नेहमी खरे बोलावे
सोमवारी शिरगांवला बीटसंमेलन होते. संमेलन संपल्यानंतर मी एस्.टी. ने कणकवली गाठली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून शाळेत जायच्या तयारीला लागलो. गढिताम्हाणे दादरावाडी शाळा कणकवलीपासून ४५ किलोमीटरवर होती. कणकवलीवरुन पहाटे सहा वाजताच्या रत्नागिरी गाडीने निघावे लागे. आईने माझ्याबरोबर उठून माझ्यासाठी डबा बनवला होता. बाबांनी मला हलवून उठायला सांगितले होते. उठायला सांगितल्यानंतरही मी १० मिनिटे झोपूनच असे. उठून तयारी करण्याचा कंटाळा येई. लवकर उठणे आणि गाडी मिळायला पाहिजे म्हणून घाईघाईने तयारी करताना नोकरीचा वैतागथोर राग येई. पण उठण्याशिवाय पर्याय नसे. अधिक काळ झोपून राहीलो आणि बाबांची पाठीत लाथ बसली तर ! उठून तयारी करुन लगबगीने निघे.
गाडी स्थानकात लागलेली पाहून हायसे वाटे. थंडी असली तरी तिची परवा न करता कसातरी चहा ढोसून माझी स्वारी गाडीत चढे. आता आठवडाभर घरी यायला मिळणार नाही याची जाणीव होऊन रडू येई. पण तोपर्यंत कंडक्टर तिकिट काढायला आलेला असे. विचार करता करता कधी तळेरे स्टँडवर आली ते कळतही नसे.
तिथेही पाटगांव गाडी लागलेली दिसे. त्या गाडीतून गेलो तर फणसगांवला उतरुन पुन्हा तिसरी गाडी पकडावी लागे. आज मला त्या गाडीने जायचा कंटाळा आला होता. मी गढिताम्हाणे गाडी पकडली. मी पळसकाटे येथील धनगरवाडीमध्ये एका घरात राहण्यास सुरुवात केली होती. १० मिनिटे चालून खोलीवर जाऊन फ्रेश झालो. शाळा साडे दहाची होती. आता १० वाजत आले होते. मी डबा घेऊन शाळेकडे पायी निघालो. सड्यावरुन चालत जायला मला अर्धा तास लागे. मला त्याची सवयच झाली होती. पण आज माझी पावले संथ पडत होती. पाऊलवाट खडकाळ आणि उंचसखल होती. मी शाळेकडे १०.२० पर्यंत पोहोचायला हवे होते. पण थोडा उशिर झाला.....
मी यावेळी मुलांकडे शाळेची चावी देऊन ठेवलेली होती. शाळा सड्यावर असल्यामुळे मुले ऊन पावसात बाहेर उभी राहीली तर त्यांना त्रास होऊ नये हा एकमेव उद्देश होता. मी शाळेच्या जवळ आलो आणि बघतो तर काय ? ...... शाळेसमोर एक जीप उभी होती. तिच्यावर ' महाराष्ट्र शासन ' असे लिहिलेले होते. मला तिथे दिवसातून दोनदाच गाडी दिसे. सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता. पुढे गेलो तर शाळेच्या व्हरांड्यात दोन नवीन शुज दिसले. एक लेडीज आणि एक जेन्टस् .
माझ्या शाळेत मी येण्यापूर्वी कोणीतरी साहेब आले आहेत याची मला जाणीव झाली. त्यावेळी मी घाबरलो असलो तरी घाबरल्यासारखे न दाखवता आलेल्या साहेबांना नमस्कार केला. देवगड तालुक्याच्या सभापती मॅडम आणि गटविकास अधिकारी साहेब यांना बघून मी पुरता गांगरुन गेलो होतो. त्यांना बघून मीच शाळेत प्रवेश करताना ' मे आय कम इन साहेब ' असं म्हणून मला वर्गात प्रवेश करावा लागला होता.
१०.३५ वाजता शाळेत आलो होतो. मी आधी मस्टरवर १०.२० ची सही केली. लगेच राष्ट्रगीताची ऑर्डर दिली. प्रतिज्ञा झाली. प्रार्थना घेतली. सुविचार ' नेहमी खरे बोलावे ' मीच सांगितला. सर्व मुलांकडून घोकून घेतला. परिपाठाचे सर्व घटक घेऊन झाले. मुलांनी बरे सहकार्य केले. सायबांनी विचारले , " सर , तुम्ही शाळेत १०.३५ ला आलात आणि सही मात्र १०.२० ची केलीत. सुविचार शिकवताय , नेहमी खरे बोलावे " भिंतीवरील दिशा चुकीच्या लिहिल्या आहेत. सादिल किती मिळाला ? खुर्चीचा एक हात हालतोय...... असे मला निरुत्तर करणारे अनेक प्रश्न विचारले गेले. माझ्या मुलांनी साहेबांशी अतिशय उत्तम प्रकारे संवाद साधलेला होता. पण माझ्या एकवेळच्या उशिरा शाळेत जाण्याने माझ्याबद्दल अधिकाऱ्यांचे चांगले मत झालेले दिसत नव्हते. तिकडे खुर्चीचा हात हलत होता आणि मीही या आकस्मिक भेटीच्या धक्क्याने पुरता हादरुन गेलो होतो. तेव्हापासून कानाला खडा लावला, काहीही झाले तरी आपले विचार आणि आचार यात कधीही गल्लत करायची नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:
Post a Comment