🔴 ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये
उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याने आंघोळ करावीशी वाटते. थंडीच्या दिवसांत मात्र थंड पाण्याची आंघोळ करणे जीवावर येते. आपलं शरीर गरम झालं कि ते थंड करण्यासाठी शरीराने नैसर्गिकपणे ' घाम ' आणण्याची केलेली प्रक्रिया अत्यावश्यकच आहे. हा घाम आला की फॅनच्या खाली बसलात की कोण आनंद होतो ? पण हा उकाडा कोणालाही सहन होत नाही. ती थंडी परवडली , पण उन्हाळ्याच्या झळा सोसत नाहीत.
पूर्वीचं सगळ्यांचं आवडतं हिंदी गाणं आंघोळ करताना अजूनही सर्वजण म्हणत असतील. ' ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' . हे गाणे नुसते म्हणून उपयोगाचे नाही. सोबत थंड पाण्याच्या धारा डोक्यावर पडत असतील तर तो अनुभव काय वर्णावा !! हल्ली शॉवरखाली आंघोळ केली जाते. बंद खोलीत शॉवरखाली आंघोळ , आणि ओठावर ते हिंदी गाणं , थोडावेळ डोळे बंद करून पावसात भिजण्याचा मस्त फील घ्यायचा. लहानपणी पावसात भिजताना घेतलेला आनंद , शेतात गुट्यावर बसून चिखलात बैलांच्या मागे पळण्याचा आनंद , टू व्हीलर गाडीवरून जात असताना अचानक पडलेल्या पावसाने भिजण्याचा आनंद , छत्री डोक्यावर धरलेली असताना वादळाने छत्री उडून गेल्यानंतर भिजायला झाल्याचा आनंद , रेनकोट घातल्यानंतरही त्यात पाणी येऊन अर्धे निम्मे भिजताना होणारा आनंद , बाहेर तुफान पाऊस पडत आहे आणि गारा पडू लागल्या आहेत , त्या गारा वेचत असताना भिजायला होत असल्याचा आनंद हे सगळे आनंद थंड पाण्यामुळे मिळणारे आहेत.
ज्यांना सतत गरम पाण्याची आंघोळ करण्याची सवय असेल , त्यांनीसुद्धा कधीकाळी हा सर्व प्रकारचा आनंद घेतलाच असेल. पण आता तो घेता येत नसला तरी आपण हा आनंद पूर्वी घेतलेला आहे , हा सुद्धा आनंदच नाही का ? मी कधी गावी गेलो की नदीत डुंबण्यात मिळणारा आनंद , प्लास्टिकच्या भरलेल्या बादलीत येत नाही. शेतात काम करताना इरले , प्लास्टिक पिशवीची खोळ , कांबळे ( आडनाव असणाऱ्यांनी राग मानू नये ) घालून पावसात भिजताना होणारा आनंद कुडकुडतानाही जाणवतो. विहिरीतील पाणी स्वतः ओढून काढून कळशी कळशीने आंघोळ करताना ती आंघोळ संपूच नये असे वाटत राहते. एक कळशी डोक्यावर रिकामी केली की दुसरी , तिसरी करत दहा पंधरा कळश्या डोक्यावर पालथ्या केल्या तरी समाधान होत नाही. खरंच अशा आंघोळीसारखा आनंद नाही.
आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. त्यांचे घर रस्त्याच्या पलीकडे होते. आमच्या मालकांच्या विहिरीचे पाणी संपले की आम्हाला त्यांच्या विहिरीचे पाणी आणावे लागे. त्यांच्या कुटुंबात सगळी तरुण पुरुष मंडळी होती. या सर्व मुलांना विहिरीवर आंघोळ करण्याची रोजची सवय. आम्ही आमच्या खोलीबाहेर आलो , तरी सकाळ , दुपार , संध्याकाळ त्यांच्यापैकी कुणीतरी आंघोळ करताना नजरेस पडे. कळशी भरून पाणी काढायचे आणि धबाधब डोक्यावर ओतायचे. ते बघूनच माझ्या अंगावर शहारे यायचे. थंडीच्या दिवसातही ते थंड पाण्याची आंघोळ करत याची कमाल वाटे. मग गरगरीत साबण लावून तो जाईपर्यंत सात ते आठ कळश्यांचा त्यांच्या अंगावर महाअभिषेक होई. मी त्यानंतर थंड पाण्याची आंघोळ करण्याचा संकल्प करी , पण सकाळी गरम पाण्याची आंघोळ केल्यानंतर पुन्हा तोच संकल्प करत असे.
आता आंघोळीसाठी टब बाथ वगैरे पद्धती अस्तित्वात आल्या आहेत. माझी पाच वर्षांची लहान मुलगी मोठ्या प्लास्टिकच्या टबात आंघोळ करत असताना मला या ' ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' च्या आंघोळीविषयी सुचले. कारण तीसुद्धा आंघोळ करताना हेच गाणे मोठ्याने म्हणत या आंघोळीचा मनमुराद आनंद घेत होती.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर ( 9405218189 )

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete