🟣 मी वासुदेव झालो
पूर्वी सकाळी सकाळी दारोदारी एक पिंगळा येत असे. गळ्यात कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी , बाराबंदी घातलेला , कपाळी टिळा , छोटी झांज वाजवत व हरिनामाचा गजर करत येणारा वासुदेव म्हणजेच पिंगळा आम्ही अनेकदा बघितला आहे. आता हल्ली हा वासुदेव दिसेनासा झाला आहे. या वासुदेवाची कोणतीही अपेक्षा असत नसे. तुम्ही जे द्याल ते घेऊन तो पुढच्या घरी जात असे. हसतमुखाने आशीर्वाद देऊन जाणाऱ्या वासुदेवाकडे पाहिले की दिवस कसा मस्त जात असे. त्यानंतर भविष्य सांगणारे येत. तेही घरातल्या सर्वांचे भविष्य सांगत. हे भविष्यवेत्ते भरपूर तांदूळ , गहू , रोख रक्कम यांची मागणी करत. आमच्याकडे एक तुणतुणेवाला येत असे. तो तुणतुण करत एखादा सुंदर अभंग गात असे. त्याचा स्वर चांगला लागे. ते ऐकण्यासाठी मी त्याच्या जवळ जात असे. पण त्याच्याकडे एक उग्र वास येत असे. मी बाबांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि त्याने काल थोडी घेतली असणार त्याचा उग्र वास अजून त्याच्या अंगाला येतो आहे. मला त्यामुळे नंतर त्या तुणतुणेवाल्याचा राग येई. तो आला कि त्याचे गाणे न ऐकताच मी त्याला घरातून काहीतरी आणून देऊन हाकलवून लावी.
अक्षरसिंधु संस्थेत काम करत असताना मला अनेकदा ' वासुदेव ' सादर करण्याची संधी प्राप्त झाली होती. मीही त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. माझा आवाज चांगला होता , त्यामुळेही ते मला शक्य झाले असावे. लहानपणी रविंद्र महाजनीचा ' देवता ' हा चित्रपट बघितला होता. त्यात त्याने वटवलेला वासुदेव किती छान होता !! वासुदेव आला हो , वासुदेव आला ..... सकाळच्या पारी हरिनाम बोला .... असे म्हणत आपल्या मैत्रिणीला तुरुंगातून सोडवायला आलेला दरोडेखोर लाखनसिंग त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता. मी तो चित्रपट चार ते पाच वेळा तरी पाहिला असेन.
वासुदेव करायचा म्हणजे धोतर नेसावे लागे. सुधाकर प्रभूमिराशी किंवा सुप्रिया प्रभूमिराशी मला छान धोतर नेसवीत. त्यावर बाराबंदी घालावी लागे. कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी . एका हातात चिपळी, दुसऱ्या हातात खंजिरी . नाम लावून हरिनामाचा नामजप करत मी रंगमंचावर नाचत येई. माझ्या येण्यापूर्वी रंगमंचावर ओव्या सुरू होत. बायका दळण दळत असत. दळताना त्यांच्या ओठातून सुस्वर गाणे बाहेर पडे.
' कोंबडा घाली साद ,
जग समदं गं झालं जागं '
याच्या पाच सहा ओळी झाल्या की मी गाणे म्हणत व नाचत नाचत रंगमंचावर दाखल होई. काही भगिनी रांगोळी काढत , काही मुसळाच्या साहाय्याने मसाला कुटण्याचा हावभाव करत. एक घरण म्हणजे घरातली सुहासिनी महिला तुळशीला पाणी घालायला येई. सकाळचा मंगल ध्वनी सुरू असतानाच माझा प्रवेश होई आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होई.
तुळस वंदावी , तुळस वंदावी
अहो , माऊली दिनांची साऊली , तुळस वंदावी ।।
दारापुढती लावलं रोप , त्याला निर्माल्याचा खप
नित्य प्रभाती उठून , करा जलाचे सिंचन
येई आरोग्य त्यातून , जावे त्याच्यात डुंबून , तुळस वंदावी ।।
हे गाणं संपलं की ती घरंदाज संस्कारित भगिनी मला म्हणजे वासुदेवाला ' दानधर्म ' करीत असे. धर्म म्हणजे तिच्याकडे असलेले तांदूळ किंवा इतर धान्य मला मनोभावे दान देत असे. मी हे दान घेतले की पुढचे गाणे म्हणू लागे.
दान पावलं हो , धर्म पावला
गळ्यात घातल्या कवड्याच्या माळा
बाराबंदीच्या गाठी बांधल्या
नाजूक लाविले गंध कपाळा
शिरी शोभते मुकुट जैसी
मोरपंखांची मोहक टोपी
हरिनामाचा गजर ओठी , दान पावलं हो धर्म पावला .......
आकाशामध्ये सूर्यदेवाला
भूमीमधल्या नागदेवाला
पंढरीच्या पांडुरंगाला , दान पावलं हो धर्म पावला .......
असे म्हणत मी आनंदाने पुढच्या घरी जात असे. पुढच्या घरी जाताना पुढील गाणे म्हणत असे.
वासुदेव आला हो , वासुदेव आला
सकाळच्या पारी हरिनाम बोला
आज बऱ्याच वर्षांनंतर मला मी वासुदेव झालो होतो ती आठवण झाली. एकदा आपण एखाद्या भूमिकेत शिरलो की आपले राहत नाही हेच खरे. मी अगदी वासुदेवच होऊन जात असे. गोवा येथे साखळी येथे प्रयोग होता. त्यावेळी मी सुरुवातीला ' ज्ञानेश्वर ' झालो होतो. पसायदान म्हणणारे कुणी दुसरेच गायक होते. माझ्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. समईच्या अंधुक प्रकाशात मी ज्ञानेश्वर ' पसायदान ' म्हणायला लागलो. अर्थात मी फक्त ओठ हलवत होतो. पण माझे पसायदान पूर्ण पाठ असल्यामुळे ते मीच म्हणत आहे असे प्रेक्षकांना वाटून गेले होते. त्यानंतर माझे वासुदेवाचे सादरीकरण झाले. तेही इतके सुंदर झाले की कार्यक्रम झाल्यानंतर पडद्यामागे चार पाच अनोळखी लोकांनी येऊन सांगितले होते , " तुमचा ज्ञानेश्वर आणि वासुदेव दोन्ही आम्हाला खूप आवडले . " मला त्यावेळी जो आनंद झाला तो आगळा नि वेगळा असाच होता.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
©️ चित्र रेखांकन : तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर ( 9405218189 )

No comments:
Post a Comment