माझी चेकपोस्ट ड्युटी
२१ मार्च पासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने सांगितल्याप्रमाणे माझे दैनंदिन ऑनलाईन अभ्यास पाठवण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी दिवसाचे बरेच तास अभ्यास साहित्य बनवण्यामध्ये घालवत होतो. साहित्य बनवण्याच्या दृष्टीने आधी नियोजन करावे लागत होते. १० मिनिटांच्या व्हिडिओसाठी २ ते ३ तास बसून लॅपटॉपसमोर प्रयत्न सुरु होते. सर्व विद्यार्थ्यांना फोन करून सांगत होतो. शाळेपेक्षा जास्त वेळ अभ्यास तयार करणे, पाठवणे आणि केलेला अभ्यास तपासणे या गोष्टींसाठी जात असला तरी मुले शिकत आहेत याचा आनंद होत होता. काही मुलांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल याचाही विचार करत होतो.
अचानक आमच्या Whats App ग्रुपवर एक ऑर्डर येऊन धडकली. मी आपली सहजच वाचली. त्यात माझे नाव होते. मला चेकपोस्टची ड्युटी लागली होती. खारेपाटण चेकपोस्टला जायचे होते. रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत १० तासांची ड्युटी करण्याबाबत ऑर्डरमध्ये उल्लेख होता. माझे काही मित्र माझ्यासोबत असल्यामुळे मी निश्चिन्त होतो. आतापर्यंत मतदान, जनगणना, बी.एल.ओ., पल्स पोलिओ आणि इतर कामे केली होती. हेच काम करायचे बाकी राहिले होते. पहिल्यांदाच माझी ऑर्डर असल्यामुळे थोडे अप्रूपही वाटले. चेकपोस्टवर पोलिसांप्रमाणे ड्युटी करावी लागणार होती म्हणून एक वेगळाच अनुभव मिळणार या आनंदाने प्रेरित झालो होतो. मग काय स्वतः तहसीलदार कचेरीत जाऊन ऑर्डर ताब्यात घेतली. रात्रभर जागे राहावे लागणार होते. दुपारी २ - ३ तास सलग झोपण्याचा प्रयत्न केला. झोप काही येईना. शेवटी उठलो. मुलांना दुसऱ्या दिवशी पाठवायच्या अभ्यासाच्या तयारीला लागलो. घरातल्या सर्वांची मनाची तयारी केली. लहान मुलीला कसेतरी समजावून जेवल्यानंतर रात्रीच्या पहिल्यावहिल्या ड्युटीला निघालो. ती मी दिसेनासा होईपर्यंत रडत होती. जरा पुढे गेल्यानंतर मलाही रडावेसे वाटले. पण रडून उपयोग नव्हता. ६० - ७० च्या स्पीडने खारेपाटण चेकपोस्ट गाठले.
तिथे आधीचे ड्युटीवाले ड्युटी सोडून चाललेले दिसले. मी सॅनिटायझर लावून आणि तोंडाला घट्ट मास्क लावून कामावर हजर झालो. जुन्यांकडून काम समजावून घेतले. आम्हा शिक्षकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बाहेरील जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याची ड्युटी देण्यात आली होती.
लोकांची नुसती रिघ लागली होती. लोक कोरोनाच्या भीतीने आपापले गाव गाठत होते. १४ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सुद्धा आनंदाने स्विकारत होते. विलगीकरणाचे संमतीपत्र भरून दिल्यानंतरही लोक थँक्यू म्हणत होते. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना बघून जीव कळवळत होता. पण त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून बोलत होतो. तोंडाला मास्क लावल्यामुळे चष्म्यावर वाफ जमा होत होती. ती पुसण्यात वेळ जात होता. मला संगणकीय काम देण्यात आले. मी आलेल्या सर्वांची नोंद ऑफलाईन किंवा ऑनलाईन करत होतो. प्रत्येक व्यक्तीचे १५ ते १६ कॉलम भरण्याचे काम सलग करूनही सकाळपर्यंत पूर्ण होत नव्हते. अर्थात झोप घेताच येत नव्हती. असे सलग १० दिवस काम केले. पोलीस बिचारे १२ तासांची ड्युटी करून हैराण झाले होते. त्यांनीही कित्येक लोकांना आपल्याकडील पाणी दिले , खाऊ दिला. कधी कधी झोपण्यासाठी आपल्याकडील चादरही दिली. पोलिसांमधील मानवता पाहून गहिवरून गेलो. पोलिसांना काम करताना आमच्यापेक्षा त्रास होत होता. पण तरीही न कंटाळता ते करताना पाहायला मिळत होते. सर्वांशी मैत्री झाली. त्यांच्यातील प्रेमळ माणूस बघायला मिळाला.
तीन वेळा ड्युटी केली. शाळेतही ड्युटी केली. ऑनलाईन अभ्यास देण्याचे काम सुरूच होते. कित्येक कर्मचाऱ्यांनी हा अनुभव घेतला. नातेवाईकांचे फोन येऊ लागले. आम्हाला चेकपोस्टला अडवू नका, पुढे सोडा अशा विनंत्या होऊ लागल्या. सर्वांना नियमानुसारच सोडण्यात येत होते. तरीही आम्ही त्यांना दिलासा देत होतो. तुम्ही या, आम्ही आहोतच. तुम्हाला लगेच सोडतो. २ - ३ तासांनंतर सोडून सुद्धा लोक धन्यवाद देत असताना दिसत होते. लोक आपल्यासमोर असे हवालदिल होताना बघून प्रत्येकवेळी आमचाही जीव कासावीस होत होता. देवा, पुन्हा अशी ड्युटी नको या मागणीशिवाय मी आता काहीही मागणार नव्हतो.
© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

No comments:
Post a Comment