Sunday, May 30, 2021

🔴 काबुलीवाले गांधी

🔴 काबुलीवाले गांधी

        काबुली म्हणजे भाजलेले चणे. कागदाच्या गुंडाळीमध्ये गरमागरम काबुली खातानाचा आनंद मी बऱ्याचदा अनुभवला आहे. लहानपणी शाळेच्या जवळ एखादा काबुलीवाला हमखास येत असे. माझ्या एका मित्राचे वडीलही काबुलीवाले होते. ते वयस्कर झाल्यानंतर माझा तो मित्रही काबुलीवाला झाला. माझा हा काबुलीवाला मित्र मला भेटतो. माझ्या संपूर्ण कुटुंबाची विचारपूस करतो. हल्ली बरेच दिवस तो भेटला नाही. त्याचा भाऊ भेटतो , तोही चौकशी करतो. माझ्या या काबुलीवाल्या मित्रामुळे मला त्याच्या वडिलांचा खूप आदर वाटू लागला. स्वतःचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना हा माझा मित्र काबुली विकत असे. शिक्षण घेत असताना ' काबुलीवाला ' हा फिरून करावयाचा धंदा असला तरी हा धंदा त्याच्यासाठी कधीच व्यत्यय ठरला नाही. उलट त्या व्यवसायाने त्याचे शिक्षण पूर्ण केले. 
          त्यांची फिरती गाडी असल्यामुळे नाट्यगृह , जत्रा , शाळा इत्यादी ठिकाणी त्यांना फिरून धंदा करावा लागे. शाळा सुटली की माझा मित्र संध्याकाळी उशिरापर्यंत काबुलीच्या गाडीवर चणे , शेंगदाणे विकताना मी अनेकदा पाहिले आहे. आमच्या वर्गातील सर्व मुले , मुली मधल्या सुट्टीत आमच्या ह्या मित्राच्या गाडीवर जाऊन ' काबुली ' घेत असत. माझ्या या मित्राला आपल्या या धंद्याबद्दल कधीही कमीपणा वाटल्याचे दिसले नाही. त्यांच्याकडचे गरमागरम चणे , शेंगदाणे, पिवळे वाटाणे, रंगीबेरंगी वाटाणे, चुरमुरे, खारे शेंगदाणे, भाजकी चणा डाळ, तिखट डाळ, तिखट शेंगदाणे खाऊन झाले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटत. कागद सहज गुंडाळून त्याची शंकूच्या आकाराची काबुली पुडी बनवून त्यात मापाने काबुली ओतून त्यात आणखी थोडी काबुली घालत हसतमुखाने काबुली देणारे माझ्या मित्राचे ते बाबा माझ्या नयनचक्षूंसमोरून आता तरळून जात आहेत. 
          त्यानंतर अजून एक काबुलीवाले माझ्या आयुष्यात आले. आमचे सलून कणकवली ढालकाठी परिसरात असताना त्यांचा आमचा परिचय झाला. मी एकदा असाच दुकानात अभ्यास करत असताना बाबा किंवा काका मला म्हणाले , " तुला गांधीजी बघायचे आहेत का ? " मी गमतीनेच हो म्हटले. आम्ही शाळेत ज्यांची जयंती , पुण्यतिथी साजरी करतो , ते गांधीजी मी पुस्तकात बघितले होते. पण आता प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून माझी उत्सुकता वाढली. माझी नजर रस्त्यावर वळली. खरंच सांगतो , गांधीजी आमच्या दिशेनेच येताना मला दिसले. मला वाटले स्वप्न असेल. मी मला चिमटा काढून बघितला. मी जागेपणीच गांधीजी बघत होतो. अगदी तसेच दिसणारे कणकवलीतले गांधीजी मी साक्षात बघत होतो. ते आमच्या दुकानात आले. त्यांनी माझ्या हातावर प्रेमाने ' काबुली ' ठेवली. मी अवाक होऊन त्यांच्या कडे बघतच राहिलो होतो. गांधीजींचे हुबेहूब रूप घेऊन आलेले हे काबुलीवाले माझे मित्रच झाले. कधी कधी आम्ही त्यांच्याकडून ' काबुली ' विकत घेत असू. पण बऱ्याचदा ही काबुली त्यांनी आम्हाला आमच्या चिमुकल्या हातात भरभरून दिलेली असे. अगदी पैसे न घेताही. त्यांना सगळे ' बाबुराव ' म्हणत. पण आम्ही त्यांना ' काबुलीवाले गांधीजी ' म्हणत असू. 
          विविध सांस्कृतिक मंडळांनी त्यांच्या या गांधीजींसारखे दिसण्यामुळे ' गांधी जयंती ' , ' स्वातंत्र्य दिन ' अशा विशेष दिनांना ' काबुलीवाल्या गांधीजींना ' वेशभूषेने  गांधीजी ' बनवून उपक्रम सादर करून वाहवा मिळवली. ते गांधीजी म्हणून प्रसिद्ध झाले. ते सर्वांशी प्रेमाने बोलत असत. काबुली विकता विकता ते लोकांना प्रेमाचे शब्दही देत चालले होते. नंतर त्यांनी ' काबुली विकण्यासाठी गाडा ' घेतला. सर्व जत्रा, गर्दी होणारे कार्यक्रम ते करू लागले. ते बहुदा एकटेच असत. सहज कणकवलीत फिरता फिरता ते चणे , शेंगदाणे विकत असत. आधी हातावर फुकटचे चणे देत. सतत फुकट घेणे बरोबर नाही , म्हणून आम्ही त्यांच्याकडे दर भेटीवेळी चणे , शेंगदाणे घेत राहिलो. त्यांचा आमच्याविषयीचा आदर वाढला. आम्हाला तर त्यांच्याविषयी आदर होताच , तो त्यांच्या नियमित येण्याने वाढतच चालला होता. 
          माझी मोठी बहीण ताई त्यावेळी रेशन दुकानात सेल्समन होती. घराला तेवढाच हातभार लागावा म्हणून ती नोकरी करून आमच्या दुकानात शिवणकामही करत होती. तिथेही हे ' काबुलीवाले गांधीजी ' जात असत. माझ्या ताईचा स्वभाव त्यांना खूप आवडे. कदाचित माझ्या ताईमध्ये ते आपल्या मुलीला पाहत असावेत. काबुलीच्या पिशवीत हात घालून जितके येतील तितके चणे , शेंगदाणे ते तिच्या हातात ठेवीत. पैसे न घेताच ते निघून जात. असे त्यांनी अनेकदा केले असेल. संध्याकाळी रेशन दुकान सुटल्यानंतर ताईकडून आम्हाला ' काबुली ' मिळे. रेशन दुकानात कामाला असतानाच माझ्या ताईचे लग्न झाले. लग्नानंतर ती ' डोंबिवलीला ' गेली. पण हे काबुलीवाले गांधीजी आले की पहिल्यांदा तिची चौकशी करत. त्यामुळे ताई कधी गावाकडे आली की रेशन दुकानात भेटायला जाई , तशी या ' काबुलीवाल्या गांधीजींनाही भेटे. त्यांना सहज शंभर , पाचशेची नोट पुढे करी. ताईला वाईट वाटू नये म्हणून ते पैसे ते घेत. पण ताईच्या हातावर पुन्हा एकदा ' काबुलीची प्रेमळ भेट ' मिळे. अशी कोणतेही नाते नसणारी माणसे आयुष्यात येतात आणि जातात. रक्ताचे नाते नसले तरी अशी माणसे एवढा जीव का लावतात समजत नाही.कधीकाळी त्यांची आठवण आली की , घालमेल होते. 
          असे हे काबुलीवाले ' गांधीजी ' . त्यांच्या आयुष्यात ते किती सुखी होते हे आम्हाला माहीत नाही , आम्ही ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. पण त्यांच्या येण्याने आम्हाला प्रेमाचा सुवास मिळे. कालच त्यांच्या निधनाची वार्ता वाचली नि क्षणभर ' ते ' काबुलीवाले गांधीजी ' हातावर काबुली देत असल्याचा भास झाला. लोकांसाठी ते बाबुराव असतील , पण आमच्यासाठी ते कायमच ' काबुलीवाले गांधीजीच ' असणार आहेत. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...