🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग
शिक्षकी पेशामध्ये अनेक प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात. प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असते. शिक्षणातील नवनवीन प्रवाह आणि बदल समजून घेतल्याने नव्या दृष्टीकोनाने शिकवता येते. रोज काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते , " शिक्षक निरंतर अध्ययनशील असल्याशिवाय तो विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. "
मला स्काऊटचे प्रगत प्रशिक्षण घ्यायचे होते. मी स्वतःहून प्रशिक्षणाची मागणी केली होती. ऑर्डर आली होती. पुण्यातील भोर आणि कोल्हापूरातील सोनतळी अशी दोन प्रशिक्षण स्थळे होती. मी सोनतळी येथे जाणे पसंत केले होते.
४ मे ते १० मे असे सात दिवसांचे निवासी शिबीर होते. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण असल्यामुळे मुलांचे नुकसान होणार नव्हते ही माझ्या दृष्टीने चांगलीच गोष्ट होती.
४ मे हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस होता. त्या दिवशी पंधरा वर्षापूर्वी माझी पत्नी मला कायमची सोडून गेली होती. गेल्या पंधरा वर्षात मला कायमच हा दिवस असह्य होणारा असतो , तसा तो मला आजही अस्वस्थ करत होता. तरीही मी माझ्या अस्वस्थतेकडे काहीसे दुर्लक्ष करीत होतो.
राधानगरीमार्गे गाडीत बसून निघालो होतो. सोबत एक मोठी आणि एक छोटी अशा दोन बॅगा होत्या. रंकाळा येथे उतरलो होतो. मस्त गरमागरम चहा घेतला होता. तिथूनच चक्क दोनशे रुपये देऊन रिक्षानेच सोनतळी येथे पोहोचलो होतो.
प्रशिक्षण स्थळ म्हणजे " राजर्षी छत्रपती शाहू महाराज " यांचे वास्तव्य असलेला बंगलाच होता. तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून येणारे प्रत्येक नवखे चेहरे भारावून जाताना दिसत होते.
मी स्काऊट प्रगत प्रशिक्षण घ्यायला गेलो असलो तरी ते तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे मला कबमास्टरचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पर्याय सुचविण्यात आला होता. मी तो मान्य केला होता. नोंदणी करुन झाली होती.
मी पत्नीने दिलेला भोजन डबा उघडून खाऊन घेतला होता. भूक लागली होती. आता जरा बरे वाटत होते. हळूहळू सूचना मिळू लागल्या होत्या. प्रशिक्षण प्रमुख आणि संचालक यांनी सात दिवसांचे वेळापत्रक नीट समजावून सांगितले होते.
पहाटे ४ वाजता उठून दिवसाची सुरुवात होत होती. इतक्या लवकर उठल्यावर आंघोळीसाठी नंबर लागत असे. फ्रेश होईपर्यंत कर्णमधुर भक्तिसंगीत ऐकायला मिळे. ५.२५ वा. रामधून सुरु होई. टाळ्यांचा ठेका धरत मंत्रमुग्ध होत प्रत्येकाच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडे. वातावरण प्रसन्न होऊन जाई.
त्यानंतर आपल्या तंबूची सजावट करण्याचे टास्क दिलेले असे. ते करताना आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत. टोटम पोल , षटकाचे नाव , प्रशिक्षणार्थी , किल्ला , सुका कचरा , ओला कचरा , शोषखड्डा , तंबूची स्वछता , परिपूर्ण गणवेश , तंबूसाठी प्रवेशद्वार , मोगलीची गोष्ट , चप्पल स्टँड , वस्तू ठेवण्यासाठी मांडणी , गाठींचे प्रकार , रांगोळी , पताका , ले आऊट , तंबूची ओढणी इत्यादी अनेक गोष्टींची मुद्देसूद व काटेकोर पाहणी केली जात होती. अर्थात त्यासाठी लवकर उठण्याशिवाय पर्यायच नसे.
बी पी सिक्स चे सहा व्यायाम प्रकार शिकवण्यात आले. प्राणायाम , अनुलोम विलोम आणि योगासने शिकविण्यात आली होती. प्रत्येक बाबींवर पुरेसा वेळ देऊन सराव घेण्यात आला होता. वैयक्तिक लक्ष देऊन सुधारणा करण्यात आली होती.
चहा , नाश्ता रांगेत घ्यावा लागत होता. स्वतःची भांडी स्वतः घासावी लागत होती. हे सगळे निसर्गाच्या सानिध्यात घडवले जात होते. प्रत्येक सेशन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जात होते. वहीवर लिहिण्यासाठी घटक देण्यात आले होते. कोणत्या पानावर काय लिहावे हेही सांगण्यात आले होते.
कब मास्टर यांचे वय ६ ते १० करण्यासाठी अभिनवपणे उपक्रम घेण्यात आला होता. आमच्याकडे त्यांनी कबचे वय फेकले होते आणि आम्ही ते सर्वांनी अलगद पकडले होते. सगळेच उपक्रम वक्तशीरपणे घेण्यात आले होते. कामात नेहमीच बदल करण्यात येत होता.
रिकामपणाची कामगिरी करणे म्हणजे तसे अवघड काम होते. प्रशिक्षकांनी दिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष वैयक्तिक करुन दाखवायच्या होत्या. त्या करताना ब्लॅंक व्हायला होत होते. त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा करुन दाखवाव्या लागत होत्या. कितीही तयारी केली असली तरी ट्रेनरसमोर सर्वांचीच तंतरली होती. अगदी पहिल्या झटक्यात बरोबर असणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी कमी होती. शेवटी एकदा टास्क पूर्ण झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मोजता न येण्यासारखा होता.
ध्वजारोहण करताना क्रम चुकत होता. पुन्हा पुन्हा करुन घेतले जात होते. आपणच आपल्या चुका ओळखायच्या होत्या. ध्वजनेता , कबमास्टर , कब सहाय्यक यांच्या भूमिका करायच्या होत्या. या सर्व भूमिका प्रशिक्षकांनी प्रत्येकाकडून अचूक येइपर्यंत करुन घेतल्या होत्या.
राज्य पुरस्कार , राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मुलांना कसे घेऊन जाता येईल तेही सांगण्यात आले होते. आपली मुलेही तिथपर्यंत पोहोचल्याची स्वप्नं पडायला लागली होती.
कृतियुक्त गाणी नाचून म्हटली जात होती. आरोळ्या देण्यात येत होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या वाजवायला शिकवल्या जात होत्या. वेळ भराभर निघून जात होता. कधीच भोजनाची घंटा होत होती. रांगेत भोजन वाढले आणि घेतले जात होते. ड्युटीप्रमाणे प्रत्येकजण आपली कामगिरी पार पाडताना दिसत होते. कोणीही त्यात कसूर करण्याचा प्रश्नच नव्हता. सूचनाच देण्याची पद्धत अशी होती की कुणीही दिलेली कामे करायला टंगळमंगळ करु शकत नव्हते. ज्यांनी आपल्या घरी काहीही काम केलेले नसेल त्यांना काम करताना पाहून आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही गोष्टी होत होत्या.
प्रशिक्षक स्वतः राब राब राबत होते. प्रशिक्षणार्थींना प्रत्येक गोष्ट गांभिर्याने करण्यास सांगत होते. ताण तणाव येत असला तरी सगळे उपक्रम पार पाडावेच लागत होते. कोणालाही त्यात सूट दिली जात नव्हती. त्यामुळे कित्येकांचे वजन आणि पोट दोन्हीही कमी कमी होत गेलेले दिसत होते.
निसर्ग निवासाची सवय किती आरोग्यदायी असते हेच जणू या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सिद्ध केले जात होते. तंबूत झोपताना डासांची गाणी ऐकत झोपावे लागत होते.
पहिल्या दिवशी तर माझी हालतच झाली होती. पहिल्यांदा तंबूत झोपण्याचा प्रयत्न केला होता. एक तास तरी झोपच येईना. मग स्काऊट बंगल्यात फॅनच्या खाली असलेल्या बाकड्यावर झोपलो होतो. पण झोप आलीच नव्हती. झोपेत बाकड्यावरून पडेन ही भीती झोपू देत नव्हती. मग पुन्हा तीही जागा सोडली होती. आकाशाचे पांघरुण घेऊन बाहेर अंगणात गाढ झोपून गेलो होतो. माझ्याबरोबर अनेक मित्र घोरत पडलेले होते. त्या सूरसंगीतात मलाही सामील होण्याची अनमोल संधी मिळाली होती.
मोगलीची गोष्ट प्रत्यक्ष अनुभवता येत होती. भालू , भगिरा , का , मोगली यांचा डान्स करताना कितीतरी मजा आली होती. स्पर्श , चव , स्मरणशक्ती , डोळे इत्यादींवर आधारित किम गेम्स खेळले गेले होते. विविध गेम्स खेळताना लहान मुलांसारखी गंमत वाटत होती. सगळेजण आपलं वय खरंच विसरुन गेलेले दिसत होते.
रात्रीच्या शेकोटी कार्यक्रमात सर्वांनीच अक्षरशः धमालच केली होती. जे कधीही नाचले नसतील त्यांचे नृत्य हसायला लावत होते. सर्वांनी दिलेल्या थीमनुसार कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाला तरी कार्यक्रम झक्कास होत होता.
सन्मान सभेमध्ये अध्यक्ष , सचिव यांची निवड करुन दिवसभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येत होता. दुसऱ्या दिवसाचे नियोजन आधीच सांगण्यात येत होते. वहीचे लेखन करण्यासाठी जागरण केले जात होते. आपल्या तंबूचा नंबर यावा , लाल रंगाचा फ्लॅग मिळावा म्हणून चढाओढ लागत होती.
गाठींचे प्रकार शिकवले गेले होते. प्रत्यक्ष जीवनात त्यांचा कसा वापर केला जातो हेही सांगितले गेले होते. कित्येकांनी बांबूंचा वापर करुन अभिनव गॅझेट्स बनवली होती.
प्रशिक्षण संपण्याच्या आदल्या दिवशी सहल नेण्यात आली होती. ज्योतिबा , महालक्ष्मी आणि रंकाळा अशा ठिकाणी ऐतिहासिक अनुभव घेतले जात होते. प्रवास करताना गाणे म्हणण्याचा मोह कोणालाही आवरता येत नव्हता. राज्यभरातून आलेले शिक्षक , शिक्षिका एकाच कुटुंबाचा भाग बनून गेलेले होते. रंकाळा हिरवळीवर अभिनय गीते नाचताना सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
शेवटच्या शेकोटी कार्यक्रमात प्रत्येक गटातील प्रशिक्षणार्थीनी आपली हृदय मनोगते व्यक्त करताना अक्षरशः रडायला लावले होते.
क्लोझिंग कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना सलाम केला होता. प्रत्येकाला समारंभपूर्वक प्रमाणपत्रे मिळाली होती. जाताना प्रत्येकजण प्रत्येकाला निरोप देण्याच्या घाईत होता. या प्रशिक्षणात प्रत्येकाला एकसष्ठ मित्र मिळाले होते. प्रत्येकाला सात ते आठ गुरु मिळाले होते. त्यांचा सर्वांचा निरोप घेताना सर्वांचेच डोळे आतून किंवा बाहेरुन पाणावलेले दिसत होते. स्काऊटिंग नावाचे हे प्रशिक्षण खरंच एक अनुभवसंपन्न आऊटिंग असल्याचे सिद्ध होत होते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) ( कणकवली )
( सिंधुदुर्ग )