Monday, May 10, 2021

मला मेमो मिळतो

 🟧 मला मेमो मिळतो


          शासकीय किंवा खाजगी कर्मचाऱ्यांना आपल्या वरील अधिकाऱ्यांकडून चुका केल्याबद्दल ' कारणे दाखवा ' नोटीस मिळते. त्यासाठी ' ज्ञापन ' किंवा ' मेमो ' हा शब्द सगळीकडे परिचित आहे. काम करत असताना चुका होतात. अर्थात काम करणाऱ्यांच्या चुका होतात. कामे न करणाऱ्यांची एकच मोठी चूक असते ( खिळा म्हणूया का ? ) ती म्हणजे ते कधीतरी काम करतात. अशा लोकांना शंका खूप येतात. त्या शंका असल्यामुळे ते कामे करत नसतील. त्यांचा त्यात दोष नसतो , काम करताना चुका झाल्या तर त्यावर बोलणी खाण्यापेक्षा कामे न केलेली बरी असा त्यांचा समज झालेला असतो. कामे करणाऱ्यांना जसे प्रोत्साहन मिळत असतं , तसाच कामे न करणाऱ्यांना मेमो मिळत असतो. मेमो ही काही अभिमानास्पद गोष्ट नसते. मेमो म्हणजे आपला अपमानच असतो. मेमोची सवय असणाऱ्यांना त्याचे काहीही वाटत नाही. अशी माणसं मेमो आला की त्याचे काय उत्तर द्यायचे ते ठरवूनच असतात बहुतेक. पण काम करूनही जर मेमो मिळाला तर ? ..... तर मात्र खूप वाईट वाटतं. मेमो देणारे अधिकारी आपले मेमो देऊन मोकळे होतात. ते त्या व्यक्तीचा भावनिकदृष्ट्या विचार करतात की नाही माहीत नाही. त्यासाठी अधिकारी व्हावे लागेल. शेवटी मेमो अशासाठी दिला जातो की समोरच्या कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारावे , त्यात अपेक्षित बदल घडावा. त्यापेक्षा तोंडी समजावून सांगून काही फरक पडत नसेल तर कल्पना देऊन जर मेमो दिला तर ........ शेवटी हा तर आहे. हा तर काही केल्या संपत नाही. तो येतच राहतो. 

          मी त्यावेळी गढीताम्हाणे दादरा या धनगरवाडीच्या शाळेत एकटाच होतो. दुसरा शिक्षक नसल्यामुळे असे घडले असावे. मला किरकोळ रजा हवी असल्यास मोठ्या शाळेकडे शिक्षक मागावा लागे. त्यांनी शिक्षक दिला तरच मला रजेवर जाता येई. एक रजा मंजूर करण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर चालून एक नंबर शाळेत जावे  लागे. त्यावेळी मोबाईल नव्हते. मुख्याध्यापक कक्षात फोन नव्हते. वरच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांकडे अर्ज दिला तर तो पोहोचू शकत असे. 

          मला बरे वाटत नव्हते. ताप , सर्दी , खोकला आणि जुलाब असा त्रास सुरू झाला होता. लगेच रजा अर्ज भरला आणि मोठया शाळेत पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यांनी शाळेत एक दिवस कामगिरी शिक्षक देण्याचे कबूल केले. मी निर्धास्त होऊन माझ्या घरी कणकवलीत पोहोचलो. डॉक्टर उपचार सुरू केले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मुले येण्याअगोदर मी शाळेत आलो होतो. हळूहळू मुले आली. तिसरीतल्या संतोषने माझ्याकडे एक चिठ्ठी आणून दिली. काल केंद्रप्रमुख आले होते. त्यांनी ' मेमो ' लिहून मुलांच्या हातात दिला होता. मुलांनी तो माझ्याकडे दिला होता. 

          म्हणजे काल शाळा बंद नसताना मला मेमो कसा काय ? मी घाबरत घाबरतच चिठ्ठी उघडली. शाळा वेळेत उघडली नाही , याचा उल्लेख करत त्याचे ' खाली सही करणार ' यांच्याकडे लेखी उत्तर द्यायला सांगितले होते. मला समजेना. मी मुलांना विचारले. तेव्हा मुलांकडूनच समजले. मुले नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. पण मोठ्या शाळेतील शिक्षक एक तास उशिराने शाळेत आले होते. चार पाच किलोमीटर चालून यायचे म्हणजे तेवढा उशीर होणार हे गृहीतच होते. पण त्यांच्यापुर्वीच आमचे केंद्रप्रमुख शाळेत आले होते. त्यांनी मुलांकडे चौकशी केली. मी मुलांकडे माझ्या रजेबद्दल बोललो नव्हतो. त्यांनी ' कुबलगुरुजी ' येणार आहेत असे सांगितले. मी अजून आलो नाही म्हणून केंद्रप्रमुखसाहेबांनी बंद शाळेच्या व्हरांड्यातच ' मेमो ' लिहिला असेल आणि मुलांच्या हातात दिला असेल याची मला खात्री झाली. केंद्रप्रमुख गेल्यानंतर मोठ्या शाळेतील काळे चौधरीगुरुजी आले होते. मोठ्या शाळेत दोन चौधरी गुरुजी होते. एक गोरे होते आणि दुसरे काळे होते. त्यामुळे मुलांनीच त्यांना काळे चौधरी आणि पांढरे चौधरी अशी नावे दिलेली होती. तिकडच्या परिसरात ' गोरे ' हा शब्द न वापरता ' पांढरे ' हा शब्द जास्त प्रचलित असावा. त्या दोन्ही चौधरींनीही या नवीन नावांचा स्वीकार केलेला होता. शेवटी मुलांनी ठेवलेल्या नावांचा अस्वीकार कोण करील ? 

          मी मला मिळालेला मेमो कोणालाही न दाखवता त्याचे ' खाली सही करणार ' यांच्यासाठी खुलासा पत्र लिहिले. पुढील सहविचार सभेच्या वेळी त्यांच्याकडे प्रत्यक्ष सुपूर्द केले. त्यांनी ते माझ्याकडे न बघताच घेतले आणि आपल्या पाकिटात ठेवले. 

          आज मी त्या केंद्रप्रमुखांना वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी फोन करतो. ते माझ्याशी अगदी प्रेमाने बोलतात. त्यांच्या हा विषय लक्षातही नसेल. त्यांनी मला साडे सहा वर्षात केलेले शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन अनमोल असेच होते. हा मला मिळालेला मेमो हा त्यांच्यापुरता मर्यादित होता. त्यांनी तो पुढे पाठवला नाही. पण त्यांच्या मेमोने मला त्रास झाला , पण नवीन शिकायलाही मिळाले. त्यांनी त्यांचे काम केले , मी माझे काम करतच राहणार आहे. दुर्गम भागात नोकरी करताना असे अनेक त्रासदायक अनुभव आलेले आहेत. अनेकदा न्यूनगंड निर्माण झाला आहे, नोकरी सोडून द्यावीशी वाटली आहे , स्वतःवरच चिडत राहिलो आहे. एकटाच रडत राहिलो आहे. पण या सर्वांवर विजय मिळवण्याचा आणि अधिक कणखरपणे समस्यांवर मात करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत गेलो आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...