🐟 पिठी , भात आणि बांगडो
सिंधु उत्सव 1999 मला चांगला आठवतोय. त्या वर्षी अक्षरसिंधु कणकवली यांच्या वतीने एक ध्वनिफीत तयार करण्यात येत होती. त्यात सिंधुदुर्ग विषयक अनेक गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. मी साधारण गात असे. तसा अजूनही गातो. पण त्यावेळेच्या आणि आताच्या आवाजात नक्कीच फरक पडला आहे. आता गाण्यांचा रियाज होणे थांबले आहे. माझे मित्र विजय चव्हाण म्हणजेच आताचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मला सिंधु उत्सव 99 च्या कॅसेट मध्ये एक गाणे गाण्याची संधी दिली. मी त्यावेळी गढिताम्हाणे दादरा या एकशिक्षकी शाळेत कार्यरत होतो. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रेकॉर्डिंग करायचे होते.
मला त्यातली सगळीच गाणी म्हणता येत होती. गाण्यांच्या चालीसुद्धा चांगल्या बांधल्या गेल्या होत्या. मला कोणतेही गाणे दिले तरी मी म्हणू शकणार होतो. तेवढा त्यावेळी आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास माझ्यात अक्षरसिंधु आणि कलासानिध्य या दोन्ही सांस्कृतिक संस्थांनी निर्माण केला होता. साहित्याची आवड वाढण्यासाठी मला या दोन्ही संस्थांची अधिकाधिक मदतच झाली आहे.
मला जे गाणे म्हणायचे होते , ते गाणे नक्की कोणते ते समजले. माझ्यासोबत पल्लवी पवार ही गायिका गाणार होती. तिचा आवाज अभिनयासाठी चांगला होता. पण ती माझ्यासोबत गाणार असल्याने मला आनंदच होता. यापूर्वी मी स्वाती जाधव म्हणजेच आताच्या स्वराशा कासले यांच्यासोबत काही गाणी म्हटली होती. स्वातीची बहीण भारती हिच्यासोबतही मला गाणी म्हणायला मिळाली होती. मी शास्त्रशुद्ध शिकलो नव्हतो. पण गाण्यातले मला कळत होते.
वरवडे शाळेत रेकॉर्डिंग सुरू झाले होते. आम्हाला दोन वर्ग देण्यात आले होते. एक रेकॉर्डिंगसाठी आणि एक सरावासाठी. मी आणि पल्लवी दोघांनीही भरपूर सराव केला होता. तिचा आणि माझा आवाज मॅच व्हायला वेळ लागला. फायनल रेकॉर्डिंग जवळ आले. आमच्या दोघांचे बरेच टेक रिटेक झाले. शेवटी एकदाचे गाणे अंतिम टप्प्यात आले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. एक गाणे गाण्यासाठी आम्हाला सात ते आठ तास लागले होते. रात्री खूप उशिरापर्यंत गाणे पूर्णत्वास पोचले होते. गाण्याचे बोल असे होते.
कोकणला लाभलाय सागर किनारा
चल चल पारू जाऊ दर्याला
नको नको धन्या मी जातंय देवीला
म्हावऱ्यासाठी गाऱ्हाणं घालीन देवीला
ए , पारू गो पारू , काय करतस
बांगडो मी भाजतंय झकास मिठास
अगो , पिठी , भात बांगडो वाढतस काय
खाऊन बघशाल तर हाय रे हाय
अहो , मंडळी चला कोकणाला
पिठी भात बांगडो खायाला
असे हे गाणे म्हणून झाल्यानंतर मी ज्यावेळी माझा आवाज कॅसेटवर ऐकला तेव्हा मला माझेच कौतुक वाटले होते. साऊंड सिस्टीममुळे गाणे इतके अफलातून वाटत होते की एखाद्या कसलेल्या गायकांनी ते गाणे म्हटले असावे. पल्लवीचा आवाजही छान लागला होता. गाण्याचा परफॉर्मन्स देणे आणि गाणे रेकॉर्डिंग करणे यात असलेला फरक मला समजला. त्यावेळी माझ्या एक लक्षात आले की आज आपण जी सुरेल आवाजातील गाणी ऐकतो त्यामागे त्या गीतकारांचे , संगीतकारांचे आणि गायकांचे किती श्रम असतील ? खरंच या सर्व कलाकारांना माझे विनम्र अभिवादनच असेल.
पिठी , भात आणि बांगडो आमच्या कोकणातील प्रसिद्ध मेनू आहे. आम्ही आमच्या आईकडून हा मेनू अनेकदा करून घेतला आहे. गावाकडच्या घरीही तो एक दिवसाआड असायचा. कुळथाची पिठी आणि भाजलेला बांगडा भाताबरोबर खाताना एक घास अधिकचा पोटात जाई. पिठी शिजत असताना त्याचा सुगंध जवळच्या घरापर्यंत जात असे. चुलीवरच्या निखाऱ्यांवर बांगडा भाजताना येणारा दुर्गंध सुगंधच वाटत असे. मस्त उकडा भात , त्यावर गरमागरम कुळथाची पिठी आणि नुकताच चुलीवर भाजलेला बांगडा खातानाचे दिवस आठवले की आताही जिभेला पाणी सुटते. आता बाजारातील बासमती तांदळाचा भात मिळतो. बाजारातली पिठी मिळते. गॅसवर भाजलेला बांगडा मिळतो. पण त्यावेळची ती चव येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबल , ( 9881471684 )
No comments:
Post a Comment