Sunday, May 2, 2021

कोंबा आरवला

 🔴 कोंबा आरवला


          मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही सर्व भावंडे आमच्या मुळघरी किर्लोस येथे जात असू. सुट्टी पडली की सगळेच जण आपल्या मूळगावी जायला उत्सुक असतात. वर्षभर शहरात राहून त्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. गावातल्या लोकांना मात्र शहराचं अप्रूप असतं. गावाकडच्यांना म्हणावा तसा शहराचा लाभ घडत नाही. शहरातले मात्र दरवर्षी गावाकडे जातातच. आले की सगळे पाहुणे , नातेवाईक यांच्याकडे फिरून येतात. इथली गावाकडची माणसं कामात मग्न , त्यांना कुठे फिरायला उसंत. याचा अर्थ असा नव्हे की शहराकडल्यांना कामच नसतं. त्यांना त्यांच्या कामाचा कंटाळा आलेला असतो, म्हणून ती विश्रांतीसाठी गावाला हवा खायला आलेली असतात. गावाकडची हवाच भारी. ती सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी. या हवेचा कधीच कंटाळा येत नाही. स्वच्छ , शुद्ध हवा आणि निसर्गसौदर्य यांनी भारलेलं जीवन अनुभवण्यासाठी सगळी शहरातील मंडळी अतिआतुर झालेली असतात. 

          सकाळीच उठताना कानावर पडणारे नैसर्गिक आवाज उत्साह वाढवतात. लहानपणी एक गाणे ऐकले होते. ते आम्ही होळीच्या सणात गोमुच्या वेळीही म्हणत असू. ' कोंबा आरवला , चाराच्या ठोक्याला , बायको उठविते आपुल्या नवऱ्याला , अहो उठा उठा ... गिरणीचा भोंगा झाला ' हे गाणे तुम्हालाही माहीत असेल कदाचित. ते शहरातील गिरणी कामगारांच्या बायकांसाठी असेलही. पण आता शंका येते , गिरणी शहरात होत्या , मग तिकडे शहरात कोंबडे होते का ? होते तर ते गावाकडे आरवतात तसे आरवत असतील का ? पूर्वीचे कोंबडे असतीलही तसे. किंवा गिरणी कामगारांकडे घड्याळे नसतील तर त्यांना समजणार कसे ? म्हणून त्यांच्या बायकांनी ( की बायकोनी ) कोंबडा आपल्या सोबत नेला असेल तर ? असो. पण त्यावेळचे कोंबडेच भारी होते , ते वेळीच ओरडत. पण आताच्या कोंबड्यांमध्ये तितकासा आरव राहिलेला नाही. 

          आमच्या घरी भरपूर कोंबडी पाळलेली होती. आमच्या आजीचा त्यांच्यावर खूप जीव. तपकिरी कोंबडे , काळे कोंबडे , खुडकाची कोंबडी, काली कोंबडी, मानकापी कोंबडी , लांब शेपटीचे तुरेवाले कोंबडे असे अनेक प्रकार खुराड्यात पाहायला मिळत. तरुण कोंबडीला तलाग असे म्हणत. तिच्या मागे कोंबडे फिरू लागले की काही दिवसातच ती अंडी देणार हे आम्हाला आमच्या आजीनेच सांगितले होते. 

     संध्याकाळ झाली की ही कोंबडेमंडळी आपल्या खुराड्यात दाखल होण्यास येत. त्यांना अलगद पकडून किंवा त्यांच्या मागे धावून त्यांना पकडण्याची मज्जा काही औरच असे. एखाद्या रविवारी त्यापैकी एकाचे प्राण पणाला लागत. गावठी कोंबडी घराभोवती फिरताना परिसर स्वच्छ करून टाकत. घरातही त्यांचा वावर स्वच्छंदी असे. जणू आपल्या घरातले सदस्यच असल्याप्रमाणे स्वयंपाक घरापासून शयनगृहापर्यंत त्यांना परवानगी दिलेली असल्याने त्यांनी आपल्या ' शिटीने ' रांगोळीच काढलेली असे. 

     एखादी कोंबडी घरातच कुठेतरी कोपऱ्यात खुडूक करून बसे. ती निघून गेली की तिथे एक पांढरट गुलाबी रंगाचे अंडे मिळे. आम्ही ते आमच्या आजीकडे नेऊन देऊ आणि छानशी शाबासकी किंवा खाऊ मिळवत असू. दुसऱ्या दिवशी त्या अंड्याची पोळी , भुर्जी किंवा अंडाकडी खायला मिळत असे. 

     आजीच्या मदतीला आमची दांडगी आत्येही असे. तिला कोंबड्यांची भारी हौस. मंगळवारच्या बाजारात ती कोंबड्या विकून मिळालेल्या पैशात बाजार घेऊन येत असे. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम असला तरीही बिचाऱ्या कोंबड्यांवर संक्रांत येई. देवाने निर्माण केलेल्या कोंबड्यांनाच देवाला देण्यात येई. घराच्या बाहेर असलेल्या उदंड देवतांना स्मरून न दिसणाऱ्या देवाला ' एखादा कोंबडा ' बळी दिला जाई. बळी देताना त्याची मान कापून त्याला तडफडताना पाहून आमचा जीव तडफडत असे. 

     आमच्या गणपतीकडे गौरी आणली जाई. त्यावेळी गौरीला ' कोंबड्याची सागोती ' लागत असे. त्यावेळीही एका कोंबड्याचा हकनाक जीव जाई. एकदा मीच माझ्या बाबांना सांगितले की यावर्षी गौरीला कोंबडीचा नैवेद्य दाखवू नका. बाबांनी नाईलाजाने ते ऐकले. त्याच दिवशी संध्याकाळी ' तो ' कोंबडा गायब झालेला होता. माझी आजी शोधून शोधून दमली. शेवटी तिनेच निष्कर्ष काढला की आज गौरीला कोंबडं दिलं नाही म्हणून तिने आपलं कोंबडं नेलं.    

     पुढील वर्षांपासून दरवर्षी पुनश्च कोंबडी वडे चा नैवेद्य देणे सुरू झाले. तो कोंबडा गणपतीच्या आईने नेला असे आम्हाला सांगण्यात आले. मी रात्रभर विचार करत राहिलो. पण आता मोठा झालो तरी मला या गोष्टीला विरोध करता येत नाही.


©️ प्रवीण कुबलसर



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...