🟪 खळ्यातले लाडू
शाळेच्या परीक्षा संपल्या की आम्ही गावाकडे जात असू. निकाल लागण्याच्या अगोदरच आम्ही आमच्या गावचा रस्ता धरलेला असायचा. शहरात गरमही व्हायचे. गावाकडे कसं थंडगार वाटायचं. गावातील घर नदीपासून अगदीच जवळ आहे. घर आणि नदी यांच्यामध्ये हिरवीगार शेती असल्यामुळे त्या निसर्गरम्य वातावरणात नयन मनोहर वाटत असे. सगळे शेतकरी शेतात काम करण्यात दंग असलेले आताही पाहायला मिळतात. दुपारी जेवल्यानंतरही कामे थांबत नसत.
दुपारनंतर खळ्यातली कामे सुरू होत. शेतात भात झोडण्यासाठी खळी बनवली जात. आमच्या घराच्या शेजारीच अशी अनेक खळी होती. प्रत्येकजण आपापल्या खळ्यात नाचण्याची कणसे झोडत असत. आमची आजी आम्हाला प्रत्येक खळ्यावर जायला सांगत असते. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही नाचण्याची कणसे झोडण्यासाठी उपयोगी नसलो तरी त्यांना पाणी देणे, चहा नेऊन देणे या कामांसाठी उपयोगी पडत असू. माझे तिन्ही काका कणसे झोडण्यात पटाईत. माझे बाबासुद्धा शेतात कामे करत. पण ते कायम सलून कामात दंग असल्याने ते शक्यतो शेतीकामात नसत.
कणसे झोडून झाली की सर्वांना लाडू मिळत असत. घरगुती बनवलेले शेंगदाण्याचे लाडू , मुगाचे लाडू , चवळीचे लाडू मस्त मोठे चवदार असत. एक लाडू खाल्ला तर रात्री जेवलो नाही तरी चालत असे. आम्ही पाणी , चहा देत असताना आम्हालाही खळ्यातले लाडू मिळून जात. आम्ही शहराकडून कधीतरी येत असल्यामुळे आमच्यावर अधिक माया असे. प्रेमाने एखादा लाडू अधिकचा आम्हाला मिळून जाई. असे हे प्रेमळ आणि गोड लाडू मिळावेत या एकमेव उद्देशाने आमची आजी आम्हा सर्व भावंडांना खळ्यात पाठवी.
आजीचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही खळ्यात हजर होऊ. मी आणि माझा भाऊ दोघेही लाडवांचा फडशा पाडत असू. उरलेले लाडू घरी घेऊन येत असू. घरी आल्यानंतर आजी आमच्याकडून सगळे लाडू काढून घेई. ती त्यातला एकही लाडू कधी खाताना आम्ही बघितलेला नाही. ती बिचारी आमच्या इतर भावंडांना त्याचे बारीक बारीक तुकडे करून अगदी समसमान सर्वांना कशी वाटणी येईल याची काळजी घेत असे. तिचे नेहमी असे म्हणणे असे की , ' घरात येणारा पदार्थ सर्वांच्या मुखाला लागला पाहिजे. ' आमच्या मुखाला पदार्थ लागला की तिचे पोट भरून जाई.
शेंगदाण्याचे भलेमोठे गुळयुक्त लाडू खाताना त्यांची चव आणखी वाढत जाई. एक लाडू खाऊन झाला की आणखी एखादा खावासा वाटे. मग आजीला बाबापुता करून तिच्याकडून आणखी एखादा लाडवाचा तुकडा कसा मिळेल यासाठी आमची स्पर्धा चाले.
आता बाजारात विविध प्रकारचे लाडू विकत मिळतात. ते आम्ही विकत आणतो. खातो. पण ते ' खळ्यातले लाडू ' त्यांची चव आमच्या जिभेवर जी ठाण मांडून बसली आहे ती चव आताच्या कोणत्याही लाडवांना येणार नाही हे तितकंच खरं आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
No comments:
Post a Comment