Thursday, May 27, 2021

सामंतांचे वडे

 🔵 सामंतांचे वडे


          वडे कोणाला नको होतील का ? अर्थात मी बटाटेवडयांबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजले असेलच. त्याबरोबर पावाची आठवण येऊ शकते. सोबत खोबऱ्याची हिरवी चटणी किंवा लाल मसाला चटणी असेल तर काय ? जिभेला पाणीच सुटेल. नुसत्या वासानेसुद्धा आपण वडापाव , भजी खाण्यासाठी थांबत असणार . पार्सल आणून घरी एकत्र बसून मस्त गरमागरम वड्यांवर ताव मारत असणार , नाही का ? एक वडापाव खाल्ल्यानंतर अजून एक खावासा वाटणे , आणखी एक करत चार ते पाच वडापाव खाणारेही महाभाग मी बघितले आहेत. आता लॉकडाऊन काळातही बाजार घ्यायला बाहेर पडलो तर , वडापावची टपरी उघडी असली तर एखादा तरी वडापाव खाण्याचा मोह कोणालाही आवरत नसेल ना ? खरं आहे ते. 

          एखादी गृहिणी यु ट्युब वर बघून चवदार बटाटेवडे बनवतही असेल , पण पार्सल आणून तो वडापाव खाण्यात जी मजा आहे ती येत नाही. मग दर संध्याकाळी वडापाव खाण्याची सवय होऊन जाते. घरी बाजार आणल्यानंतर त्यात ' वडापाव ' चे पार्सल शोधले जाते. वडे बनवणारी गृहिणीसुध्दा यातून सुटत नाही. तीसुद्धा बाजारात जाताना आपल्या धन्याला हळूच सांगते , " अहो , येताना गरमागरम वडापाव घेऊन या ना !! " हे हळूचचं सांगणं ऐकणार नाही तो धनी कसला ?

          आमच्या दुकानापासून जवळ एक वडेवाले राहत असत. कणकवली बाजारपेठेत त्यांचे वडे प्रसिद्ध होते. आम्हाला त्यांच्या वड्याची चव लागली होती. ' वडे , वडे ' असे त्यांचे शब्द कानावर पडले की आमच्या जिभेला पाणी सुटे. मग बाबांना सांगून एखादा तरी वडा खायला मिळतच असे. त्या वडेवाल्यांचे पूर्ण नाव मला माहित नाही , त्यांचे आडनाव ' सामंत ' होते. त्यामुळे ते वडे ' सामंतांचे वडे ' या नावानेच अजूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वड्यांची चव विशिष्ट अशी होती. कित्येक ठिकाणचे वडे खाल्ले तरी ' सामंतांच्या वड्यांची तुलना होऊ शकत नाही. हल्ली आम्ही दरवेळी वडेवाले बदलत राहतो. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वड्यांची चव बदलत असल्याचे लक्षात येते. पण सामंतांच्या वड्यांची चव कधीही बदलली नाही. ते आमच्या दुकानापासून लांब गेले की ते पुन्हा येईपर्यंत आम्हाला थारा नसे. कधी एकदा ' सामंतांचा वडा ' खातो असे होऊन जाई. ते पाच दहा मिनिटांनी येत आणि म्हणत , " काय ओ कुबलांनु , मघाशी एवढो मोठ्यान ओरडत गेलय ,तेवा लक्ष खय होतो तुमचो " त्यावर बाबा म्हणत , " अहो सामंत , मी माझ्या कामात होतय , ह्या पोरांनी सांगल्यानी म्हणून तुमका हाक मारुची लागली . तेंका तुमच्या वड्याशिवाय चैनच पडत नाय ". असे म्हणत असतानाच सामंत रद्दी पेपरात दोन तीन वडे बांधून देत. बाबा मग त्यांचे प्रत्येकी दोन ते तीन भाग करत. त्यातला छोटा भाग आम्हाला खायला मिळे. पण तेवढा छोटा वडासुद्धा अमृतासमान लागत असे. तशी अमृताची चव आम्ही कधीच चाखलेली नाही. पण तसे म्हणण्याची एक पद्धत आहे. आम्ही अमृत प्यायलो नाही , म्हणून त्या वड्याला ' अमृताची चव ' देऊन टाकली इतका तो सामंतांचा वडा चविष्ट होता. 

          एकदा हे सामंत दुकानाकडून वडे घेऊन चालले होते. त्यांचे वड्यांचे दुकान कधीच नव्हते. ते फिरून फिरून तासाभरात शंभर इतके वडे विकून येत असत. सगळे कणकवलीकर ' सामंतांच्या वड्यांचे ' शौकीन होते. मी सामंतांना हाक मारली , " ओ सामंतकाका , कसे आहात ? " ते फक्त हसले आणि पुढे निघून गेले. दररोज आम्ही वडे मागू शकत नव्हतो. बाबांनी बरेचदा आम्ही न सांगताही आम्हाला वडे घेऊन दिले होते. पण दुकानात काम नसताना उगीच खाऊसाठी खर्च करणे आम्हालाही पटत नव्हते. एखादी गोष्ट हवी वाटली तर ती लगेचच मिळायला हवी असे नाही. ती मिळण्यासाठी थोडा अवकाश जायला हवा. आम्हाला तो अवकाश मिळत असे. आज वडा मिळाला तर तीन चार दिवसांनी वडा खायला मिळणार हे नक्की. पण तसा संयम ठेवायला हवा. आम्ही तसा संयम ठेवत असू. बाबांना आमची आवड माहिती असली तरी त्यांनीही आम्हाला वाईट सवय लावली नाही. तसंही , वाट पाहण्यात किंवा एखादी गोष्ट मिळणार आहे याची प्रतिक्षा करण्यातही वेगळीच मौज असते. ती मौज आम्ही पाचही भावंडांनी अनुभवलेली आहे. आज वडा मिळणार नाही हे आम्हाला ठाऊक होते. त्यामुळे मी आपला माझ्या अभ्यासाचे पुस्तक वाचण्यात मग्न होतो. 

          तेवढ्यात माझ्या डोक्यावर कोणीतरी टपली मारली. मी पुस्तकातून डोके वर काढले. समोर वडेवाले सामंत उभे होते. त्यांनी माझी हाक ऐकली होती. तरीही ते पुढे गेले होते. एक वडा माझ्यासाठी शिल्लक ठेऊन त्यांनी बाकी सर्व वडे विकले होते. तो माझ्यासाठी शिल्लक ठेवलेला वडा त्यांनी माझ्या चिमुकल्या हातात दिला. बाबांनी माझ्याकडे बघितले. मला बाबांची भीती वाटली. पण बाबांनी माझ्याकडे रागाने बघितले नव्हते. त्यांनी पैशाच्या ड्रॉव्हरला हात घातला. बाबा त्यांना वड्याचे पैसे देऊ लागले. पण सामंतांनी ते पैसे घेतले नाहीत. ते म्हणाले , " कुबल , मी वड्यांचा धंदा करतो , पण मला या वड्याचे पैसे नकोत , जाताना तुमच्या मुलाने मला जी प्रेमाने हाक मारली , त्यामुळे मी मुद्दामच आज त्याला हा वडा मोफत देत आहे. " दुकानातली इतर गिऱ्हाईके त्यांच्यातल्या या वेगळ्या माणसाकडे पाहून गप्पच झाली. नेहमीप्रमाणे सामंतांचा तो ' प्रेमळ वडा ' आम्ही सगळ्यांनी वाटून खाल्ला हे वेगळे सांगायलाच नको. 

          आम्ही त्यानंतर अनेक दुकाने बदलली तरी खायचा वडा कधीही बदलला नाही. सामंतांनी अनेकदा आम्हा भावंडांना असे फुकट वडे दिले आहेत. त्यांचा एखादा वडा खाल्ल्यानंतर पोट भरून जात असे. माझी सर्व भावंडे अगदी माझ्यासह लहानपणी असं म्हणत असत , " मी सामंतांकडचे खोलीभर वडे खाईन ". या वड्याबरोबर पाव नसे , चटणी नसे , कांदा नसे , ओली चटणी नसे , पण त्या वड्यात त्यांचे प्रेम मात्र ओतप्रोत भरून राहिलेले असे . 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...