Wednesday, December 30, 2020

टचस्क्रिन

 टचस्क्रिन        

        मला खरंच कमाल वाटते, पूर्वी लेखनाची साधने नसताना लेखन केले गेले आहे. , कवी, लेखक यांनी जर लेखन केले नसते तर आज जे आपण वाचन करतोय ते आम्हाला वाचायलाच मिळाले नसते. कसा, कधी वेळ काढत होते लिहायला ? आणि असे काही लिहित कि कधी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटत राहाते. संग्रह करावासा वाटतो. अधोरेखित करुन ठेवावी अशी वाक्यरचना. 

          मी लहान असताना मला बाबांनी पेन्सिल दिली आणि हात धरुन लिहायला शिकवले. ताईने अक्षरे गिरवून घेतली. तेच तेच अक्षर गिरवताना ते चुकू नये यासाठी आकाने लक्ष ठेवले. आईने पाटी स्वच्छ पुसून दिली. रात्री घरी आल्यानंतर बाबांनी ती तपासली. पुन्हा पुन्हा हस्ताक्षर सराव करुन घेतला. अक्षर वाचावे असे वाचणार्‍याला वाटावे असा बाबांचा आग्रह. ताईचे मोत्यासारखे वळणदार अक्षर काढण्याचा माझा प्रयत्न असे. तिच्या अक्षराशी तुलना नाही होऊ शकत, पण शाळेत जाण्यापूर्वी मी घरच्या घरी अ, आ, ई काढायला शिकलो. 

          शाळेत जायची मला भिती वाटे. जबरदस्तीने शाळेत पाठवले गेले. मला पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले. मी उठून ताईच्या वर्गात गेलो. ताईने मला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसवले. मग आकाच्या वर्गात गेलो. आकाने मला पहिलीच्याच वर्गात सोडले. मी रडू लागलो. मला आईची आठवण येत होती. मी आवाज वाढवला तरी मला कोणीही घरी सोडायला तयार नव्हते. मग काय गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या वर्गात आणखी इतर मुले माझीच नक्कल करत होती. 

          बाई वर्गात आल्या. मोठ्या आवाजात त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. मी बसलो आपला. पण बाईंना बघून मला आईची अधिकच आठवण येऊ लागली. ' मला आईकडे जायचंय ' असं मला सांगायचं होतं. पण बाईच म्हणाल्या, " बाळा, रडू नको हो. तुला आईकडे जायचंय ना ? थांब हं, मी तुला आईकडे नेऊन सोडते." आता मला धीर आला. मला बाईंमध्ये माझी आई दिसू लागली. मला बरे वाटले. मी वाट पाहू लागलो. आता मला बाई माझ्या आईकडे सोडतील. पण बाईंनी दुसऱ्या मुलांनाही तसेच सांगितले आणि गप्प केले. न मारता , डोळे न वटारता बाईंनी संपूर्ण वर्ग शांत केला होता. 

          काळ्या शहाबादी फरशीवर थंडगार वाटत होते. दोन सुटलेल्या फरश्यांमधील वाळू मला खेळायला मिळाली होती. मी वाळू काढून काढून खेळू लागलो. बाईंचे माझ्याकडे लक्ष नाही हे माझ्या लक्षात आले. मी हळूच दप्तरासह बाहेर पळालो. आता मला ताईकडे किंवा आकाकडे जायचे नव्हते. कारण त्या मला पुन्हा पहिलीच्याच वर्गात सोडणार हे मला कळून चुकले होते. 

          मला वाट माहिती होती. आमचे दुकान शाळेपासून जवळच होते. कणकवली ढालकाठीजवळ आलो. बाबा दुकानात कोणाचीतरी दाढी करत असावेत. मला बघून त्यांचा पारा चढला. अ, आ शिकवताना प्रेमाने जवळ घेऊन शिकवले होते , आता मात्र त्यांनी दुकानातली झाडूच काढली. मला मारण्यासाठी त्यांनी झाडू माझ्यावर नुसती उगारली आणि म्हणाले,  " झिला, तुका मी आता मुगड्यान मारतलंय." मला बाबांचा मार चांगलाच माहिती होता. मी बाबांना हात जोडले आणि मारु नका म्हणून विनवणी करु लागलो. मला त्यांनी मारत मारत शाळेत सोडले. बाईंनाच सांगितले , " बाई , हा तुमचा विद्यार्थी घ्या, आमच्या दुकानात आला होता. शाळा सुटल्याशिवाय याला घरी पाठवू नका. " आता मला बाई मारणार याची मला पुरेपुर खात्री झाली होती. पण उलटच झाले. बाईंनी मला आईसारखे जवळ घेतले. आपल्याकडचा फळ्यावर लिहायचा खडू घेतला आणि म्हणाल्या , " प्रवीण, हा खडू घे आणि फळ्यावर ' अ ' काढ. " मी दोन गोळे काढले आणि एक काठी काढली. दोन्ही गोळ्यांचा अर्धा भाग पुसून ' अ ' तयार केला. मला बाईंनी पाठीवर शाबासकी दिली. त्यानंतर मला त्या तावडेबाईंची भिती वाटेनाशी झाली.

          आता मला हे सर्व आठवतं आणि मलाच माझी गंमत वाटते. सर्वजण यामधून गेले असतील. मोठे लेखक झाले असतील. अनेक पुस्तके लिहिली असतील. आता मी एक साधा उपशिक्षक आहे. बाईंनी मला पहिल्या दिवशी विद्यार्थी म्हणून फळ्यावर लिहायला सांगितले होते. आता मी कायमच फळ्यावर लिहितोय. 

          आज मी जे काही लेखन करतोय, त्यासाठी प्राथमिक शाळेत माझ्यावर झालेले संस्कारच कारणीभूत आहेत. आताची मुले मोबाईल या यंत्रांच्या ' टचस्क्रिन ' वर शिकत आहेत. काहीही झाले तरी मला माझा फळा आणि पाटीच खरी ' टचस्क्रिन ' वाटते. यांची संगत सर्वांनी करायला हवी. नाहीतर काही वर्षांनंतर आपण पेनाने , खडूने लिहायचे विसरुन जाऊ याची मला भिती वाटत राहते. संगणकाचा आणि मोबाईलचा कीबोर्ड आपलासा केलात तरी आपली खरी टचस्क्रिन कधीही विसरु नका. 



© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )





No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...