🟢 सो गया है रस्ता
गेले दहा बारा दिवस कणकवली ते खारेपाटण प्रवास सुरू आहे. चेकपोस्ट ड्युटीच्या निमित्ताने खारेपाटण चेकपोस्टवर रुजू झाल्यापासून दुपारी साडे बारा वाजता निघतो. दोन वाजण्याच्या अगोदर चेकपोस्टवर पोचायचे असते ना !! जाताना रस्ते मोकळेच असतात. मोकळे म्हणजे उघडे. आता उघडे म्हणजे काय ? तर रस्त्यावर गाड्या तरी असायला पाहिजेत ना ? बिचारे ते या मे महिन्याच्या कडक उन्हात ताप ताप तापताहेत ..... मस्त काळे कुळकुळीत रस्ते. आता दोन बाजूंनी प्रवास सुरू झाला आहे. गाडी चालवायला आणि लवकर अपेक्षित ठिकाणी पोहोचणं सोपं झालंय अगदी.
गाडीचा वेग वाढवणं आपल्याच हातात असतं. तरीही वेग वाढता वाढत नाही. हेच जर शाळेत जायचं असतं तर वेग नक्कीच वाढला असता. तरीही जाताजाता शाळेकडे जाणारा रस्ता वाटेत मिळतोच. गाडी आपसूकच शाळेच्या रस्त्याला वळते. मी आपला नेहमीप्रमाणे गाडी पुढे नेत राहतो. शाळेचा आतला रस्ता सुनसान आणि चिडीचूप. फक्त मैदानातील वृक्ष रुक्षपणे उभे असलेले. खोखोचं मैदानही मुलांशिवाय खायला येत होतं. शाळेचे व्हरांडेही मुलांची वाट बघत असल्यासारखे. शाळेचे दरवाजे मला आपल्याला उघडण्यास सांगताहेत. फक्त कार्यालय उघडून मी कसातरी आत शिरतो आणि जरा वेळच बसल्यासारखे करत पुन्हा दरवाजा बंद करून टाकतो. सगळी शाळाच मला खायला येते आहे असे वाटून मी शाळेतून तसाच निघतो. गाडीचा वेग वाढलेला असतो. मी चेकपोस्ट गाठतो.
कोविड प्रादुर्भावामुळे घाबरून किंवा कंटाळून लोकं पुन्हा एकदा गावाकडे येत असलेली बघून रस्ता सुखावतो. आमचे चेकपोस्टवरचे कर्मचारी येणाऱ्यांची नीट नोंदणी करून घेतात. पोलीस बिचारे येणाऱ्या सर्व गाड्यांना थांबवत आहेत. बारा बारा तासांची ड्युटी करत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षण विभागातील शिक्षक वर्ग चेकपोस्टवर जीवावर उदार होऊन नोंदणीचे उत्तम प्रकारे काम करताहेत.
अधिकारी आणि पदाधिकारी सुद्धा काम सुरळीतपणे सुरू आहे का खात्री करत आहेत. येणारी माणसं घाबरत घाबरत प्रवास करून येत आहेत. आल्यानंतर आदरपूर्वक आपली माहिती देत आहेत. सर्व तपासणी करूनही शिक्के मारून घेऊनसुद्धा ' धन्यवाद ' असे म्हणत निघून जात आहेत. लहान मुले सुद्धा जाताना बाय बाय करत आहेत. या येणाऱ्या माणसांना बघून रस्ता खुश होत चाललाय बहुतेक.
दुपारी माणसं कमी असताना तो तापतोय, रात्री मात्र माणसांची संख्या वाढत चालली की तो थंडगार पडतोय. असे करता करता रात्रीचे दहा कधी वाजतात मला समजतसुद्धा नाही. मी आपली ड्युटी संपवून रात्री निघतो तेव्हा पुन्हा एकदा शांत संयत रस्त्याशी माझी गाठ पडते. नेहमी वर्दळीचा असणारा रस्ता गाड्यांची आपणहून वाट पाहताना दिसू लागतो. जाताना संचारबंदी कडक दिसून येते. वाऱ्याच्या झुळकीसह एक गाणं हळुवार कानात गुंजन करू लागतं. ' सो गया ये जहाँ ... सो गया आसमा..... सो गयी है सारी मंजिले .... सो गया है रस्ता ..... मी आपला त्या गाण्यांच्या ओळी गुणगुणत पुढे निघतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment