Tuesday, May 11, 2021

एका टकलाची गोष्ट

 🔴 एका टकलाची गोष्ट

          डोक्यावर केस नसले की त्या व्यक्तीला ' टक्कल आहे ' असे म्हटले जाते. थोडे केस असले तरी टक्कल आणि अजिबात केस नसले तरी टक्कलच. त्या माणसाची मग ' टकलू ' या नावाने वेगळी ओळख होऊ लागते. हे टक्कल कधी आनुवंशिक असते , तर कधी ' केस सांभाळता आले नाही म्हणून असते. केस सांभाळता आले नाहीत म्हणजे ते गळताना थांबवता आले असते पण योग्य उपचार घेऊन थांबवले नाहीत. त्यामुळे ते केस काही गळायचे थांबले नाहीत. अर्थात थोड्याच दिवसात मस्त टक्कल दिसू लागले. चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो , तसे टक्कलही वाढत जाते. पौर्णिमेनंतर ते कलेकलेने कमी होत जात नाही हे विशेष. 

          व. पु. काळे म्हणतात , " टकलातही सौदर्य असते. टकलाला अजिबात मेंटेनन्स नाही. " त्यांनाही टक्कल होते म्हणून ते म्हणाले असतील का ? पु. ल. देशपांडेंनी त्यावर छान विनोद केला आहे. ते म्हणतात , " टक्कल असल्यामुळे चेहरा कुठपर्यंत धुवावा हे समजत नाही. " खरं आहे ते , मलाही तो अनुभव येतोय. 

          आमच्या घरात आजोबांना टक्कल होते, त्यानंतर बाबा , काका आणि आता मला. केस पुसण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हाही एक फायदाच आहे. पूर्वी मी खिश्यात फणी बाळगत असे. आता फणीची गरज नाही. कारण फणीचे दात इतके टोचतात की नको वाटते. माझं टक्कल बघून कदाचित ते दात ओठ खात असावेत असा आपला माझा गोड गैरसमज. 

          टक्कल विविध प्रकारची पहावयास मिळतात. विमानतळ टक्कल , सागर किनारा टक्कल , मैदान टक्कल , खापा खापांचे टक्कल, बेटासारखे टक्कल , हिरवळीचे टक्कल , लॉन टक्कल , स्मश्रु टक्कल , गुळगुळीत टक्कल , गरगरीत टक्कल , आकर्षक टक्कल , टक्केवारीचे टक्कल आणि विशेष टक्कल असे अनेक प्रकार बनवता येतील. आता आपण विचाराल , तुमचे टक्कल वरील  कोणत्या प्रकारात मोडते ? त्याचे उत्तर तुम्हीच सांगू शकाल. कारण माझे टक्कल मला दिसत नाही ते तुम्हाला दिसते ना ? असो. 

          एकदा एक छोटी मुलगी फोटोंचा जुना अल्बम बघत असते. त्यात तिला आपल्या मम्मीबरोबर एक केस असलेला माणूस दिसतो. ती मम्मीला विचारते , " हे तुझ्यासोबत कोण आहेत ? " मम्मी सांगते , " अग वेडे , हे तुझे पप्पा आहेत . " त्यावर ती मुलगी आईला विचारते , " मग मम्मा , हल्ली आमच्याकडे एक टकल्या राहतो तो कोण गं ? "

          वरचा विनोद आहे , तो वाचताना हसायला येते. डोक्याला टक्कल पडले तरी आपली अक्कल कमी पडत नाही. ती आपल्याला जीवन जगताना कामी येते. म्हणून माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका , असण्यावर लक्ष केंद्रित करा. 

          टक्कल पडलेले महाशय आपले टक्कल दिसू नये म्हणून कृत्रिम केशरोपण करून घेतात. काही केसांचे टोप वापरतात. जसा जिरेटोप असतो , तसा ते घालून मिरवतात. त्यांना वाटते मला केस नाहीत हे कुणाला समजणार नाही. पण त्यांना आनंद मिळतोय ना ? मग आपण उगीच त्यांच्या टकलावर ( आनंदावर ) विरजण का घालायचं ? 

          कित्येक महापुरुष होऊन गेले ज्यांना टक्कल होतं. त्यांचे कोठेही अडलेले मला माहीत नाही. उलट ते त्यांचं सौदर्यच म्हणावं लागेल. केशकर्तनालयात टक्कल असलेल्या माणसांचे केस कापण्याचे तितकेच पैसे घेतले जातात. एकदा एका माणसाने सहज हीच शंका विचारली. केशकर्तनकाराने उत्तर दिले , " आम्ही केस कापण्याचे पैसे घेत नाही तर केस शोधून कापण्याचे पैसे घेतो. " आता बोला ? 

          मी डीएडला असेपर्यंत माझ्या डोक्यावर दाट केस होते. मी बारीकही होतो. कंठही बाहेर आलेला दिसत असे. नोकरीला लागल्यानंतर केसांची गळती सुरू झाली. कौटुंबिक अडचणींचा सामना करत असताना केसांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे राहूनच गेले. माझे मित्र माझ्या डोक्याकडे पाहून एखादी कॉमेंट देत असत. मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आलो. काहींनी माझ्या टकलावर एखादी टपली मारण्याचा आनंदही घेतला असेल. मी त्यांना कधीही काहीही बोललेलो नाही. बोललो असेन तर त्यांनी जरूर सांगावे. 

          टकलावरून अनेक विनोद प्रसिद्ध आहेत. तीन टकले होते वगैरे वगैरे ...... टकले आडनाव असलेल्या माणसांना टक्कल अजिबात नसल्याचे मी बघितले आहे. ऋषिकेश नावाच्या मुलाचे केस ऋषीसारखेही बघितले नाहीत. नावात काय आहे म्हणा. दिलेले नाव आपल्याला सार्थ करता आले पाहिजे म्हणजे झालं !!!

          माझ्या टकलाची मला कोणतीही अडचण झाली नाही. उलट ते हेल्मेटमध्ये व्यवस्थित मावते. फक्त कुठे डोके आपटलेच तर मस्त गोल गरगरीत टेंगुळ येतं. हा एकच तोटा असावा , बाकी सगळे फायदेच फायदे !!! याचा अर्थ हे फायदे तोटे माझ्यासाठी आहेत हं !!! नाहीतर फायदे आहेत म्हणून तुम्ही केसाळ असाल तर टक्कल करून घेण्याच्या अजिबात फंदात पडू नका. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...