🪒 वस्तऱ्याने मोठे केले
गाव गाता गजाली ही मराठी मालिका प्रसिद्ध झाली होती. त्यात एक नाभिक व्यावसायिकाचे पात्र रंगविण्यात आले होते. त्यात असणारा नाभिक नेहमी एक वाक्य म्हणत असतो. ते वाक्य " वस्तरो मारीन " असे होते. त्या बिचाऱ्याने ते वाक्य फक्त म्हणण्याचे काम केले. कधी वस्तरा मारला मात्र नाही. त्या नाभिकाचा हुबेहूब अभिनय करणारा कलाकार म्हणजे आमचे ग्राहकमित्र अभय नेवगीसर. आमच्या केशकर्तनालयात येऊन बऱ्याचदा दाढी आणि केस कापून गेले आहेत. आम्हाला या गोष्टीचा अभिमानही आहे की " त्या " सिरियलमध्ये काम करणारा कलाकार आमच्या दुकानात येऊन आमची सेवा घेत आहे.
एकदा तर मला त्यांना फोन करण्याचा मोह झाला. मी फोन केला तर माझ्या मुलींनाही त्यांच्यासोबत बोलायचे होते. त्यांच्या प्रत्यक्ष संवादाने माझ्या मुली आनंदल्या. छोटी उर्मी तर अजूनही त्यांच्याशी बोलायला आतुर आहे. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना सहजच विचारले , " नेवगीसाहेब , तुम्ही उत्तम प्रकारे नाभिक दुकानदाराची भूमिका वटवली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. पण तुम्ही ते ' वस्तरो मारीन ' हे वाक्य का म्हणता ? " त्यावर त्यांनी छान उत्तर दिले , " अहो , ते माझं सहजवाक्य आहे. ते माझ्या तोंडात पटकथाकाराने दिलं आहे. ह्या वाक्याने मी तुमचा ' वस्तरा ' साता समुद्रापार नेला आहे. मला तुमच्या या वस्तऱ्यामुळे अमाप प्रसिद्धी मिळते आहे. मी वस्तऱ्याला मोठे केले तर वस्तऱ्याने मला मोठे केले. " फोन ठेवल्यानंतर मी विचार करत बसलो. तर माझ्या लक्षात आले की या ' वस्तऱ्याने ' आमच्या सर्व नाभिक व्यावसायिकांना मोठे केले आहे.
आठवीत गेल्यापासून हा वस्तरा माझ्यासोबत आहे. त्यापूर्वीही होताच पण लक्षात येत नव्हता. कोणीही ' वस्तरा पाजळण्याचा ' अभिनय करून चिडवले तर वैतागथोर राग येई. त्यावेळी मनात येई , " वस्तरो मारीन " . पण मनात आलेले कधी बोललोही नाही. केलेही नाही. राग गिळून टाकीत सहन करीत राहिलो. आज काहीजण सहजच म्हणतात , " काय हजामती करायच्या आहेत काय ? " जे असे म्हणत असतील त्यांना हजामतीच्या कामाची माहिती नसावी . कारण त्यांनी ते काम करून बघितले असते तर तसे म्हटलेच नसते. कारण ' हजामती ' करणे तेवढी सोपी गोष्ट नाही. असे म्हणणाऱ्यांनी तसे करूनच पाहावे. त्यांनी आमच्यासारखी गुळगुळीत हजामत करून दाखवावी. आता कितीही सांगून जर म्हणणारे म्हणतच असतील तर आम्ही काय त्यांच्या तोंडाला धरू शकत नाही. पण दाढी आणि केस कापताना सर्व ग्राहक आपले पूर्ण डोके आमच्याच हातात देतात ना ? त्यावेळी तरी आम्हाला त्यांच्या तोंडाला धरावेच लागणार.
आमच्या दुकानाची जागा गेली होती. आम्ही नवीन जागेत एका घराच्या पडवीत तेली आळीत दुकान थाटले. सर्व ग्राहकांना समजेपर्यंत थोडे दिवस ग्राहकांची वाट पाहत बसावे लागले. मी , माझा भाऊ त्यावेळी मराठी शाळेत जात होतो. शाळेतून आलो की दुकानात यायचे आणि घरी जाताना बाबा देतील तो बाजार घेऊन जायचा असे आमचे नेहमी चाले. दुकानाची जागा बदलल्यामुळे गेले दोन तीन दिवस दुकानाकडे कधीतरी एखादा ग्राहक फिरकत असे. आम्ही वाट पाहून दमत असू. बाबांना तर आमची काळजी लागून राहिली होती. तेवढ्यात एक ग्राहक दुकानात शिरले. त्यांची दाढी आणि केस दोन्ही करायचे होते. बाबांनी लगेच उठून खुर्चीवर टॉवेल झटकून कामाला सुरुवात केली. माझा छोटा भाऊ दरपत्रक वाचत बसला होता. तो मला म्हणाला , " अरे , आता आम्हाला 5 रुपये मिळणार " खरंच केस आणि दाढी केल्यानंतर त्यावेळी पाच रुपयेच मिळणार होते. ते पाच रुपये मिळाल्यानंतर बाबा आम्हाला घरातील बाजार आणून देणार होते आणि आम्ही तो घरी नेऊन दिल्यानंतर आई जेवण बनवणार होती.
ते काही दिवस खूपच हलाखीचे गेले. पण या वस्तऱ्याने आम्हाला जगवले. 14 व्या वर्षी मी दुकानात कामाला सुरुवात केली. वस्तरा हातात घेऊन पैसे मिळवू लागलो. हा वस्तरा आम्हाला पैसे मिळवून देत होता. अजूनही आम्ही या वस्तऱ्याला मनोमन पूजतो आहोत आणि पूजत राहणार. कारण या वस्तऱ्यानेच आम्हाला मोठे केले.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
No comments:
Post a Comment