Wednesday, December 30, 2020

माझी अविस्मरणीय शाळा : कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर

माझी अविस्मरणीय शाळा : कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर

                    कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमधील शिक्षक ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. मला दुसरीचा वर्ग देण्यात आला. पटवर्धन हायस्कूलद्वारा चालवली जाणारी रत्नागिरीतील ती एक प्रसिध्द शाळा असा उल्लेख केला तरी तो चुकीचा ठरणार नाही. नगर परिषदेच्या २२ शाळांमध्ये ही तेवीसावी. त्यावेळी १ ली ते ४ थी चे प्रत्येकी दोन तुकड्यांप्रमाणे एकूण आठ वर्ग होते. पहिली गुलाब , पहिली चमेली , दुसरी ज्ञानेश, दुसरी मुक्ताई, तिसरी ध्रुव, तिसरी प्रल्हाद, चौथी शिवाजी, चौथी महाराणा प्रताप अशी तुकड्यांची नावे. माझ्या तुकडीचे नाव दुसरी मुक्ताई. 

          माझ्या वर्गात एकूण ६० विद्यार्थी होते. मी वर्गात प्रवेश केला. राष्ट्रगीताची घंटा कानावर पडताच मुले सावधान स्थितीत उभी राहिली. मुले त्या ४२ सेकंदात ६० प्रकारच्या हालचाली करताना दिसत होती. त्यांना बिचाऱ्यांना राष्ट्रगीताचे महत्त्व ते काय माहित ! ! ती निरागस भाबडी मुले पाहून मला त्यांना किती शिकवू आणि किती नको असे झाले होते. मी त्यांच्यासाठी नवखा होतो. मुलांनी मला ' काका ' म्हणायला सुरुवात केली. त्यांना कुठे माहिती होते कि मी त्यांचे नवीन सर होतो ते ? थोड्याच वेळात मुख्याध्यापिका शीतल काळेमॅडम आल्या. त्यांनी मुलांना अगदी नीट समजावून सांगितले. त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. मला त्यावेळी जो आनंद झाला तो काय वर्णावा ! इंजिनिअर झालो असतो, कदाचित डॉक्टरही. पण शिक्षकी पेशामध्ये मिळणारा हा आनंद आगळा वेगळाच असतो. त्यासाठी शिक्षकच व्हावे लागते. मी मुलांशी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न सुरु केला.  मुले सर्व प्रकारची होती. अत्युच्च , उच्च आणि मध्यमवर्गीय पालकांची मुले असल्याने ती बोलकी होती. पहिल्या दिवशी त्यांनी मला अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले. त्यानंतर मी ६ ते ७ शाळांमध्ये सेवा केली तरी हाच दिवस मला सुखावणारा वाटत राहतो. माझी आणि मुलांची पहिल्या दिवसापासून गट्टी जमली. माझं लटक्या रागानं पाहणं , ओरडणं त्यांना समजू लागलं. मी त्यांना माराची भिती दाखवली, पण मारले मुळीच नाही. माझे व्यक्तिमत्त्व अजिबात आकर्षक नव्हते. पण मुले व्यक्तिमत्व नाही, तर स्वभाव बघतात. त्यांनी माझ्या दिसण्याकडे नाही , तर असण्याकडे लक्ष दिलं असावं. त्यावेळी माझ्या डोक्यावर दाट केस होते. आता ते शोधावे लागतात इतकेच. 

          मला कणकवली डी.एड. कॉलेजला असताना मिळालेल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासाने घडवले म्हणायला हरकत नाही. तेथे दोन वर्षात सर्वांमधील विविध सुप्त क्षमता बघून माझ्यातला खरा शिक्षक जागा झाला आणि मी घडत गेलो. मला त्यावेळी सगळ्यांची इतकी साथ मिळाली कि मी माझ्या वर्गमित्रांना ( मैत्रिणींनाही ) कधीच विसरणार नाही. आता बर्‍याच वर्षांनंतर ते मला माझ्या केसांमुळेच ओळखू शकत नाहीत ही खरी गोष्ट असेल कदाचित. पण केस गेल्यामुळे किंवा माझ्या टकलामुळे माझे कधीच कुठे अडले नाही हे मी इतक्या वर्षांनंतरही ठामपणे सांगू शकतो. 

          परिपाठापासून शाळा सुटेपर्यंत मी मुलांना अभ्यासात एवढा गुंतवून ठेवी कि मुले शाळा सुटली तरी घरी जायला बघत नसत. मी सतत कामच करत असे. शाळेत एकूण ८ शिक्षिका होत्या, मी एकटाच पुरुष शिक्षक होतो. मी मालवणी होतो. त्या सगळ्या शुद्ध भाषा बोलणार्‍या होत्या. मी त्यांच्या संस्काराने सर्व शिकलो. त्यांनी मला सर्व जबाबदाऱ्या दिल्या. दैनंदिन फलकलेखन करायला दिले. बाहेरील कोणतेही काम , सुशोभन इत्यादी करताना त्यांना माझ्या कल्पना आवडू लागल्या. पण भरसभेत पालकांसमोर त्या जितक्या धीटपणाने बोलत , तेवढं मला जमत नसे. मला ते अधिकारीवर्ग असलेले पालक पाहून त्यांच्याशी बोलताना संकोच वाटे. त्यातील माझे बहुतांशी पालक महिला असत. त्यांच्याशी बोलताना तर मी कमालीचा लाजून जाई. पण त्या महिला पालकांनी मला विश्वास दिला. त्या दररोज मुलांच्या अभ्यासाविषयी माझ्या वर्गात येऊन माझ्याशी बोलत असत. त्यामुळे मला धीर येत गेला. माझ्या शिकवण्याबद्दल मुले घरी जाऊन पालकांना सांगत असत. त्यामुळे पालकदेखील माझ्यावर खुश होते. हळूहळू माझ्यातला आत्मविश्वास वाढत गेला. मी एखाद्या कार्यक्रमामध्ये मला मुख्याध्यापिका यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू लागलो. माझे अक्षर वळणदार असल्यामुळे मला लिखाणकामही देण्यात येऊ लागले. मी आपला देतील ते काम आपलेपणाने करतच गेलो. कधीही नकार दिला नाही. त्यामुळे मी सगळ्या प्रकारची शैक्षणिक कामे करण्यात पटाईत झालो. तेथे सर्व सहशालेय उपक्रम समारंभपूर्वक साजरे केले जाण्याची पद्धत मला खूप आवडली. कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे अहवाललेखन बर्‍याचदा मला करण्याची संधी मिळाली. मी संधीचे सोने करत गेलो. कंटाळा करणे माझ्या रक्तातच नाही. फक्त आर्थिक बाबतीत कमी पडत आहे हे मुख्याध्यापिका मॅडमांच्या लक्षात आले. कारण मला त्यावेळी १२०० रु. पगार होता. मामांकडे खानावळ ३०० रु. देत होतो. ती कमीच होती. पण मामा मामींनी माझ्याकडे कधी खानावळ मागितली नाही. पण मी त्यांच्याकडे पैसे न देता राहणे मला स्वतःला पटणारे नव्हते. पगार झाला कि मी कणकवली गाठत असे. माझा सगळा पगार मी बाबांकडे देई. मी त्यातील एकही रुपया कधी माझ्याकडे ठेवला नाही. 

          आर्थिक प्रश्न सुटावा म्हणून मॅडमांनी मला शाळेतच वर्ग सुरु होण्याअगोदर एक तास लवकर येऊन जादा क्लास घेण्यास सांगितले. मला क्लाससाठी २० विद्यार्थी मिळाले. प्रत्येकी ३० रु. मासिक फी घेऊन मला महिना ६०० रु. मिळू लागले. मी त्यातील ३०० रु. खानावळ आणि ३०० रु. कणकवली ते रत्नागिरी प्रवास यासाठी वापरुन सगळा पगार जसाच्या तसा घरी कायमच दिला. मामा त्यावेळी कोकणनगरला राहात. मी एक ५०० रुपयांची जुनी लेडीज सायकल घेतली. सायकलनेच मी शाळेत जाऊ लागलो. 

          १५ जून ते नोव्हेंबर १९९६ असे सहा महिने मी तिथे नोकरी केली. मी तिथे काम करताना सहा महिन्यात शिकलेल्या गोष्टींचा मला पुढील जीवनात अजूनही उपयोग होतो आहे आणि होत राहील. मला तिथली नोकरी सोडताना ज्या जोग सरांनी पाठबळ दिले होते , ते म्हणाले ,  " अरे , आम्हांला आता पुन्हा तुझ्यासारखा शिक्षक शोधावा लागणार." आता मी त्या शाळेत नसलो तरी त्या पहिल्या शाळेत म्हटली जाणारी प्रार्थना अजूनही म्हणतो आहे आणि मी जणू त्याच शाळेत असल्याचा मलाच दिलासा देत आहे ...... 


दयासागरा सद्गुणांचा निधी तू , 

सदासर्वदा रक्षी आम्हासी रे तू , 

तुझ्या भक्तिरुपे तुला ओळखावे , 

तुला आठवावे , तुला रे पहावे .


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )





No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...