Wednesday, December 30, 2020

डोक्यावर मारु नका सर

  डोक्यावर मारु नका सर         

           दादरा शाळेत असतानाची घटना आहे. शाळेत शिस्त असायला हवी हे सगळ्यांनाच मान्य असेल. त्यासाठी मुलांना थोडी शिक्षा करून वटणीवर आणण्याचे प्रयत्न होत असतात. मी सुध्दा लहानपणी शिक्षकांचा व पालकांचा मार खाल्ला आहे. पाढे पाठ नसले तर पाठीत धबके मिळाले आहेत. बाबांच्या काळात त्यांना रुळाने मारण्याची पद्धत होती असे म्हणतात. ' छडी लागे छम छम् विद्या येई घम घम् ' असे बालगीत त्यावरूनच आले असावे. 

          माझे लग्न झाल्यानंतर माझ्या बोटात सोन्याची अंगठी आली होती. मला दागिने घालण्याचा सोस नाही. पण लग्नात घातली. आता काढायची कशाला म्हणून घालूनच ठेवली. ती थोडी सैल होत होती म्हणून दोऱ्याने गुंडाळून तिचा व्यास कमी करून बोटात घट्ट बसवलेली. आता ती बोटातून सुटण्याची भिती नव्हती. 

          मुलांच्या अभ्यासाबाबत मी अजुनही काटेकोर आहे. दिलेला अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे हा सर्वसाधारण दंडक असे. माझाही तसाच आग्रह नेहमीच असतो. कधी कधी कामाच्या व्यापात अभ्यास तपासणे होत नाही. मग नुसते पाहून सुध्दा प्रतिक्रिया देता येते. दैनंदिन अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे जसे काम असते तसे दिलेला अभ्यास वेळच्या वेळी तपासून देणे हे शिक्षकाचे काम असते. 

          मी दररोज अभ्यास देत असे. अभ्यास न केलेल्या मुलांना पाठीवर प्रसाद मिळे. कधी हातावर काठीने हलकेच मारून अभ्यास न आणल्याबद्दल सौम्य शिक्षा देत असे. कितीही शिकवले तरी मुलांमध्ये फरक पडताना दिसत नव्हता. कारण मुले घरी अभ्यासच करत नव्हती. पालकच शिकलेले नव्हते. त्यांना शिक्षणाबद्दल आस्था होती. पण तरीही ते मुलांकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे माझी तळपायाची आग मस्तकात जाई. एवढे सांगूनही मुले अभ्यास करत नाहीत म्हणजे काय ? माझा संयम सुटत चालला होता. मी शिस्तीसाठी शिस्तीचे हत्यार वापरू लागलो. मुले शाळेत यायची बंद झाली. 

          मग मुलांना घरी जाऊन शाळेत आणू लागलो. मुलांना आता शाळेत यावेच लागत होते. नाहीतर सर घरी येतात हे समजले. पालकांनीही " मारा तुम्ही सर , अभ्यासासाठी मारलेत तरी हरकत नाही " असे सांगितले. मग काय मला परवानगी मिळाली होती. मुलांनी अभ्यास करून चांगले शिक्षित व्हावे हा मूळ हेतू होता. तरी मार देणे हा काही त्यावरचा पर्याय नव्हता. पण नाही शिक्षा केली तर मुलांची पाटी नेहमी कोरीच राहताना दिसत होती. माझा संयम सुटला की मारणे आलेच. पण या शिक्षेची सवय होणे कधीही वाईटच. कारण मारल्याशिवाय अभ्यास येतच नाही असा समज दृढ होत जातो. पालक म्हणू लागले ते सर भारी आहेत. शिस्तीचे भोक्ते आहेत. मुलांना भरपूर मारून मस्त अभ्यास करून घेतात. 

          दरमहाच्या मासिक भेटीत केंद्रप्रमुख सूचना देत. मुलांचा अभ्यास कमी आहे त्याकडे लक्ष द्या. ते गेल्यानंतर त्या शेऱ्याचा राग येई. तो राग शिक्षेच्या रूपाने मुलांना परत मिळे. मुले अभ्यास करू लागली तसा मार सुध्दा कमी झाला. पण आता डोक्यावर मारायला सुरुवात केली. खुर्चीवरून न उठता मारायला बरे. 

          तीन चार दिवसानंतर आमच्या ग्रामशिक्षण समितीची सदस्या कोयना बाई झोरे उर्फ कोंडी आजी शाळेत आली. म्हणाली, " सर, तुम्ही मस्त शिकवता. तुमचा मुलांवर छान धाक आहे. तुम्ही आल्यापासून मुले अभ्यास करू लागली आहेत. पण सर , तुम्ही मुलांच्या डोक्यावर मारू नका. कारण तुमची अंगठी त्यांच्या डोक्यात बसते. एखाद्या मुलाच्या डोक्याला खोक पडली तर काय कराल ? " 

          मला तिचे येणे, जाणे, बोलणे अपेक्षित होते. पण तिने जे सांगितले ते अपेक्षितच नव्हते. ती जास्त वेळ थांबली नाही. लगेच निघूनही गेली. ती रागावलीही नाही. पण एका अशिक्षित आजीने मला एक चांगला धडा दिला होता. त्याच दिवशी मी ती सोन्याची अंगठी काढली. पुन्हा ती कधीच घातली नाही. मुलांना मारणे सोडून दिले. 

          मुलांना प्रेमाने जवळ घेतले. मुले मला घाबरेनाशी झाली. पण रोज शाळेत येऊ लागली. दररोज दिलेला अभ्यास वेळच्या वेळी करू लागली. मलाही माझ्या रागावर नियंत्रण आले. माराशिवाय अभ्यास होऊ लागला. हजेरी वाढली. मी अध्यापनाची डिग्री घेतली असली तरी ती अशिक्षित आजी मला जे शिकवून गेली ते मी आजपर्यंत वापरत आहे. जे मारल्याने होत नाही ते प्रेम दिल्याने नक्कीच होते याचा मला पुरता अनुभव नेहमीच येतो आहे. त्यानंतर मी अनेक शाळांमध्ये कामे केली पण शिक्षणाला मी प्राधान्य दिले आणि शिक्षेला गौणत्व. प्रेमाने मुलांना जिंकता येते. शिक्षेने कधीच नाही.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...