्थ्य प्रत्येकात आहे , ते त्या त्या वेळी आपल्यातून बाहेर काढणं ही आजची आत्यंतिक गरज आहे. मग ' सारखं टोचतंय ' असं रडगाणं आपण कधीच रडत बसणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, March 14, 2022

जिल्हा सचिव सुधीरसाहेब

🛑 जिल्हा सचिव सुधीरसाहेब

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना गेली कित्येक वर्षे जोमाने कार्य करत आहे. त्यासाठी जी जिल्हा कार्यकारिणी आहे , त्यांची जाणीव जागृती आणि ज्ञाती बांधवांबद्दल असलेली आपुलकी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर साहेब यांचे कार्य अद्वितीय असेच आहे. त्यांना साथ देणारी त्यांची कार्यरत कार्यकारिणी त्यांच्या कायमच सोबत राहिलेली आहे. 

          कुडाळ पिंगुळीचे मूळ वालावलचे आमचे सचिव सुधीर चव्हाण यांचे कार्य त्यात लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या ज्या वेळी  जिल्ह्याचे उपक्रम असतात , त्या त्या वेळी त्यात हिरीरीने सहभाग घेणारे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारे सुधीर चव्हाण कायमच अग्रस्थानी असलेले दिसून येतात.

          हल्लीच त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. ते पुरते कोलमडून गेलेले दिसले. त्यांना उठताही येत नव्हते. त्यांना पाहून आम्हाला आमच्या आईची आठवण आली. खरंच आई गेल्यानंतर काय अवस्था होते , याची आम्हालाही कल्पना होती. पण सुधीरजी खूपच हळवे आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यासुद्धा खूप हुशार आहेत. 

          वधु वर मेळाव्याच्या आयोजनात सुधीर साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसली. कोणी कोणाचे स्वागत करायचे हे त्यांनी सर्व नियोजनबद्ध करून माझ्याकडे दिले होते. सचिव कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीरजी आहेत. सूत्रसंचालन करतानाही मला त्यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. सर्वसामान्यांसारखे सलून दुकानात काम करता करता असे काम करणे कठीण असते. पण त्यांना त्याचे काही वाटत नाही. त्यांची सेवाभावी वृत्ती असल्याने ते संघटनेचे कार्य आनंदाने न थकता करताना दिसतात. 

          जिल्ह्याचे सर्व कागद काळजीपूर्वक जपून ठेवणे , हिशोब ठेवणे ही सर्व कामे ते करताना बघून आम्हाला त्यांच्याकडूनही काही शिकायला मिळते. त्यांचा आर्थिक कारभार अगदी पारदर्शक असतो. 

          नुकताच त्यांना पडवे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ते दवाखान्यात असताना त्यांना मी सपत्नीक भेटायला गेलो होतो. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. त्यांचा बोलताना धाप लागत होती. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यावर शस्त्रक्रिया करुन आता त्यांची तब्येत साधारण बरी आहे. तरीही त्यांना आता भविष्यात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना डॉक्टरांनी काळजी घ्यायला सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे ते काटेकोर पालन करतीलच. आता ते काही काळ दुकानात जाऊन काम करु लागले आहेत. 

          सुधीर साहेबांचा हा त्रास लवकरच पूर्णपणे बरा होवो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना त्यांच्या प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आमचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...